नवीन लेखन...

`ज्ञानकोशकार’ डॉ.श्रीधर व्यंकटेश केतकर

`ज्ञानकोशकार’ म्हणून डॉ.श्रीधर व्यंकटेश केतकर यांच्या नावामागे उपाधी लागली असली तरी त्यांच्या व्यक्तिमत्त्वात पांडित्य आणि विक्षिप्तपणा यांचे अजब मिश्रण होते. श्रीधर व्यंकटेश केतकर हे एक लेखक, समाजशास्त्रज्ञ व विचारवंत म्हणून जेवढे ज्ञात आहेत, त्यापेक्षा ‘ज्ञानकोशकार केतकर’ म्हणून अधिक सुपरिचित आहेत. त्यांचा जन्म २ फेब्रुवारी १८८४ रोजी झाला.समाजप्रबोधनासाठी जीवनभर अत्यंत निर्धारपूर्वक झटलेले व ‘भारतीय जातिसंस्थेचा इतिहास’ या आपल्या अत्यंत अभ्यासपूर्ण पुस्तकाने देशाबरोबरच पाश्चारत्त्य जगातही मान्यता पावलेले व्यक्तिमत्व म्हणजे डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर. एक समाजशास्त्रज्ञ, विचारवंत आणि लेखक म्हणून ते लोकप्रिय ठरले हे खरे, पण ‘ज्ञानकोशकार केतकर’ म्हणून ते विशेष प्रसिद्ध झाले.

डॉ. केतकर यांनी मनाचा निश्चरय करून ज्ञानकोशाचे कार्य पूर्ण करायचेच असा निर्धार जेव्हा केला, तेव्हा सुप्रसिद्ध इतिहास संशोधक वि. का. राजवाडे यांनी आपल्या मनातील रास्त शंका केतकरांपुढे मांडीत म्हटले, ‘हे काम एवढे अवाढव्य आहे की, त्यासाठी एखाद्याची पुरी हयात खर्च होईल.’ डॉ. केतकर यावर स्मितहास्य करीत म्हणाले,‘ प्रयत्न तरी करून पाहूया.’ आणि डॉ. केतकर यांनी आपल्या प्रचंड मेहनतीने हे अपूर्व व असामान्य काम बारा वर्षांत पूर्ण केले व याकामी आपणास सहकारी संपादक म्हणून य. रा. दाते, चिं. ग. कर्वे आदींचे मोलाचे सहकार्य लाभले हेही अत्यंत प्रांजळपणे कबूल केले. श्रीधर व्यंकटेश केतकर यांचे कोकणातील दाभोळजवळील अंजनवेल हे मूळ गाव. त्यांचे वडील पोस्ट खात्यात पोस्टमास्तर होते. वडीलांचे छत्र लहानपणीच नाहीसे झाल्यामुळे आईच्या मदतीने त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. प्राथमिक दुसर्याा इयत्तेपासून प्रवेश मिळेपर्यंत त्यांचे शिक्षण उमरावतीस झाले. तिसरीहून चौथीत जाताना त्यांनी ‘हायस्कूल एंट्रंस’ ही परीक्षा देऊन पहिल्याप्रथमच आपली शालेय चमक दाखवली. नववीत असताना गंमत म्हणून ते दहावीच्या परीक्षेला बसले व अनेक विषयांत उत्तम गुण मिळवून शिक्षकांच्या कौतुकास पात्र ठरले. पुढे व्हर्नाक्युलर स्कॉलरशिप’ च्या परीक्षेत बसून दुसर्यात क्रमांकावर उत्तीर्ण झाले.

शिक्षणाचा ध्यास घेतलेल्या केतकर यांनी अनेक हालअपेष्टांना तोंड देत ते उच्चविभूषित झाले. शिवाय शालेय जीवनात जोपासलेल्या वाचन, कविता करणे, इतिहास, वाङ्‌मय, राजकारण, रोमन कायदा यांत विशेष रस घेणे यांचा फायदा त्यांना त्यांच्या पुढील आयुष्यात झाला. ते इंग्लंडमध्ये सांपत्तिक स्थिती हलाखीची असूनही उच्च शिक्षण घेताना कसे जीवन जगले व शिक्षणाची हौस पूर्ण केली हे समजून घेणे उचित ठरेल. इंग्लंडमध्ये ‘हिंदुइझम’ या तेथे प्रसिद्ध झालेल्या आपल्या ग्रंथावर आणि ‘अथिनियम’ किंवा ‘राजस्थान’ या नियतकालिकात समालोचन करून किंवा लेख लिहून ते आपला उदरनिर्वाह चालवित. पण या पैशांतून भागत नसे. तेव्हा ते दिवसातून एकदाच जेवण घेत. जेवणाला पुरेसे पैसे नसल्यामुळे लंडनमध्ये स्वस्तात स्वस्त जेवण कुठे मिळेल याचे ते ‘तज्ज्ञ’ बनले. ते स्वस्त जेवण जेवण्यास ये-जा करण्यासाठी खिशात आवश्यक पैसे नसल्याने लंडनमध्ये पायी फिरण्याची ‘खास मौज’ ते अनुभवीत. पण आपले हे दैन्य त्यांनी इतरांना दाखवून दिले तर नाहीच, पण त्यामुळे अभ्यासाकडे दुर्लक्ष होऊ नये याची खबरदारीही त्यांनी घेतली.

ऑक्टोबर १९१२ मध्ये उच्चविद्याविभूषित होऊन ते जेव्हा हिंदुस्थानात परतले तेव्हा त्यांच्या जीवनातील खर्याा कार्यास सुरवात झाली. त्याकाळी अनेक हिंदुस्थानी लोक पाश्चाेत्य पदवी संपादून मायदेशी येत व बड्या पगाराची नोकरी मिळवून ऐषारामी जीवन जगत. पण डॉ. केतकर यांनी अनुकरण केले ते रँग्लर अप्पासाहेब परांजपे यांचे. त्यांनी त्यागपूर्वक जीवन जगण्याचा निर्धार केला होता. १९१३-१४ च्या दरम्यान त्यांनी कलकत्ता विद्यापीठात पदवीधर विद्यार्थ्यांना राजकारण व अर्थशास्त्र शिकविण्याचे काम स्वीकारले खरे, पण त्यांच्या सत्य बाण्यामुळे त्यांना नोकरीचा त्याग करावा लागला. येथील वास्तव्यात त्यांनी ‘इंडियन इकॉनॉमिक्स’ हे पुस्तक लिहिले, पण त्यातील सत्यांशामुळे ते विरोधाचे धनी बनले. ‘हिंदू लॉ’ या दुसर्याय पुस्तकात त्यांनी अर्थकारण व समाजनियमन या दोन क्षेत्रांतील विचारांना चालना दिली. शिवाय सामाजिक, राजकीय विषयांवर अभ्यासपूर्ण लेख लिहून समाजमन जागृत करण्याचे काम केले. या वेळपर्यंत त्यांची परिपक्व झालेली परिस्थिती आणि कर्तबगार व्यक्तींचे प्रयत्न यांची सांगड पडली की त्यातून मोठी कार्ये उभी राहत असतात याची पूर्ण जाणीव झाली आणि त्यांनी ‘ज्ञानकोशा’च्या भव्य दिव्य कार्यात स्वतःला अक्षरशः झोकून दिले. तोपर्यंत तेलगू, बंगाली, हिंदी, गुजराथी, ऊर्दू यांसारख्या भारतीय भाषांत ज्ञानकोश तयार झाले होते.

केतकरांनी ‘मराठी’ ज्ञानकोशाचा ध्यास घेतला. १९१५ च्या ऑगस्टमध्ये त्यांनी सर्वप्रथम ज्ञानकोशाची कल्पना मांडली व आर्थिक अडचणींवर मात करीत असंख्यांचे असंतोष मनात साठवित व असंख्यांचे सहकार्य घेत बारा वर्षांनी त्यांनी हा ज्ञानकोश तयार केला. त्यांच्या या अद्वितिय कार्याची पावती देत त्यांच्या चाहत्यांनी त्यांच्या ‘श्रीधर व्यंकटेश केतकर’ या नावाऐवजी त्यांना ‘श्रीधर व्यंकटेश ज्ञानकोशे’ असे संबोधून त्यांचा गौरव केला. श्रीधर व्यंकटेश केतकर यांचे १० एप्रिल १९३७ रोजी निधन झाले.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ :- इंटरनेट

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4228 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..