
लेखक म्हणून पुस्तक लिहिणं ही एक गोष्ट आहे आणि ते पुस्तक कोणीतरी मनापासून वाचताना स्वतःच्या डोळ्यांनी पाहणं ही त्याहून मोठी गोष्ट आहे.
मी नोकरीनिमित्त अमरावतीला असतो. सुट्टी मिळाली की मन आपोआप गावाकडे ओढ घेतं. गाव म्हणजे फक्त एक ठिकाण नाही, तर मनाला विसावा देणारी जागा असते. असाच एक दिवस सुट्टीच्या निमित्ताने गावाकडे जाण्यासाठी मी ट्रेन पकडली.
स्टेशनवर पोहोचलो तर नेहमीपेक्षा जरा जास्तच गर्दी होती. ट्रेन आली आणि डब्यात चढण्यासाठी अक्षरशः धावपळ सुरू झाली. कसाबसा गर्दीतून वाट काढत मी ट्रेनमध्ये घुसलो. आत शिरलो खरा; पण आता पुढचा प्रश्न होता ..बसायला जागा कुठे मिळणार?
डब्यात सगळ्या जागा भरलेल्या होत्या. कुठे एखादी सीट रिकामी होते का, कुणी उठतंय का, याचा अंदाज घेत मी नजर फिरवत होतो. पण जागा मिळण्याची काहीच चिन्हं दिसत नव्हती.
मग विचार केला, “चला, आजचा प्रवास उभ्यानेच करायचा.”
आणि तेवढ्यात माझी नजर एका प्रवाशाकडे गेली.
तो शांतपणे माझंच पुस्तक वाचत होता.
‘चार लोक काय म्हणतील’!
क्षणभर माझा विश्वासच बसला नाही.
गर्दीच्या त्या डब्यात, शेकडो अनोळखी माणसांमध्ये, माझं पुस्तक कुणीतरी हातात घेऊन वाचत होतं.
त्या क्षणी मला बसायला जागा मिळाली नाही याचं दुःख कुठल्यातरी क्षणी विसरून गेलो.
मी त्याच्याजवळच उभा राहिलो.
तो पुस्तक वाचण्यात इतका रमला होता की त्याला माझं तिथे उभं राहणंही कदाचित जाणवलं नसेल. काही वेळाने त्याने पुस्तकातून नजर वर केली. आमची नजरानजर झाली.
मी सहज विचारलं,
“पुस्तक कसं वाटतंय?”
त्याने पुस्तक हातात घेत माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाला,
“खूप छान आहे. काही गोष्टी अगदी आपल्या आयुष्यातल्याच वाटतात.”
मी फक्त हसलो.
मला त्याला सांगावंसं वाटत होतं की “हे पुस्तक मीच लिहिलं आहे.”
पण त्या क्षणी स्वतःची ओळख सांगण्यापेक्षा, एक सामान्य वाचक म्हणून त्याचं मत ऐकावं असं मला वाटलं.
मग आमच्या गप्पा सुरू झाल्या.
तो पुस्तकाबद्दल बोलत होता. काही प्रसंग त्याला का आवडले, काही विचार त्याच्या मनाला कसे भिडले, आजच्या समाजात आपण इतर लोक काय म्हणतील या भीतीने किती निर्णय घेतो, यावर आमची चर्चा सुरू झाली.
मी त्याचं बोलणं ऐकत होतो आणि मनात एक वेगळीच भावना निर्माण होत होती.
लेखकासाठी पुरस्कार, सत्कार, सन्मान महत्त्वाचे असतात; पण आपलं पुस्तक एखाद्या अनोळखी माणसाच्या हातात दिसणं आणि तो ते मनापासून वाचत असल्याचं पाहणं— याची किंमत काही वेगळीच असते.
त्या दिवशी ट्रेनमध्ये मला सीट मिळाली नाही.
पण मला त्यापेक्षा खूप मोठी गोष्ट मिळाली—
एक वाचक.
तो वाचक माझ्यासाठी त्या दिवसाचा सर्वात सुंदर योगायोग होता.
आपण लेखक म्हणून अनेकदा विचार करतो—आपण लिहिलेलं कोण वाचेल? आपल्या शब्दांचा कोणाच्या मनावर परिणाम होईल? आपली पुस्तकं लोकांपर्यंत पोहोचतील का?
पण त्या दिवशी गर्दीने भरलेल्या ट्रेनमध्ये मला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली.
माझ्या पुस्तकाला एका अनोळखी प्रवाशाच्या हातात पाहून मला जाणवलं—
लेखकाची खरी कमाई पुस्तकांच्या विक्रीत नसते; ती त्याच्या शब्दांना आपलंसं करणाऱ्या वाचकांच्या मनात असते.
गावाकडे जाणारा तो प्रवास माझ्यासाठी फक्त एक प्रवास राहिला नाही.
त्या दिवशी ट्रेनमध्ये जागा शोधता शोधता मला एक असा माणूस भेटला, ज्याने माझ्या लेखणीला आणखी लिहिण्याची प्रेरणा दिली.
कदाचित त्याला माहीतही नसेल की त्या काही मिनिटांच्या गप्पांनी एका लेखकाच्या मनात किती मोठा आनंद निर्माण केला होता.
आजही तो प्रसंग आठवला की मनात एकच विचार येतो—
“कधी कधी प्रवासात सीट मिळत नाही… पण आयुष्यभर लक्षात राहील अशी माणसं नक्की भेटतात.”
आणि त्या दिवशी मला सीट मिळाली नाही,
पण माझं लिखाण खरंच कोणाच्या तरी आयुष्यापर्यंत पोहोचलं आहे, याचा विश्वास मिळाला.
हीच एका लेखकासाठी सर्वात मोठी कमाई आहे.
– निलेश सु कवळे (सुपुत्र)
©️®️2026Nileshkawale


Leave a Reply