नवीन लेखन...

गोडधोड खा, पण विचाराने



दिवाळीसाठी विविध वस्तूंच्या खरेदीबरोबर तयार मिठाईला मागणी असते. शिवाय गोडधोड पदार्थ आवर्जून बनवले जातात. साहजिकच दूध, दही, चक्का, खवा यालाही मोठी मागणी असते. या परिस्थितीचा गैरफायदा उठवत बाजारात भेसळयुक्त खवा बाजारात आणला जात आहे. राज्यात आतापर्यंत भेसळयुक्त खव्याचा मोठा साठा जप्त करण्यात आला. त्यामुळे यावेळी दिवाळीचे गोडधोड पदार्थ खाताना जरा विचारच करायला हवा.दिवाळीचा उत्साह आता शिगेला पोहोचला आहे. कपडे तसेच जिवनावश्यक वस्तूंची खरेदी आटोपत आली आहे. आता अनेकजण पाडव्याच्या सुमुहूर्तावर करावयाच्या खरेदीबाबत विचार करत असतील. याचबरोबर या खास सणासाठी कोणते गोडधोड पदार्थ करायचे याचाही विचार महत्त्वाचा ठरतो. तसेही आजकालच्या इन्स्टंट जमान्यात तयार खाद्यपदार्थांवर अधिक भर दिला जात आहे. त्यामुळे दिवाळीच्या सणाच्या निमित्ताने मिठाईला मोठी मागणी असते. तरिसुध्दा घरी आवर्जून खाद्यपदार्थ बनवणार्‍यांची संख्या काही कमी नाही. त्यामुळे या दिवसात दूध, दही, चक्का, खवा यांची मागणी अधिक असते. याच परिस्थितीचा काही व्यावसायिकांकडून गैरफायदा घेतला जातो. त्यातून ऐन सणासुदीच्या काळात बाजारात भेसळयुक्त पदार्थ दाखल होतात. अर्थातच असे पदार्थ मानवी आरोग्यासाठी घातक ठरतात. पण याचा विचार कोण करणार, असा प्रश्न आहे. या पार्श्वभूमीवर यावेळच्या दिवाळीवर दूधातील आणि खव्यातील भेसळीचे सावट दिसून येत आहे. गेल्या काही महिन्यात दुधातील भेसळीचे विविध प्रकार उघडकीस आले होते. फलटणमधील असे रॅकेट उघड झाल्यावर नगरमध्ये असेच प्रकार समोर आले. त्यामुळे ऐन सणासुदीच्या काळात भेसळयुक्त दूध पदरात पडणार का अशी शंका भेडसावत असतानाच राज्यात विविध ठिकाणी भेसळयुक्त खव्याचा मोठा साठा आढळून आला. पुण्याबरोबरच धुळे आणि बीडमध्ये जप्त करण्यात आलेल्या खव्याचे वज
तब्बल 6300 किलो आहे. अर्थात भेसळ प्रतिबंधक पथकाच्या तावडीतून सुटलेला किती खवा बाजारात दाखल झाला असेल याची कल्पनाच केलेली बरी.या भेसळयुक्त खव्याची आवक गुजरातमधून

झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या

खव्याची किंमत बाजारभावापेक्षा कमी असल्याने बर्‍याच व्यापार्‍यांनी त्याची खरेदी केली. आता भेसळयुक्त खव्याच्या तपासणीची मोठी मोहिम आखल्याने राज्यभरातील मिठाई विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे. विशेष म्हणजे असा खवा सहज ओळखू येत नसल्याने ती चिंताजनक बाब ठरत आहे. अशा भेसळयुक्त खव्याची मिठाई खाल्ल्याने संबंधितांचा जीव धोक्यात येऊ शकतो असेही सांगितले जात आहे. त्यामुळे ग्राहकांमध्येही चिंतेचे तसेच घबराटीचे वातावरण दिसून येत आहे. वास्तविक जीवनावश्यक वस्तूतील भेसळ ही नवी बाब नाही. पण आता या समस्येची व्याप्ती अधिक वाढू लागली आहे. शिवाय भेसळीत अनेक घातक घटकांचा समावेश केला जाऊ लागला आहे. पूर्वी दुधामध्ये केवळ पाणी मिसळले जायचे. त्याबाबतही सातत्याने तक्रारी येत होत्या. पण, त्यातून या प्रकाराला फारसा आळा बसला नाही. नंतर त्या ठिकाणी दुधाच्या पावडरचा उपयोग करण्यात येऊ लागला. आता घातक रसायनांचा वापर करून दुधात भेसळ करण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. हे कमी म्हणून की काय नफेखोरांनी सिंथेटीक दुधाचा शोध लावला. असे दूध महाराष्ट्रासह, राजस्थान, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, कर्नाटक आणि ओरिसा या राज्यांमधून तयार केले जाते. या दुधात युरिया, कॉस्टिक सोडा, रिफाईंड तेल, शॅम्पू, डिटर्जंट पावडर यांचा वापर केला जातो. असे दूध तयार करण्याचा प्रती लीटर खर्च फक्त तीन रुपये आहे. पण, हेच दूध प्रती लीटर वीस ते पंचवीस रूपये दराने विकले जाते. अलीकडे दूध काढणे सुलभ जावे म्हणून गाई-म्हशींना ऑक्सिटोक्सीनचे इंजेक्शन दिले जाते. या इंजेक्शनमुळे जनावरांना दूध स
ुटणे शक्य होते परंतु या दुधात, हाडे, रक्त आणि हार्मोन्सचाही अंश असतो. हे घटक मानवी शरीरासाठी धोकादायक आहेत. त्यांच्या सेवनाने अपचन, गॅस, कफ, अॅसिडीटी तसेच पोटाचे विकार होण्याचा धोका असतो. हे लक्षात येऊनही हा प्रकार थांबवला जात नाही. राज्यात दुधाचा व्यवसाय मोठा आहे. एवढेच नव्हे तर देशातील सर्वाधिक दुग्धोत्पादन करणारे राज्य म्हणून महाराष्ट्राचा उल्लेख केला जातो. राज्यात सुमारे 300 सहकारी आणि खासगी दूधसंस्थांकडून दररोज 80 लाख ते एक कोटी लीटर दुधाचे संकलन केले जाते. त्यापैकी एकट्या पुणे शहरात 14 लाख लीटर तर मुंबईत 44 लाख लीटर दुधाची विक्री होते. भेसळीची सुरूवात जनावरांच्या गोठ्यापासून होते. तेथे दूध काढल्यानंतर प्रथम पाणी मिसळले जाते. नंतर दुधाची घनता वाढवण्यासाठी युरिया मिसळला जातो. प्रामुख्याने सहकारी संस्था असे दूध खरेदी करतात. याचे कारण या संस्था म्हणजे पुढार्‍यांची कुरणे असतात. मतांच्या राजकारणासाठी दूध उत्पादकांना खूष ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे दूध कसेही असले तरी त्याची खरेदी होते. असे दूध सहकारी संस्थांकडे आल्यानंतर तेथे पुन्हा घनता वाढवण्यासाठी त्यात पावडर, पामतेल आणि युरियाचा मारा केला जातो. अशा पध्दतीने भरपूर भेसळ केलेले दूध ग्राहकांच्या माथी मारले जाते. विशेष म्हणजे या सार्‍या प्रकारांपासून अनभिज्ञ असणारी जनता अशा दुधाचे सेवन करते.राज्यात दुधाचे उत्पादन अधिक होत असल्याने त्याच्या प्रक्रिया उद्योगाला मोठी चालना मिळत आहे. त्यातून दुग्धजन्य पदार्थ तयार करणार्‍यांची संख्याही वाढली आहे. वास्तविक आपल्याकडे दुधापासून खवा तयार करण्याचा व्यवसाय अनेक वर्षांपासून केला जातो. राज्यातील काही गावे तर या व्यवसायासाठीच प्रसिध्द आहेत. या गावातील खव्याची तालुका, जिल्हा तसेच अन्य मोठ्या शहरांमधून विक्री केली जाते. मात
र, आजही हा व्यवसाय निष्ठेने करणार्‍यांची संख्या मोठी आहे. मात्र, शेजारच्या राज्यातून भेसळयुक्त खवा येत असल्याने याही व्यावसायिकांकडे संशयाने पाहिले जाऊ लागले आहे. अर्थात परराज्यातील खव्याला मागणी प्राप्त होण्याचे कारण म्हणजे ऐन सणासुदीच्या काळात ग्राहकांची मागणी पूर्ण करु शकेल इतक्या खव्याचे उत्पादन आपल्याकडे होत नाही. मग खव्याची मागणी आणि उत्पादनातील तूट

भरून काढण्यासाठी व्यापारी अन्य राज्यातून खवा मागवतात. मात्र, त्याच्या दर्जाविषयी

कोणतीच खात्री देता येत नाही अशी परिस्थिती आहे.खरे तर कोणतीही भेसळ मानवी आरोग्यासाठी हितकर ठरत नाही. त्यामुळे भेसळ करणार्‍यांचा शोध घेऊन त्यांच्यावर योग्य कारवाई करता यावी यासाठी अन्न आणि औषध प्रशासन या स्वतंत्र विभागाची निर्मिती करण्यात आली. मात्र, या खात्यातील अधिकार्‍यांकडून कधी तरी कोठे तरी भेसळयुक्त पदार्थांच्या साठ्यावर छापा टाकला जातो. सबंधितांवर खटले भरले जातात, पण पुढे त्याचे काय होते हे कोणालाच उमगत नाही. वास्तविक अन्नधान्यातील भेसळीवर लक्ष ठेवणे हे या विभागाचे प्रथम कर्तव्य ठरते. पण शेवटी या खात्याच्या कारभारावर सत्ताधार्‍यांचे नियंत्रण असते. त्यातून बहुतांश वेळा भेसळीचे प्रकरण उघडकीस आले तरी ते दडपण्याचाच प्रयत्न होतो तर काही वेळा अर्थपूर्ण तडजोडीही केल्या जात असल्याची शक्यता अधिक आहे. पण हा सर्वसामान्य जनतेच्या आरोग्याशी घातक खेळ आहे याची जाणीव कोणालाच नसते किबहुना असली तरी स्वत:च्या फायद्यासाठी त्याकडे सोयिस्कर दुलर्क्ष केले जाते. (अद्वैत फीचर्स)

— मनोज मनोहर

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..