नवीन लेखन...

गृहिणींना विश्रांतीची घंटाच नाही !

नुकताच ८ मार्च रोजी जागतिक महिलादिन सर्व जगभर मोठया उत्साहाने साजरा करण्यात आला. परंतू त्यात भारतासारख्या अनेक पुरुषप्रधान देशातील पुरुषांचा सहभाग किती होता? आणि नसल्यास सर्व स्त्री-पुरुषांनी नक्कीच आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे. असो.आपण सर्वांनी विद्यार्थीदशेत आणि सद्य जीवानात पदोपदी विश्रांतीची घंटा नक्कीच अनुभवली असेल. परंतू विश्रांती घंटेचा अर्थ प्रत्येकाने त्याच्या आत्ता पर्यंतच्या अनुभव व समजुती प्रमाणे काढला असेल. परंतू मला भावलेला अर्थ पुढील प्रमाणे आहे. रबरी फुगा किंवा रबर बँड जास्त ताणला तर अनुक्रमे फुटतो किंवा तुटतो. म्हणजेच कुठलीही प्रसरण पावणारी लवचिक वस्तू जास्त ताणली तर तुटते. स्त्रियांचेही तसेच आहे. गृहिणींना नैसर्गिकरीत्याच देवाने खुपच शोशिकता दिली आहे याचा अर्थ असा नाही की त्यांना विश्रांतीच्या घंटेची गरजच नाही. पण…..!

प्रथम कुठलीही गृहिणी मग ती गावातील असो की शहरातील. राज्यातील असो की देशातील, प्रथम ती एक स्त्री/महिला आहे व आपण सर्व तिच्याकडे एक मुलगी, बहीण, आई आणि पत्नी अश्या नजरेने बघणे अपेक्षित आहे. परंतू आजच्या घडीला निदान राज्यात किंवा आजूबाजूला घडणाऱ्या भृणहत्या, नराधमांचे एका स्त्रीवर एकामागोमाग बळजबरीने होणारे बलात्कार आणि त्यातून कानावर पडणाऱ्या आर्त किंकाळ्या, लग्न करण्यास नकार दिल्याने अंगावर फेकले गेलेले अॅसिड किंवा अमर्याद सुडाने पेटून स्त्रीचा केलेला खून, हे सगळे कश्याचे प्रतिक आहे? अश्या स्त्रीला समाज खरोखर एक आई, बहीण आणि पत्नी म्हणून नीट वागवत नसेल किंवा बघत नसेल तर त्या स्त्रीचे जगणे ते काय आणि तिच्या जीवनात विश्रांतीच्या घंटेची काय कथा? पण बरीच व्यथा ! असो.

येथे मला गृहिणीचा अर्थ जरा वेगळ्या तऱ्हेने मांडायचा आहे आणि त्याला तशी कारणही आहेत ती पुढे दिलेल्या उदाहारणांवरून अनुभवास येतील, आठवतील व पटतील असा मला ठाम विश्वास आहे. गृहिणी म्हंटले की आपल्या नजरे समोर फक्त एकच व्यक्ती उभी राहते आणि ती म्हणजे घरात राबराब राबणारी बाई. मग त्यामध्ये मुलगी, आई, पत्नी वगैरे. जसे जग बदलत गेले, विकास होत गेला तश्या काही व्याख्या व अर्थ बदलत गेले तसे गृहिणी या शब्दाचे झाले आहे असे वाटते. कारण गृहिणी म्हणजे ऑफिसला न जाणारी, व्यवसाय न करणारी, घरात सर्वकाही आपमानासकट सहन करून, टक्केटोणपे खाऊन, काबाडकष्ट करून जगणारी स्त्री.

इंधनाची बचत म्हणजे इंधन निर्मिती याच तत्वाप्रमाणे गावाकडच्या काही गृहिणी स्वत:च्या शेतात राबताना दिसतात. म्हणजेच एका मजुराची मजुरी नक्कीच वाचवतात. एका अर्थाने आर्थिक बचत करून पैसे कामाविण्यासारखेच आहे पण तरीही त्या गृहिणी आहेत.

काही गृहिणींवर घरातील कर्ता पुरुष अचानक जाण्याने दुर्दैवी प्रसंग गुदरतो आणि मुलाबाळासकट घरातील सर्व मंडळींची जबाबदारी व आर्थिक संकट समोर येऊन ठेपते. अश्या वेळेस मिळेल ते काम आणि मोलमजुरी करून दिवस ढकलावे लागतात आणि त्यात विश्रांतीची घंटाच नसते. एकच उद्दिष्ट ‘काम ऐके काम’ करत राहावे लागते. तिच्या स्वत:च्या तब्बेतीकडेही लक्ष द्यावयास वेळ मिळत नाही. कधी अर्धपोटी तर कधी उपाशीपोटी पाणी पिऊन दिवस काढण्याची वेळ येते. शासनाने अश्या गृहिणींसाठी कुटिरोद्योगास चालना दिली आहे. घरकाम आणि घरच्यांची मर्जी सांभाळून महिला बचत गटापासून ते अनेक व्यवसाय त्या उत्तमरीत्या सांभाळतात आणि संसारासाठी आर्थिक मदत करतात तरी त्या गृहिणी आहेत.

परंतू काही गृहिणी या विरुद्धही वागताना दिसतात. काही गृहिणींना दुपारचा फावला वेळ असतो त्यात मुलांचा अभ्यास घेणे, चांगले चुंगले करू खाऊ घालणे, मुलांच्या आरोग्याची काळजी घेणे असे करता येऊ शकते. परंतू काही गृहिणी आपला अमूल्यवेळ कीटीपार्टी व आपली व्यसने पुरी करण्याकडे घालवतांना दिसतात असे दुर्दैवाने म्हणावेसे वाटते. याने गृहिणीचे संसारातील लक्ष उडते आणि मग नवराबायकोत कुबुरी सूर होऊन प्रकरण डिव्होर्स किंवा काडीमोड पर्यंत जाते यामुळे संसाराचा गाडा एकट्या गृहिणीलाच कसाबसा रेटावा लागतो. यात सांगा कुणाचे चुकले? बिचाऱ्या मुलाबाळांचा काय दोष?

याच्या उलट बऱ्याच वेळा असे बघण्यात आले आहे की गृहिणीला घरातील सर्व कामांबरोबर इतरही कामे करावी लागतात. जसे रेशन आणि भाजी आणणे, बँकेचे व्यवहार सांभाळणे व मुलांचा अभ्यास घेणे वगैरे. पण याचे कोणालाच सोयर सुतक नसते. संसार हा दोघा नवराबायाकोचा असतो. दोघांनीही त्यात रस घेऊन एकमेकांना मदत केली तर नक्कीच त्यात आनंद बहरून येतो. संसाराच्या वेलीला चांगली रंगीबेरंगी मधुर फळे व विविध आकार रंग व सुगंधी फुले येतात व स्वत:च हातभार लावतात. परंतू बऱ्याच ठिकाणी असे बघण्यात येते की घरातील माणसे त्या स्त्रीला जरा विश्रांती घे असे स्वत:हून कधीही म्हणत नाहीत. नवराबायकोने समजून वागले तर एकटया गृहिणीवर संसाराची जबाबदारी पडणार नाही आणि संसार नक्कीच सत्य, प्रेम व आनंदाने बहरून जाईल यात वाद नाही.

देशात व राज्यात शिक्षण, विज्ञान तंत्रज्ञान, राजकारण, समाजकारण व संस्कृती यामध्ये एवढी प्रगती झाली तरी बऱ्याच ठिकाणी आपण जुन्या बुरसटलेल्या धर्म, रुढी, प्रथा, परंपरा किंवा अंधश्रद्धा यांना चिकटून आहोत. काही समाजातील माणसांमध्ये गृहिणींबद्दल एवढा आकस आहे की तिला नेहमी घालूनपाडून बोलणे, टोमणे मारणे, हुंड्यासाठी जाळणे, जीवघेणे असे प्रकार होताना दिसतात. कदाचित हा पुरुषी न्यूनगंड आणि आत्मगंड असेल पण तो चुकीचा आहे. एकूणच बऱ्याच वेळा गृहिणींना गृहीत धरले जाते आणि एक भोग्यवस्तू ह्या दृष्टीने बघितले जाते. त्यासाठी प्रथम पुरुषांनी स्त्रीकडे बघण्याची मानसिकता बदलायला पाहिजे. एकविसाव्या शतकात ही खेदाची आणि लाजिरवाणी गोष्ट आहे. सर्वांनी याचा निषेध करावा असे यानिमित्ताने म्हणावेसे वाटते. स्त्रीही क्षणाची पत्नी व अनंतकाळाची माता आहे ह्याची बऱ्याच वेळा जाणीव नसते आणि ती आठवण करून द्यावी लागते यासारखे दुर्दैव ते काय?

परंतू सध्याच्या काळात गृहिणींत सबलीकरणाची आणि आत्मबल वाढविण्याची अत्यंत आवश्यकता आहे. चांगले शिक्षण, आरोग्य आणि स्वसंरक्षण याची गरज आहे. संसाराचा गाडा हाकण्यासाठी जर त्याची दोन चाकं (नवरा-बायको) सर्वार्थाने सशक्त व मजबूत असतील तर सर्व शक्य आहे. परंतू होते कसे की संसाराचा गाडा हाकतांना स्त्री आणि पुरुष अशी दोन समांतर धावणारी बैलगाडीची किंवा रथाची चाक न राहता सायकलच्या मागच्या चाकासारखी स्त्रीची/गृहिणीची परिस्थिती होते. सायकलच्या मागच्या चाकावरच नेहमी जास्त भार पडतो आणि ते चाक पंक्चर होते. मागच्या चाकाला पुढचे चाक आणि हॅनडल जिकडे वळले त्या दिशेने जाणे भागच पडते. मागच्या चाकाच्या कॅरियरवर वजनी बोजा ठेवला जातो. पुढचे चाक मागच्या चाकाचा विचार न करता त्याला फरफटत पुढे नेते.

अस म्हणतात की ‘यशस्वी पुर्षांच्या जीवनात चांगल्या गोष्टी घडण्यामध्ये स्त्रीचा मोठा सहभाग आणि मदत असते’ पुर्षांच्या वाईट कार्याला स्त्रिया कधीच संमती देत नाहीत आणि देणार नाहीत. यापुढे नक्कीच घराघरात गृहिणीला हक्काच्या विश्रांतीची घंटा वाजण्याची वाट पहावी लागणार नाही. परमेश्वर सर्वांना सुबुद्धी देवो व प्रत्यके गृहिणीच्या घरात प्रयत्न न करता आपोआप वाजणारी विश्रांतीची घंटा वाजो.

जगदीश पटवर्धन, बोरिवली (प)

— जगदीश पटवर्धन

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..