नवीन लेखन...

कालाय तस्मै नमः

पुर्वीच्या काळी घराघरात रेडियो ऐकला जायचा. काळ बदलला, पुढची पिढी आली तसे रेडियोच्याही पुढच्या पिढीचे आगमन झाले. पिढीदरपिढीगणिक नवनवीन गोष्टी येतात, जुन्या गोष्टी बदलतात, त्याचप्रमाणे टेलिव्हीजन नामक रेडीयोच्या पुढील जनरेशननेही लोकांच्या आयुष्यात बदल घडवुन आणला . काम करता करता रेडियो ऐकणे शक्य व्हायचे , तसे टीव्हीचे नाही . त्यासाठी काम सोडुन त्याच्यासमोर बसावे लागते. आमच्या लहानपणी ‘ टेलिव्हिजन शाप की वरदान ‘ या विषयावर दहावीला निबंध असायचा. साठीला आलेल्या शिक्षकाकडे पेपर तपासायला गेला की टेलिव्हिजन वरदान नसुन शाप आहे , असे लिहिणार्‍या निबंधाला जास्त मार्कस पडायचे. तर विशीच्या नवीनच नोकरी लागलेल्या शिक्षकाकडे पेपर गेला तर टेलिव्हिजन शाप नसुन वरदान आहे , असे लिहिणार्‍या निबंधाला जास्त पडायचे. यात विद्यार्थीवर्गाची चांगलीच गोची व्हायची. हा धोका माझ्या वेळीच लक्षात आला आणि मी या विषयावर निबंध लिहायचे टाळुन ‘ सत्यम शिवम सुंदरम ‘ या विषयावर निबंध लिहिला. ( माझ्या बर्‍याच मित्रांनी या विषयात झीनत अमान विषयी लिहिले, पण हा निबंध झीनत अमानवर नसुन गांधीजींवर लिहायचा होता ) असो. हळुहळु टिव्हीमधेही अनेक बदल होत गेले,नवीन नवीन चैनल्स आले , चोवीस तास न्युज चैनल नावाच्या प्रकाराचा जन्म झाला . सुरुवातीला सातच्या बातम्या या प्रकाराला सरावलेल्या आम्ही चोवीस तास बातम्या काय दाखवणार ? याची चर्चा करायचो. हळुहळु या सर्व चर्चा मागे पडल्या आणि न्युज चैनल या प्रकाराने आपला पाय टिव्हीविश्वात भक्कमपणे रोवला .

पुर्वीच्या काळी चैनल्सची सुरुवात ही सकाळी सव्वापाचला होत असे. आजकाल ही सगळी न्युज चैनल चोवीस तास . त्यामुळे चैनलची सुरुवात म्हणजे आपली झोपेतुन उठण्याची वेळ असे आपण ठरवावे. सर्व न्युज चैनलची सुरुवात ही भक्तीरसाने होते . वेगवेगळे महाराज , ज्यांची नावेपण आपण कधी ऐकली नसतात , ती या चैनल्सवर ब्रम्ह , जीवन किंवा अध्यात्मिक प्रतीरोध अशा अत्यंत दुर्बोध विषयावर बोलत असतात . समोर प्रेक्षकगण माना डोलावत असतात . त्यांचे एकसुरी निरुपण ऐकुन आपल्याला झोप येते . त्यामुळे हे कार्यक्रम कदाचित रात्रपाळी करुन आल्यावर लोकांना शांत झोप येण्यासाठी लावत असावेत , अशी एक शंका माझ्या मनात आली. काही चैनल्सवर योगासने चालु असतात . ती मात्र आपण फक्त बघायची असतात . त्याप्रमाणे आपण करायला गेल्यास आपले हातपाय विचित्र अवस्थेमधे अडकुन बसतात , हा माझा स्वानुभव आहे.अत्यंत धोकादायक स्टंट्स केल्यावर ” हे स्टंट्स प्रोफेशनल लोकांनी सुरक्षिततेची सर्व साधने वापरुन केलेले आहेत , लोकांनी अनुकरण करण्याचा प्रयत्न करु नये ” अशी पट्टी खाली येते , तशी पट्टी योगाच्या कार्यक्रमात दाखवायला हवी असे माझे मत आहे.

या सर्व न्युज चैनलवर बघण्यासारखी कोणती गोष्ट असते , तर ती त्यावरील निवेदिका. या मात्र अत्यंत सुंदर असतात. त्यांचा मेकप अत्यंत व्यवस्थित असतो. मात्र बातम्या सांगताना त्यांच्या चेहेर्‍यावर कुठल्याही प्रकारचे हावभाव नसतात. कुणाला पुरस्कार मिळाल्याची बातमी जितक्या निर्विकारपणे त्या सांगतात , त्याच निर्विकारपणे कुणाचे निधन झाल्याचीपण सांगतात . आदला जन्म संताचा घेतल्यानंतर कदाचित पुढल्या जन्मी त्या निवेदिका बनत असाव्यात . संतांच्या वागण्यात निर्विकारपणा असायचा , यांच्या चेहेर्‍यात असतो. सहा महिन्यापुर्वीच एकदा एका नविन चालु होणार्‍या न्युज चैनलच्या निवेदिकेसाठी जाहिरात आली , ती अशी

” अडिचशे कोटी टर्नओव्हर असणारा क्ष ग्रुप न्युज चैनलच्या व्यवसायात पदार्पण करीत आहे . या नवीन चालु होणार्‍या न्युज चैनलसाठी निवेदिका हव्यात . वय वर्षे वींस ते पंचवीस. दिसायला सुंदर हव्यात . भाषेचे उत्तम ज्ञान हवे. संपर्क करा . “ पुढे एक मोबाइल नंबर दिला होता . आता विचार करा , ही जाहिरात “ मिस इंडीया स्पर्धेसाठी स्पर्धक हवेत “, यासाठीपण चालली असती. जागतिक घडामोडींचे चांगले ज्ञान हवे, अशी त्यांना मुळीच आवश्यकता नव्हती .

आजकाल कुठल्याच न्युज या नुसत्या न्युज नसतात , तर त्या ब्रेकींग न्युज असतात. कुठलीही न्युज घ्या , ब्रेकींग न्युज . आता ही ब्रेकींग न्युज म्हणजे काय ? हा प्रश्न मी माझ्या न्युज चैनलमधे काम करणार्‍या मित्राला विचारला . तेव्हा त्याने ” हार्ट ब्रेक करणारी न्युज म्हणजे ब्रेकींग न्युज” असे उत्तर दिले. मराठीत त्याला ” आतडे पिळवटुन टाकणारी बातमी “असे म्हणतात , हेही त्याने मला सांगितले. त्याच दिवशी संध्याकाळी ”मुंबईच्या आयएएस अधिकार्‍याचा कुत्रा गेस्ट्रोने आजारी , रुग्णालयात दाखल , ” अशी ब्रेकींग न्युज ऐकुन आतडे खरोखर पिळवटुन निघाले.
या चैनल्सवर काही नेत्यांच्या सतत मुलाखती चालत असतात . हा मात्र खरोखर विनोदी प्रकार असतो . उदाहरणार्थ , एका न्युज चैनलवर य या नेत्याची मुलाखत चालु आहे . हे चैनल स्वतःला सर्वोतम असे म्हणवुन घेते.
निवेदक – आज आपल्या या वाहिनीवर राज्याचे तरुण तडफदार नेते मिस्टर य आपल्याकडे आलेले आहेत. त्यांच्या या अत्यंत बिझी शेड्युलमधुन त्यांनी ही एक्सक्लुजिव मुलाखत फक्त आपल्या चैनलला दिली आहे. पुन्हा एकदा, ही एक्सक्लुजिव मुलाखत फक्त आपल्या चैनलवर आहे. कारण आम्ही सर्वोत्तम आहोत.
( साहेबांवर कैमेरा ) सर , राज्याच्या सद्यपरिस्थितीबद्दल आपले मत काय ?
य – सरकार बदल केल्याशिवाय ही परिस्थिती बदलणार नाही. ( मिस्टर य हे विरोधी पक्षात आहेत हे आपल्या लक्षात आले असेलच )
निवेदक – पण सर , यापुर्वी पाच वर्षे आपण सत्तेत होतात ?
य – त्या काळात एकही दंगल झाली नाही .
निवेदक – दंगल करणारे लोकच सत्तेत होते , म्हणुन झाली नाही असे सगळे म्हणतात ?
य – कोण म्हणतो असे ? स्साला हराम – ( आपण टीव्हीवर आहोत हे लगेच जाणवुन ) म्हणजे हे चुक आहे .
निवेदक – राज्याचा विकासपण झाला नाही ?
य – हे चुक आहे , माझे कार्यकर्ते पुर्वी सायकलवर फिरायचे. आजकाल ते टाटा सफारीत फिरतात . आमचे कार्यकर्ते हे सामान्य लोक आहेत . सामान्य लोक सायकलवरुन टाटा सफारीत आले तर तुम्हा लोकांना वाईट का वाटते ? म्हणजे विकास झाला .
निवेदक – तुमच्यावर घराणेशाहीचा आरोप होतो ?
य – आम्ही खासदार आहोत , हे खरे आहे . मात्र आमदारपद आम्ही घराणी वेगळी असणार्‍या आमच्या जावयांना दिली आहेत, त्यामुळे आम्ही घराणे शाही करतो , हा आरोप खोटा आहे …..आम्ही एकाच घराण्यात पदे वाटत नाही .

ही मुलाखत अशीच चालु रहाते. अर्धा तास संपल्यावर एकदाची मुलाखत संपते, आणि तरुण तडफदार नेत्याला शुभेच्छा देउन निवेदक एकदाचा आपला निरोप घेतो. या मुलाखतीतुन आपल्या हाती काहीच लागत नाही. नेत्यांचे चेहेरे बदलतात, वाक्ये मात्र तीच रहातात.
तरीही शेवटी ही चैनल्स आपण का बघतो ? हा प्रश्न उरतोच . त्याचे उत्तर म्हणजे , हल्ली आपल्यालाही असेच आवडते . दिखाउपणा आवडतो , कुठल्याही गोष्टीच्या खोलात जायला आवडत नाही . त्यामुळे दोष शेवटी आपणावरच येतो .त्यामुळे चैनलवाल्यांची सध्या चलती आहे . ’ पिकते ते विकते ‘, या जुन्या म्हणीपेक्षा ‘ जे विकते ते लोक पिकवतात ‘ हेच खरे ! शेवटी काय , तर कालाय तस्मै नमः !

— निखिल नारायण मुदगलकर

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..