नवीन लेखन...

आला पाऊस मातीच्या वासात गं

   

तापलेला रस्ता, वितळलेल डांबर, घामाच्या धारा, गरम वारा, उन्हाच्या झळा, तहानलेले जीव, व्याकुळ नजरा. वासरांच्या तापल्या पाठी चाटणार्‍या गाई. आकाशाकडे बघणारे पक्षी. गरिब बापडा पिसारा आवरुन बसलेला मोर. आग ओकणारा सुर्य. बापरे. कधी एकदा पाऊस येतोय याची प्रत्येकजण वाट बघत होते. उकाडा वाढतच चालला. निसर्ग पावसाची वाट पाहात होता. जुनी कात टाकुन वसंतात झाडांना नवी पालवी फ़ुटली आणि सुष्टी पावसाच्या स्वागतासाठी तयार झाली. हळु हळु आकाशात मेघांची दाटी होत चालली. मधेच सुर्याच्या आड येणारे ढग पाहिले आणि सर्व सृष्टिला धीर आला. मोर पिसारा झटकुन तायार झाला होता, चातकाला आपली प्रतिक्षा संपणार म्हणुन आनंद झाला. पक्षांची धांदल सुरु झाली. जागा मिळेल तीथे घरटी बनवायला सुरवात झाली. मुंग्या किटक वारुळ तयार करायला लागले. काही मुंग्यांनी पंख पसरुन वर उडायला सुरवात केली.

लहान लहान सरी बरसत मेघांनी सृष्टीला दिलासा द्यायला सुरवात केली. आनंदीत झालेल्या धरतीनी मातीचा सुगंध पसरवत पावसाच स्वागत केल. पश्चिम लाल रंगानी उजळुन निघाली. आणि पावसाची सुरवात झाली. मोराचा नाच, पक्षांची किलबिल, गाई बैलांच शेपुट उंचाऊन धावण, लहान मुलांच आईची नजर चुकवुन पहिल्या पावसात भिजणं.

पहिला पाऊस सुरु झाला. शाळा सुरु होण्याचे दिवस आले. लहानापासून मोठ्यापर्यंत सगळे या पावसाच्या आगमनाची वाटच पाहात होते. आधी हळु हळु पडणारा पाऊस वाढत गेला आणि मुसळधार पावसाला सुरवात झाली. रस्त्यानी खळाळात पाणी वाहायला लागल. प्राण्यांची एकच धांदल उडाली. गाई बैलांनी बस स्टॅंडवर आडोशाला जागा बघुन स्वतःसाठी जागा बनवली. पावसाला साथ देत वार्‍यानी सर्व सृष्टीला झोडायला सुरवात केली. आणि उन्हाळ्यामुळे आलेली मरगळ कुठच्या कुठे पळाली.

मनात खुप होत, धावत बाहेर जावं, या पावसात धुंद भिजुन पावसाचे आभार मानावेत. पण आता मी मोठा झालो होतो. बाहेर न जाता, घराच्या खिडक्या लावायला सुरवात केली. शेवटची खिडकी लावताना बाहेर नजर गेली. नुकतीच शाळा सुटली होती. लहान मुलं पावसात भिजत होती. एकमेकांना धक्के देत होती. रस्त्याच्या पलिकडे एक लहान मुलगी दोन्ही हात पसरुन आकाशाकडे बघत भिजत होती. चेहर्‍यावर खुप आनंद दिसत होता. आनंद मनात साठवुन ठेवायसाठी तीनी डोळे मिटुन घेतले. पावसाच्या धारा तीच्या चेहर्‍यावर पडत होत्या. ओले केस तोडावर आले होते. हनवटीवरुन पाणी खाली निथळत होत. अंगातला फ़्रॉक पुर्ण भिजला होता. पावसाचा जोर वाढला होता. रस्त्यानी जाणार्‍या ओघळात तीचे पाय बुडाले होते. पण या कशानीही तीची समाधि भंग होत नव्हती. आनंदात ती न्हाऊन निघत होती. तो आनंद रोम रोमात ती साठवुन ठेवत होती. पसरलेले हात आकाशाला कवटाळत होते. आहा ! मी स्वतःच वय विसरुन गेलो आणि धावत रस्त्यावर आलो. तसेच हात पसरले. तसाच आकाशाकडे बघत भिजायला लागलो.

मन खुप खुप मागे गेल. लहान झालो. आमच माजिवड्याच घर आठवल. बाहेरचा मोठा दिवाणखाना. समोर मोठी पडवी. पडवी समोर मोकळ आंगण. वार्‍याबरोबर हालणार गवत, डुलणारी लाल मुकुट असलेली जास्वंद. एका बाजुला पारिजातकाचा पडलेला सडा. पावसाची खिडकीतुन आत येणारी झड. माझ्या चेहर्‍यावर पडणारे तुषार. धावत मी आंगणात आलो, माझ्या लहान पायांनी गवत दबल. माझ्या बरोबर खेळणार्‍या झाडांना आनंद झाला. त्यांनी जोर जोरात डोलुन मला साथ दिली. माझा कुत्रा मात्र धावत जाऊन घरात बसला होता. माझ्याकडे पाहुन कु कु करत होता. मला आत बोलवत होता. मी आकाशाकडे पाहिल. पावसाचे थेंब चेहर्‍यावर पडत होते. मी तोंड उघडुन हे पावसाचे थेंब पिऊन टाकत होतो. शांत थंड वाटत होत. माझे पसरलेले हात आकाशाला कवटाळत होते. पावसानी माझे केस भिजवले होते. कपडे अंगाला चिकटवले होते. वारा अंगाला झोंबत होता. मी डोळे बंद करुन प्रत्येक क्षण मनात साठवत होतो.

तोच आवाज आला “काकांना वेड लागलय. उद्या आजारी पडले की समजेल” धाडकन वर्तमानात आलो. मी म्हातारा झालोय. शरिरानी म्हातारा असलो तरी मनानी लहान होतो. मला माझी पोझीशन जाणवली. मी अस रस्त्यात भिजण बरोबर नाही. पोझीशन आठवताच मनानी मी म्हातारा झालो. धावत घरात आलो. टॉवेलनी डोक पुसत बाहेर पाहिल. ती लहान मुलगी पायानी पाणी उडवत जात होती. मधेच तुंबलेल्या पाण्यात तीनी उडी मारली पाणी सर्व बाजुनी उडाल. तीच्या मैत्रिणी केकाटल्या. आणि त्यांची कशी फ़जिती झाली हे पाहुन ती खळाळुन हासली.

मला मात्र आता भिती वाटात होती, उद्या आजारी नाही न पडणार ? मन म्हातार झाल्याबरोबर शरिर दुप्पट म्हातार झाल आणि लगेच ४-५ शिंका आल्याच.

— निरंजन प्रधान

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..