नवीन लेखन...

“अ‍ॅशेस”ची जन्मकहाणी

29 ऑगस्ट 1882 रोजी इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियादरम्यानचा एक सामना ब्रिटिश पाठीराख्यांच्या अपेक्षांची ‘राख’रांगोळी करीत संपला. 1882च्या मालिकेतील हा एकमेव सामना झाला ओवलवर. आंतरराष्ट्रीय यादीतील हा कसोटी सामना क्र. (केवळ) नऊ होता. नियोजित खेळ तीन दिवसांचा असणार होता.

नाणेफेक जिंकून पाहुणा कर्णधार बिली मर्डोकने फलंदाजी स्वीकारली आणि कांगारूंची दाणादाण उडाली. अवघ्या 63 धावांवर त्यांचा डाव संपला. पहिल्या दिवस अखेर इंग्रजांचा डावही 101 धावांवर संपुष्टात आला. 38 धावांची पिछाडी भरून काढीत ऑस्ट्रेलियाने मग आणखी 84 धावा जमविल्या. दीड दिवसांचा खेळ शिल्लक असताना यजमानांना केवळ 85 धावांचे आव्हान विजयासाठी मिळाले. डॉ. विल्यम गिल्बर्ट ग्रेस बाद होण्यापूर्वी इंग्लंडची स्थिती 3 बाद 52 अशी ‘तशी’ चांगली होती पण ते बाद झाल्यानंतर खेळपट्टीवर थांबण्याची मुभा फ्रेड्रिक स्पोपोर्थने कुणालाही दिली नाही. पहिल्या डावात त्याने 46 धावांत 7 इंग्रज टिपले होते. आता त्याने 51 चेंडू कमी टाकून आणि 2 धावा कमी मोजून तितकेच गडी गारद केले. यजमान दुसरा डाव सर्वबाद 77. ऑस्ट्रेलिया 7 धावांनी विजयी.

31 ऑगस्ट रोजी प्रकाशित झालेल्या आवृत्तीत ‘क्रिकेट : अ वीक्ली रेकॉर्ड ऑफ द गेम’ने क्रिकेटच्या मैदनावरील इंग्लिश संघाचे वर्चस्व संपुष्टात आल्याबद्दल एक श्रद्धांजलीपर चौकट प्रसिद्ध केली. 2 सप्टेबरच्या ‘द स्पोर्टिंग टाईम्स’च्या अंकात ब्लूब्ज या टोपणनावाने लिहिणारा रेजिनाल्ड ब्रुक्स आणखी पुढे गेला आणि त्याने ओवलवर 29 ऑगस्ट 1882 रोजी इंग्लिश क्रिकेट मृत्यू पावले असून त्याचे पार्थिव जाळण्यात येईल आणि राख ऑस्ट्रेलियात नेण्यात येईल अशी घोषणा केली.

1882-83च्या हंगामात ऑस्ट्रेलियाचा दौरा करणार्‍या इंग्लिश संघाच्या कर्णधाराने वारंवार राखेचा उल्लेख केला आणि आपण ती पुन्हा मिळवू असेही बोलून दाखविले. मेलबर्नमधील काही महिलांनी इंग्लिश कर्णधाराला टेराकोटापासून (तांबड्या रंगाची भाजलेली माती) बनविलेले एक रक्षापात्र भेट दिले.

याच्यात नेमके काय होते हे मात्र अजूनही ‘रक्षापात्रा’तच आहे! (तो गुलदस्ता नव्हताच.) ती एक बॅट जाळल्यानंतर निर्माण झालेली राख होती, एक विटी जाळल्यानंतर झालेली राख होती इथपासून ते एका महिलेने आपले एक खास अब्रूझाकू वस्त्र जाळल्याने तयार झालेली राख होती असे अनेक उल्लेख आढळतात. इवो ब्लायच्या मृत्यूपश्चात त्याच्या पत्नीने हे रक्षापात्र मेरिलबोन क्रिकेट क्लबला भेट म्हणून दिले आणि लॉर्ड्सवरील एका संग्रहालयात ते ठेवले गेले आहे. त्याची प्रतिकृती आता ‘चषक’ म्हणून वापरली जाते.

‘दि अ‍ॅशेस’ ही संज्ञा मात्र लोक विसरून गेले. ‘विद बॅट अ‍ॅन्ड बॉल’ या आपल्या पुस्तकात जॉर्ज गिफिनने या शब्दाचा वापर केला (प्रकाशन 1899). 1903च्या इंग्लिश दौर्‍यावर जाताना ऑसी कर्णधाराने तिचा पुन्हा उल्लेख केला. विज्डेन क्रिकेटर्स आल्मनॅकमध्ये सर्वप्रथम 1905 साली या संज्ञेचा समावेश झाल्याचे आढळते.

आजमितीला अ‍ॅशेसवर इंग्लिश संघाचा कब्जा आहे. 5-0 ने अ‍ॅशेस जिंकण्याची भाषा ऑसी कर्णधार रिकी पॉन्टिंगने नुकतीच केली आहे.

— डॉ. आनंद बोबडे

Avatar
About डॉ. आनंद बोबडे 232 Articles
सोलापूर येथील डॉ. वैशम्पायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएस. क्रिकेटमधील विक्रम, मराठी-इंग्रजी शब्दकोडी, साहित्य व साहित्यिकांवरील लेख, महफिल-ए-ग़ज़ल हे सदर सोलापरच्या दैनिक संचार मध्ये गाजले. "जागत्या स्वप्नाचा प्रवास - सचिन तेंडुलकर १९८९ ते २०१०..." हे सचिनच्या कामगिरीचा सर्वांगीण आढावा घेणारे पुस्तक (पूजा प्रकाशन, ठाणे).

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..