असाच थोडा वेळ गेला असेल नसेल पोलिसांनी दिलेली सूचना खरी ठरली. पहिलाच दगड जो आला तो नेमका जी खिडकी बंद होत नव्हती त्या माझ्या डाव्या हाताकडील खिडकीवरच आणि लागोपाट सगळीकडे दगडफेकीचे आवाज उमटू लागले. मनातल्या मनात देवाचे आभार मानले आणि विचार करू लागलो, जर का हि खिडकी बंद झाली नसती तर आम्हा प्रवाशांचे काय झाले असते? आठवण होवूनच पोटात गोळा आला. निश्चितच कोणीतरी ह्या गोष्टीला नक्कीच बळी पडला असता. त्यानंतर मनाने निश्चिंत झाल्यामुळे झोप केव्हा लागली हे कळलेच नाही आणि ह्या दरम्यान कर्नाटक राज्य केव्हा सोडले हे देखील समजले नाही. रात्रीच्या अंधारातच कर्नाटक पार करून आमच्या गाडीने सकाळी-सकाळी आंध्रप्रदेशामध्ये प्रवेश केला.
जरी रात्री दगडफेकीच्या प्रकारानंतर झोप लागली होती, तरी मधून मधून जाग येतच होती. सकाळी जेव्हा पूर्ण जाग आली तेव्हा कळले की आपण आंध्र प्रदेशामध्ये आहोत. आजूबाजूचा आपणास नवखा असलेला प्रदेश डोळ्याखालून घालू लागलो. हा आंध्रचा प्रवास जवळ जवळ आठ-नऊ तासांचा होता. रेल्वेच्या डब्ब्याच्या दोन्ही बाजूला दूरवर शेकडो एकर पसरलेली जमीन दृष्टीस पडत होती. काही जमिनींवर सूर्यफुलाची शेती केलेली होती त्यामुळे सर्वत्र पिवळ्या रंगाचे साम्राज्य पसरलेले दिसून येत होते तर काही ठिकाणी शेती न केलेली अशी जमीन लांबवर पसरलेली दिसत होती. काही ठिकाणी तर दोन्ही बाजूना मोठमोठाले दगडांचे डोंगर दिसत होते, तर काही जमिनी नुसत्या दगडांनी खच्चून भरलेल्या दिसून येत होत्या आणि त्याबरोबरच दोन्ही बाजूंना मोठमोठे सिमेंटचे कारखानेहि दिसून येत होते. त्यामुळे येथे अशाप्रकारचे सिमेंटचे कारखाने उदयास येण्यामागील रहस्य आपोआपच उलगडले गेले.
विशेष म्हणजे येथे एक गोष्ट नमूद करावीशी वाटते ती म्हणजे आमच्या गाडीमध्ये बरीच माणसे ही मुंबई, पुणे व इतर महाराष्ट्रभरातून आलेली होती आणि ती सगळी तिरुपती बालाजीच्या दर्शनाला जाणारी होती, त्यामुळे त्यांचाच भरणा अधिक प्रमाणात असल्याचे दिसून येत होते. त्यामानाने तामिळनाडूमध्ये जाणारी तमिळ माणसे हि कमी प्रमाणात दिसून आलीत.
अशाप्रकारे तासावर तास ढकलत आमचा प्रवास पुढे पुढे चालला होता, परंतु आंध्र प्रदेश संपण्याचे चिन्ह काही दिसत नव्हते. दुपारी दोन वाजता गाडी रेनुगुंटा स्थानकात प्रवेशती झाली आणि डब्ब्यातील ब-याच माणसांची उतरण्याची लगबग सुरु झाली. बरीच माणसे उतरताना पाहिल्यावर चौकशी केली तेव्हा असे कळले की ही सगळी तिरुपती बालाजीच्या दर्शनाला जाणारी माणसे येथेच उतरतात. येथून जवळ जवळ अडीच-तीन तासांच्या प्रवासानंतर तिरुपती बालाजीला जाता येते, तर रेल्वेने तसेच पुढे गेले असता तीन तासांवर असणारे आमचे गंतव्य स्थान चेन्नईही गाठता येते. यावरून अंदाज आला तो म्हणजे चेन्नई हे जरी तामिळनाडूमध्ये असले तरी ते आंध्रप्रदेश व तामिळनाडूच्या सीमेवर आहे.
आमच्या गाडीने रेणूगुन्टा स्टेशन सोडल्यावर आणि आम्हाला हे कळल्यामुळे की चेन्नई आता तसे फार दूर नाही, आम्ही केव्हा एकदा चेन्नईला पोहचतो असे झाले. येथपर्यंत आम्ही महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्रप्रदेश अशी तीन राज्ये पार केली होती. नवीन प्रदेश पाहावयाचा होता, माझ्या चिरन्जीवाना आणि पर्यायाने त्याच्या मित्रांना भेटावयाचे होते, चिरंजीवांचे ऑफिस (इन्फोसिस, महिंद्र सिटी, चेन्नई) पहावयाचे होते, ऑफिस म्हणण्यापेक्षा ऑफिसचा कॅम्पस म्हणणे योग्य होईल कारण येथे कामगारांच्या नातेवाईकांना ऑफिसच्या आत प्रवेश दिला जात नाही, तर फक्त कॅम्पस डोळ्याखालून घालण्याची परवानगी देण्यात येते. चिरन्जीवाना अगोदरच कल्पना दिली गेली असल्यामुळे आम्हाला स्टेशनवरून घेवून जाण्यासाठी ते स्टेशनला येणार होते आणि तो क्षण आला. आम्ही दोघे, मी आणि माझा भाचा, गाडी चेन्नईला थांबल्यावर गाडीतून उतरलो आणि मेन गेटजवळ येऊन थांबलो. तेथेच चिरंजीव येणार होते. फोनवरून त्याला आम्ही उतरल्याचे कळविल्यावर तो पंधरा मिनिटातच तेथे पोहचला. स्टेशनच्या बाहेरच बसेस मिळत असल्यामुळे धावतच एका ए.सी. बसपाशी जाऊन चौकशी केल्यावर ती आमच्या राहण्याच्या ठिकाणच्या बाजूलाच जात असल्याचे कळल्यामुळे त्यामध्ये बसलो.
तसे पाहिले तर चेन्नई स्टेशन ते चिरंजीवांचे राहण्याचे ठिकाण उरपक्कम् मधील देश अपार्टमेंट, जे हायवेवरच आहे, अंतर जवळ जवळ एक-दीड तासांचे होते, परंतु संध्याकाळची वेळ असल्यामुळे मुंबईसारखेच सर्वत्र ट्रॅफिक जाम होत होते, त्यामुळे हा प्रवास अडीच-तीन तासांवर लांबला. घरी पोहचता पोहचता रात्रीचे ७.३० वाजले. ह्या दरम्यान थोडेसे चेन्नईचे दर्शन घेता आले, परंतु जानेवारी महिना असल्यामुळे व दिवस छोटा असल्यामुळे लवकरच काळोखाचे साम्राज्य पसरू लागले. एकंदरीतच हा माझा प्रवास गुरुवारी दुपारी २.३० वाजता जो सुरु झाला होता तो शुक्रवारी रात्री ७.३० वाजता संपला, म्हणजेच साधारणपणे २९ ते ३० तासानंतर आम्ही आमच्या जागेवर पोहोचलो. गाडीतच दिवस गेल्यामुळे पहिल्या प्रथम आंघोळ वगैरे विधी आटोपून आम्ही जेवणासाठी पुन्हा खाली उतरलो. जेवून आल्यावर माझ्या चिरंजीवांचे रूमवरचे मित्रही आलेत, त्यांना भेटून झोपी गेलो.
Leave a Reply