नवीन लेखन...

जागतिक हवामानशास्त्र दिनाच्या निमित्ताने !

सध्या आपण बघतो आपल्या राज्यात बहुतेक ठिकाणी अवकाळी पाऊस, गारपीट, वादळे झाली आणि हाताशी आलेलं पिक भिजून वाया गेलं. अजून हवामान चांगले नाही. सध्या चांगले उन पडतांना दिसत नाही आकाशात ढग दिसतात आणि वातावरण मळबी होतं.

भारत शेतीप्रधान देश असून भारतातील ७० टक्के नागरिक शेती आणि त्याला पूरक असणारे व्यवसाय करतात. परंतु देशाची लोकसंख्या विचारात घेता, सरकारकडून देण्यात येणाऱ्या पायाभूत सुख-सुविधा खूपच तोकड्या पडतात. जनतेला पायभूत सुख-सुविधा उपलब्ध करून देतांना रेल्वे, रस्ते, नवीन इमारती, धरणे आणि इतर आवश्यक गोष्टीसाठी जमिनींचा वापर करण्यात आल्यामुळे मोकळ्या जागा, जमिनी कमी होत चालल्या आहेत. गावखेड्यातील बरीच मंडळी पारंपारिक शेती व्यवसाय सोडून विशेषत: तरुण शहराकडे नोकरी/व्यवसायासाठी आकर्षित होत आहेत. त्याला कारणही तशीच आहेत. लहरी हवामान, अवकाळी पाऊस, गारपीट, वादळे अश्या असंख्य आपत्तींना तोड देता देता शेतकऱ्यांचा जीव मेटाकुटीस आला आहे. त्यात सावकाराचे/बँकेचे कर्ज. अर्थात अश्या लहरी हवामानाला सर्वस्वी आपणच जबाबदार आहोत असे म्हंटल्यास चुकीचे ठरणार नाही.

भारताच्या सरहद्दीवर जसे आपले शूर सैनिक रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून आपल्या देशाचे रक्षण करतात तसे आपले हवामान खाते हवामान अंदाजाचे अचूक भाकीत करून भविष्यातील होणाऱ्या जीवित आणि वित्तहानी पासून रक्षण करतात.

भारतीय अर्थव्यवस्थेचे गणितही अजून मान्सूनच्या पावसावर आधारलेले आहे. त्याशिवाय शेती, हवाई वाहतूक, तेलकंपन्या, पर्यावरण संस्था, प्रशासकीय संस्था इत्यादींना हवामानाचा अंदाज आवश्यक ठरतो. मान्सूनचा अंदाज वर्तवण्यासाठी अनेक निकष पाहिले जातात. हे निकष अत्यंत किचकट तसेच गुंतागुंतीचे असतात. त्यातही तापमान, हवेचा दाब, वाऱ्याची दिशा, उपरी वाऱ्यांचे वाहन वगैरे असे काही प्रमुख घटक. या सर्व घटक तसेच अनेक वर्षांमध्ये जमा केलेली महिती लक्षात घेता अंदाज वर्तवण्यात येतो. पावसाशी संबंधित या घटकांच्या अभ्यासामध्ये काही वर्षांनी बदलही होत असतात. एखाद्या घटकाचा फारसा प्रभाव पडत नसल्याचे लक्षात आल्यावर तो रद्द करण्यात येतो तर परिणाम होण्याची शक्यता असलेला घटक नव्याने समाविष्ट केला जातो. परंतु हे सर्व जाणून घेण्याआगोदर आपल्याला त्याची सरुवात कशी झाली हे जाणून घेण्याचे कुतूहल नक्कीच असेल.

इसवी सन पूर्व सातव्या शतकात बॅबिलॉनमध्ये ढगांच्या रचनेवरून हवामानाचा अंदाज वर्तवला जात होता. ग्रीस, चीन व भारतात विविध नैसर्गिक निरीक्षणांचा व खगोलशास्त्राचा वापर हवामानाचा अंदाज वर्तविण्यासाठी केला जात असे. भारतीय ज्योतिष शास्त्रातील निरिक्षणांनुसार हस्त, मृग नक्षत्राच्या राशीतील स्थानानुसार पाऊस कधी पडणार, याचा अंदाज घेतला जात असे. परंतु हे ठोकताळे दर वेळी अचूक असतील असे होत नसे. शिवाय ज्योतिषाच्या अभ्यासानुसार त्यात फरकही होण्याची शक्यता असे.

इ.स. १९२२ मध्ये लुइस फ्राय रिचर्डसन या हवामान शास्त्रज्ञाने अंदाज वर्तविण्याची सांख्यिक पद्धती सुचवली. या पध्हतीनुसार निरिक्षणांच्या सांख्यिक विश्लेषणानुसार सारखेपणा शोधून त्यानुसार काही प्रमाणात हवामान अंदाज वर्तविता येऊ लागले.

हवेचे तापमान, वातावरणातील दाब, वाऱ्याची गती व दिशा यांच्या परस्परसंबंधातून निर्माण होणारी वादळे, ढग, पाऊस, विजांचा कडकडाट आदी घटनांची कालमानानुसार बदलणाऱ्या परिस्थीचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रास हवामानशास्त्र (मीटिअरॉलजी) असे म्हणतात. वातावरणातील या घडामोदींचे निरिक्षण करून त्यांचा अभ्यास करणे, त्यानुसार निकटच्या आणि दूरच्या भविष्यातील हवामानाविषयी अंदाज बांधणे हे हवामानशास्त्रज्ञांचे प्रमुख काम असते. २३ मार्च हा दिवस ‘जागतिक हवामानशास्त्र दिन म्हणून साजरा होतो.

हवामान निरीक्षणासाठी अनेक प्रकारची साधने वापरली जातात. या साधनांच्या मदतीने हवामानविषयक घटनेचे भौगोलिक स्थान, तिची तीव्रता, वेग, प्रकार, तिच्यामुळे होणारे तापमानातील बदल अशा निरीक्षणांची नोंद केली जाते. ही उपकरणे जमीन, समुद्र आणि वातावरण अशी तिन्ही ठिकाणी निरिक्षणासाठी नियुक्त केली जातत. जमिनीवरील साधने ही प्रामुख्याने हवामान वेधशाळांमध्ये असतात. ठिकठिकाणी उभारलेले रडार रेडिओलहरींच्या साहाय्याने विविध प्रकारच्या वृष्टीचा पाऊस, गारा, बर्फवृष्टी इत्यादींचा अभ्यास करतात. यातील पल्स डॉपलर प्रकारच्या रडारमुळे वाऱ्याचा वेग व दिशा यांची नोंद करता येते. समुद्राच्या पाण्यावर हेलकावे खाणाऱ्या फुग्यांसारख्या तरंगणाऱ्या वस्तूंना बांधलेली उपकरणे पाणी व वारा या दोन्हींच्या फरकांची नोंद करतात.

फुग्यांच्या साहाय्याने पृथ्वीच्या वातावरणात सोडले जाणारे रेडिओ संच तेथील विविध घटकांची निरीक्षणे रेडिओ-लहरींद्वारे पृथ्वीवर पाठवतात. अवकाशात पृथ्वीप्रदक्षिणा करणारे काही मानवनिर्मित उपग्रह खास हवामान निरीक्षणासाठी असतात व बदलांवर लक्ष ठेवून ते बदल कळवत राहतात. या शिवाय चक्रीवादळांचा अभ्यास करण्यासाठी त्या हवामानाच्या ठिकाणी सुरक्षित अंतरावरून घिरटय़ा घालत नोंदी करणारी खास विमाने सोडली जातात. ही विमाने म्हणजे एक प्रकारच्या उडत्या हवामान वेधशाळा असतात.

वरील सर्व प्रकारे केलेल्या निरीक्षणांचा उपयोग हवामान साच्यामध्ये (वेदर मॉडेल्स) करून नजीकच्या भविष्यातील हवामानाविषयी अंदाज वर्तविला जातो. हवामान साचे म्हणजे हवामान कसे बदलेल किंवा निर्माण होईल याची तयार केलेली प्रतिकृती होय. प्रवाही पदार्थाच्या हालचालींविषयी समीकरणे तयार केली जातात. या समीकरणांच्या आधारे विविध स्थितीतील हवामानाचे संगणकीय साचे बनविले जातात.

अतिवृष्टीचा इशारा असो की वातावरणातील उष्मा, नागरिकांना हवामानविषयक अधिकृत आण‌ि अचूक माहिती मोबाइलवरच मिळावी यासाठी भारतीय हवामान विभाग स्वतःचे मोबाइल अॅपस विकसित करत आहे. लवकरच हे अॅपस सर्वसामान्यांसाठी उपलब्ध होणार असून त्या माध्यमातून देशातील प्रमुख महानगरांचे चार ते सहा तासांचे सविस्तर पूर्वानुमानही एका टचवर मिळवता येणार आहे.

हवामानविषयक माहिती देणारे अनेक अॅप्स अँड्रॉइड, विंडोजवर उपलब्ध असले तरी त्यातून मिळणाऱ्या माह‌ितीच्या अचूकतेवर प्रश्नचिन्ह असते. विशेषतः पावसाळ्यात अनेकांना पुढील २४ तासांच्या पूर्वानुमानापेक्षा येत्या चार ते सहा तासांत आपल्या शहराचे हवामान कसे असेल हे जाणून घेण्यात अधिक रस असतो. ही सर्व माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत लवकर आणि तिही मोफत मिळावी यासाठी हे अॅप विकसित करण्यात येत आहे. खास करून पावसाळ्यात मुंबईची दैना हवामानावर अवलंबून असते. त्यामुळेच या अॅपची संकल्पना पुढे आली असून नवी दिल्ली हवामान खात्याने त्याचे काम सुरू केल्याची माहिती प्रादेशिक हवामान विभागाचे उपमहासंचालक सांगतात.

पर्यावरणाचा समतोल बिघडविण्यास आपणच कारणीभूत आहोत ज्यामुळे लहरी हवामान तयार होऊन ऋतूनमध्ये बदल होताना दिसतात. अवकाळी पाऊस, थंडी, गारपीट यासारखे परिणाम भोगणे नशिबी येते. ग्लोबलवॉर्मिंगमुळे वातावरणात अनेक बदल संभवतात. त्यामुळे नैसर्गिक आपत्तींत वाढ होते आणि त्याचा मुकाबला करण्यासाठी, त्यातून बाहेर पडण्यासाठी अधिकाधिक पैसा खर्च होतो आणि याचा परिमाण थेट अर्थकारणावर होऊन महागाईत वाढ होण्याची शक्यता असते. अर्थातात जगातील सर्व माणसांनी याची गंभीर दाखल घेऊन सकारात्मक पाऊल उचलणे गरजेचे आहे. अंतर्मुख होऊन त्याची ठोस अंमलबजावणी होणेही तेव्हढेच आवश्यक आहे.

जगदीश अनंत पटवर्धन
About जगदीश अनंत पटवर्धन 227 Articles
एम.कॉम. एल.एल.बी. असलेले श्री पटवर्धन हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. चित्रकला, तबला वादन, क्रिकेट, टेबल टेनिस शास्त्रीय संगीत ऐकण्याची त्यांना आवड आहे. त्यांनी अनेकविध विषयांवर आजपर्यंत लेखन केले आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..