नवीन लेखन...

विल यु बी माय व्हॅलेन्टाईन

प्रेम, माणसांना जोडणारं सुरेख रसायन. किती सखोल, किती मृदु, तरल आणि माणसांना कोणत्याही गोष्टीत आपलंसं मानून स्वत:त गुंतून ठेवणारं. तितकंच निरागस, अबोल पण प्रभावी, चिरंतन, अमर, नात्यातले बंध घट्ट करणारी एक अदभूत नैसर्गिक देणगी.

”याला ना कसला गंध, ना कसले रुप,

पण ज्याच्यात आहे मनोमिलन, तेच खरे प्रेमवर्णन”

आपल्या आयुष्यात असंख्य जिवीत, निर्जीव वस्तू येतात. ब्रम्हांडातल्या अनेक गोष्टी आपल्याला आवडतात. जर हे आवडणं माणसांसाठी असेल तर आपलं जीवन तितकंच फुलत जातं. कारण त्यात अनेक भावनांची गुंफण असते. पण हेच आवडणं जेव्हा दोन व्यक्तिंमध्ये असेल, समविचारी स्वभावाच्या, त्यावेळेस जगण्याला नवीन दृष्टीकोन, दिशा आणि आशा मिळते.

जेव्हा हेच आवडणं काही पाऊलं पुढे जाऊन थबकतं त्यावेळेस आपुलकीची, जिव्हाळ्याची नकळतंच ओढ निर्माण होते. कारण त्यात लपलेल्या असतात ऐक्याच्या अनमोल संवेदना, ही भावना असते युगुलाची. अगदी हमखास, या सर्व गोष्टी कोण घडवतं, का घडतात, या मागचा करता करविता कोण, असे अनेक प्रश्न मनात तरळतात. पण असं म्हणतात की प्रितीसंगमापुढे सारे प्रश्न फिके. ती दोघंच जबाबदार स्वत:च्या मनोमिलनाला. त्यांची परिभाषा असते, ”ह्रदयापासून ह्रुदयापर्यंत” जोडणारी तर कधी ”डोळ्यांनी बोलणारी”. हीच खरी सुरुवात असते दोघांना एकत्र येण्याची आणि प्रथम मैत्रीचा हात कायमत: पुढे करण्याची. या ओघात एकमेकांना पुरेसं जाणून दिवसेंदिवस नात्यातील विण दृढ करण्याची, कधी मित्र बनून तर कधी प्रिय म्हणून. विविध मूड्स् मध्ये कधी रुसवा, तर कधी खट्याळता दाखवण्याची, कधी अवखळ, अल्लड बनण्याची तर कधी अगदीच ”रोमॅन्टीसिझम” व्यक्त करत आपुलकीची गहनता प्रगटण्याची.

वयात आल्यावर विशिष्ट्य टप्प्यावर आपल्यापैकी अनेकांनी अशी भावना, अशी प्रेमाची विविधांगी रुपं अनुभवली असतील, अर्थात अपवाद हा असतोच पण बर्‍याच अंशी हेच स्वरुप असतं. ”लव्ह स्टोरी” वेगळी असली तरीही. याचा शेवट लग्नात होतो किंवा ब्रेक अप मध्ये, पण जेव्हा ती किंवा तो जिवापाड आवडतो तेव्हाची भावना ही कदाचित शब्दबद्ध करणंही कठीण होईल. अतिशय गोंडस, गोजिरं, आठवण झाली तर कधी लाजवून गालातल्या गालात स्मित हास्य निर्माण करणारं

मनस्पर्शी प्रेम हे असंच असतं.

”दोन जिवांची जुळली मनं, पटले विचार, जडली प्रित,

एकमेकांशिवाय ना सुचे काही, कारण दडलीये त्यात अनोखी मित.”

हळूहळू या प्रेमाची व्याप्ती इतकी वाढत जाते की तो किंवा ती सतत एकमेकांच्या ह्रदयावर अधिराज्य करु लागतात. काळजाचे ठोके हळूवार धकधक करणारी मुलायम स्पंदनं होईन जातात, ज्याच्या प्रत्येक आवाजातून आपल्या प्रिय व्यक्तिची साद ऐकू येते. कारण आपण मनमुरादपणे त्याच्याच आठवणीत गर्क असतो. हीच किमया असते का प्रेमाची?..गडद, रम्य तर कधी स्वप्नाळू..

एक दिवस हें प्रेम कंठापर्यंत दाटून येतं, मनाची वाट मोकळी करण्यासाठी आसुसतं, सर्व भावना एकत्र येतात आणि ओठांपर्यंत येतात, आपल्या प्रिय व्यक्तिला निरनिराळ्या अंदाजात विचारण्यासाठी. ”सांग तू माझी होशिल का?”, ”माझं तुझ्यावर मनापासून प्रेम आहे”, ”मला तू खूप आवडतेस”, वगैरे वगैरे….

“आज सांग मज, विचारतो एकच,

आहे का प्रित, जी आपणा जोडेल कायमंच”

थोडासा भाव खाल्ला जातो, मुद्दाम चेष्ठेनं मान वळवली जाते, ”असं नाही, जरा वेगळेपणानं विचार”, थोडं घाबरत्या स्वरातून बोलणं कानावर पडतं, वातावरणात अचानकपणे ”सिरियसपणा” येतो. आणि पुढे ” माझं तुझ्यावर नितांत प्रेम आहे, मी आयुष्यभराची तुला साथ देईन, वील यु बी माय व्हॅलेन्टाईन” असं म्हणत होकार येतो. प्रेमाचा हा प्रवास चिरंतन सुरु राहतो.

व्हॅलेन्टाईन डेच्या सदाबहार क्षणी, मधुर स्मृतीचं हेच ते टिकाऊ प्रेमपुष्प

”दोन मनांची सुंदर प्रिती,

जिच्या सहवासात सोनेरी भेटी,

अशीच छान अनुभूती,

व्हॅलेन्टाईन दिनी”

— सागर मालाडकर

Avatar
About सागर मालाडकर 111 Articles
श्री. सागर मालाडकर हे आकाशवाणीवरील निवेदक असून ते मराठीसृष्टीसाठी नियमितपणे लेखन करतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..