नवीन लेखन...

वृद्धजीवनशास्त्र

आजपर्यंत आपण वृद्धांच्या समस्या, त्यांच्या व्यथा, त्यांना होणारे त्रास, त्यांचे केवीलवाणे जीवन, तरुणांकडून त्यांची होणारी ससेहोलपट आणि दुर्लक्ष यांसारख्या विषयांवर बरेच काही बोललो आहोत, ऐकले आहे, वाचले आहे आणि थोडेफार पाहीले पण आहे. या विषयावरचे डोळ्यांतुन अश्रुंचे पाट व्हायला लावणारे ‘चिमणी पाखरे’ पासून ते ‘बागबान’ पर्यंतचे अनेक चित्रपट पण पाहीले आहेत. पण अनेकांनी ‘वृद्धजीवनशास्त्र’ हा शब्द पण ऐकला नसेल. नीदान मी तरी ऐकला नव्हता. थोडक्यात वृद्धांनी आपले जीवन आनंदात कसे घालवावे याचे पणं एक शास्त्र आहे हे मला पहिल्यांदा कळले.

मी जेव्हा जेव्हा अमेरिकेत येतो तेव्हा तेव्हा एक गोष्ट माझ्या लक्षात येते. येथील वृद्ध मंडळी त्यांचे जीवन आनंदात जगताना मला दिसतात. बहुतेकांचे चेहेरे आनंदी असतात. त्यांच्या चेहेर्यारवर हास्य असते. मिस्कीलपणा तर भरपूर असतो. हसत खेळत हे लोक जीवन जगत असतात. तुम्हाला वाटेल की अमेरिका हा श्रिमंत देश आहे. या लोकांकडे भरपूर पैसा असतो. सरकार पण या लोकांची काळजी घेत असते म्हणून हे लोक आनंदाने जगत असतात. पण हे आपल्याला वाटते तेवढे खरे नसते. या लोकांनी सुद्धा आयुष्यात अनेक दुःखे भोगलेली असतात. अनेक संकटांना तोंड दिलेले असते. अनेकवेळा मानहानी झालेली असते. काहीजणांना तर वर्णद्वेषाला पण तोंड द्यावे लागलेले असते. बरे यांची संकटे पण फार विचित्र असतात. डायव्होर्स होणे, नवर्यााने बायकोला किंवा बायकोने नवर्याअला अचानक सोडून जाणे, अचानक नोकरी जाणे, मुलांनी लहान वयातच घर सेडून जाणे आणि वर्षातुन एकदाच म्हणजे थॅन्क्सगिव्हिंगच्या दिवशी आणि ते सुद्धा जमलेच तर भेटायाला येणे, सावत्र आई किंवा सावत्र बाप असणे, अचानक बिघडणारी इकॉनॉमी या सारखी संकटे या लोकांवर कोसळलेली असतात. तरी सुद्धा हे लोक हॅपी असतात. नाहीतर आपल्याकडे नेमके उलटे चित्र असते. मला ठाऊक असलेली बहुतेक म्हातारी मंडळी आंबट किंवा नुकतेच एरंडेल घेतलेल्या चेहेर्या ने वावरताना दिसतात. त्यांचे चेहेरे खंगलेले, दुःखी, कष्टी, उदास आणि काळवंडलेले असतात. मरण येत नाही म्हणून कसेतरी जगायचे किंवा आला दिवस ढकलायचा हे यांचे सूत्र असते. त्यांचा बोलण्याचा विषय पण बहुतकरून एकच असतो. ते म्हणजे त्यांचे आयुष्य किती वाईट आहे हे सांगत बसणे. त्यांची चर्पटपंजीरी ऐकल्यावर कोणाचाही समज, ‘म्हातारपण नको रे देवा’ असे होण्याचा संभव असतो. अमेरिकेमध्ये वृद्धकाळाला ‘गोल्डन ईयर्स’ म्हणतात पण आपल्याकडे मात्र या गोल्डन इयर्सचे मातेरे केलेले असते. असे का होते याचा मी गेली अनेक वर्षे विचार करत होतो. मग माझ्या लक्षात आले की या लोकांना थोड्याफार प्रमाणात का होईना ‘वृद्धजीवनशास्त्र’ कळलेले आहे आणि ते सुद्धा तरुण वयात कळलेले आहे. आपल्याकडे मात्र या शास्त्राचा थांगपत्ताच लोकांना नाही. त्यामूळे हे शास्त्र आता वृद्धांबरोबरस तरुणांनी पण जाणून घेणे आवश्याक आहे.

सुप्रसिद्ध मराठी लेखीका मंगला गोडबोले यांचेकडून मी पहिल्यांदा हा शब्द ऐकला. तुम्ही म्हणाल मंगलाताई तर विनोदी लेखीका म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांचा ‘वृद्धजीवनाशी’ काय संबंध? (त्या पण ज्येष्ठ नागरीकच आहेत). पण त्याचे असे झाले.

सन 1963 साली पुण्याच्या डेक्कन जिमखाना भावेस्कूलमधून (आत्ताचे विमलाबाई गरवार हायस्कूल) 11 वी म्हणजे मॅट्रिक झालेल्या आमच्या बॅचला 54 वर्षे झाली आहेत. सन 2013 साली आमच्या बॅचला 50 वर्षे पूर्ण झाली त्याबद्दल पुण्याला एका भव्य स्नेह मेळाव्याचे म्हणजेच गेट टुगेदरचे आयोजन करण्यात आले होते. त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला. जवळ जवळ 70 च्या वर माजी विद्यार्थी आणि विद्यार्थिनी या मेळाव्याला उपस्थीत होते. त्यानंतर माझे मित्र सुरेश रानडे आणि जयंत दामले यांच्या पुढाकाराने महिन्यात एकदा भेटणे आणि वर्षातुन एकदा गेट टुगेदर करणे असे प्रोग्रॅम सुरू झाले. या वर्षीचा म्हणजे सन 2017 चा गेट टुगेदर जानेवारी महिन्यात पुण्यात पार पडला. याला पण 50 च्या वर मंडळी उपस्थीत होती. या मध्ये महिलांची संख्या जवळ जवळ पुरुषांइतकीच होती. या मेळाव्याला मंगलाताई गोडबोले यांना मुख्य आतिथी म्हणुन आमंत्रीत केले होते. आपल्या 45 मिनिटांच्या खुसखुशीत आणि विनेदाची झालर असलेल्या भाषणात मंगलाताईंनी ‘वृद्धजीवन’ या विषयावर पहिल्यांदा प्रकाशझोत टाकला. त्यांच्या बोलण्यातून ‘वृद्धजीवन’ हे एक शास्र आहे याचा अंदाज आला. यावर मी पण थोडाफार अभ्यास केला.

एका फ्रेंच महिलेने सन 1950 ते 1070 या 20 वर्षांच्या काळात अनेक वृद्ध व्यक्तींच्या जिवनाचा अभ्यास करून त्यावर एक ग्रंथ लिहीला आहे. हा 600 पानांचा ग्रंथ असून याचे इंग्रजी भाषांतर पण उपलब्ध आहे. या ग्रंथामध्ये वृद्धांच्या जीवनाचा अभ्यास करून आणि त्यांचे अनुभव विचारात घेऊन ‘वृद्धांनी त्यांचे जिवन आनंदात कसे घालावावे’ या विषयी काही मार्गदर्शक तत्वे सांगीतली आहेत. वृद्धांच्या जीवनावरचा हा जगातला पहिला ‘ऑथेंटिक’ ग्रंथ समजला जातो. हा अभ्यास जरी युरोपमधील वृद्ध मंडळींबद्दल मर्यादीत असला तरी इतर देशातील वृद्ध मंढळींना पण यातील बरीच तत्वे लागू होतात. तसेच तुम्हाला यातील काही तत्वे ठाऊक असतील, काही नवीन असतील. काही पसंत पडतील तर काही पसंत पडणार नाहीत. पण वाचायला तरी काहीच हरकत नाही. असो.

माणसाच्या आयुष्यातील प्रत्येक महत्वाच्या घटनेला एक ‘स्टार्टिंग पॉईंट’ असतो. माणसाचा जन्म झाला की त्याच्या आयुष्याला सुरवात होते. त्याला 16 वे वर्ष लागले की त्याच्या तारुण्याला सुरवात होते. त्याचे लग्न झाले की त्याच्या वैवाहीक आयुष्याला सुरवात होते. हे सगळे ‘स्टार्टिंग पॉईंट्स’ आहेत आणि याला ‘सेलिब्रेशन’ असते. सेलिब्रेशन हे नेहमी आनंद व्यक्त करण्यासाठी होत असते. पण वार्धक्याला म्हणजे म्हातारपणाला नक्की असा स्टार्टिंग पॉईंट नसतो की याचे सेलिब्रेशन पण नसते. मी वृद्ध झालो म्हणून कोणी आनंद व्यक्त करत नसतो. देवाने माणसाला पहिल्यांदा केवळ 25 वर्षांचेच आयुष्य बहाल केले होते. पण माणसाने वारंवार देवाकडे जाऊन अधीक आयुष्याची मागणी करायला सुरवात केली. मग देवाने घोडा, बैल, गाढव, माकड या प्राण्यांची आयुष्ये कमी करून माणसाचे आयुष्य वाढवले. म्हणुन मग माणसाला पंचविशीनंतर घोड्यासारखे धावावे लागते, मग आधी बैलासारखी आणि मग गाढवासारखी ढोर मेहेनत करावी लागते शेवटी त्याचे माकड होते असे सांगणारी एक बोधकथा जगप्रसिद्ध आहे. शरीरशास्त्र दृष्ट्या माणसाच्या पंचविशीनंतरच त्याच्या वार्धक्याला सुरवात होते. म्हणजे माणसाचे म्हातारपण हे त्याच्या वयाच्या पंचविशीपासूनच सुरु होते. आपल्याकडे माणसाला 60 वे वर्ष लागले की त्याच्या म्हातारपणाला सुरवात झाली असे समजले जाते. पण ते काही खरे नाही. हल्ली चाळीशितील माणसे सत्तर वर्षांच्या वृद्धासारखी वागत असतात तर सत्तरीतील वृद्ध पंचवीस वर्षांच्या तरुणाच्या उत्साहाने वावरत असतात. पण एक गोष्ट मात्र खरी आहे. प्रत्येक माणसाला वृद्धत्व हे ‘बाय डिफॉल्ट कंपल्सरी’ मिळालेले आहे. यातून सुटका नाही. यातून सुटका करायचा एकच मार्ग आहे तो म्हणजे लौकर किंवा तरूण वयात मरणे. पण हा मार्ग काही योग्य नाही. कारण मरण काही आपल्या हातात नसते आणि आत्महत्या हा गुन्हा आहे.

पूर्वीचे वृद्ध आणि हल्लीचे वृद्ध यात बराच फरक पडला आहे. पूर्वी वृद्ध माणूस म्हणजे सोडावॉटरच्या बाटलीच्या तळासारख्या काचेचा जाड भिंगांचा चष्मा लावणारा, तोंडाचे बोळके झालेला किंवा दातांची कवळी वापरणारा, कानात भले मोठे कर्णयंत्र घातलेला, हातात काठी घेऊन गबाळ्या कपड्यात थरथरत्या अंगाने फिरणारा गरीब बापडा म्हातारा असे रूप असायचे. पण हल्लीचे वृद्ध असे नसतात. त्याची शरीरे धडधाकट असतात, अंगात अजून ताकद असते, ते चांगले कपडे घालत असतात. पूर्वी चष्मा लागणे ही वृद्धत्वाची खूण समजली जायची. पण हल्ली तर तरुण वयात किंवा लहान वयातच चष्मा लागतो. त्या मूळे चष्मा लागणे ही वृद्धत्वाची खूण कालबाह्य झाली आहे. पूर्वी वृद्धांचे वय छोटे होते. साधारणपणे वयाची साठी ओलांडली की पाच ते दहा वर्षात माणसाची ‘एक्झिट’ व्हायची. पण आता तसे होत नाही. आता माणसाचे वय वाढत चालले आहे. आता 80 किंवा 90 वर्षांचे अनेक वृद्ध दिसू लागले आहेत. याला कारणीभूत आहे ‘मोडिकल इंडस्ट्री’. आता ‘मेडिकल’ हे प्रोफिशन राहीले नसून त्याची मोठी इन्डस्ट्री झाली आहे. या इन्डस्ट्रीच्या इन्कमचा एक मुख्य सोर्स वृद्धांना येन केन प्रकाराने जिवंत ठेवणे, त्यांचे आयुष्य वाढवत बसणे हा आहे. माणसाची सुद्धा जास्तीत जास्त वर्षे जगण्याची इच्छा पण असते. त्यामूळे आपल्याला आता आपल्याला कोणी लवकर मरू देणार नाही याची खूणगाठ प्रत्येकाने बांधून ठेवावी. भारतीय कुटुंबांमध्ये अजुन एक गोष्ट आढळून येते. पुरुषाचा मृत्यु आधी होतो आणि त्याच्या मृत्युनंतर त्याच्या पत्नीला कमीत कमी दहा वर्षे तरी जगावे लागते. मला काही ज्येष्ठ महीला ठाऊक आहेत की ज्यांच्या पतीचे निधन 60 ते 70 या वयांमध्ये झाले (त्या वेळी या महिलांचे वय 50 ते 60 च्या मधे होते). आता या महिलांचे वय 80 ते 90 च्या मधे आहे. त्यामूळे आपल्या मृत्युनंतर आपली पत्नी कमीत कमी 5 ते 10 वर्षे तरी जिवंत रहाणार आहे तर त्यासाठी लागणार्यात पैशांची योग्य ती तजवीज करून ठेवणे आवश्यक आहे. पती पत्निमध्ये जर पती आधी गेला तर पत्निची फारशी ससेहोलपट होत नाही. पण जर पत्नि आधी गेली तर मात्र पतीची फारच ससेहोलपट होते असे आढळून आले आहे. असा जर प्रसंग आला तर काय करायचे हे पण आधीच ठरवावे लागेल.

कमी कमी होत जाणारे अधीकार ही वृद्ध मंडळींची पहीली प्रमुख समस्या असते. याची सुरवात शरीरापासून होते. आपले शरीरच आपले हुकुम मानेनासे होते, साथ देईनासे होते. मग आपल्या घरातले किंवा संसारातले आपले महत्व कमी कमी होऊ लागते. घरामध्ये आपले हुकुम चालेनासे होतात. अनेक वृद्धांना हे पचवणे फार जड जाते. ज्या घरात आपला दरारा होता त्या घरात आता आपली किंमत शून्य झाली आहे हे अनेकांना सहन होत नसते. मग त्यांची, ‘मला कोणी घरात विचारत नाही. मला घरात काही किंमत नाही. हल्ली माझा सल्ला घेतला जात नाही. मी म्हणजे घरातील एक अडगळीची वस्तु झालो आहे’ अशी बडबड चालू होते. घरातील तरूण पिढी विचारत नाही हा त्यांचा मुख्य आरोप असतो. पण त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी. आपण जेव्हा कुटुंब प्रमुख होतो तेव्हा आपल्या घरातील मंडळी, विशेषतः मुलेबाळे आपला हेकुम पाळत होती. आपल्या इच्छेप्रमाणे जगत आणि वागत होती. आपल्या प्रतिष्ठेला किंवा इभ्रतीला कोणत्याही प्रकारची बाधा येणार नाही याची काळजी घेत होती. आता ती मंडळी कुटुंब प्रमुख झाली आहेत तर त्यांचा योग्य तो आदर करणे हे आपले कर्तव्य आहे हे वृद्ध मंडळींनी जाणून घ्यायला हवे. यात कोणताही प्रकारचा कमीपणा नसतो. यासाठी काही पथ्ये मात्र पाळणे जरूरीचे आहे. आपल्या घरातील दुय्यम स्थान आपण स्वखुशीने स्विकारायला हवे. घरातील तरूण पिढीला जेणेकरून आपला त्रास किंवा वैताग होणार नाही. तसेच त्यांच्या प्रतिष्ठेला धक्का पोचणार नाही अशी वागणूक आपण ठेवायला हवी हे आता वृद्ध मंडळींनी जाणून घ्यायला हवे. यासाठी वारंवार घरातील तरुणांच्या मधे मधे करू नये. त्यांच्या कामाला नेहमी प्रायॉरिटी द्यावी. त्यांना सतत उपदेशांचे डोस पाजत बसू नये तसेच सुचनांचा मारा करत राहू नय. त्यांचे निर्णय त्यांना घेण्याची पूर्ण मुभा द्यावी. त्यांनी मागितल्याशिवाय सल्ले देऊ नयेत. जेणेकरून त्यांच्या काळजीत भर पडेल असे काही करू नये. सर्वात महत्वाचे म्हणजे त्यांच्याविषयी तक्रारी करत फिरत बसू नये किंवा त्यांना नावे ठेवत तसेच त्यांच्यातील दोष काढत बसू नये. वृद्धांनी एवढी पध्ये जरी पाळली तरी त्यांच्या 50 टक्के समस्या आपोआप कमी होतील.

अनेक वृद्ध मंडळींना आयुष्यात अनेक कष्ट आणि मेहेनत करावी लागलेली असते. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीला तोंड द्यावे लागलेले असते. काडी काडी जमवून संसार उभा करावा लागलेला असतो. कोंड्याचा मांडा करून संसार करावा लागलेला असतो. पै पै वाचवून मुलांचे शिक्षण करावे लागलेले असते. अनेक प्रकारचे त्याग करावे लागलेले असतात. याचा त्यांना सार्थ अभीमान असतो. काहीजण तर स्वतःला त्यागमूर्ती समजत असतात. पण हल्लीच्या तरूण पिठीला त्यांच्या या कष्टाचे किंवा त्यागाचे फारसे अप्रुप किंवा ऍप्रिसिएशन नसते. कारण हल्लीच्या तरूण पिढीलापण तेवढेच कष्ट, मेहेनत किंवा त्याग करावा लागत असतो. फक्त त्याचे रूप बदललेले असते. असे असूनही अनेक वृद्ध मंडळींना ‘आमच्यावेळी असे होते, आमच्यावेळी तसे होते’ असे सांगत आपला भूतकाळ तरुण पिढीच्या तोंडावर फेकून मारण्याची सवय असते. ही सवय अत्यंत घातक आहे. अनेक वेळा त्याच त्याच गोष्टी पुन्हा पुन्हा सांगीतल्या जातात. त्यामूळे माणसे बोअर होत असतात. तसेच कालच्या भूतकाळावर उद्याचा भविष्यकाळ घडत नसतो. तो आजच्या वर्मानकाळावर घडत असतो हे तत्व ते विसरतात. काही मंडळी तर भूतकाळात पार डुंबुंन गेलेली असतात. त्यांनी आता भूतकाळातून बाहेर पडून वर्तमान काळात येणे आवश्यक असते. त्यामूळे भूतकाळातील घटना शक्यतो ‘झाले गेले गंगेला मिळाले’ या कॅटेगरीत ठेवाव्यात आणि वर्तमान काळ आनंदात कसा घालवता येईल याची चिंता करत बसावे.

पूर्वीच्या वृद्धांच्या मानाने हल्लीच्या वृद्धांची सांपत्तीक स्थिती बरीच चांगली असे. बँकेत बर्याापैकी पैसे असतात. स्वतःचे एखादे घर, प्लॉट, फ्लॅट, बंगला किंवा जमिनीचा तुकडा असतो. ही संपत्ती गोळा करायला सुद्धा पुष्कळ मेहेनत करावी लागलेली असते. त्यामूळे या संपत्तीचा रास्त अभीमान असणे साहजीकच आहे. अनेकांना असे वाटत असते की ही संपत्ती मुलाबाळांसाठी किंवा नातवडांसाठी आपली आठवण म्हणून ठेऊन द्यावी. काहीजणांचा असा पण समज असतो की आपल्या संपत्तीकडे पाहून किंवा आपल्या संपत्तीच्या मोहापायी आपली मुले बाळे आपली योग्य अशी देखभाल करतील. पण हा फार मोठा भ्रम आहे. हल्लीच्या तरून पिढीला या संपत्तीचे पण फारसे अप्रुप राहिलेले नसते. कारण हल्लीची तरूण पिढी कितीतरी पटीने जास्त पैसे कमवत असते. त्यामूळे या संपत्तीचे त्यांना काहीच आकर्षण नसते. आता व्रद्धांनी या संपत्तीचा उपयोग स्वतःसाठी करायला शिकले पाहीजे. अनेक वृद्ध मंढळी भावनेच्या भरात किंवा दबाव आल्यामूळे आपली सर्व संपत्ती जिवंतपणीच मुलाबाळांमध्ये वाटून टाकतात किंवा रहाते घर मुलांच्या नावाने करून टाकतात. मग यातूनच ‘नटसम्राट’ सारखी नाटके आणि सिनेमे तयार होतात आणी उतारवायात ‘कोणी घर देता का घर’ असे म्हणत बसायची पाळी येते. त्यामूळे जिवंतपणी आपली सर्व धनदौलत आणि संपत्ती मुलाबाळांच्या किंवा नातवंडांच्या नावे करण्याचा गाढवपणा करू नये. आपली संपत्ती आपल्या मृत्युनंतरच मुलाबाळांना मिळावी अशी कायदेशीर तरतुद करावी. त्यासाठी मृत्युपत्रासारखे अनेक मार्ग उपलब्ध आहे. अजून एक गोष्ट. वृद्धपणाचा काळ हा गुंतवणूकीसाठी योग्य नव्हे. अनेक जण सांगतात म्हणून अनेक वृद्ध मंडळी शेअर मार्केट म्हणजेच स्टॉक मार्केट, म्युच्युअल फंड, कमोडिटी मार्केट यामध्ये गुंतवणूक करत असतात. पहीली गोष्ट म्हणजे या वयात संपत्तीमध्ये वृध्दी करायचे काही कारण नसते. दुसरी गोष्ट म्हणजे या रिस्की इन्व्हेस्टमेन्ट आहेत. त्यामूळे उगीच ब्लड प्रेशर वाढते आणि रात्रिची झोप खराब होते. हे पैसे आता इन्जॉय करण्यासाठी वापरावेत. फॉरीन टूरला जावे (हल्ली अनेक ज्येष्ठ नागरीक अशा टूर्स करू लागले आहेत), भारत फिरून बघावा, आपला छंद जोपासावा किंवा वाढवावा, नाटक सिनेमा बघावा किंवा एखादा आवडीचा कोर्स करावा, छान कपडे घालावेत. अनेक मार्ग आहेत.

वृद्धपणामध्ये प्रत्येक वृद्धाने आपल्या तब्येतिची काळजी घेणे मात्र आवश्यक आहे. वेळच्यावेळी वैद्यकीय तपासण्या करून घेणे, औषध पाणी वेळच्या वेळी घेणे, पथ्य पाणी संभाळणे या गोष्टी आवश्यक आहेत. व्यायाम झेपेल एवढाच करावा. अघोरी व्यायामाच्या मागे लागून आपली तब्येत आणखी बिघडवून घेऊ नये.

हल्ली अनेक वृद्धांकडे भरपूर वेळ असतो आणि तो कसा घालवायचा हा त्यांचा मुख्य प्रॉब्लेम असतो. डोळे अधू झाल्यामूळे फारसे वाचन करणे जमत नाही. हल्ली टी. व्ही. पण फारसा पहाण्याच्या लायकीचा राहीलेला नाही. मग करायचे काय हा प्रश्न उपस्थीत होतो. यावर उत्तम उपाय म्हणजे ‘टेक्नोसॅव्ही’ व्हावे. इंटरनेटचा जास्तीत जास्त उपयोग करायला शिकावे. हल्ली अनेक घरांमध्ये इंटरनेट कनेक्शन असते. नसले तर घेता येते. अनेक घरांत पिसी, लॅपटॉप किंवा टॅबलेट्स पडलेल्या असतात. नसल्यास विकत आणता येतात. इंटरनेटने आख्या जगाचे दार उघडून दिले आहे. स्मार्टफोममुळे तर इंटनेट आपल्या खिशापर्यंत किंवा पर्सपर्यंत पोचले आहे. त्यामूळे कॉम्युटर कसा वापरायचा, इंटरनेट कसे वापरायचे, स्मार्ट फोन कसा वापरायचा हे शिकून घ्यावे. सोशल मिडीयाचा उपयोग करावा. यूट्युबवर आवडीचे व्हिडियो बघावेत. आपल्याला या विषयांवरचे गुरु आपल्या घरातच भेटतात. ते म्हणजे घरातील तरून पिढी. त्यांचेकडून हे सर्व शिकताना त्यांच्यातील अंतर कमी होते आणि त्यांच्याशी दोस्ती पण होते.

विनोदासारखा दुसरा विरुंगळा नसतो. एकदा खळखळून हसले की जिवनातील अनेक दुःखे हलकी होतात. विनेद हा नेहमी विसंगतीवर अवलंबून असतो आणि आपल्या आजुबाजुला अनेक विसंगत आणि विनोदी गोष्टी सतत घडत असतात. त्यामूळे विनोद बुद्धी सतत जागृत ठेवावी. अमेरिकेतील वृद्ध मंडळींमध्ये चांगली विनोदबुद्धी असते आणि ते नेहमी दुसर्यावला हसवण्याचा प्रयत्न करीत असतात असे मला आढळून आले आहे.

हल्ली आपल्याकडे वृद्धांना ‘ज्येष्ठ नागरीक किंवा सिनियर सिटिझन्स’ म्हटले जाते. पण वृद्ध आणि सिनियर सिटिझन यात फरक आहे. जे शरीराने आणि मनाने गलीतगात्र झालेले असतात ते वृद्ध असतात पण जे शरीराने आणि मनाने धडधाकट असतात ते सिनियर सिटीझन्स असतात. आपण वृद्ध व्हायचे का सिनियर सिटिझन रहायचे हे प्रत्येकाच्या मनोवृत्तीवर अवलंबून असते. हा चॉईस प्रत्येकाला असतो. 87 वर्षांचे वॉरन बफे, 84 वर्षांच्या आशाताई भेसले, 71 वर्षांचे डोनाल्ड ट्रंप ही मंडळी अजुनही वृद्ध नसून सिनियर सिटिझन कॅटेगरीतच आहेत आणि शेवटपर्यंत त्याच कॅटेगरीत रहातील असे वाटते. अनुभव हा वृद्ध व्यक्तींचा फार मोठा ठेवा असतो. अनेकांच्या कडे प्रचंड अनुभवांचा खजीना असतो. ही खरे म्हणजे या लकांची संपत्ती असते. सिनियर सिटिझन मंडळी या अनुभवाचा उत्तम उपयोग करत असतात. आपणही जास्तीत जास्त काळ ‘सिनियर सिटिझन’ कॅटेगरीत रहावे यासाठी प्रयत्न करायला काहीच हरकत नाही.

या शिवाय अजून बरीच तत्वे आहेत. पण ही प्रमुख तत्वे आहेत. ही तत्वे जरी युरोपियन लोकांसाठी असली तरी ती आपल्याला पण लागू आहेत. मंगलाताईंनी त्यांच्या भाषणात पण याच तत्वांवर प्रकाश टाकला.

आता ही तत्वे पाळून आपले म्हातारपण सुखी आणि आनंदी बनवायचे की नाही जे ज्याचे त्याने ठरवायचे.

— उल्हास हरी जोशी
मोः-9226846631

उल्हास हरि जोशी
About उल्हास हरि जोशी 31 Articles
श्री उल्हास जोशी हे गुंतवणूक विषयक सल्लागार असून ते Financial Health या विषयावर जनजागृती करतात. या विषयावरील त्यांचे अनेक लेख प्रकाशित झाले आहेत. ते मेकॅनिकल इंजिनिअर असन ४० वर्षे मार्केटिंग आणि सेल्स या क्षेत्रात कार्यरत होते.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..