नवीन लेखन...

विश्वकर्मा शिल्पकार – समालोचन

विश्वकर्मा समाजाच्या सांस्कृतिक अध्ययनात सर्वप्रथम शिल्पकारांच्या अस्तित्वाचा शोध घेतल्या गेला आणि नंतर अन्य पैलुवर विचार करण्यात आला आहे. विश्वकर्मा शिल्पकारांनी आपल्या कला कौशल्याने धर्म, रुढी, परंपरा, श्रद्धा, दैवते, कुलाचार, नैतीकता, शिष्ठाचार, या सर्व मनो व्यापाराना शाश्वत रुप दिले आणि एका पिढीने जतन केलेली सांस्कृतिक ठेव पुढच्या अनेक पिढींपर्यंत पोहोचविण्याचे कार्य केले. त्यांनी राष्ट्रीय जीवनच समृद्ध करुन नवोन्मेषाने जगण्याची प्रेरणा दिली. पाषाणात प्रेम, शौर्य, हास्य, करुणा किंवा कोणताही भाव मूर्तीमंत (जसाच्या तसा) कोरणे मोठे अबघड काम आहे. पुराण ग्रंथातील प्रसंगाना सुद्धा मूर्त रुप देऊन पाषाणातून सजीव केल्या गेले, त्यामुळे वाचा नसलेले दगडही बोलते झाले; प्रेक्षकांशी संबाद साधू लागले. ही किमया शिल्पकाराच्या टाकीने केली. शिल्पकाराच्या टाकीची सर्जनशक्‍ती म्हणूनच जनसामान्यांच्या, शासनकर्त्यांच्या तसेच धर्मरक्षकांच्या प्रसंशेस पात्र ठरली आहे. प्राचीन काळी कवी हा शब्द विद्वान शिल्पकारांसाठी पर्यायवादी शब्द होता. शिल्पकारांनी जड पाषाणाला आकार देऊन त्यातून असे भाव प्रकट करावयास लावले की, त्या पाषाणांनीच इतिहासाची कवणे पिढ्यानपिढ्या गायली आहेत. तेव्हा या अर्थानेही शिल्पकार कवी ठरले.

भारतीय शिल्पकलेने युगायुगाचा प्रतिधात, राजकीय उलाढाल, विदेशी हस्तक्षेप या सर्व प्रभावांना शांतपणे पचविले कसलेही विपरीत परिणाम बाहेर ओकले नाहीत. आणि सर्व प्रभावांना आत्मसात करुन आपले मुख निरंतर नवोन्मेषाकडेच वळवून ठेवले. ‘रविंद्रनाथ टागोरांनी’ भारतीय कलांच्या सामाजिक प्रकृतिच्या संदर्भात म्हटले आहे की, ‘भारतात आलेले अनार्य, द्रविड, चीनी, शक, हूण, पठाण, मुगल यांच्या प्रभावाला आत्मसात करुन सुद्धा शेवटी कला ही आपले सत्व तसेच ओज या बाबत भारतीयच राहिली.’ म्हणून प्राचीन भारतीय कलांमध्ये जो भेद दिसून येतो, तो एक तर प्रादेशिक आहे किंवा विकासाच्या विविध पायरीचा निर्देशक तरी आहे. याहून दुसरा भेद नाही.

खरे म्हणजे मनुष्याच्या उत्कर्षाचा इतिहास कलेच्याच हाताने लिहिल्या गेला. परंतु कांही कलाविषयक प्राचीन ग्रंथात कलेला हस्तकौशल्य, चमत्कार प्रदर्शन किंवा वैचित्र्य या पेक्षा मोठा दर्जा दिल्या गेला नाही. याचा मोठा खेद वाटतो, त्याला वस्तूचे रुप सुधारण्याची ‘विशेषतः’ म्हटल्या गेले. जेव्हा कलेला केवळ ‘कौशल्य’ संबोधल्या गेले तेव्हा कलेचा एकमात्र उद्देश मनोरंजन समजल्या गेला. त्यामुळे चकोर, तीतर, बटेर, खेळविणे सुद्धा कलेच्या अंतर्गत मानल्या गेले. कलेचे चौसष्ट किंवा त्याहून जास्त प्रकार करुन कलेचे क्षेत्र व्यापक केले खरे, परंतु या प्रवृत्तीमूळे मानवी व्यवहारातल्या साध्या साध्या क्रिया सुद्धा चौसष्ट कलांत घुसडल्या गेल्या. कलेचे हे असले हलके विश्लेषण करुन कलेची किंमत कमी ठरविली गेली. अभिजात शिल्पकृतींना मनोरंजनाचे स्वस्त माध्यम मानून त्याची समीक्षा करणे म्हणजे कांही सौंदर्य निरिक्षण नव्हे. हा कलेला दिलेला न्याय तर नव्हेच नव्हे. भारतीय कलेचा दृष्टीकोण केवळ कलेकरीता कला मूळीच नव्हता आणि तीला परतत्वाचा स्पर्श आहे. तीला विलासात गुंतवून न ठेवता परमतत्वाकडे घेऊन जायचे आहे. भोग पर्यवसायी कला वस्तूत: कला नाही. तसे तीचे प्रयोजन नाही, तर ज्या द्वारे परमानंदाची प्राप्ती होते, तीच श्रेष्ठ कला होय असा जो श्रेष्ठ आचार्यांचा निर्वाळा आहे, तो दृष्टीकोण विश्वकर्मा शिल्पी विसरलेले नाहीत. एकूण सर्वच प्राचीन भारतीय शिल्पांत तसा प्रमाद कधी घडल्याचे दिसत नाही. विश्वकर्मा शिल्पकारांनी कला आणि विज्ञान अध्यात्मापासून वेगळे कधी केलेले नाही. येथील शिल्पकला म्हणूनच धार्मिक विचारधारा, पारलौकिक विचारधारा यांच्याशी समांतर वाटचाल करीत राहिली आहे. भारतीय प्राचीन ऋषीमुनींनी देवविषयक भावना त्यांचे क्रियाकलाप ज्या पद्धतीने आपल्या विचारात व्यक्त केल्या आणि ज्या भावप्रतिमा लेखनात उभ्या केल्या, त्याला अनुसरुन भारतीय विश्वकर्मा शिल्पकारांनी शिल्प निर्मिती केली. विद्वान आचार्यांनी वेळोवेळी जे शिल्प निर्मितीचे नियम ठरवून दिले, ते देव, धर्म आणि राज्य या विषयीच्या मतांवर अवलंबून होते हे खरे आहे आणि यात धर्मतत्वच सर्वात जास्त प्रभावशाली ठरले आहे. त्यामुळे भारतातील विद्या कला या धर्माद्वारेच प्रेरीत झाल्या आहेत. कलेने ज्या भावना प्रदर्शित केल्या. त्यांचे मूल्यांकन धर्मशक्तीने केले. धर्मशक्तीने कधी कलेला भरकटु दिले नाही की, कलेने कधी धर्माचा उंबरठा ओलांडला नाही. विश्वकर्मा शिल्पींनी कलेचे प्रदर्शन धर्माच्या आधीन राहूनच केले मात्र याचा अर्थ असा नाही की, कलेला स्वत:चे आत्मतत्व नाही, कलाकारात स्वतःचा मुक्त उन्मेष उधळण्याचे सामर्थ्य नाही! धर्म प्रवृत्तीमुळेच भारतात धार्मिक स्थापत्याची निर्मिती झाली; धर्मप्रवृत्तीमुळेच आभूषणात पावित्र्यभाव पाहिल्या गेला. हे जरी खरे असले तरी शिल्पकला कधी कोण्या एका धार्मिक मतवादाच्या सीमेत बांधल्या गेली नाही. ती साऱ्याच धर्म विचारांची सारखीच प्रेरक शक्ती ठरली. विश्वकर्मा शिल्पीनी जैन, बौद्ध, वैष्णव, शैव, शाक्त, सौर अशा सर्व धर्माच्या मूर्त्या, मंदिरे, लेण्या वास्तू सारख्याच तन्मयतेने निर्माण केल्या.

या देशाची सांस्कृतिक एकता टिकविण्यात आणि त्यात नित्यनुतन आदर्शांचा समावेश करण्याच्या दृष्टीने प्राचीन राजवंशाचे महत्वपूर्ण योगदान राहिले आहे. वेळोवेळी येथील कवी कलाकार आणि शिल्पकारांचा यथायोग्य सन्मान तसेच प्रोत्साहन देण्याबाबत येथील विद्याप्रेमी तसेच कलानुरागी राजांनी स्वतःला धन्य मानले. याची अनेक उदाहरणे ग्रथात आणि शिलालेखात पहावयास मिळतात. राजदरबाराकडून कला कारागीरांना शिल्पकारांना राष्ट्रीय सन्मान प्राप्त होत असत, त्यांना तऱ्हेतऱ्हेची बक्षिसे मिळत. उदरनिर्वाहासाठी भूमी सुद्धा दान मिळत असे. वेळोवेळी कला कारागीरांच्या परिषदा आयोजित करुन त्याद्वारा नवनिर्मितीचे मानक निश्चित केल्या जात असत अशावेळी शिल्पशास्त्रीय, धर्मशास्त्रीय विचारांचे आदान प्रदान करण्यासाठी अनेक सुविधा उपलब्ध होत असत.

या दृष्टीने विचार केला तर केवळ भारतातच नव्हे, तर जगातील सर्व देशात कलेचे संरक्षण व पोषण शासक, सामंत आणि धनिकाकडूनच झाले आहे. प्राचीन भारताच्या राजवंशानी कलेच्या माध्यमातून दूर देशापर्यंत सांस्कृतिक संबंध प्रस्थापित केले. आशिया खंडातील अन्य अनेक देशात सुद्धा सांस्कृतिक आणि वैचारिक एकता निर्माण करण्यासाठी कलेची विशेष भूमिका राहिली आहे. कदाचित हेच कारण असावे की भारतीय राज्य नियामक आचार्यांनी एका युवराजासाठी अन्य योग्यते सोबतच कलाभिज्ञ असणे आवश्यक ठरविले.

अभिजात कलाशिल्पीनी कधी स्वतःला मर्यादित करुन घेतले नाही. त्यांनी स्वत:च्या कलागुणांना धर्माच्या चौकटीत बंदिस्त केले नाही, तसे ते कोणत्या प्रदेशातही बंदिस्त झाले नाहीत. त्यांनी चारही दिशेला आपल्या कलेची उधळण मुक्त हस्ते केली. त्यांना ज्या ज्या प्रदेशात बोलावणे आले तेथे तेथे आपली कला तेवढयाच तन्मयतेने प्रदर्शित केली. अनेकदा शिल्पकारांना राजाज्ञेने स्थानांतर करावे लागले, भिन्न धर्मियांच्या प्रदेशात आपली कला रचना करावी लागली. अनेकदा असे झाले की, त्या प्रदेशातील राज्यशासनच परधर्मिय राजांनी बळकावले तरी शिल्पकाराच्या शिल्पधर्मात बदल घडला नाही.

जे परराष्ट्रीय भारत भूमीत येऊन स्थिरस्थावर झाले. त्यांनी पुढे भारतीय संस्कृतीच्या संवर्धनाचाच विचार केला. असे काही शिल्पकार अलेक्झांडर सोबत आले होते आणि त्यांनी आपली ग्रीक शैली भारतीय शिल्पात उतरविली त्यातूनच गांधार शैलीचा उगम झाला. परंतु त्यामुळे शिल्पांच्या शैलीचा आणि तंत्राचा विकासच घडला.

असुर, दानव, नाग, यक्ष, वानर वगैरे वांशिक भेद असलेले शिल्पी आणि वैदिक, जैन, बौद्ध, वैष्णव, शैव, शाक्त, सौर, वीरशैव अशा कोणत्याही धर्माचे उपासक असलेले शिल्पी असो, प्रस्थापित धार्मिक मतांशी स्वतःची नाळ जोडत शिल्प उपासना करीत राहिले. राजाचा धर्म कोणताही असला तरी राजांनी ज्या धर्माची मंदिरे मूर्त्या निर्माण करण्याची इच्छा प्रकट केली शिल्पींनी त्याचा पूर्ण आदर केला व आपले सारसर्वस्व ओतून अप्रतिम तसेच अजरामर कलाकृती निर्माण केल्या, सोबतच धार्मिक पावित्र्यही तेवढेच राखले आणि उपासकांच्या धार्मिक भावनाचा आदर केला. धार्मिक द्वेष कधी पसरविला नाही. तशी उदाहरणे भारतीय इतिहासात नाहीत.

शिल्पकार हा मूळ कोणत्याही वंशाचा असला तरी विश्वकर्मा हा देव त्याला आपला वाटला, त्यामुळे भिन्न भिन्न गुणकर्माच्या शिल्पाचा विश्वकर्मा समाज निर्माण होऊ शकला आणि त्यांनी स्वतःला विश्वकर्मापुत्र म्हणवून घेतले. मयासुर स्वत:ला दानवाचा विश्वकर्मा म्हणवून घेतो, तर रामायणातला स्थपति नल स्वतः विश्वकर्मा वंशज म्हणवितो. विश्वकर्मा वंशाची निर्मिती प्रख्यात अशा शिल्पतज्ज्ञ ऋषीकुलातून झाली. त्यांची मूळ धार्मिक मतप्रणाली, प्रादेशिक वंशभिन्नता, शिल्प संस्कृतीच्या कधी आड आली नाही. त्यामुळेच शिल्पकारांनी स्वत:ची वेगळी देवळे निर्माण केली नाहीत की वेगळे देव निर्माण केले नाहीत. विश्वकर्मा हा देव सर्वांचा देव म्हणून देवमंडलात सामावूनच राहिला. अन्य देवांप्रमाणेच त्यांच्याही स्वरुपाचे वैदिक काळात, पुराण काळात आणि इतिहास काळात बदल घडत गेले. परंतु विश्वकर्मा सर्व समाजाचाच पूजनिय देव राहिला.

विश्वकर्मा वंश हा वैदिक आर्य शिल्पींचा किंवा त्या आर्याच्या उत्तराधिकारी असलेल्या शिल्पींनी निर्माण झाला असावा असे वाटण्याचा संभव आहे आणि ही संभाव्यता भारतातील जाती प्रथेने निर्माण केली आहे. कारण भारतीय लोकांना स्वतःला कोणत्या ना कोणत्या जातीत विभागून घ्यायची सवय आहे. शिल्पकर्म हे मूळात उच्च गुणवत्तेचे काम होते म्हणून त्याला ब्रह्मकर्म सुद्धा म्हटल्या गेले आणि ब्रह्मकर्म करणारे ते ब्राह्मण झाले. परंतु शिल्पकामातील वर्गवारी मूळे सारीच कामे कांही उच्च गुणवत्तेची राहिली नाहीत, शिवाय व्यक्ती निहाय गुणवत्ताही कमी पडली की कामाची गुणवत्ता घसरुन कमी दर्जाची कामे करणे भाग पडले. परिणामी सारेच शिल्पकार ब्राह्मण राहू शकले नाहीत. जातीनिष्ठ वंश हे एक जसे कर्माने निर्माण झाले, तसे यौन संबंधाने निर्माण झाले. जे शिल्पकार सतत क्षत्रियाबरोबर वास करीत, शस्त्रास्त्रे निर्माण करीत, त्यांचे शिक्षण देत व युध्दभूमीवर शस्त्रास्त्रे पुरविण्याचे, ते दुरुस्त करण्याचे काम करीत ते शिल्पकार पुढे क्षत्रिय स्त्रियांची संबंध जुळून आले की क्षत्रिय होत. जे शिल्पकार स्वतः निर्मिती न करता शिल्पांची विक्री करीत किंवा व्यापार करीत, असे शिल्पी पुढे साहाजिकच वैश्य समजल्या जाऊ लागले असतील तर नवल नाही. ज्या विश्वकर्मा शिल्पींवर कोणत्याही दर्जाचे काम करण्याची पाळी आली अशा वेळेस ते शुद्र सुद्धा गणल्या गेलेत. भारतीय जाती प्रथेने आधी कर्मावर जाती निश्चित केल्या आणि त्या पुढे जन्मावर स्थिर करुन एक दुसऱ्याच्या जातीचे कुंपण प्रामुख्याने वरच्या जातीचे कुंपण ओलांडता येणार नाही, अशी व्यवस्था करुन ठेवली यामुळे विश्वकर्मा कारागीर सर्व जातीच्या वर्गवारीत पहावयास मिळतात. विश्वकर्मा वंशाची निर्मिती काही केवळ आर्य लोकांमधून झालेली नाही, तर त्यात असूर, दानव, नाग, यक्ष, किन्नर, वानर आदी भिन्न लोकसमूहातील शिल्पी आहेत. हे समूह जेव्हा आर्यांकडून सत्तेतून पदच्युत झाल्या तेव्हा त्यांना त्यांच्या गुणवत्तेनुसार कांही वरची वर्गवारी दिल्या गेली नाही, विश्वकर्मा समाज असा भिन्न भिन्न स्तरात विभागल्या गेल्यामुळे स्वतःची सांस्कृतिक एकता जपू शकला नाही आणि कधीही एकजात होऊ शकला नाही. विश्वकर्मा समाजाची जात ही बाब नेहमीच वादग्रस्त राहिली आहे.

विश्वकर्मा समाज एकसंघ दिसत नसण्याचे एक कारण म्हणजे त्यांच्या शिल्पाकृतीचे माध्यम धातू, काष्ठ, पाषाण आणि अन्य वस्तू वरील शिल्प असून तेही भिन्नभिन्न उपयोगीतेसाठी बनवावे लागणारे काम होय. त्यातल्या त्यात दैवज्ञ हा घटक तर विश्वकर्मा समाजाचा स्थायी घटक आहे की नाही असा संभ्रम निर्माण करतो. कारण या घटकाचा विकास पुढे स्वतंत्ररित्याच झाला आणि देव व दैव विषयक जाणकार पंडित म्हणून वरिष्ठ सामाजिक दर्जा ही प्राप्त झाला.

खरे म्हणजे विश्वकर्मा समाजाचे प्रत्येक घटक थोड्या थोड्या फरकाने भिन्न व्यवसायी आहेत. म्हणून त्या प्रत्येकाचा स्वतंत्र संशोधनाचा विषय होऊ शकतो. दैवज्ञ या घटकावर तर स्वतंत्र कार्य होणे जरुरी आहे.

या ग्रंथात भिन्न भिन्न शिल्प घडविणाऱ्या विश्वकर्मा समाज घटकांचा एकत्र आणि समग्रलक्षी विचार केलेला आहे. वरवर पाहता त्यांची शिल्प माध्यमे भिन्न असली तरी ते एक शिल्पकौशल्याचे कारागीर सहजच दुसऱ्या प्रकारचे शिल्प घडवू शकत असत आणि असे करतांना त्यांना कोणतेही नवे शास्त्र शिकावे लागत नसे. यातच विश्वकर्माच्या सर्व शिल्पकौशल्याच्या अंतःप्रेरणा एक असल्याचे स्पष्ट होते.

विश्वकर्मा समाज घटकाची सामाजिक स्थिती त्याचा सामाजिक दर्जा हा स्वतंत्ररित्या चर्चेस न घेता त्यांनी घडविलेले शिल्प कितपत उपयोगी ठरले किंवा त्या शिल्पांनी भारतीय समाजाच्या सांस्कृतिक उत्थानात काय काय योगदान दिले, हे स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला. त्यातच त्यांची स्थिती आणि दर्जा स्पष्ट झाला आहे. विश्वकर्मा समाजाला स्वत:चे शास्त्र आहे. शिल्पशास्त्र हे सर्वव्यापी जीवनशास्त्र अंगिकारुन सांस्कृतिक योगदान देणारा विश्वकर्मा शिल्पी त्यात शिल्पकर्माच्या आधारावर उदरनिर्वाह करतो. त्याचे सामाजिक दायीत्व त्याला माहित आहे आणि तो ते दायीत्व काटेकोरपणे पाळतो. शिल्पकलेत समाज नीति नियमांची बंधने पूर्वापारच पडली होती. ती त्याने काटेकोर पाळली आहेत, म्हणून भारतीय जनजीवनात शिल्पकाराचे स्थान वरच्या दर्जाचे आहे. प्राचीन आणि मध्ययुगीन काळात तरी त्याचे स्थान वरच्या दर्जाचे होते यात शंका नाही.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..