नवीन लेखन...

वीस-विशी (२०-२०)

सुरु होते सुरळीत । साऱ्या सृष्टीचे व्यवहार ।
आला अदृश्य विषाणू । माजविला हाहाःकार ।। १ ।।

किती उपाय योजिले । दूर ठेवण्यासि त्यास ।
रोज डांबून ठेविले । घरी सकळ जनांस ।। २ ।।

हात सतत धुतले । पाणी प्यायले कोमट ।
तरी सरता सरेना । विचारांचे जळमट ।। ३ ।।

नको कसलाच धोका । सारे झालो भावनिक ।
रिचविला काढा ,गोळ्या । भरीस अर्सेनिक ।। ४ ।।

एकैक ऐकोनि अनुभव । गेली मने हेलावून ।
निद्रादेवी ही रात्रीस । आता हसे वेडावून ।। ५ ।।

सारे आकडे पाहता । साऱ्या लाखाच्याच गोष्टी ।
सारी प्रजा अन राजाही । जाहले दुःखी कष्टी ।। ६ ।।

नको नको रे माणसा । असा उतावीळ होवू ।
तीन मासाचे प्रयत्न । नको धुळीस मिळवू ।। ७ ।।

सर्वा कळून चुकले । त्वरित सोडेना हा पाठ ।
त्याच्या सोबत जगणे । बांध आता स्मरण गाठ ।। ८ ।।

नको नकोसे वाटले । परि यात आहे तथ्य ।
आता पाळायाच हवी । काही सामाजिक पथ्य ।। ९ ।।

घराबाहेर पडता । सदा मुख-नाक झाक
तेथे दिसता सवंगडी । मार दुरूनच हाक ।। १० ।।

तरी समीप ते येता । घाल स्वतःवरी बंधन ।
नको हस्तस्पर्श आलिंगन । केवळ हाताने वंदन ।। ११ ।।

द्रव्य खर्चण्या आधी । कोष्टक मांड तू त्रिवार ।
मुख्य गरजा सांभाळ । नको चैनीचा विचार ।। १२ ।।

जरी नैराश्य भवताली । ठेव उल्हासित चित्त ।
परिस्थिती सुधारण्या । तू व्हावेस निमित्त ।। १३ ।।

शासकांच्या हाती असे । केवळ सुविधांचा दर्जा ।
परि तुझ्या जीविताची मात्र । तूच आहेस उर्जा ।। १४ ।।

काळ जरी हा कठीण । अटळ आहे त्याची हार ।
काळ हेच असे औषध । तोच नेईल अटकेपार ।। १५ ।।

सर्वकाही करू आता । जगण्याच्या आसक्तीने ।
पिटाळून लावू त्यास । शक्ती-युक्ती-भक्तीने ।। १६ ।।

पण एकट्याचे कर्म नव्हे । हवे सर्वांचेच दायित्व ।
अन्यथा अशक्य आहे । त्यावर मिळविणे प्रभुत्व ।। १७ ।।

अदृश्य शत्रूच्या चालीचं ।आता अवघं गणित मांडलं ।
संशोधनाचे फळ मिळता । घालोनि कवच कुंडलं ।। १८ ।।

सर्व मिळून निश्चित । वाचवू एक एक श्वास ।
दिवस येतील सुगीचे । दृढ आहे हा विश्वास ।। १९ ।।

आशेच्या या किरणांनी । नष्ट करू अंधःकार ।
पुन्हा सुरळीत करू । साऱ्या सृष्टीचे व्यवहार ।। २० ।।

©️ क्षितिज दाते.
ठाणे. 

Avatar
About क्षितिज दाते , ठाणे 57 Articles
केवळ एक हौस म्हणून लिखाण सुरू केलं . वेगवेगळ्या विषयांवर पण साध्या सोप्या भाषेत लेखन . आकाशवाणीवरील कार्यक्रमात काही लेखांचं प्रसारण झालं आहे .काही लेख/कथा पॉडकास्ट स्वरूपात देखील प्रसारित झाल्या आहेत . Snovel या वेबसाईट / App वर "सहज सुचलं म्हणून" या शीर्षकाखाली तुम्ही ते पॉडकास्ट ऐकू शकता.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..