नवीन लेखन...

विरही बागेश्री

रात्रीच्या शांत समयी, एकांतात भेटलेल्या विरहिणीची तरल मनोवस्था म्हणजे बागेश्री. आपल्या शेजारी बसलेला प्रियकर, साथीला आहे पण तरीही मनात कुठेतरी धडधड होत आहे आणि त्या स्पंदनातून उमटणारी वेदना आणि हुरहूर म्हणजे बागेश्री. बागेश्री रागाच्या या आणि अशा अनेक छटा आपल्याला एकाचवेळी आकर्षित करतात आणि त्याचबरोबर चकित देखील करतात.
रागाची मांडणी बघायला  गेल्यास, आरोहात पाच स्वर तर अवरोहात संपूर्ण सप्तक आहे – म्हणजेच औडव/संपूर्ण असा राग आहे. आरोहात “पंचम” आणि “रिषभ” वर्जित तरीही “कोमल निषाद”,”दोन्ही मध्यम” तसेच “कोमल गंधार” असल्याने रागाची प्रकृती नाजूक अशीच आहे. शास्त्रकारांनी या रागाचा समय मध्यरात्र असा दिलेला आहे. इथे बहुतेक कोमल स्वरांचा प्रभाव असल्याने, ठाय लयीत आणि मंद्र स्वरी सप्तकात. इतक्या प्रकारचे विभ्रम ऐकायला मिळतात की, प्रत्येक कलाकाराला या रागाची मांडणी वेगवेगळ्या प्रकाराने करायला अवसर देते. रात्रीच्या गूढ अंधारात हातातील हिऱ्यातून फाकणाऱ्या अननुभूत प्रकाश किरणाने आसमंत उजळून निघावा त्याप्रमाणे या रागाचे स्वर, कलाकाराच्या मगदुराप्रमाणे या रागाचे सौंदर्य दाखवतात. अर्थात “विरह” आणि “करुणा” हे या रागाचे खरे भाव आहेत, असे म्हणता येईल. या रागाची आणखी खासियत अशी सांगता येईल, या रागात तुम्ही आलापी कितीही वेळ रंगवून आळवायला भरपूर संधी आहे. बहुदा त्यामुळेच या रागात  “विरही” भाव अधिक सुंदर खुलतो.
याच विवेचनाच्या आधारावर, कौशिकी चक्रवर्ती या असामान्य गायिकेने मांडलेली बागेश्री रागातील रचना खास आहे. “पतियाला” घराण्याचा संस्कार घेऊन देखील इतर घराणी आपल्या गायनात सामावून घेऊन, आपली गायकी अधिकाधिक विस्तृत आणि विलोभनीय केली आहे.
मुळात या गायिकेचा गळा इतका लवचिक, सुरेल आणि संपूर्ण सप्तकाला आवाक्यात सहज घेणारा असल्याने, गळ्यातून येणाऱ्या तानेला कुठेही “अटकाव” म्हणून नसतो. त्याचा परिणाम असा  होतो,गळ्यातून येणारी ताण, हरकत ही अतिशय स्वच्छ, सलग असते. बंदिशीच्या सुरवातीलाच, “कोमल गंधार” आणि “कोमल निषाद” जोडीने आल्याने, आलापी अतिशय सुंदर खुलते. गंमतीचा भाग ऐकण्यासारखा असा आहे, वादी स्वर मध्यम आणि हे दोन्ही कोमल स्वर इतके बेमालूम मिसळलेले आहेत की बागेश्री पहिल्याच आलापित आपल्या समोर येतो.
यात आणखी गंमत म्हणजे सरगमचा वैशिष्ट्यपूर्ण वापर. गाण्यात बरेचवेळा सरगम घेतली जाते, ती त्याच्या आधीच्या तानेच्या संदर्भात किंवा पुढे  येणारी जी तान आहे, त्याचे आरेखन मांडणारी असते. त्यामुळे सरगम म्हणजे “स्पेलिंग” असा काहीवेळा प्रकार होतो. तान घेत असताना, ती सरगम बरोबर जोडून घेणे किंवा सरगम संपत असतना, तिला हरकतीच्या वेलबुट्टीची आरास चढविणे, ही खास ऐकण्यासारखे आहे. सरगम मधून परत मुख्य प्रवाहात येणे, ही देखील अप्रतिम कला आहे आणि ती इथे स्पष्टपणे ऐकायला मिळते. तसेच, बंदिश मध्यलयीत असताना, त्याच लयीत “तराणा” गायलेला आहे. फारच सुरेख गायन. आपल्याकडे “तराणा” हा शक्यतो द्रुत लयीत मांडला जातो आणि तालाशी त्याचे नाते जुळवले जाते. “अवधपूर की ये सैंय्या” ही बंदिश म्हणजे खास “पतियाला” घराण्याची मुद्रा आहे.
इथे बंदिशीच्या ओघात “तराणा” सुरु केला आहे आणि त्याचबरोबर सरगम जोडीने घेतली आहे. याचा फायदा असा होतो, सरगम ऐकताना, “कोमल” स्वर कुठले आणि “तीव्र” स्वर कुठले, याचे भान रसिकाला नेमकेपणाने समजून घेता येते. साधारणपणे तान ऐकताना, अशा स्वरांचा “अदमास” घेणे कधीकधी अवघड होऊन जाते.
संगीतकार सी. रामचंद्र आणि लताबाई. या जोडीने कितीतरी अजरामर गाणे दिली आहेत आणि रसिकांचे कान तृप्त केले आहेत. या संगीतकाराचे खास वैशिष्ट्य सांगायचे झाल्यास, यांनी बांधलेली गाणी अतिशय गोड, श्रवणीय तर असतात(च) पण, त्याचबरोबर आपणही गाऊ शकतो, असे आवाहन करणारी असतात. अर्थात, लताबाईंच्या हरकती घेणे मुश्किल असते तरीदेखील, गाण्याच्या चालीचा स्वत:चा असा अप्रतिम गोडवा असतो आणि तो गोडवा, रसिकांना गायला प्रवृत्त करीत असतो. प्रस्तुत गाणे अतिशय साधे, सरळ आहे पण तरीही अप्रतिम गोडवा त्या गाण्यात भरलेला आहे.
“ना बोले, ना बोले, ना बोले रे
घुंघट के पट ना खोले रे
राधा ना बोले, ना बोले, ना बोले रे”
कवी राजेंद्र कृष्ण यांनी हे गीत लिहिले आहे. गीताची शब्दकळा बघितली तर असेच समजून घेता येते, गाण्यात जे “खटके”,”हरकती घेतल्या आहेत त्या घेताना कुठेही शब्दांची (फारशी) ओढाताण होत नाही. रचना गेयताप्रधान असणे म्हणजे नाकी काय, याचे हे गाणे एक सुरेख उदाहरण म्हणून मानावे लागेल. सोप्या शब्दात देखील, प्रसंग गहिरा करण्याची, या कवीची ताकद विलक्षण अशीच होती.
गाण्यात नेहमी  वापरला जाणारा “दादरा” ताल आहे पण, तालाची योजना किती सुंदर आहे. सुगम संगीतात, कुठल्या शब्दावर समेची मात्रा ठेऊन, त्या गाण्याचे सौंदर्य कसे वाढवायचे, यावर संगीतकाराची, शब्दाची जाणकारी दिसून येते. गाण्याची चाल अतिशय सरळ आहे पण ठिसूळ नाही!! गाण्यात सुरवातीच्या सुरांपासून बागेश्री दिसत आहे पण तरीही हे गाणे आहे, याची जाणीव असल्याने. त्या रागाच्या सावलीतच गाण्याची चाल बांधली आहे. खरे तर बागेश्री राग, बहुदा या संगीतकाराचा खास आवडीचा राग असावा, असे वाटते, त्यांच्या कारकिर्दीत, त्यांनी इतर वेळी देखील, बागेश्री रागाचा अप्रतिम उपयोग करून घेतल्याचे आढळून येते. मी वरती, या रागाच्या भावदर्शनाबद्दल “विरही’,”करुन” असे शब्द वापरले होते परंतु या भावनांचा परिपोष असून देखील, याच रागातून, अशी आनंदी, उत्फुल्ल तर्ज शोधून काढण्याचे कसब मात्र याच संगीतकाराचे. शास्त्रीय संगीताचा गाढा अभ्यास असेल तर तुम्ही रागाच्या पलीकडे जाउन देखील रागाशी साम्य दाखणारी तर्ज निर्माण करू शकता, हे आणखी खास वैशिष्ट्य इथे सांगता येईल.
हृदयनाथ मंगेशकरांनी या रागावर आधारित काही गाणी बांधली आहेत. मंगेशकरांच्या गाण्याचे एक वैशिष्ट्य सांगता येईल, त्यांच्या गाण्यात कवितेचा दर्जा नेहमीच अतुलनीय असतो. किंबहुना, ज्या कवितेला चाल लावायची आहे, ती कविता आशयघन असणे, त्यांना जरुरीचे वाटते. मराठीतील अनेक कवी – खास करून असे कवी जे कधीही भावगीतकार म्हणून प्रसिद्ध नव्हते, अशा कवींच्या कविता हुडकून काढून, त्यांना चाल लावणे, मंगेशकरांना नेहमीच आव्हानात्मक वाटत आले आहे. त्यामुळे, गाणे म्हणून आस्वाद घेताना, कविता म्हणून देखील त्या गाण्याचा आस्वाद घेणे तितकेच आनंददायी असते. कवितेचा, कविता म्हणून एक आशय ध्वनित होत  असताना, सुरांच्या मदतीने त्याच कवितेचा वेगळाच आशय काहीवेळा अनुभवायला मिळतो आणि तीच कविता झळाळून उठते. आता सुगम संगीतात “कविता” असावी का नसावी, हा एक सनातन विषय आहे आणि अर्थातच त्याचा इथे उहापोह करण्यात काहीच हशील नाही. परंतु कविता दर्जेदार असेल तर संगीतकाराला, चाल बांधायला हुरूप मिळतो, असे कित्येक रचनाकारांनी मान्य केलेले आहे.
खरतर संत ज्ञानेश्वर यांची शब्दकळा आहे. ज्ञानेश्वर हे आधी कवी आहेत, नंतर मग, तत्वज्ञ, साधक इत्यादी.
ज्ञानेश्वरांच्या रचनेत “गीतमयता” आहे, याची जाण संगीतकार म्हणून हृदयनाथ मंगेशकरांना झाली आणि त्यातून मराठीतील काही अजरामर गाणी निर्माण झाली.
“घनु वाजे घुणघुणा, वारा वाजे रुणझुणा” ही ज्ञानेश्वरीमधील अशीच अप्रतिम काव्यरचना.
“घनु वाजे घुणघुणा, वारा वाहे रुणझुणा;
भवतारकु आहे कान्हा, वेगी भेटवा का”.
या रचनेतील पहिलाच आलाप बागेश्री रागाची खूण पटवतो. हा आलापच किती कठीण आहे आणि त्यावरून पुढील रचना कशी वळण घेईल, याचा थोडाफार अंदाज बांधता येतो. वास्तविक, या गाण्यात, “निर्मळ” बागेश्री सापडत नाही तरी एकंदरीत गाण्यावर याच रागाची सावली आहे. मी मघाशी म्हटल्याप्रमाणे, या गाण्याचा कविता म्हणून आस्वाद घेत येतो आणि तो तसा घेत यावा, म्हणून गाण्यात फार कमी वाद्ये वापरली आहेत, ज्यायोगे सुरांचे शब्दांवर आक्रमण होऊ नये. अर्थात, नेहमीप्रमाणे, “अनघड” चाल, हे या गाण्याचे लक्षण दिसून येते आणि त्यामुळे ऐकायला गोड वाटणारे गाणे, त्यातील हरकतीसहित गायचे म्हणजे परीक्षाच असते.
गुलाम अली, हे असेच गझल गायकीमधील सुप्रतिष्ठित नाव. मेहदी हसन साहेबांनी रागावर आधारित गझलांच्या चाली बांधल्या तर गुलाम अलींनी, ठुमरीला हाताशी धरून, गझल गायनाला नवा रंग दिला.
“मस्ताना पिये जा युं ही मस्ताना पिये जा;
पैमाना तो क्या चीज है, मैखाना पिये जा”.
अर्थात, उर्दू भाषेत, “मैखाना”, “साकी” या विषयावर अनंत रचना वाचायला मिळतात आणि त्याच “मैखाना”ला समोर ठेऊन ही गझल लिहिली आहे. तेंव्हा या शब्दातील भाव ओळखून, गुलाम अलींनी चाल बांधली आहे आणि त्याच स्वरूपाचे गायन केले आहे.
बागेश्री रागातील नखरेल रंग शोधून, उस्तादांनी अप्रतिम रंग दिला आहे. या सादरीकरणात, आपल्या नेहमीच्या शैलीला थोडी मुरड घालून, किंचित भावगीताच्या अंगाने गायन केले आहे. खानसाहेबांच्या गायकीवर काहीवेळा एक आक्षेप घेतला जातो – गझल गाताना, त्यात इतक्या वेळा तानांचा वर्षाव केला जातो की त्यात शायरी कुठल्याकुठे विसरली जाते आणि गायकीची कलाकुसर फक्त ध्यानात रहाते. पण, इथे मात्र अत्यंत लडिवाळपणे, स्वरांना गोंजारत अति आत्मीयतेने गायन केले आहे आणि त्यामुळे आपण शायरीची देखील मजा घेऊ शकतो.
मराठीत कवी सुरेश भटांनी अशाच प्रकारच्या म्हणजे गेयतापूर्ण कवितेचा आग्रह धरून, मराठी  कवितेत अनमोल भर टाकली आहे. विशेषत: “गझल” हे वृत्त मराठीत रुजवण्यात त्यांचा महत्वाचा वाटा आहे, ही बाब कुणी नाकारू शकणार नाही.
“तरुण आहे रात्र अजुनी, राजस निजलास का रे;
एवढ्यातच त्या कुशीवर, तू असा वळलास का रे”.
काहीशी रंगेल वाटणारी ही कविता, मराठीत तशी विरळाच वाचायला मिळते. तसे बघितले तर या कवितेला “गझल” म्हणता येईल का? उर्दूतील “नझ्म” या वृत्ताशी जवळचे नाते सांगणारी ही कविता आहे. कविता वाचतानाच, त्या शब्दात दडलेली लय आपल्याला सापडते पण तरीही संगीतकाराने त्यांच्या प्रतिभेला अनुसरून, संपूर्ण वेगळ्या वळणाची चाल बांधली आहे. चाल अतिशय राजस, रंगेल आणि गायकी थाटाची आहे. गमतीचा भाग बघण्यासारखा आहे. वरतीच आपण, याच संगीतकाराने, याच बागेश्री रागात ज्ञानेश्वरांची विराणी सादर केलेली बघितली आणि आता इथे संपूर्ण वेगळ्या घाटाची कविता आणि त्या घाटानुसार संगीतरचना तयार केलेली बघायला मिळते. संगीतकार किती बहुपेडी प्रतिभेचा असू शकतो, हे या दोन उदाहरणांवरून समजून घेता येते.
तरुण आहे रात्र अजुनी, राजसा निजलास का रे

Avatar
About अनिल गोविलकर 92 Articles
मी अनिल गोविलकर. उभरता लेखक असे म्हणता येईल. माझा ब्लॉग आहे – www.govilkaranil.blogspot.com ही वेबसाईट आहे. या वर्षी, माझ्या ब्लॉगला ABP माझा स्पर्धेत २रे पारितोषिक मिळाले आहे. तसेच "रागरंग" नावाचे पुस्तक – रागदारी संगीतावरील ललित आणि तांत्रिक, लेखांवर आधारित- प्रसिद्ध झाले आहे. मी १९९४ ते २०११, दक्षिण आफ्रिकेत नोकरीनिमित्ताने वास्तव्याला होतो. त्याचा परिणाम म्हणून त्या देशावरील ललित लेख – जवळपास ३५ ते ४० लेख लिहिले आहेत तसेच संगीतावर आधारित ( जागतिक स्तरावरील संगीत) १०० पेक्षा जास्त लेख लिहून झाले आहेत. काही आवडलेल्या पुस्तकांची परीक्षणे लिहिली आहेत .

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..