नवीन लेखन...

व्हिएतनाम – एक बेधडक राष्ट्र – भाग २

हो ची मिन्ह रात्री

भेट देऊन बघा , करोडपती बनून बघा……
काय झाले शॉक बसला का?

कोणत्याही राष्ट्राचा कणा ही त्याची अर्थव्यस्था आणि संस्कृती, ह्यातून तुम्हाला देशाची खरी ओळख मिळते. तर आज आपण निघुयात व्हिएतनाम च्या मुंबई बघायला….. हा असा जगातील एकमेव देश आहे कि जिथे तुम्ही उतरलात तरी तुम्हाला करोडपती झाल्याचा आभास होतो… जणू काही तुम्ही आताच कौन बनेगा करोडपती जिंकून आलात.

अरे हो फिरण्याआधी आपल्याला इथले दर माहिती पाहिजेत ना…. तर मी वापरलेली एक युक्ती सांगतो, व्हिएतनाम मध्ये राष्ट्रीय मूल्य हे व्हिएतनामी डाँग हे असून साधारण ३०० डाँग हे आपल्या १ रुपया बरोबरीचे असून इथे १००० ते ५००००० पर्यंत च्या चलनी नोटा आपल्याला मिळतात, आता इतके शून्य पहिले कि भंबेरी उडतेच, मग पटकन कोणतेही वस्तू घेताना शेवटचे ३ शून्य काढून उरलेल्या संख्येला ३ ने गुणायचे म्हणजे तुम्हा त्याची भारतीय किंमत कळेल. आल्या का कपाळावर आठ्या ???

तर मग मित्रानो बघुयात आपण व्हिएतनाम चे न्यूयॉर्क आणि तिथल्या लोकांची जीवाची मुंबई म्हणजे हो ची मिन्ह सिटी. तसे सगळेच दक्षिण पूर्व देश आपल्या भयानक ट्रॅफिक साठी बदनाम आहे त्याला व्हिएतनाम काही वावगे नाहीय . इथे खूप ट्रॅफिक आपल्या बघायला मिळते, पण जर तुम्ही सुट्टीच्या दिवशी फिरायला निघाला तर एकदम सुखद अनुभव मिळेल आणि जर तुम्ही सोमवार ते शुक्रवार कुठे बाहेर जाणार असाल तर मग जपूनच. तसे इये तुम्हाला बस ,टॅक्सी , बाईक ह्यासारखे पर्याय उपलब्ध असून तुम्हाला हवा तसा पर्याय निवडू शकता.

हो ची मिन्ह म्हणजेच सैगोन , व्हिएतनाम च्या इतिहासातील अतिशय महत्वाचे असे शहर, आधी फ्रान्स आणि नंतर अमेरिका ह्याचा प्रभाव आपल्याला इथे प्रकर्षाने जाणवतो, सैगोन हे आधीचे नाव फ्रान्स च्या अधिपत्यातील असून १९७५ मध्ये जेव्हा कॅम्युनिस्ट असणाऱ्या उत्तर व्हिएतनाम ने इथे विजय मिळवला तेंव्हा सैगोन चे बारसे होऊन त्यांच्या नेत्याच्या नावावर म्हणजे हो ची मिन्ह असं नाव पडले.

अतिशय घातक अशी लढाई आणि त्यात वापरल्या गेलेल्या युद्ध सामुग्री ह्यांसाठी नक्कीच तुम्ही युद्ध अवशेष (वॉर रेमणेन्ट्स) ला नक्की भेट द्या आणि जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर बेन थानः मार्केट (इकडचं क्रोफोर्ड मार्केट) इथे नक्कीच जावे, बाकी इथे अनेक म्युझिअम आणि चर्च सुद्धा आहेतच. आणि हो खरेदी करताना बऱ्याच ठिकाणी तुम्हाला किमतीचे लेबल दिसणार नाही तिथे पर्यटक म्हणून तुम्हाला वस्तूचे भाव भरपूर जास्त सांगितले जातात, जर तुम्हाला काही खरेदी करायचे असेल तर अर्ध्याकिमती पासून सुरुवात करावी आणि जास्तीत जास्त ७० टक्के पर्यंत न्ह्यावी.

दिवस एखाद्या सामान्य शहराप्रमाणे भासणाऱ्या हो ची मिन्ह शहर रात्री आपले रूप मात्र एखाद्या सौंदर्यवती तरुणीप्रमाणे पालटते, अनेक ठिकाणी आकर्षक असे रस्ते त्यावरील दिवे ह्याची रोषणाई म्हणजे डोळ्यांचे पारणे फेडणारी आहे , आणि ह्याचा जर तुम्हा कॅलीडोस्कोप जर बघायचा असेल तर सूर्यास्तावेळी सैगोन स्काय डेक ला नक्कीच भेट द्या उंच अश्या ६५ मजली इमारतीच्या ४९व्या मजल्यावर गेल्यानंतर दिसणारे दृश्य म्हणजे अवर्णनिय.आणखी एक ठळक गोष्ट म्हणजे इथे असलेली नदी , सैगोन रिव्हर हि बहुपयोगी नदी असून संपूर्ण शहरात आपल्याल्या ती किंवा तिच्या जोडनाड्या कालवे मात्र बघायला मिळतील म्हणूनच इथे राहणाऱ्या लोकांना पाण्याची समस्या नाही.

हो ची मिन्ह हे भरपूर मोठे जवळपास मुंबई च्या तिप्पट असलेले शहर आहे . त्यामुळे राहण्याचे हॉटेल बाबत नक्कीच काळजी घ्यावी. तसे पहले तर पूर्ण शहर हे १९ डिस्ट्रिक्ट (आपल्याकडचे छोटे नगरासारखे) चे बनले असून डिस्ट्रिक्ट १ मध्ये खूप राहण्यासाठी पर्याय उपलब्ध असून आसपास भरपूर भारतीय जेवण उपलब्ध आहे. पण जर तुम्हाला शांत वातवरण हवे असेल तर डिस्ट्रिक्ट २ किंवा डिस्ट्रिक्ट ७ निवडावे, ह्या शहरावर असलेल्या पाश्चिमात्य प्रभावामुळे तुम्हाला इथे मेक्सिकन, इटालियन, फ्रेंच आणि इंडोनेशियन , थाई आणि इतर देशातील खाद्यपदार्थ सुद्धा सहज चाखायला मिळतील, त्या साठी जर तुम्ही बेन थानः फूड स्ट्रीट ला गेलात तर हे जवळपास सर्व प्रकार मिळतील.

फो , हे व्हिएतनाम चे खास असे नूडल्स सूप असून त्याचे वेगवेगळे नाव आहेत जे त्यात असलेल्या मांसाहारावर अवलंबून असतात . शाकाहारी लोकांसाठी तुम्ही फो थाप कॅम असे नाव असलेलं सूप घेऊ शकता, ह्याशिवाय व्हिएतनाम चे सी फूड सुदर खेकडे, झिंगे अन बरेच काही आणि स्प्रिंग रोल्स तर अहहह..हो ची मिंग मध्ये फक्त पावसाळा आणि उन्हाळा हेच दोन ऋतू असल्यामुळे इथे तुम्हाला थंडी जाणवणार नाही, उन्हाळा त्रीव्र असल्यामुळे इथे डिसेंबर ते फेब्रुवारी (टेट सोडून) मध्ये भेट देणे उत्तम ठरेल. उष्णकटिबंधीय असल्यामुळे इथे मिळणाऱ्या फळाचा स्वाद नक्कीच घ्यावा.

इथे जर तुम्हाला फिरायचे असेल तर इथे अनेक पर्याय उपलब्ध आहेत , पण जर तुम्ही एकटे असला तर इथे असणाऱ्या बाईक टॅक्सी नक्कीच घ्यावी जेणेकरून तुम्हाला शहराचे दर्शन होईल, तसेच नाईट सफारी , काही सिटी टूर्स सुद्धा चांगले पर्याय आहेत. इथे अनेक स्पा पर्याय असून जर थकवा आला असले तर डिस्ट्रिक्ट १ मध्ये खिश्याला परवडणारे आणि चांगले असे स्पा मिळतील.

हो ची मिन्ह जवळच चू ची नावाचे ठिकाण आहे तिथे युद्धात अमेरिकन आणि फ्रेंच सैन्यपासून वाचण्यासाठी व्हिएत काँग दलाने अनेक भुयारांचे जाळे निर्माण केले आहे, आणि नुसतेच भुयार नसून ह्यात संपूर्ण एक नगररचना बसवली होती, एक अत्भुत आणि जटील असे साधारण २५० किमी लांबीची ही भूयारे थेट कंबोडिया पर्यंत जातात, जवळपास ३ मजले जमिनीखाली इतके खोल आणि त्यात आपल्या सारख्या हॉल पासून झोपण्याची खोली एकत्र येण्याची खोली हे सुद्धा समाविष्ट होते. परंतु वेळेनुसार झालेल्या नुकसानांमुळे ह्यातील थोडाच भाग पर्यटकांसाठी उपलब्ध केलेला आहे, तसेच तिथे तुम्ही खरी बंदूक चालवून आपला निशाणा बघू शकता. भुयार असल्यामुळे तिथे तुम्ही मळखाऊ कपडे आणि कीटक निरोधक नक्की सोबत ठेवावे. इथे जायचे असेल तर डिस्ट्रिक्ट १ मधून अनेक टूर ऑपरेटर अर्ध्या दिवसाच्या टूर वर नेतात साधारण त्या साठी 35 डॉलर पर्यंत खर्च येतो.

तर मग अश्या जुने आणि नवीन ह्यांच्या संगम असलेलया ह्या शहराला कधी भेट देणार आहेत?

टीप:

इथे मोबाईल खासकरून महागडे फोन रस्त्यात हिसकावून घायचे प्रकार खूप घडतात, त्यामुळे त्याबाबतीत तुम्ही सावधगिरी बाळगावी, महागडा मोबाईल वर एखादे अतिशय साधारण असे आवरण घालावे जेणेकरून त्या बद्दल माहिती कळत नाही.

— यशोदीप भिरुड 

(क्रमश: )

हे सदर दर रविवारी प्रकाशित होईल… 

यशोदीप भिरुड
About यशोदीप भिरुड 3 Articles
मी यशोदीप भिरुड खान्देशी, पण जन्मापासून मुंबईकर झालोय. औषध निर्माणशास्त्र पदवी घेऊन मग आंतरराष्ट्रीय व्यवहार मध्ये पदव्युत्तर शिक्षण घेऊन सध्या व्हिएतनाम येते स्थायिक आहे. मला आवड तश्या बऱ्याच पण खाणे आणि फिरणे म्हणजे माझा आवडीचा विषय. नेहमी नवीन गोष्टी, नवीन मित्र आणि ठिकाणे ह्यांच्या शोधात असणारं व्यक्तीमत्व.

1 Comment on व्हिएतनाम – एक बेधडक राष्ट्र – भाग २

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..