नवीन लेखन...

जेष्ठ विनोदी अभिनेते मधु आपटे

बोबडे बोल हा एकमेव गुण (?) असुनही केवळ त्यावर अनेक मराठी तसेच हिंदी चित्रपट करणारे मधू आपटे हे एकमेव कलावंत असतील. मधुकर शंकर आपटे हे मधू आपटे यांचे पुर्ण नाव. मराठीतील जेष्ठ विनोदी अभिनेते मधुकरआपटे म्हणजेच मधु आपटे यांचा जन्म १ मार्च १९१९ रोजी झाला.

‘मधू आपटे के साथ काम करते वख्त अच्छी ऍक्टिंग करके कोई फायदा नही. लोग तो मधू को ही देखेंगें’ असा हिंदी चित्रपटसृष्टीतील मातब्बर नट ओमप्रकाश यांच्याकडून अभिप्राय मिळवणाऱ्या मधू आपटे यांचा जन्म कोल्हापूर येथे झाला. घरच्या संपत्तीचे वाद चालू असतानाच्या काळातच त्यांच्या वडिलांचे निधन झाल्यावर त्यांच्या आई गंगूबाई आपल्या तीन मुलांना घेऊन आपल्या भावाच्या (ताम्हणकर यांच्या) आश्रयाला गेल्या. मुलांना सांभाळण्याच्या जबाबदारीमुळे त्यांनी लोणची, पापड, हलव्याचे दागिने, जरीच्या टोप्या इत्यादी गोष्टी करून विकण्याचा व्यवसाय केला व आपल्या मुलांचा सांभाळ केला. वयाच्या नवव्या वर्षी अतितापाने मधू आपटे यांची वाचा गेली. मिरजेच्या डॉ. वानलेस यांनी केलेल्या घशाच्या शस्त्रक्रियेमुळे त्यांना अडखळत का होईना, बोलता येऊ लागले. त्यांचा तोतरेपणा मात्र कायम राहिला.

घरची गरिबी असल्यामुळे शाळेची फी देणे परवडत नव्हते, त्यामुळेच बर्यायपैकी हुशारी, चांगली स्मरणशक्ती व उत्तम हस्ताक्षर असूनही मधू आपटे यांचे शालेय शिक्षण पाचव्या इयत्तेपुढे जाऊ शकले नाही. मधू आपटे यांच्या मामांना १९२९ मध्ये ‘प्रभात’मध्ये नोकरी लागली व त्यांनी मधू आपटे यांच्या मोठ्या भावाला – अनंत आपटे यांना बालनट म्हणून काम मिळवून दिले.

पुढे मामांच्या ओळखीनेच मधू आपटे १९३४ मध्ये ‘प्रभात’च्या पेंटिंग खात्यात कामाला लागले. तेथे त्यांना खूप कष्टाची कामे करावी लागली. ती त्यांना झेपत नसत. तरी त्यांनी वर्षभर ती कामे केली. त्याच वेळेस त्यांचा साहेबमामा फत्तेलाल यांच्याशी ऋणानुबंध जुळला. याच काळात सोळा वर्षांच्या तरण्या मधूच्या तोंडाला बालनट म्हणून रंग लागला तो अपघातानेच. स्टील डिपार्टंमेंटमध्ये असताना शांतारामबापूंनी फोनवर मधू आपटे यांचे बोलणे ऐकल्यावर त्यांनी मधू आपटे यांना ‘संत तुकाराम’ या चित्रपटात सालोमालो या इरसाल व्यक्तिरेखेच्या भूमिकेत उभे केले.

‘प्रभात’ कंपनीचा १९५४ मध्ये लिलाव झाल्यावर मधू आपटे बेकार झाले, त्या वेळेस त्यांना सीताकांत लाड व चित्तरंजन कोल्हटकर यांच्या प्रयत्नांमुळे आकाशवाणीवर काम मिळाले. पण त्यात सातत्य नसे. येथे काम करत असतानाच त्यांनी नाटकांमध्येही कामे करायला सुरुवात केली. १९४४ मध्ये मा. दीनानाथ यांच्या पहिल्या पुण्यतिथीला ‘भावबंधन’ नाटकाचा प्रयोग करण्यात आला, त्यात मधू आपटे यांना लता मंगेशकर यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. अधूनमधून ते बाबूराव गोखले यांच्या नाटकांमधून काम करीत असत. पण तेथे त्यांचा जम न बसल्यामुळे त्यांनी १९५६ मध्ये मुंबईत ‘फिल्मिस्तान’ कंपनीत नोकरी स्वीकारली.

दरम्यानच्या काळात ते सुलोचना दीदींबरोबर चित्रीकरणाला जात असत, तेथे वावरत असतानाच हिंदी निर्मात्यांनी त्यांना छोट्या-मोठ्या भूमिका द्यायला सुरुवात केली. तेथे त्यांनी राजेंद्रकुमार, ओमप्रकाश, मोहनकुमार, नरेशकुमार यांच्यासोबत काम केले. वसंत जोगळेकर यांच्या ‘कारगीर’ या हिंदी चित्रपटातही त्यांना ओमप्रकाश व ललिता पवार या भांडकुदळ जोडप्याच्या इरसाल मुलाची भूमिका मिळाली.

खरे तर मधू आपटे यांना तोतरे बोलण्याच्या ढंगावर भूमिका मिळत असल्या तरी ते तेवढ्यावरच आपली भूमिका वठवत नसत, तर विनोदी प्रसंगात दुसऱ्याच्या बोलण्यावर रिऍक्ट होण्याचे तंत्रही ते वापरत असत. त्यामुळेच त्यांनी वठवलेल्या विनोदी भूमिका प्रेक्षकांच्या कायम स्मरणात राहत.

चार्ली चॅप्लीन, डॅनी के, बालगंधर्व, नानासाहेब फाटक यांच्याविषयी त्यांच्या मनात आदर होता. मधू आपटे यांनी आपल्या सदतीस वर्षांच्या कारकिर्दीमध्ये २०० हून अधिक हिंदी-मराठी चित्रपटांमध्ये व २० नाटकांमध्ये कामे केली.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.कांचन घाणेकर/ इंटरनेट
ही व इतर पोस्ट माझ्या फेसबुक पेजवर पाहू शकता.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4228 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..