वसंत सरवटे

मराठी साहित्यातील अनेक सा​हित्यकृतींना आपल्या चित्रांनी अधिक देखणेपण देणाऱ्या वसंत सरवटे यांचा जन्म ३ फेब्रुवारी १९२७ रोजी झाला. वसंत सरवटे यांचा जन्म कोल्हापूरचा. त्यांचे शालेय आणि सुरुवातीचे महाविद्यालयीन शिक्षण कोल्हापूरलाच झाले. त्यांना शाळेमध्ये असल्यापासून चित्र काढण्याची आवड होती. हस्तलिखितांमध्ये कविता, कथांसाठी चित्रे काढायला त्यांनी सुरुवात केली आणि त्यातूनच पुढे त्यांची कारकीर्द घडली. पु.ल. देशपांडे, जयवंत दळवी, रमेश मंत्री या लेखकांनी रेखाटलेल्या पात्रांना त्यांनी जिवंत रूप दिले. त्यांचे ‘ठणठणपाळ’ या पात्राचे अर्कचित्र विशेष लोकप्रिय ठरले.

चिं.त्र्यं. खानोलकरांचे अजगर, पुल एक साठवण, बटाट्याची चाळ, सूर्य, शांतता कोर्ट चालू आहे, अशा अनेक पुस्तकांची मुखपृष्ठे सरवटे यांनी रेखाटली आहेत. राणीची बाग हे विंदा करंदीकरांचे बालकवितांचे पुस्तकही त्यांच्या चित्रांनी सजले आहे. वसंत सरवटे यांनी अनेक दिवाळी अंकांची मुखपृष्ठे स्वतःच्या वेगळ्या शैलीतून रेखाटली. या मुखपृष्ठांवर त्यांनी रेखाटलेली चित्रे वाचकांनी समजून घ्यावी, त्या विषयाचा आशय समजून घ्यावा अशी त्यांची अपेक्षा असे. त्यांनी चित्रकलेचे शास्त्रोक्त शिक्षण घेतले नव्हते. मात्र छंद म्हणून त्यांनी रेखाटलेली रेखाचित्र आणि व्यंगचित्रांच्या प्रेमात वाचकांपासून लेखकांपर्यंत सर्वच जण पडत. त्यांची चित्र रेखाटण्याची शैली प्रयोगशील होती.

वसंत सरवटे इंज‌निअर होते. त्यांनी ए.सी.सी या कंपनीत तीस वर्षांपेक्षा अधिक काळ नोकरी केली. तल्लख आणि मार्मिक कल्पनाशक्ती, राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनातील विसंगतीवर भाष्य करणारी विश्लेषक बुद्धिमत्ता आणि रेषेची खास लय यामुळे त्यांची रेखाचित्रे वैशिष्ट्यपूर्ण ठरली. चार दशकांहून अधिक काळ त्यांनी व्यंगचित्रकार म्हणून कारकीर्द गाजवली.

सुरुवातीला त्यांनी काढलेली चित्रे राजारामियन या कोल्हापूरच्या राजाराम महाविद्यालयाच्या वार्षिक अंकात छापली गेली. त्यानंतर महाद्वार या मासिकातही त्यांची चित्रे छापून आली. ‘हंस’ आणि ‘वाङ्मयशोभा’मधून त्यांच्या चित्रांना प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर १९५२पासून मौजमध्ये द्वा. भ. कर्णिक आणि ज्ञानेश्वर नाडकर्णी यांच्या लेखनाला सजावट म्हणून त्यांची रेखाचित्रे वापरण्यात आली. ‘ललित’च्या मुखपृष्ठावरही सरवटे यांची चित्रे छापली होती. सातत्याने पन्नास वर्षे त्यांनी ललितसाठी मुखपृष्ठे रेखाटली. सामान्यांना व्यंगचित्रे, अर्कचित्रे समजावी यासाठी परकी चलन, खडा मारायचा झाला तर, खेळ रेषावतारी, रेषा लेखक, सावधान पुढे वळण आहे, संवाद रेषालेखकाशी, व्यंगकला-चित्रकला, व्यंगचित्र एक संवाद अशी विविध नऊ पुस्तके सरवटे यांनी लिहिली. त्यांनी आपल्या मित्रांविषयीही सहप्रवासी म्हणून एक पुस्तक लिहिले. त्यांनी लेखकांची, प्रकाशकांची अर्कचित्रे काढली. त्यांच्या चित्रांवर अमेरिकन शैलीचा प्रभाव होता. त्यांच्या चित्रांमधून मुंबई, कोल्हापूर ही शहरे मोठ्या प्रमाणात आली आहेत. राजकीय मोर्चे, ध्वनिप्रदूषण, काँक्रिट जंगल, मुंबईची गर्दी असे अनेक विषय त्यांनी या चित्रमालेत रेखाटले. त्यांना बेंगलोरच्या कार्टूनिस्ट कंबाइन संस्थेने जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरविले होते. वसंत सरवटे यांचे निधन २६ डिंसेबर २०१६ रोजी झाले.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 2285 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…