नवीन लेखन...

उमामहेश्वर स्तोत्रम् – मराठी अर्थासह

पार्वती व शंकर यांच्या स्तुतीपर असलेले हे स्तोत्र बहुतांश उपेंद्रवज्रा/इंद्रवज्रा वृत्तात रचलेले असून अत्यंत रसाळ व तितकेच समजण्यास सोपे आहे. त्याच्या पहिल्याच श्लोकातील ‘नगेंद्रकन्या’ या उल्लेखाने कालिदासाच्या कुमारसंभवातील पहिल्या सर्गातील ‘उमा’ या शब्दाच्या उपपत्तीची आठवण झाल्याखेरीज रहात नाही.


नमः शिवाभ्यां नवयौवनाभ्यां
परस्पराश्लिष्टवपुर्धराभ्याम् ।
नगेंद्रकन्यावृषकेतनाभ्यां
नमो नमः शंकरपार्वतीभ्याम् ॥ १ ॥

मराठी- ज्यांनी तारुण्यात नुकताच प्रवेश केला आहे, एकमेकांच्या मिठीत असलेली शरीरे ज्यांनी धारण केली आहेत अशा कल्याणकारी हिमालयाची पुत्री (पार्वती) आणि ज्याच्या झेंड्यावर नंदी आहे (शंकर) अशा शिव आणि पार्वती यांना मी नमस्कार करतो.

नवीन तारुण्य नि क्षेमकारी
परस्परां वेढून देहधारी |
हिमाद्रिकन्येस नंदिध्वजाला
प्रणाम माझा शिवपार्वतीला ॥ ०१

टीप- येथे काही अभ्यासकांनी पहिल्या चरणातील ‘शिवाभ्यां’ चा अर्थ ब्रह्मस्वरूप असा, तर काहींनी तो शिव आणि पार्वतीचा मिळून द्विवचनी उल्लेख (एकशेषद्वंद्व समास) असे मानले आहे. माझ्या मते दोघेही शिव म्हणजे कल्याणकारी असल्याने येथे तो द्विवचनी शब्द वापरला असावा.


नमः शिवाभ्यां सरसोत्सवाभ्यां
नमस्कृताभीष्टवरप्रदाभ्याम् ।
नारायणेनार्चितपादुकाभ्यां
नमो नमः शंकरपार्वतीभ्याम् ॥ २ ॥

मराठी- कल्याणकारी, ज्यांचा (मीलनाचा) उत्सव आनंदमय आहे, त्यांना नमस्कार करणार्‍यांना जे इच्छित गोष्टी दान करतात, ज्यांच्या पावलांची पूजा श्रीविष्णूने बांधली आहे, अशा शिव आणि पार्वती यांना मी नमस्कार करतो.

जयां समारंभ रसाळ भारी
हवे हवे देत नि क्षेमकारी
हरी जयां पूजितसे पदाला
प्रणाम माझा शिवपार्वतीला ॥ ०२


नमः शिवाभ्यां वृषवाहनाभ्यां
विरिंचिविष्ण्विंद्रसुपूजिताभ्याम् ।
विभूतिपाटीरविलेपनाभ्यां
नमो नमः शंकरपार्वतीभ्याम् ॥ ३ ॥

मराठी- कल्याणकारी, नंदी ज्यांचे वाहन आहे, ब्रह्मा,विष्णू, इंद्र यांनी ज्यांची पूजा केली आहे, ज्यांनी सर्वांगाला भस्म लावलेले आहे (असे शंकर) व जिने सर्वांगाला चंदनाची उटी लावली आहे (अशी पार्वती) यांना मी नमस्कार करतो.

पाटीर- चंदन

वृषेश ज्यां वाहक, क्षेमकारी  ( वृषेश – नंदी )
सुरेश ब्रह्मा पुजिती मुरारी ।
विलेपती भस्म, उटी तनूला
प्रणाम माझा शिवपार्वतीला ॥ ०३


नमः शिवाभ्यां जगदीश्वराभ्यां
जगत्पतिभ्यां जयविग्रहाभ्याम् ।
जंभारिमुख्यैरभिवंदिताभ्यां
नमो नमः शंकरपार्वतीभ्याम् ॥ ४ ॥

मराठी- जे जगाचे दैवत आहेत, जगताचे अधिपती आहेत, (असुरांवर) विजय हेच ज्यांचे लेणे आहे, इंद्र ज्यांचा मुख्य ते देव ज्यांना नमस्कार करतात, अशा कल्याणकारी शंकर पार्वतीला मी नमस्कार करतो.

जगास सार्‍या सुर, क्षेमकारी
प्रजापती पूजिति इंद्र बद्री ।           (बद्री – विष्णू)
जगास स्वामी, जय दागिना ज्या
नमू असे शंकर आणि जाया ॥ ०४

टीप- विग्रह या शब्दाला नाना अर्थछटा आहेत. त्यानुसार विविध अभ्यासकांनी वेगवेगळे अर्थ लावलेले दिसतात. जसे ‘ जय हे ज्यांचे स्वरूप आहे ’, ‘ जे नेहेमी विजयी होतात ’ ‘ जय आणि पराजय देणारे ’ इत्यादी.  अनेक असुरांवर महादेव आणि महाकाली यांनी विजय मिळवलेले असल्याने येथे `विजय हाच ज्यांचा अलंकार आहे ’ असा अर्थ घेतला आहे.


नमः शिवाभ्यां परमौषधाभ्यां
पंचाक्षरीपंजररंजिताभ्याम् ।
प्रपंचसृष्टिस्थितिसंहृताभ्यां
नमो नमः शंकरपार्वतीभ्याम् ॥ ५ ॥

मराठी-  (भवरोगावर) अत्युच्च औषध असणारे, (नमः शिवाय या भक्तांच्या) पाच अक्षरांच्या (जपरूपी) पिंजर्‍याने (कवचाने) उल्लसित होणारे, जे या विश्वाची उत्पत्ती स्थिती आणि लय यांना कारणीभूत आहेत, अशा कल्याणकारी शंकर पार्वतीला मी नमस्कार करतो.

अमोघ ओकाद हि क्षेमकारी (ओकाद – औषध)
खुषी तया पाच वर्णात भारी ।
जगास पुष्टी लय जन्म दाता
उमेस शंभूस प्रणाम आता ॥ ०५


नमः शिवाभ्यामतिसुंदराभ्यां
अत्यंतमासक्तहृदंबुजाभ्याम् ।
अशेषलोकैकहितंकराभ्यां
नमो नमः शंकरपार्वतीभ्याम् ॥ ६ ॥

मराठी- जे अत्यंत सुरेख आहेत, (आपल्या भक्तांची) हृदयकमळे ज्यांना खिळवून ठेवतात, जे संपूर्ण जनांचे एकमेव हितकर्ते आहेत, अशा कल्याणकारी शंकर पार्वतीला मी नमस्कार करतो.

अतीव रेखीव व क्षेमकारी
मनांबुजे जात जडून सारी ।
दुजा न कल्याण करी जनांचे
धरू मनी पाय उमा शिवाचे ॥ ०६


नमः शिवाभ्यां कलिनाशनाभ्यां
कंकालकल्याणवपुर्धराभ्याम् ।
कैलासशैलस्थितदेवताभ्यां
नमो नमः शंकरपार्वतीभ्याम् ॥ ७ ॥

मराठी- वाईट प्रवृत्तींचा नाश करणार्‍या, आपल्या देहावर नररुंडांची माळ (शंकर) आणि सुरेख पुष्पमाला (पार्वती) धारण करणार्‍या, कैलास पर्वतावर निवास करणार्‍या, कल्याणकारी शंकर-पार्वतीला मी नमस्कार करतो.

दुर्बुद्धिचा नाश नि क्षेमकारी
सुरेख माळा, नररुंडधारी ।
जयास कैलासगिरी निवासा
प्रणाम शंभू गिरिजेस साचा ॥ ०७


नमः शिवाभ्यामशुभापहाभ्यां
अशेषलोकैकविशेषिताभ्याम् ।
अकुंठिताभ्यां स्मृतिसंभृताभ्यां
नमो नमः शंकरपार्वतीभ्याम् ॥ ८ ॥

मराठी- सर्व अशुभ गोष्टींचा जे नाश करतात,सर्व लोकांत (तिन्ही जगतात) जे एकमेव आणि असामान्य आहेत, कोठेही ज्यांना अवरोध नाही, सर्व गोष्टी ज्यांच्या स्मृतीत साठवलेल्या आहेत (जे भक्तांना कधीच विसरत नाहीत), अशा कल्याणकारी शंकर-पार्वतीला मी नमस्कार करतो.

अभद्रता नाश नि क्षेमकारी
जगी असामान्य स्वरूप भारी ।
अडे कुठे ना, स्मृति तीव्र सारी
नमू महादेव समेत गौरी ॥ ०८


नमः शिवाभ्यां रथवाहनाभ्यां
रवींदु-वैश्वानर-लोचनाभ्याम् ।
राका-शशांकाभ-मुखांबुजाभ्यां
नमो नमः शंकरपार्वतीभ्याम् ॥ ९ ॥

मराठी- रथामध्ये आरूढ झालेल्या, सूर्य,चंद्र आणि अग्नी हे ज्यांचे डोळे आहेत,पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे तेजस्वी वदनकमळे असणार्‍या, शंकर-पार्वतीला मी नमस्कार करतो.

रथात आरूढ, नि क्षेमकारी
रवी शशी पावक नेत्र भारी ।
गोलाकृती इंदु-मुख-नीरजाला
प्रणाम माझा शिव पार्वतीला ॥ ०९


नमः शिवाभ्यां जटिलंधराभ्यां
जरामृतिभ्यां च विवर्जिताभ्याम् ।
जनार्दनाब्जोद्भवपूजिताभ्यां
नमो नमः शंकरपार्वतीभ्याम् ॥ १० ॥

मराठी- जे ‘जटिलंधर’ आहेत (जो मस्तकावर जटा धारण करतो तो शंकर व आयाळधारी सिंह जिचे वाहन आहे अशी पार्वती), जे जन्म आणि मृत्यू यांच्यापासून मुक्त आहेत, विष्णू आणि ब्रह्मा यांनी ज्यांची पूजा केली आहे, अशा कल्याणकारी शिव आणि पार्वतीला मी नमस्कार करतो.

जटा शिरी, वाहन सिंह साचा
प्रभाव वार्धक्य नसे यमाचा ।
ब्रह्मा हरी पूजित नित्य ज्यांना
प्रणाम माझा शिवपार्वतींना ॥ १०

टीप- येथे पहिल्या चरणातील जटिलंधर या शब्दाचे विविध अर्थ लावलेले दिसतात. जसे की माथ्यावरील केशसंभार – शंकराच्या शिरावरील जटा तसेच पार्वतीचे माथ्यावरील केशकलाप (अनेक काव्यातून ‘ कुटिल कचभरा ’ असे वर्णन आलेले आहे). जटिल म्ह. आयाळ असलेला सिंह हा देवीचे वाहन आहे असाही अर्थ घेतला जाऊ शकतो. पार्वतीच्या कचभारातील विविध सुवर्णालंकार असाही अर्थ काही अभ्यासकांनी घेतलेला दिसतो.


नमः शिवाभ्यां विषमेक्षणाभ्यां
बिल्वच्छदामल्लिकदामभृद्भ्याम् ।
शोभावतीशांतवतीश्वराभ्यां
नमो नमः शंकरपार्वतीभ्याम् ॥ ११ ॥

मराठी- ज्यांचे नेत्र विषम संख्येचे आहेत,ज्यांनी बेलाची पाने व जातिपुष्पांचा हार धारण केला आहे, जे शोभावती (कांची) व शांतवती (काशी) चे अधिपती आहेत, अशा कल्याणकारी शिव आणि पार्वतीला मी नमस्कार करतो.

न नेत्र ज्यांचे सम, क्षेमकारी
गळा जुई हार नि बेलधारी ।
कांची महीषी नि काशीपतीला
प्रणाम माझा शिव पार्वतीला ॥ ११

टीप- प्रथम चरणातील ‘विषमेक्षण’ – विषम संख्येचे (तीन) नेत्र हे विशेषण शंकराचार्यांच्या ‘अर्धनारीश्वरस्तोत्रम्’ मध्येही वापरले आहे. परंतु तेथे शंकराचे वर्णन विषमेक्षण व पार्वतीचे वर्णन समेक्षण असे आले आहे. येथे आचार्यांनी शिव आणि पार्वती या दोघांचेही वर्णन ‘विषमेक्षण’ असे केले आहे. दोघांचे मिळून पाच डोळे होतात म्हणून त्यांना ‘विषमेक्षण’ असे संबोधले असावे असाही अर्थ घेता येईल.


नमः शिवाभ्यां पशुपालकाभ्यां
जगत्रयीरक्षणबद्धहृद्भ्याम् ।
समस्तदेवासुरपूजिताभ्यां
नमो नमः शंकरपार्वतीभ्याम् ॥ १२ ॥

मराठी- जे सर्व प्राणीमात्रांचे (किंवा आपले वाहन नंदी व सिंह यांचे) पालनकर्ते आहेत, तिन्ही जगांचे रक्षण करण्याचा ज्यांनी दृढनिश्चय केला आहे, सर्व देव व दानव यांनी ज्यांची पूजा केलेली आहे, अशा कल्याणकारी शिव आणि पार्वतीला मी नमस्कार करतो.

जिवांस संगोपन, क्षेमकारी
जगा तिन्ही राखण जे करारी ।
जयांस सारे सुरदैत्य पूजी
उमामहेशास प्रणाम आजी ॥ १२


स्तोत्रं त्रिसंध्यं शिवपार्वतीभ्यां
भक्त्या पठेद्द्वादशकं नरो यः ।
स सर्वसौभाग्यफलानि भुंक्ते
शतायुरंते शिवलोकमेति ॥ १३ ॥

मराठी- जो मनुष्य शिवपार्वतींचे बारा श्लोकांचे स्तोत्र भक्तीने तिन्हीत्रिकाल म्हणेल, तो सर्व उत्कृष्ट नशीबाची फळे उपभोगतो शंभर वर्षे जगून शेवटी शिवलोकास जातो.

उमाशिवाचे नित स्तोत्र गाई
अनन्यभावे, बहु लाभ होई ।
फळे सुखाची, शतवर्ष भोगी
अखेर जाई शिवलोक मार्गी ॥ १३

असे हे श्रीमद् आदिशंकराचार्यांनी रचलेले उमामहेश्वर स्तोत्र संपूर्ण.

*****************

धनंजय बोरकर (९८३३०७७०९१)

धनंजय मुकुंद बोरकर
About धनंजय मुकुंद बोरकर 60 Articles
व्यवसाय इलेक्ट्रॉनिक (एव्हियॉनिक्स) इंजिनियर. संस्कृत भाषेची आवड. मी केलेले संस्कृत काव्यांचे मराठी गद्य व स्वैर पद्य रूपांतर - १. कविकुलगुरू कालिदासाचे `ऋतुसंहार' (वरदा प्रकाशन, पुणे) २. जयदेवाचे `गीतगोविंद' (प्रसाद प्रकाशन, पुणे). ३. मूकशंकराचार्याचे `मूक पंचशती' ४. जगन्नाथ पंडितांचे `गंगा लहरी' इत्यादी. मी ऋतुसंहार मधील श्लोकांवर आधारित एक दृकश्राव्य कार्यक्रम तयार केला असून त्याचे अनेक कार्यक्रम पुण्यात व इतर ठिकाणीही सादर केले आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..