नवीन लेखन...

तुमको न भूल पाएँगे – रफ़ी साहेब

मंडळी सप्रे म नमस्कार !

४३ वर्षांपूर्वी….. ३१ जुलै २०२३ या दिवशी एक अशुभ वार्ता रात्री देणारी सकाळ उगवली होती….. लहान मुलासारखं निर्व्याज हसू असणारा एक उत्कृष्ट चेहेरा तितक्याच उत्कृष्ट आवाजासह शांत झाला !

मुझको मेरे बाद ज़माना ढूँढेगा म्हणणारा रफ़ी शांत झाला !

रफ़ी , सगळ्याच दृष्टीने तू ज्येष्ठ आणि श्रेष्ठ , पण तरीही आप्तेष्ट वाटत आलास आणि म्हणून तुला एकेरी संबोधतोय ! तुला विसरणं हे श्वास घ्यायला विसरण्याएवढंच अशक्य आहे ! ढूँढा उसे जाता है जो कहीं खो गया हो ! आप कभी इस दिल से रुख़सतही नहीं हुवे रफ़ीसाहाब!

रफ़ी साहेबांची आठवण डोळ्यांत पाणी आणते ! त्यांना विनम्र श्रद्धांजली !

यानिमित्त माझा एक जुना लेख पुन:प्रसारित करत आहे….. ~ सप्रे म


मंडळी आपल्या सगळ्यांचे आवडते गायक स्वर्गीय मोहमद रफी यांची आज पुण्यतिथी ! जगाच्या कानाकोपर्‍यातून आज रफीचे लाखो चाहते आपापल्या सोयीनुसार अत्यंत श्रद्धेने रफीवर लेख लिहितील.कुणी फक्त ३१ जुलैविषयी तर कुणी रफीची गाणी व इतर काहि.पण मी मात्र जरासा वेगळा विचार करून रफीसाहेबांवर हि १४ दिवसांची विशेष लेखमाला लिहिण्याचं ठरवलं , पहिल्या १३ भागांमधे रफीच्या जन्मापासून ते त्याच्या रेकाॅर्ड झालेल्या शेवटच्या गाण्यापर्यंतचा प्रवास उलगडण्याचा मी प्रयत्न केला.रफीसारखं व्यक्तिमत्व सशक्तपणे शब्दांत मांडण्याइतकी माझी शब्दसंपदा आणि मराठीची जाण कदाचित् गर्भश्रीमंत नसेलहि पण मनाच्या गाभार्‍यात ठाण मांडून बसलेले दोन अभिषिक्त छत्रपती — शिवाजी महाराज व संभाजी महाराज , मराठीचे वाल्मिकी ग.दि.माडगूळकर , स्वातंत्र्यवीर वि.दा.सावरकर….अशा कित्येक व्यक्तिंप्रमाणेच मोहमद रफीबद्धल खूप काहि वाटत असून पण काहिहि लिहिता न येण्याएवढीही दीन नक्कीच नाहि !

या लेखमालेच्या शीर्षकापासूनंच मी या १४ लेखांच्या लेखमालेचं वेगळेपण जपायचा प्रयत्न केलाय.मंडळी रफी आपल्यासाठी तुम मुझे यूँ भुला न पाओगे हे सार्थ आव्हान देऊन गेलाय आणि म्हणूनंच आपण रफीला आठवताना मी हसरत जयपुरींचे मुकेशच्या गाण्यातील तुमको न भूल पाएँगे हे शब्द शीर्षकासाठी वापरलेत ! मंडळी , मनातल्या भावना जागा करणार्‍या मुकेश या आवाजाखेेरीज इतका दर्द कुणाच्याच गाण्यात नाहि असं खुद्द रफीच सांगत असे !

चला , शीर्षकाचा मुद्दा सांगून झाला.आता तुमच्या मनात असं आलं असणार की रफीची गाणी हा विषय : नाहि , फक्त ३१ जुलै १९८० ची आठवण हा विषय : नाहि… तर मग या लेखात असं काय वाचण्यासारखं उरलंय ? मंडळी आहे , उलट आजच्याच लेखात सगळं काहि आहे ! मंडळी , गाणी आणि संगीत बाजूला केल्यावरंच जे शिल्लक उरतं ते रफीचं एक माणूसपण आणि हे माणूसपणंच रफीला देवमाणूस या सार्थ पदवीपर्यंत घेऊन जातं ! रफी माणूस म्हणून इतरांपेक्षा कसा आणि किती वेगळा होता हे कळल्याशिवाय त्याच्या आजन्म निर्व्याज हसर्‍या चेहेर्‍याचं आणि सच्चा सुरांचं रहस्य कधीही जाणून घेता येणं अशक्य आहे! हे आणि हे  एवढंच सांगायचा माझा उद्देश असेल आजच्या लेखाचा ! { एवढंच ?  “अरे मूर्ख माणसा उदय , आज ३७ वर्षांनंतर पण ३१ जुलैला तुझ्यासकट करोडो लोकांचे डोळ्यांना ज्याला आठवून संततधार लागते , ते माणूसपण केवढं असेल बघ आणि म्हणे एवढंच !” }

चला तर माझे प्रयत्न तर सुरु करतो ! पाहुया माझ्या लेखणीत सद्गुरुंच्या कृपेने तुमच्या डोळ्यांत रफीसाठी असलेलं प्रेम व आदर वाढवून ते हा लेख संपेतोवर अश्रूंच्या वाटे बाहेर येण्याएवढं सामर्थ्य आहे की नाहि !

चला तर मग रफी जाणून घेण्यासाठी तुम्हाला रफीच्या माणुसकीचे आणि इतर पण काहि हकिगतमय किस्से सांगतो ….

रफीच्या मोठ्या मुलाने सांगितल्याप्रमाणे , रफीला बॅडमिंटन खेळायला खूप अावडायचं ! घरी अाल्यावर थोडासा वेळ असला की रफी लगेच बॅडमिंटन खेळायचा.ती बॅट अजूनहि जपून ठेवली अाहे ! { रफीचा हात लागल्यावर त्या रॅकेटला किंबहुना या खेळालांच अाता *BAD*minton न म्हणता *GOOD*minton म्हणून सरकारनं जाहिर करावं असं मला मनापासून वाटतं. }

रफीला दुसरा आवडता छंद होता कपड्यांचा ! चांगलं रहाणीमान आणि टापटिप कपडे रफीला खूप आवडायचे. { म्हणून तर तो Mr.Clean होता ना महाराजा ! रफीला कुठलंहि व्यसन नव्हतं ! }

रफींबद्दल असं म्हटलं जायचं की गाण्याचं कागद त्यांच्या पुढे सरकवायचा आणि नजर फिरवताच सूर तयार.. ही रफीसाहेंबाची विशेष शैली होती.. तसंच नायक बघून ते गाण्याचा सूर आणि मूड तयार करायचे… हाच मूड त्यांचा घरी आल्यावरही असायचा. रफींच्या कुटुंबातला प्रत्येक जण आजही त्यांच्या आठवणींनं भावूक होतो. एफएम असो वा रेडिओ तसंच टीव्ही असाही एकही तास रफींनी गायलेल्या गीताशिवाय जात नाही. त्यामुळे कुटुंबाला आजही रफी घरातच वावरत असल्याचा भास होतो. रफींचे ज्येष्ठ चिरंजीव बाबांची आठवणी सांगताना खुपच भावूक होतात. शाहीद रफी म्हणतात, “बाबा आमच्यात नाहीत असं अजुनही आम्हाला वाटत नाही. ते सदैव कुटुंबासोबत असतात. बाबांचं मधाळ आवाज दिवसभरातून किमान चार-पाच वेळा तरी आम्ही ऐकतो. त्यामुळे बाबा सतत आमच्यात आहेत असंच आम्ही समजतो. कधी हॉटेलमध्ये कधी सिग्नलला, कधी लोकलमध्ये कधी टैक्सीत सतत बाबांची गाणी वाजत असतात. त्यामुळे आम्हाला बरं वाटतं, तर कधी हेवा वाटून विचार येतो बाबा आपल्यात असायला हवे होते.”

फावल्या वेळेत बाबांसोबत आम्ही मनसोक्त हिंडायचो.. असंही शाहीद सांगतात.. रफींना सुट्टीचा दिवस आपल्या कुटुंबासोबत घालवायला आवडायचा. तसंच त्यांना नातवंडासोबत खेळायलाही खूप आवडायचं.

‘बाबूल..’बद्दल  रफी यांचा मुलगा शाहीद रफींबद्दल अविस्मरणीय प्रसंग सांगतात, “हमारी बडी बाजी { म्हणजे रफीची मोठी मुलगी }  अब्बू के बहुत लगाव और प्यार था. बाजी के विदाई समय अब्बू बडे उदास थें. बाजी के जाने के बाद अब्बू बहुत देर अकेले बैठे रहे. इसके दो दिन बाद ही निलकमल की रेकॉर्डींग थी. और अब्बू ने वह बेशकिमती गाना गाया.” या गाण्याबद्दल रफी बीबीसीच्या एका मुलाखतीत म्हणतात, “हे गाणं मी गायलं खरं, पण ज्यावेळी निलकमल पाहिला. गाणं आणि बिदाईचा प्रसंग बघून मी खूप भावनिक झालो आणि मला रडू कोसळलं.. मुलगी बिदा झाली त्यावेळी मी रडलो नाही पण, हे गाणं पडद्यावर बघून मी खूप रडलो.”

मोहम्मद रफी व्यवहारात मितभाषी होते. त्यांचं आणि लता मंगेशकरांचं गाण्यांच्या रॉयल्टीवरून मोठा वाद झाला होता. रफी रॉयल्टीच्या विरोधात होते. गाण्याचे पैसे निर्माते देतात मग रॉयल्टी का घ्यायची अशी रफींची भूमिका होती. लता दिदी मात्र उलट विचाराच्या होत्या. तसंच आशा भोसले यांच्यासोबत रफींचे अनेकदा वाद झाले. हे वाद मात्र स्टुडिओ माईकवर आल्यास शमायचा. याव्यतिरिक्त रफींचा कुठलाही, कुणाहीसोबत वाद झाल्याची नोंद आढळत नाही.

१९५२ मध्ये बनलेल्या ‘बैजु बावरा’ या सिनेमाशी निगडीत एक आठवण आहे. खरंतर यातली सर्व गाणी तलत मेहमूद हे गाणार होते. पण संगीतकार नौशाद यांनी एकदा त्यांना स्टुडिओत धुम्रपान करताना पाहिलं आणि ती सर्व गाणी मग रफीजींना मिळाली.

या काळात किशोरकुमार स्वतःच्या गाण्यापेक्षा अभिनयाकडे जास्त लक्ष द्यायचे. त्यामुळे त्यांना गायला कठिण जातील अशी ‘मन मोरा बावरा’ (चित्रपट – रागिनी) आणि ‘अजब है दास्तां तेरी ये जिंदगी’ (चित्रपट – शरारत) ही दोन गाणी त्या त्या संगितकारांनी चक्क रफीजींकडून गाऊन घेतली होती. पुढे किशोरकुमार यांना अभिनय क्षेत्रात फारसा वाव उरला नाही. त्यावेळी त्यांनी आपल्यातल्या गायकावर लक्ष केंद्रीत केलं.

६९-७० मध्ये आराधनातली ‘मेरे सपनोंकी रानी ‘ आणि ‘रूप तेरा मस्ताना ‘ गाजल्यावर सुपरस्टार राजेशखन्ना नेहमी किशोरकुमारजीचीच शिफारस जिथे तिथे करू लागला. त्यामुळे रफीसाठी गायनाच्या संधी कमी होत गेल्या. अगदीच कव्वाली, शास्त्रीय, गजल.. अशा प्रकारची संगिताची बैठक असलेली गाणी त्यांना मिळू लागली.

पण त्यातूनही ‘हम किसीसे कम नही’ मधल्या ‘क्या हुवा तेरा वादा’ या गाण्याने रफीजींना पुन्हा एकदा नव्याने प्रकाशझोतात आणलं. हा आनंद फार काळ टिकला नाही कारण त्याकाळी चित्रपटक्षेत्रात खूप वेगाने बदल होत होते. एक लाट आली ती संपूर्ण डायलॉगबाज सिनेमांची. शोले सारख्या सिनेमांनी तर प्रेक्षकवर्गांचं सगळं लक्ष वेगळीकडेच वेधलं. मग हे क्षेत्रं डिस्कोने व्यापलं. त्यातही मोहम्मद रफी यांनी लक्ष्मीकांत-प्यारेलाय यांच्या मदतीने ‘कर्ज’ साठी ‘दर्द्-ए-दिल’ गात नविन प्रवाहात स्वत:ला झोकून दिलं खरं, पण सिनेमातून आता ‘संगीत’ हद्दपार होतंय हे त्यांना पुर्णपणे कळून चुकलं होतं.

संगीतकार सी.रामचंद्र यांनी सांगितल्याप्रमाणे रफी हा एकमेव कलाकार असा होता की ज्याने गायनातले कितीतरी आदर्श डोळ्यांसमोर असूनहि कुणाचीहि नक्कल न करता स्वत:च्या आवाजात गायला!

रफी लवकरंच गायनाच्या कार्यक्रमासाठी परदेशी जाणार होता आणि परतताना एक डायलिसीस मशिन घेऊन येणार होता—कशासाठी? तर गोरगरिबांना आजारपणात डायलिसीस मशीनची सेवा मोफत उपलब्ध व्हावी म्हणून रफी ते मशिन एखाद्या हाॅस्पिटलला दान देणार होता !…. पण या दौर्‍यापूर्वीच रफी आपल्यातून निघून गेला होता !

रफीबद्धलच्या आठवणी सांगताना गीतकार आनंद बक्षी म्हणतात , ” माझ्या उमेदवारीच्या व झगडत्या काळात जब जब फूल खिले च्या माझ्या गीतांना रफीसाहेबांच्या आवाजाचा परीसस्पर्श झाला आणि मला सोनेरी यश लाभलं , नंतर मी मागे वळून पाहिलं नाहि !”

रफीसाहेबांच्या माणूसकीविषयी पण अानंद बक्षी हेलावून जाऊन सांगतात….. “मी बांद्र्याला नवीन घर घेतल्यानंतर प्रचंड द्विधा मन:स्थितीत सापडलो कारण माझ्या मुलाच्या —  राकेशच्या शाळेच्या प्रवेशासाठी वणवण करूनहि मला यश मिळंत नव्हतं! तेंव्हा माझ्या चिंताक्रांत चेहेर्‍यामागील विवंचनेचं कारण विचारणारा रफीसाहेबांचा हात माझ्या खांद्यावर पडला आणि माझा बांध फुटला ! राकेशच्या शाळेचं कारण समजताच रफीसाहेबांनी फार आश्वासक स्मितहास्य करत मला मुलाला घेऊन दुसर्‍या दिवशी बांद्र्याच्या एका प्रसिद्ध शाळेत यायला सांगितलं.दुसर्‍या दिवशी आम्ही शाळेत पोचतांच शाळेच्या प्रिन्सिपलनी रफीला पहाताच कंबरेत वाकून अभिवादन केलं आणि   तात्काळ राकेशचा त्या शाळेतला प्रवेश नक्की केला ! शाळा प्रवेशाची औपचारिकता आटोपल्यावर आम्ही प्रिन्सिपलसाहेबांचा निरोप घेण्यासाठी गेलो असता त्यांनी रफीसाहेबांना माईकवरून शाळेतल्या मुलांसाठी एखादं गाणं म्हणण्याची विनंती केली जी रफीसाहेबांनी अत्यंत विनम्रतेने मान्य केली.सगळ्यांसाठी जिव्हाळा असलेल्या रफीसाहेबांचं व्यक्तिमत्व मी आश्चर्यचकित होऊन पहातंच राहिलो ! खरंच रफीसाहेबांसारखी माणसं शतकांमधे एखाद्या वेळेसंच जन्मतात !”

रफीजी हे त्यांच्या उदार स्वभावासाठी प्रसिद्ध होते. काही संगितकारांना रफीजींच्या गाण्याचे मानधन देणे परवडत नसे, अशा वेळी ते फक्त छोटेसे मानधन घेत. प्रसिद्ध अभिनेता राकेश रोशन यांच्या (दिग्दर्शक आणि निर्देशक म्हणून) पहिल्या चित्रपटासाठी ‘आप के दिवाने’ साठी रफीजींनी शिर्षकगीत गायलं. पण गाण्याचं मानधन म्हणून एक रूपयासुद्धा घेतला नाही. किशोरकुमारजींच्या सिनेमातल्या गाण्यासाठी त्यांनी निव्वळ ‘एक रुपया’ मानधन घेतलं असही म्ह्टलं जातं.

रफींचं एक साम्राज्य होतं आणि त्याला टक्कर देण्यासाठी किशोर सज्ज होता.पण ही स्पर्धा फक्त व्यावसायिक स्तरावर होती, व्यक्तिगत जीवनात हे दोघे अतिशय चांगले मित्र होते. आपली जागा कोणीतरी घेऊ पहात आहे म्हणत रफींनी कधीही किशोरचा दुस्वास केला नाही, उलट किशोरला आपला लहान भाऊ मानलं आणि किशोरनेही आपल्याला मिळणाऱ्या यशाचा माज रफींसमोर कधीही दाखवला नाही, किशोरच्या मनातही या भावना कधीच नव्हत्या. या दोघांच्या घट्ट मैत्रीचे अनेक किस्से सांगितले जातात. रफी गेल्याची बातमी जेव्हा पसरली आणि ती किशोरच्या कानावर आली तेव्हा तडक किशोरने रफींचं घर गाठलं. त्या वेळी रफींच्या घरी येणारं पहिलं जर कोणी असेल तर तो होता किशोर कुमार. रफींच्या पार्थिवाजवळ बसून किशोर कित्येक तास रडत होता, अगदी जनाजा उठेपर्यंत…

रफींच्या घराजवळ एक विधवा बाई रहायची. तिला दर महिन्याला ठराविक दिवशी एका निनावी व्यक्तीकडून मनी ऑर्डर मिळायची. दर महिन्याला अगदी न चुकता हे घडायचं. एकदा सलग दोन तीन महिने तिला ही मनी ऑर्डर मिळाली नाही. तिने डाकघरात जाऊन चौकशी केली. तेव्हा तिला कळलं की आपल्या शेजारी राहणारे मोहम्मद रफी तिला दर महिन्याला पैसे पाठवायचे. ती बाई हे कळल्या कळल्या तिथे पोस्टातच ढसाढसा रडायला लागली.

सुधीर फडकेंच्या संगीतात दरार साठी रफी गाणार होता.सुधीर फडकेंनी रफीच्या घरी रिहर्सलला येण्यासाठी म्हणून सुधीर फडकेंचा फोन येऊन गेल्याचं जहिरनी सांगताच रफी म्हणाला , “सुधीर फडके माझ्याहून सिनिअर आहेत.तेंव्हा रिहर्सलसाठी माझ्या घरी यायचा त्रास त्यांना द्यायचा नाहि.त्यांचा मान ठेवण्यासाठी मलाच त्यांच्या घरी रिहर्सलला गेलं पाहिजे ! ” या प्रमाणे जहिरला त्यांनी सुधीर फडकेंना निरोप देण्यासाठी बजावलं.तसा निरोप सुधीर फडकेंना मिळालाय याची खात्री झाल्यानंतर रफी दरार च्या गाण्यांच्या रिहर्सलसाठी ठरल्याप्रमाणे शिवाजी पार्कच्या त्यांच्या निवासस्थानी पोचला.तेंव्हा ललिताबाई देऊळकर फडके यांच्याशी रफीची भेट झाली.तेंव्हा साजनमधल्या हमको तुम्हाराहि आसरा या द्वंद्वगीताच्या वेळी नवख्या असलेल्या आपल्याला ललिताबाईंनी कसं सांभाळून घेतलं होतं हे रफीला आठवलं.इतक्पा वर्षांनी रफीची भेट — तीही घरी म्हटल्यावर कुटुंबवत्सल ललिताबाईंनी डिंकाचे लाडू आणि चकली देऊन रफीचा पाहुणचार  केला.तेंव्हा रफी त्यांना म्हणाला , ” मला आठवतं , फिल्मिस्तानमधे तुम्हि असंच काहितरी खायला डब्यातून घेऊन यायच्यात आणि त्याचा आस्वाद मीही तेंव्हा घ्यायचो ! ”

एकदा नागपूरमधे एके ठिकाणी कल्याणजी आनंदजी नाईट शो होता व यासाठी मुकेश , रफी , हेमंतकुमार , मन्ना डे असे सगळे आले होते.पण काहि कारणाने सुमन कल्याणपूर व कमल बारोट येऊ शकल्या नव्हत्या.KA पुढे स्थानिक गायिकांच्या आॅडिशन्स घेण्याखेरीज पर्यायंच नव्हता.पण ते करूनहि कुणी सुयोग्य आवाजाची गायिका त्यांना मिळेना.तेंव्हा मधुसूदन नामक एका माणसाने आपल्या ९ वर्षाच्या बहिणीला संधी देण्याविषयी KA ना विनंती केली.पण हि कल्पनाच हास्यास्पद वाटल्याने KA नी त्याकडे दुर्लक्ष करत पुरुष गायकांची गाणी घेत कार्यक्रम सुरु केला.मध्यंतरानंतर परत मधूसूदनच्या आग्रहामुळे नाइलाजाने त्या ९ वर्षाच्या मुलीला गाण्याची संधी दिली.

९ वर्षाच्या चिमुरडीने लताचं रसिक बलमा सुरेख म्हटलेलं पाहून स्तिमित झालेल्या रफीने तिला स्टेजवर विचारलं , “तू माझ्यासोबत सौ साल पहले — गाशील का? ” ती चिमुरडी नुसतं हो म्हणून थांबली असती तरंच नवल ! तिनं रफीबरोबर सौ साल पहले मुझे तुमसे प्यार था तर म्हटलंच पण नंतर मुकेशसोबत ये वादा करो चांदके सामने पण गायलं ! आत्यंतिक कौतुकाने रफीने त्या ९ वर्षाच्या चिमुरडीच्या डोक्यावर आशीर्वादाचा हात ठेवला! त्यानंतर रफीच्या प्रत्येक स्टेज शो मधे ती चिमुरडी गायली !

पुढे ही चिमुरडी मुंबईला आली आणि ती १३ वर्षांची असताना १९६५ मधे हिमालयकी गोदमें या चित्रपटासाठी संगीतकार कल्याणजी आनंदजी यांनी रफीसोबत गायला तिला उभं केलं!स्टेज शो मधे गाणं वेगळं आणि रेकाॅर्डिंग स्टुडिओमधे शेकडो साजिंद्यांसह  गाणं वेगळं महाराजा! त्यात कल्याणजींनी तिला सावध करण्यासाठी म्हटलं , “सामने शेर है , डटे रहियो !” झालं हिचं त त प प झालं ना राव ! चौकशीअंती रफीच्या लक्षात सारा प्रकार येताच रफीने तिला चुचकारत आशीर्वादाचा हात तिच्या डोक्यावर ठेवला आणि गाण्यासाठी तिला आत्मविश्वास मिळवून दिला ! मंडळी , ते गाणं हौतं ओय तू रात खडी थी छतपे नी मैं समझा के चांद निकला आणि ती १३ वर्षाची मुलगी होती उषा तिमोथी जिला रफीने आपली मानसकन्या मानली.पुढे अनेक वर्ष रफीने उषाला आपल्या प्रत्येक स्टेज शोमधे गावोगावी — परदेशात सुद्धा गाण्याची संधी दिली.इतकंच नव्हे , रफीला अब्बा व रफीच्या बेगमना बा जी म्हणणार्‍या रफीनं उषाला सांगितल की “मी तुझ्यासाठी चांगलं स्थळ शोधीन!” नंतर उषाने आपला जोडीदार निवडल्याचं कळताच रफीनं आधी सगळी चौकशी केली आणि खात्री पटताच तिचं लग्न approve केलं.

मंडळी उषा तिमोथीचं लग्न झाल्यावर तिचा हनिमून Five Star Hotels मधे बुकिंग करून रफीने स्वखर्चाने sponsor केला !

गाण्याबद्धल लिहायचं नाहि असं ठरवूनहि हे सगळं लिहिण्याचा मोह आवरला नाहि याचं कारण म्हणजे मंडळी , हि रफीची मानसकन्या उषा तिमोथी आज ६५+ वर्षाची झाली आहे आणि काल रफी फॅन्स क्लब— तर्फे उल्हासनगर इथल्या टाऊन हाॅलमधे रफी पुण्यतिथीनिमित्त डाॅ.आहुजांच्या सौजन्याने विनामूल्य असलेल्या साहिर—रफी नाईट या आॅर्केस्ट्राला उषा तिमोथी मालाडहून आली होती ! वरील नागपूर व हिमालयकी गोदमें हा किस्सा दस्तुरखुद्द उषा तिमोथीने सांगितला ! उषा तिमोथी काल म्हणाली , रफीसाहाब बहोतहि नेकदिल इन्सान थे — clean character वाले इन्सान थे , उनका नाम किसीकेभी साथ नहिं जुडा और उस वक्त एक बापकी हैसियतसे जो हाथ अब्बा नें मेरे सरपे रखा , उसे मैं आजभी महसूस करती हूँ! मंडळी , काल हे ऐकल्यावर जेवढा कंठ दाटून आला आणि अश्रू निखळले ना , तितकाच आजंहि मी भावुक झालोय ! या रफी नावाच्या देवमाणसाबद्धल हे ऐकलं , उषाला पण भरून आलं होतं… हे सगळं अनुभवलं आणि म्हणून हे सगळं आज बोललो…..मी बरोबर केलं ना ?…

रफी खाण्याचा प्रचंड शौकिन होता.वर सांगितल्याप्रमाणे रफीने जिला मानसकन्या मानलं होतं ती उषा तिमोथी , रफी , संगीतकार सी.रामचंद्र आणि दिलीपकुमार हे मालेगांवच्या एका चॅरिटी शोसाठी निघाले होते.नाशिकजवळ वाटेत रफीला काहि बायका फडक्यातून शिदोरी घेऊन जात असताना दिसल्या.तेंव्हा अण्णांनी { C.R. } रफीला सांगितलं की या बायका फडक्यातून ज्वारीच्या भाकर्‍या व लाल मिरचीचा ठेचा घेऊन जातात.तोंडाला पाणी सुटलेल्या रफीने गाडी थांबवून त्या बायकांकडे चौकशी केली असता खरंच शिदोरीत ज्वारीच्या भाकर्‍या व ठेचा घेऊन निघाल्याचं कळलं.रफीच्या विनंतीवरून त्या बायकांनी ती सगळी न्याहारी या चौघांना दिली.ते खाऊन झाल्यावर तृप्त मनाने रफीने शंभराच्या काहि नोटा त्या बायकांना देऊ केल्या.रफीच्या उदारपणाचं त्या बायकांना कौतुक वाटलं.पण गावात अतिथींना खाऊपिऊ घालणं हि एक पर्वणी समजली जाते.त्यामुळे त्या बायकांनी अर्थातंच पैसे घ्यायला नकार दिला.त्या खेडवळ बायकांना कल्पनाहि नव्हती की हिंदुस्तानचा शहेनशहा रफी , संगीत शिरोमणी सी.रामचंद्र , ट्रॅजिडी किंग दिलीपकुमार व १३ वर्षाची असताना कल्याणजी आनंदजींच्या संगीतात रफीबरोबर ओय् तू रात खडी थी छतपे नी मैं समझा के चाँद निकला हे गाणं गाणारी उषा तिमोथी या चौघा महारथींना आपण आत्ता खाऊ घालून तृृृप्त केलंय !आपल्याला त्यांनी ओळखलं नाहि याविषयी जराहि रुखरुख न वाटलेल्या रफीसोबतच्या दिलीपकुमारच्या चेर्‍यावर मात्र विशादाच्या काहि छटा आढळून आल्या… { MOHAMMED RAFI – GOD’S OWN VOICE या राजू कोर्ती व धीरेंद्र जैन लिखित पुस्तकातून साभार !}

रफीच्या उदारतेचे अनेक किस्से सांगितले जातात. या रुपेरी सृष्टीत त्यांनी अनेकांना मदत केली, एवढंच नाही तर कोणीही असूदेत अगदी कोणीही त्यांच्याकडे मदतीच्या अपेक्षेने आलेला कधीच रिकाम्या हाताने परत जात नसे. रस्त्यावरच्या भिकाऱ्यांच्या हातावरही काही ठेवल्याशिवाय ते पुढे जात नसत.

एकदा एका संगीतकाराचा हलाखीच्या परिस्थितीत मृत्यू झाला.रफी त्या संगीतकाराच्या आजारपणात त्याला भेटायला गेला होता.आणि तिथून परत येण्यापूर्वी त्याच्या उशाशी पण त्याला नकळत , दहा हजारचं बंडल ठेवून आला होता ! { नकळत का ? तर त्याचा आत्मसन्मान दुखावू नये म्हणून ! किती काळजी करावी दुसर्‍यााचं मन दुखावलं जाऊ नये म्हणून ! रफी तुला शिरसाष्टांग नमस्कार ! }

असंच एकदा एका तंगीला आलेल्या कलाकाराला आपल्या कारनं रफीनं त्याच्या घरी सोडलं होतं. पण बोलता बोलता हळूच रफीने पैशांनी भरलेलं पाकिट त्या कलाकाराच्या नकळत त्याच्या बॅगमधे  सारलं होतं !

मंडळी , MOHAMMED RAFI – Golden Voice of the Silver Screen या Sujata Dev लिखित पुस्तकासोबत ४०—४५ मिनिटांची एक DVD FREE आली आहे.हे पुस्तक काल रात्री हातात पडलं , त्यातली DVD ऐकली — ज्यात फिल्म इंडस्ट्रितला एक बुजुर्ग कलाकार सांगतो की कलाकारांच्या अपरोक्ष बोलण्याच्या वाईट प्रथेसाठी कुप्रसिद्ध असणार्‍या या इंडस्ट्रीमधे रफी हा एकटाच असा कलाकार होता की जो स्वत: तर कुणाबद्धलहि वाईट बोलत नसेच पण कुणी कुचाळक्या करू लागलं तर त्याला सांगत असे , ” ऐसा मत कहो ! सभी नेक और खुदाके बंदे हैं ! ”

बाकिच्यांचं माहित नाहि पण रफी नक्कीच ख़ुदाका बंदा होता !

विपन्नावस्थेत संगीतकारांना, गायक—गीतकारांना व वादकांना रफी दरमहा काही ना काही मदत करायचा.प्रत्येकासाठी शंभरपासून ते हजारापर्यंत काही ठराविक रक्कम रफीने ठरवून ठेवली होती व त्याची यादी तयार करून ठेवलेली होती.प्रत्येक महिन्याच्या २८ तारखेला ही यादी उघडून रफी व त्याचा सेक्रेटरी जहिर बसायचे आणि प्रत्येकाची ठरलेली रक्कम एका पाकिटात घालून त्यांच्या नावाचे पाकिट तयार करायचे.एक तारखेपर्यंत ही सारी पाकिटे तयार होऊन प्रत्येक महिन्याच्या दोन तारखेला हि पाकिटे घेऊन जाणार्‍या मंडळींची मोठी रांग बांद्र्याच्या रफी व्हिलासमोर लागायची.रफी व जहिर घरात नसले तरी रफीची बेगम बिल्किस रफी हि पाकिटं ज्याची त्याला सुपुर्द करत असे ! अनेक वर्षांचा हा उपक्रम ठरलेला होता.

मंडळी , रफी दरमहा जवळ Such २८ हजाराची रक्कम दान म्हणून वाटत होता ! *{ Source : *रफीनामा – by इसाक मुजावर }

मंडळी , १८ जानेवारी १९८० ला अभिनेता मिथून चक्रवर्तीने कलकत्त्याच्या दुर्गापूरमधे एक रफीच्या गाण्यांचा शो आयोजित केला होता. रफीने त्यावेळी नागपूरमधे असलेल्या उषा तिमोथीला दुर्गापूरला शो साठी बोलावून घेतले.रफीच्या शोमधे साजिंदे वगळता निवेदक शाहिद बिजनौरी , नकलाकार जाॅनी व्हिस्की , स्वत: रफी आणि उषा असे चारंच कलाकार होते.शो मधे सुरुवातीला उषा तिमोथीची चार—पाच सोलो गाणी , मग रफी—उषाची duets असा क्रम ठरलेला होता.पण त्या रात्री मात्र हा नियम रफीने मोडला होता आणि सुरुवातीला पटापट एकट्याने काही गाणी गायली.नंतर साजिंद्यांकरवी उषाने यानंतर जितकी जमतील तितकी जास्त गाणी गावीत असा निरोप ठेवला.उषाने पण सांगितल्याप्रमाणे पंचवीस एक गाणी गायली.नंतर उषाला कळलं की रफीला mild heart attack आला होता व म्हणून त्याला नंतर उपचार व  सक्तीची विश्रांती लादावी लागली.

१ जुलै १९८० ला रफी होमी वाडियांच्या महाबली चित्रपटासाठी कमलाकांत या संगीतकाराकडे गीत रेकाॅर्ड करण्यासाठी निघाला होता.१९५० ला रफीच्या मोठ्या भावाचा मित्र बंगलोरला निघून गेल्यानंतर रफीचे सेक्रेटरी म्हणून त्याचे मेव्हणे — बायको बिल्किस रफीचे बंधू जहिर बारी काम बघायचे.रेकाॅर्डिंगसाठी बाहेर पडतानाच रफीने जहिरला बजावलं , ” वाडियासाहेब या इंडस्ट्रीतले बुजुर्ग प्रोड्यूसर आहेत.माझ्या करियरच्या सुरुवातीला त्यांनी मला बरीच मदत केली आहे.तेंव्हा त्यांच्याशी देण्याघेण्याच्या गोष्टि न करता पाकिटात घालून ते जे काहि देतील ते मुकाट घ्यायचं !”

२ जुलै १९८० ला रफी अब मेरी बारी या सिनेमातील भप्पी लाहिरींच्या संगीतात एक गाणं आशा व किशोरकुमार बरोबर गाणार होता.रेकाॅर्डिंगसाठी घरातून बाहेर पडताना रफी जहिरला म्हणाला , “आज किशोरबरोबर गायचंय म्हणजे आजचा दिवस हसण्याचा आहे म्हणायचा!” — कारण किशोरचं तसंच खट्याळ वागणं!आणि त्या दिवशीहि किशोर  रेकाॅर्डिंग स्टुडिओमधे कुणा म्युझिशियनची छत्री उघडून चाळे करत बसला होता ! रफीची किशोरविषयीची भावना इतकी स्वच्छ होती की तो खरंच गमत्या स्वभावामुळे रफीला खूप आवडायचा !

३१ जुलै १९८०…..

ठरल्याप्रमाणे संगीतकार श्यामल मित्रा रफी व्हिलावर आले होते.दुर्गापूजेनिमित्त रफी गाणार असलेल्या बंगाली गाण्याची रिहर्सल करायला.आज दुसरं काहिच विशेष काम नसल्याने एरवी सकाळी ७ ते रात्री उशिरापर्यंत रफीसोबतंच असणारा जहिर दुपारी बारापर्यंत लवकर घरी निघून गेला.

एक वाजायच्या सुमारास शामल मित्रा निघून गेले.

रफीला थोडसं छाती आणि पोटात जड जड वाटू लागलं.अपचनाचा त्रास असावा असं वाटलं म्हणून रफीने त्याचा घरेलू नोकर खलीलकरवी सोडा—फुदिन्याची गोळी मागवून ती घेतली.सहरीनंतर नमाज आणि कुरआन वाचून बेगम बिल्किस जरा आराम करत पडली होती.खलीलने बाईजींना उठवू का? असं विचारल्यावर , कुणालाहि आपला त्रास न होऊ देणार्‍याा रफीने खुणेनेच नको महटलं.

गोळी घेतल्यावर रफीला १५—२० मिनिटांनी अंमळ बरं वाटलं.मग रफीने जेवण केलं आणि जरा वेळ हाॅलमधे कारपेटवरंच पडून आराम केला.

पण थोड्या वेळानं परत त्याला अस्वस्थ वाटू लागलं.म्हणून रफीने बेगमला बोलावलं.तोपर्यंत रफीला श्वास घ्यायलाहि त्रास होऊ लागला व ओठ काळेनिळे दिसू लागले.आता मात्र बेगमचा जीव घाबरला व तिने फॅमिली डाॅक्टर के.एम्.मोदिंना बोलवायला फोन लावला.पण नेमका आत्ताच फॅमिली डाॅक्टरांशी फोनवर संपर्क होऊ शकला नाहि.तोवर रफीला उलटी पण झाली होती.

मग डाॅ.चंदिरामानीना बोलावलं गेलं.रफीची अवस्था बघताच डाॅक्टरनी रफीला नॅशनल हाॅस्पिटलला घेऊन जाण्याचा सल्ला दिला.एंव्हाना रफीची आवडती निळी आॅडी बंगल्याच्या मागील दरवाजाशी हजर होती.इतकं होऊनहि रफी स्वत:च्या पायांनी चालत गाडीशी निघाला.तेंव्हा रफीला निघण्यापूर्वी भेटायला रफीची मोठी सून — सईदची बायको जी आपल्या तीन मुलाबाळांसोबत लंडनहून सुट्टीवर आली होती ती आणि रफीची चार महिन्याची गरोदर धाकटी मुलगी यासमिन या दोघी व घरचे सगळे नोकर चाकर , चौकिदार गोळा झाले होते.रफीनं याही परिस्थितीत सगळ्यांना हसून खुदा हाफिझ म्हटलं व यासमिनला मिठीत घेत म्हणाला , “घाबरू नकोस , तुझे अब्बा ईन्शाल्लाह लवकरंच परत येतील.”

नंतर रफी —  बेगम बिल्किस , मधली मुलगी नसरीन व जावई मेहराजसोबत नॅशनल हाॅस्पिटलला आला.तिथे पोचल्यावर लिफ्ट बंद असल्याचं लक्षात आलं.घरच्यांनी स्ट्रेचमागवलं व रफीला जिने चढून जाण्यास मनाई केली.पण का कुणास ठाऊक , कुणालाहि न जुमानता रफी दोन मजले चढून वर गेला!तिथे रफीचा ECG काढला गेला आणि बर्‍यााच वेळाने लक्षात आलं की रफीला हार्ट अॅटॅक येऊन गेलाय आणि त्याच्या इलाजाची कुठलीच सोय तिथे उपलब्ध नव्हती! तिथूनंच बाॅम्बे हाॅस्पिटल प्रमुख डाॅकटरशी बोलणं झालं आणि रफीला तिकडे घेऊन यायचा सल्ला दिला गेला !

आपल्यामुळे कुणालाहि — अगदि बेगमलासुद्धा म्हणून जागरूक असलेल्या आणि कुणालाहि आपल्यामुळे ताटकळायला लागू नये म्हणून आयुष्यभर वक्तशीर व काटेकोरपणे वेळ पाळणार्‍या रफीच्या बाबत मात्र आज काहिच वेळेवर होऊ नये ना ? हाय रे कर्मा…..

बाॅम्बे हाॅस्पिटलला पोचेस्तोवर सात वाजले होते.

करकरीत तिन्हिसांजेची वेळ ..तिथे पोचल्यावर मात्र डाॅ.जे.एल्.डागांनी त्वरीत सूत्र हाती घेत तातडीची उपाययोजना सुरु केली ! बघता बघता रफी नळ्यांच्या जंजाळात सापडला!एंव्हाना फॅमिली डाॅक्टर के.एम्.मोदिही तिथे पोचले होते.दोघेहि डोळ्यांत तेल घालून रफीला स्थिर करण्याचा आटोकाट प्रयत्न करत होते.रफी अंमळशाने स्थिरावताच घरच्यांशी बोलला.नसरीन अब्बांच्या उशाशी बसून कुरआनची एक दुआ — यासीन शरीफ वाचत होती.रफी बोलला म्हटल्यावर आशा पल्लवित झाल्या व सगळ्यांना बरं वाटलं.

पण नाहि…..आज कुठलातरी स्वर कमी लागायचा होता , कुठलातरी ताल चुकायचाच होता , रफीच्या आयुष्यातलं पहिलंच { आणि शेवटचंच } गाणं बेसूर झालं होतं…..हार्ट अॅटेक येऊन गेल्यानंतर एका प्रहरापेक्षा अधिक काळ उलटून गेल्यावर उपाययोजना सुरु करता आली होती..परिणाम व्हायचा तोच झाला… रफीची नाडी मंदावत गेली… भैरवी बेसूर होत चालली..रफीच्या कानांवर त्याचेच सूर दूरवरून ऐकू आल्यासारखे वाटत होते दुनिया न भाए मोहे , अब तो बुला ले …चरणोंमें चरणोंमें , तेरे चरणोंमें चरणोंमें…आणि रात्री १०वाजून २५ मिनिटांनी रफीची इबादत अल्लाहच्या दरबारात मंजूर झाली…..रफी आपल्याला सोडून गेला….दूर कुठेतरी पानपट्टीच्या ठेल्यावर असावं बहुतेक … एरवी खरखरणार्‍या आवाजात ऐकू येणारं गाणं आता मात्र स्पष्टपणे ऐकू येत होतं ये ज़िंदगीके मेले , ये ज़िंदगीके मेले , दुनिया मे

कम न होंगे , अफसोस हम न होंगे

रमझानच्या महिन्यात एकिकडे चाँद उगवला होता आणि तेंव्हाच संगीतक्षेत्रातल्या एक सूर्य अस्ताला गेला… ३१ जुलै १९८० — रात्री १० वाजून २५ मिनिटांनी

उदय गंगाधर सप्रे म

ठाणे

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..