नवीन लेखन...

तुकारामांच्या आरत्या आणि इतर अभंग

दत्तावरील अभंग
तीन शिरे सहा हात । तया माझा दंडवत ।।
काखे झोळी पुढे श्वान । नित्य जान्हवीचे स्नान ।।
माथां शोभे जटाभार । अगी विभूती सुंदर ।।
शंख चक्र गदा हाती । पायी खडावा गर्जती ।।
तुका म्हणे दिगंबर । तया माझा नमस्कार ।।

नमन माझे गुरुराय । महाराजा दत्तात्रया ।।
तुझी अवधूत मूर्ती । माझ्या जीवाची विश्रांती ।।
जीवींचे सांकडे । कोण उगवील कोडे ।।
अनसूयासुता । तुका म्हणे पाव आता ।।

श्रीराम
श्रीराम सखा ऐसा धरीं भाव ।
मीपणाचा ठाव पुसी मना ।।
शरण निरंतर म्हण तू गोविंद ।
वाचे लावी धंपा नारायण ।।
या परी सोपान नाही रे साधन ।
वाहतसे आण तुझी मना ।।
नको काही करु आळस अंतरी ।
जपे निरंतरी रघुपती ।।
तुका म्हणे मोठा लाभ नरदेही ।
देहीच विदेही होती नामे ।।

राम नामाचे पवाडे । अखंड ज्याची वाचा पढे ।।
धन्य तो एक संसारी । रामनाम जो उच्चारी ।।

रामनाम गर्जे वाचा । काळ आज्ञाधारक त्याचा ।।
तुका म्हणे रामनामी । कृतकृत्य झालो आम्ही ।।

रामनाम हाचि मांडिला दुकान ।
आहे वानोवाण ह्या रे कोणी ।।
नका कोणी करु घेतारे आळस ।
वांटतो तुम्हांस फुकाचे हे ।।
संचितासारखे पडे त्याच्या हाता ।
फारसे मागतां तरी नये ।।
तुका म्हणे आम्ही सांढविले सार ।
उरलिया थार विचारीता ।।

शंख चक्र गदा पद्म ।
पैल आला पुरुषोत्तम ।
ना भी ना भी भक्तराया ।
वेगी पावलो सखया ।।
दुरुनी येता दिसे दृष्टी ।
धाके दोष पळती सृष्टी ।।
तुका देखोनि एकला ।
वैकुंठाहूनि हरि आला ।।

राम राम म्हणता रामची होईजे ।
पदी बैसोनी पदवी घेईजे ।
ऐसे सुख वचनी आहे ।
विश्वासे अनुभव पाहे ॥
रामरसाचिया चवी ।
आन रस रुचती केवी ।।

तुका म्हणे चाखोनी सांगे ।
मज अनुभव आहे गे ।।

राम म्हणता तरे जाणता नेणता ।
हो का याति भलता कुळहीन ।।
राम म्हणता न लगे आणिक सायास ।
केले महादोष तेही जळती ।।
राम म्हणे तया नये जवळी भूत ।
कैचा यमदूत म्हणता राम ।।
राम म्हणता तरे भवसिंधुपार ।
चुके येर झार म्हणता राम ।।
तुका म्हणे हेचि सुखाचे साधन ।
सेवी अमृतपान एक भावे ।।

राम म्हणे वाट चाली । यज्ञ पाऊलापाऊली ।।
धन्य धन्य ते शरीर । तीर्थ व्रतांचे माहेर ।।
राम म्हणे करिता धंदा । सुखसमाधि त्या सदा ।।
राम म्हणे गासो ग्रासी । तोची जेविला उपवासी ।।
राम म्हणे भोगी-त्यागी । कर्म न लिंपे त्या अंगी ।।
ऐसा राम जपे नित्य । तुका म्हणे तो जीव मुक्त ।।

घोंगडीची रूपके (देहाची खोळ)
ठकिले काळा मारिली दडी । दिली कुडी टाकोनि ।।
पांघरलो बहु काळे । घोंगडे बळे सांडवले ।।
नये ऐसा लाग बरी परते दुरी लपाले ।।
तुका म्हणे आडसेवा । लाविला हेवा धांदली ।।

घोंगडियास घातली मिठी । सोडी साटी केली जीवे ।।
हा गे चोर धरा धांवा कोणी । घरात रहाटे चहु कोनी।।
नोळखवे म्यां धारिला हाती ।
देहा दिप माया लाविली वाती ।।
न पवे धावणें मारितो हाका । जनाचारी तुका नागवला ।।

तुकोबांच्या आरत्या
करुनी आरती आता ओवाळू श्रीपती ।। आजी पुरले
नवस । धन्य काळ हा दिवस ।। आजी पुरले नवस ।
धन्य काळ हा दिवस । पहा हो सकळा । पुण्यवंता
तुम्ही बाळा ।। तुका वाहे टाळी । होता सन्निध जवळी ।।

प्रसाद
पावला प्रसाद आता उठोनि जावे । आपुलाले श्रम कळे
येताती भावे ।। आता स्वामी सुखे निद्रा करा गोपाळा ।
पुरले मनोरथ जाता अपुलिया स्थळा ।। तुम्हांसी
जागवू आम्ही आपुलिया चाडा । शुभाशुभ कर्मे दोष
हरावया पीडा ।। तुका म्हणे दिले उच्छिष्टाचे भोजन।
नाही निवडले आम्हा आपणां भिन्न ||

पाहे प्रसादांची वाट । द्यावे धावोनिया ताट ।।
शेष घेऊनि जाईन | तुमचे झालिया भोजन ।।
झालो एक सवा । तुम्हा आडुनिया देवा ।।
तुम्हा म्हणे चित्त करुनी राहिलो निश्चिंत ।।

नटाचे अभंग (आरती)
ओवाळू आरती पंढरीराया ।।
सर्व भावे चरण आलो तुझीया पाया ।।
सर्व व्यापून कैसे रुप आकळ ।
तो हा गवळ्यांघरी झाला कृष्ण बाळ ।।
स्वरुप गुणातीत झाला अवतारधारी ।
तो हा पांडुरंग उभा विटेवरी ।।
भक्तीचीया काजा कैसा रुपासी आला ।
ब्रीदाचा तोडर चरणी मिरवला ।।
आरते आरती कैसी ओवाळिली ।
वाखाणिता किर्ती वाचा परतली ।।
भावभक्ती बळे होसी कृपाळू देवा ।
तुका म्हणे पांडुरंगा तुझ्या न कळती भावा ।।

(अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१६ मधून)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..