नवीन लेखन...

“थ्रिलिंग” कलावंतीण

Thrilling Kalavantin Fort

रायगड जिल्ह्यातील पनवेलच्या उत्तर-पूर्व भागात किंचित त्रिकोणी आणि लिंगकृती किल्ला स्थित आहे. मुंबई-पुणे एकस्प्रेस वे वरुन सहज लक्ष वेधून घेणारा हा किल्ला म्हणजे कलावंतीण दुर्ग होय ! मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील शेडुंग फाट्यापासून गडाकडे जायचा मार्ग आहे. कळंबोळीपासून पनवेल बायपासने आल्यास मुंबई-पुणे हा महामार्ग जोडला जातो. कलावंतीण ला जाण्यासाठी पनवेल ते ठाकुरवाडी बससेवा देखील उपलब्ध आहे. ठाकुरवाडीला पोहोचल्यावर प्रबलगडाच्या दिशेने पायी जावे लागते. येथे पोहोचल्यावर प्रबलगड आणि कलावंतीण हे दोन्ही किल्ले नजरेस पडतात.

साधारणत: २३०० फुट उंची असणार्‍या कलावंतीण दुर्गचा मार्ग हा शेडुंग या तुरळक वस्ती असलेल्या गावापासून सुरु होतो. कलावंतीण किल्ल्याला सुळका असे ही म्हणतात कारण तो सर करत असताना आडवाटेची वळण, पावसामध्ये लहान-मोठे धबधबे तर हिरव्यापानांनी फुललेला गडाचा परिसर मन मोहून टाकतो ! या भागात निरनिराळी फुले या दिवसांमध्ये आढळून येतात. अर्धा गड सर केल्यावर खाली नजर टाकल्यास दरीचं दृश्य विलोभनीय वाटत रहातं. बहरलेली शेतं, लहान-सहान झरे, अन् तलावांमुळे हा परिसर आपल्या मनाच्या कप्प्यात स्थित होतो. इथून पनवेल शहरातील वस्ती व तिथल्या उंच इमारती नजरेस येतात. गडाचा पहिला टप्पा सर केल्यावर आपण हळुहळू गडाचा महत्त्वपूर्ण टप्प्याकडे सरकतो. इथे मोठ्या दगडांच्या उजव्या बाजूस हनुमानाची कोरलिली मूर्ती आढळते. त्यापुढील पाऊलवाट काहीशी वरच्या दिशेला सरकत गेल्यामुळे व नंतरची चढाई रुंद आणि काही प्रमाणात झाडाझुडपातून जात अल्यामुळे चालताना थोडी सावधानता बाळगावी. पावसात या वाटेत पूर्णत: चिखल असतो ही नागमोडी वाट पार केल्यावर उजवीकडच्या भागामध्ये गुहा आढळून येते. या गुहेत जाताना सरपटून किंवा बसून जाण्यावाचून पर्याय नाही. काही सेकंदातच आपण गुहेच्या मुख्य भागामध्ये येऊन पोहोचतो या गुहेत पूर्णत: आहे. आत मध्ये विशेष काही बघण्यासारखे नाही. इतिहासात बहुधा या ठिकाणी गुप्त बैठक अथवा वार्तालाप किंवा महत्त्वाच्या गोष्टींसाठीच उपयोग केला जात असावा असं तरी वाटते. या गुहेत शिरताना टॉर्चचा वापर अनिवार्य ठरतो. त्याशिवाय इथे काय आहे हे देखील कळून येऊ शकत नाही. गुहेत प्रवेशासाठी आणि परतीसाठी एकच मार्ग असल्यामुळे आलेल्या वाटेने पु्न्हा त्याचस्थितीतून बाहेर यावे लागते. पुन्हा गडाकडे मार्गक्रमण करण्याच्या दिशेने आपण निघाल्यावर त्यापुढे काही अंतरावरच निमुळते व चिंचोळी जिन्यावरून अगदी सावकाशपणे पावलं टाकावी लागतात कारण पावसाळ्यात या भागात शेवाळं पसरलेले असते. काही ठिकाणी काताळमार्गातून वाट काढुन जाताना किल्ला आव्हानात्मक वाटतो. त्यामुळे शिवकालीन इतिहासाची अनुभूती डोळ्यासमोर उभी रहाते.

अखेर आपण गडाचे मुख्य टोक गाठण्यासाठी त्याच्या पायथ्याशी येऊन थबकतो. या टोकावर जाण्यासाठी तुम्हाला काहीश्या अवघड मार्गाने म्हणजे “कमी ग्रीपच्या उंच दगडांवरुन” वर चढत जावे लागते. या ठिकाणी दोरखंडाचाही मदतीने वर जाता येते. केवळ २०-२५ फुट असा हा “पिनॅकल” चढाई करताना दम काढतो हे नक्की ! पण ही चढाई तेवढी कठीण नाही जेवढं लांबून दिसते. पण एक मात्र नक्की की ही चढाई करताना तज्ञांच्या मार्गदर्शनाशिवाय चढू नये. पण त्या चढाई नंतर अखेर आपण गडाच्या मुख्य माथ्यावर पोहोचतो. इथून अगदी समोरच्या दिशेला लागून असलेल्या प्रबलगडाचे पूर्ण रुप जवळून पाहता येते तर भोवतालचं माथेरान, चांदेरी व पेब दुर्ग (विकतगड), इर्शलगड, कर्नाला किल्ला ही चित्त वेघून घेतात. फोटोग्राफर्ससाठी ही जागा म्हणजे पर्वणीच जणू ! चहुबाजूला पसरलेली हिरवाई, धबदबे आणि अथांग दरीची सुरेखता आपल्याला स्वर्गसुखाचा आनंद देते हे नक्की. माथा उतरताना तज्ञांच्या मार्गदर्शनाने उतरावे. पण उतरणीचा भाग कठीण नाही. जवळपास दिड तासातचं आपण माचीच्या पायथ्याशी येतो. आणि काहीसा कठीण वर्गात गणल्या जाणार्‍या कलावंतीण किल्ल्यावर आपण चढाई केल्याचा आनंद देखील मनात असतो.

यापूर्वी किल्ल्याला मुरंजन असे देखील म्हण्टले जात असे; पण मराठ्यांनी हा किल्ला जिंकल्यावर त्याचे नामांतर कलावंतीण असे करण्यात आले होते. या दुर्गच्या नावाबाबत असं ही बोलले जाते की कोण्या राज्याचे कलावंती राणीवर खूप प्रेम होते. कलावंती राणी आपल्याला सोडून न जावी म्हणून त्या राज्यांनी कलावंती राणीला त्या किल्ल्यावर महाल बांधून दिला. या दुर्गाशी माचीप्रबळ गावामधील आदिवासी लोकांचे जिव्हाळयाचे नाते असल्यामुळे दरवर्षी होळीला या दुर्गावर ते नृत्ये देखील करतात.

कलावंतीण किल्ला “वन डे ट्रेक”चा उत्तम पर्याय असला तरीपण नव्याने ट्रेकींग करणार्‍यांनी येथे शक्यतो जाऊ नये किंवा गेलातच तर सोबत अनुभवी ग्रुप व मार्गदर्शक असावेत. तसंच गडावरील गावांमधील स्थानिक लोकांना सुचित केल्यास उत्तम जेवणाची व नाष्ट्याची सोय देखील होऊ शकते. धो-धो पावसात हा किल्ला सर करणं म्हणजे अॅडव्हेंचर्स आणि “गडकर्‍यां”ची खरी कसोटी पाहून थ्रिलिंग अनुभव देणारा क्षण म्हणता येईल.

— सागर मालाडकर

Avatar
About सागर मालाडकर 111 Articles
श्री. सागर मालाडकर हे आकाशवाणीवरील निवेदक असून ते मराठीसृष्टीसाठी नियमितपणे लेखन करतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..