नवीन लेखन...

बळीराजाला सौर कृषिपंप योजनेचे वरदान

शेतकऱ्यांना दिवसा सिंचन करणे सोयीचे व्हावे व पारंपरिक पद्धतीने कृषिपंपासाठी लागणाऱ्या खर्चात बचत व्हावी, या उद्देशाने राज्यातील कृषी वापराकरिता पारेषणविरहित एक लाख सौर कृषिपंप योजना राज्य शासनाने महावितरणच्या माध्यमातून सुरू केली आहे. या योजनेमुळे अपारंपरिक ऊर्जेचा वापर वाढवण्यास मदत होईल, त्याचबरोबर शेतकऱ्यांचे शाश्वत विजेचे स्वप्न पूर्णत्वास येणार आहे.

उद्योग-व्यवसायाला वीज जेवढी आवश्यक आहे; तेवढीच किंबहुना त्यापेक्षा अधिक शेतीसाठीही आहे. त्यासाठीच बळीराजाला दिलासा देणारी मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजना सुरू करण्यात आली आहे. विजेअभावी सिंचनापासून वंचित असलेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना ही योजना फायद्याची ठरणार असून, त्यातून शिवार फुलवण्याचे शेतकऱ्यांचे स्वप्न साकारणार आहे.

* पार्श्वभूमी

महाराष्ट्रातील कृषिपंप ग्राहकांना वीजपुरवठा करण्यासाठी 63 केव्हीए/100 केव्हीए क्षमतेचे विद्युत रोहित्रे उभारण्यात येतात व त्या रोहित्रावरील लघुदाब वाहिनीद्वारे कृषिपंपांना वीजपुरवठा करण्यात येतो.  लघुदाब वाहिनीची लांबी वाढल्याने कमी दाबाने वीजपुरवठा होणे, विद्युतपुरवठ्यामध्ये वारंवार बिघाड होऊन वीजपुरवठा खंडित होणे, तांत्रिक वीजहानी वाढणे, रोहित्र बिघाड होण्याच्या प्रमाणात वाढ, विद्युत अपघात, विद्युत चोरी या सारख्या समस्यांमुळे अखंडित व शाश्वत वीजपुरवठा करण्याचे उद्दिष्ट साध्य होण्यास अडचणी निर्माण होतात. याशिवाय जेथे विजेचे जाळे उपलब्ध नाही तेथे डिझेल इंधनाचा वापर करूनही कृषिपंप चालविले जातात. याला पर्याय म्हणून मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजना सुरू करण्यात आली आहे.

* योजनेचे स्वरूप

ज्या शेतकऱ्यांकडे शाश्वत जलस्रोत आहे व ज्या शेतकऱ्यांकडे शेतीच्या सिंचनाकरिता पारंपरिक पद्धतीने वीजपुरवठा उपलब्ध नाही, विद्युतीकरणासाठी वन विभागाचे ना-हरकत प्रमाणपत्र मिळत नसलेले शेतकरी, अतिदुर्गम भागातील शेतकरी, महाराष्ट्र शासनाच्या धडक सिंचन योजनेअंतर्गत लाभ घेतलेले शेतकरी अशा शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्याकडे 5 एकर किंवा त्यापेक्षा कमी शेती आहे अशा शेतकऱ्यांना 3 अश्वशक्ती तर ज्यांच्याकडे 5 एकरपेक्षा जास्त शेती आहे, अशा शेतकऱ्यांना 3 अश्वशक्ती क्षमतेचे पंप देण्यात येणार आहेत. सदर योजनेमध्ये भाग घेण्यासाठी सर्वसाधारण गटाच्या लाभार्थ्याकडून पंपाच्या आधारभूत किंमतीच्या 10 टक्के रक्कम व अनुसूचित जाती, जमातीच्या लाभार्थ्याकडून पंपाच्या आधारभूत किंमतीच्या 5 टक्के रक्कम भरावी लागणार आहे. जे शेतकरी पारंपरिक वीजपुरवठ्याकरिता कृषिपंपासाठी पैशाचा भरणा करून प्रलंबित आहेत. अशा शेतकऱ्यांची रक्कम यामध्ये समायोजित करण्यात येईल व उर्वरित फरकाची रक्कम लाभार्थ्यांना भरायची आहे. सर्वसाधारण गटाच्या लाभार्थ्यांकरिता 3 अश्वशक्ती पंपासाठी 25 हजार 500 रुपये तर 5 अश्वशक्ती पंपासाठी 38 हजार 500 रुपये एवढी रक्कम भरायची आहे. अनुसूचित जाती, जमातीकरिता 3 अश्वशक्ती पंपासाठी 12 हजार 750 रुपये तर 5 अश्वशक्ती पंपासाठी 19 हजार 250 रुपये एवढी रक्कम भरावी लागणार आहे.

* अर्ज करण्याची पद्धत व आवश्यक कागदपत्रे

या योजनेअंतर्गत नवीन सौर कृषिपंप मिळण्यासाठी महावितरणतर्फे www.mahadiscom.in/solar हे स्वतंत्र वेब पोर्टल सुरू करण्यात आले आहे. या पोर्टलवर अर्जदाराने ए-1 अर्ज ऑनलाइन भरायचा आहे. सदर अर्ज अगदी साधा व सोपा असून अर्जासोबतची आवश्यक कागदपत्रे सहज अपलोड करता येतात. शेतकऱ्यांकडे असलेल्या शेताचा सातबारा उताऱ्याची सत्यप्रत, आधार कार्डची सत्यप्रत, जातीचे प्रमाणपत्र (केवळ अनुसूचित जाती/जमाती लाभार्थ्यांसाठी) ही कागदपत्रे आवश्यक आहेत. अर्जदार स्वतः शेतजमिनीचा मालक नसेल तर इतर हिस्सेदार, मालकांचा ना-हरकत दाखला देणे बंधनकारक आहे. तसेच पाण्याचा स्रोत डार्क झोनमध्ये असल्यास भूजल सर्वेक्षण विभागातर्फे ना-हरकत प्रमाणपत्र देणे बंधनकारक आहे. संपर्कासाठी ग्राहकाचा मोबाईल क्रमांक, ई-मेल, पाण्याचा स्रोत व त्याच्या खोलीची माहिती अर्जामध्ये भरणे आवश्यक आहे. अर्जदाराने ऑनलाइन अर्ज सादर करताच व अर्जाची सद्य:स्थिती विविध टप्प्यांची माहिती अर्जदारास त्याच्या मोबाईल क्रमांकावर एसएमएसद्वारे कळविण्यात येईल.

* सौर कृषिपंपाचे फायदे

सौर कृषिपंप मिळवण्यासाठी प्रतीक्षा काळ नाही. सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर शेतकऱ्यांना लवकरात लवकर पंप मिळणार आहे. सौरपंपामुळे दिवसा सिंचन शक्य होणार आहे. वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे, कमी विजेच्या दाबामुळे किंवा सिंगल फेजमुळे सिंचनावर कोणताही परिणाम होणार नाही. विजेचा किंवा डिझेलचा वापर नसल्यामुळे वीजबिलाचा किंवा डिझेलचा खर्च नाही. कमीत कमी देखभालीची गरज आहे. विजेची तार तूटून किंवा पोल पडून विद्युत अपघाताचा धोका नाही. एकूणच सौर कृषिपंप हा शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारा पर्याय आहे. सौर कृषिपंप 25 वर्षे सेवा देऊ शकतो. सदर सौर कृषिपंपाची देखभाल व दुरुस्तीचा कालावधी पाच वर्ष तर सौर पॅनलचा कालावधी दहा वर्षाचा राहणार आहे. या कालावधीत सौर कृषिपंप नादुरुस्त झाल्यास दुरुस्ती व देखभालीसाठी निश्चित केलेल्या कालावधीत विनामूल्य दुरुस्ती करण्याची जबाबदारी एजन्सीची राहणार आहे. तसेच सौर कृषिपंपाचा 5 वर्षासाठी पंप आस्थापित करणाऱ्या एजन्सीद्वारे विमा उतरवण्यात आलेला आहे. त्यामुळे सौर कृषिपंपाच्या साहित्याची चोरी झाल्यास किंवा नुकसान झाल्यास लाभार्थी विमा कंपनीकडून नुकसानभरपाईसाठी पात्र ठरेल.

एखाद्या अर्जदार शेतकऱ्यास ऑनलाईन अर्ज करण्यास अडचण निर्माण झाल्यास महावितरणच्या तालुकास्तरावरील उपविभागीय कार्यालयाशी संपर्क साधता येईल. अर्जदार शेतकऱ्यांच्या सुविधेसाठी महावितरणद्वारे निशुल्क मदत करण्यात येईल. याशिवाय महावितरणच्या मध्यवर्ती ग्राहक सुविधा केंद्राशी संपर्क साधावा. यासाठी टोल फ्री क्रमांक 1800-102-3435 / 1800-233-3435 तसेच 1912 या क्रमांकावर संपर्क साधावा.

– ज्ञानेश्वर आर्दड,

जनसंपर्क अधिकारी,

महावितरण, औरंगाबाद

Agriculture Pump, Electricity, Environment, Farmer, maharashtra, Solar, Solar Energy, Solar Pump

लेखकाचे नाव :
ज्ञानेश्वर आर्दड
लेखकाचा ई-मेल :
vdnyan@gmail.com
Avatar
About Guest Author 522 Articles
मराठीसृष्टीवर ज्या लेखकांनी स्वत:चे अकाऊंट बनवले नाही त्यांचे लेख या Guest Author द्वारे प्रकाशित होतात. आपले सर्व लेख एकत्रितपणे मिळवण्यासाठी स्वत:चे अकाउंट मराठीसृष्टीवर जरुर बनवा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..