नवीन लेखन...

गुणी मेहनती – धनश्री काडगावकर

आजचं नवं नाव… धनश्री काडगावकर. केवळ अभिनयातच नव्हे तर फोटोशूटही तितक्याच मेहनतीने आणि प्रामाणिकपणे करण्यात तिची कामाशी समर्पित वृत्ती दिसून येते..

बघताच क्षणी फ्रेश लूक वाटावा, कोणतेही भाव लीलया व्यक्त करणारा बोलका चेहरा असावा आणि जिच्या चेहऱयावर कोणताही प्रयोग केला तर तो हमखास यशस्वी ठरेल इतका फोटोजेनिक असावा अशा चेहऱयाची मॉडेल फोटोग्राफरसाठी पर्वणीच ठरते. धनश्री काडगावकर हे याचे उत्तम उदाहरण. धनश्रीचा चेहरा बोलका आहे, कोणतेही दडपण झुगारून तो व्यक्त होतो आणि म्हणूनच धनश्रीचे फोटो उत्तम येतात, हे मी ठामपणे सांगू शकेन. धनश्री काडगावकर हे अल्पावधीतच नावारूपाला आलेलं मराठी इंडस्ट्रीतलं खणखणीत नाव.

शूटसाठी कॉस्च्यूम, मेकअप, हेअर काय असेल आणि फोटोचे रेफरन्स धनश्रीला आधीच माहीत होते. त्यामुळे शूटच्या वेळी काही तासांतच धनश्री तयार झाली. पारंपरिक वेशभूषा, त्यावर मराठमोळा साजशृंगार, कलाकुसरीने सजलेले दागिने आणि धनश्रीचा मोहक चेहरा हे सारं मी कॅमेराबद्ध करत होतो. शूटची गरज असलेले फोटो मी आधी टिपले. नंतर त्याच कॉस्च्यूममध्ये फुल लेंग्थ, हेडशॉटस् असे काही फोटो घेतले, तर नंतर ड्रमॅटिक लाइटिंग करून काही फोटो टिपण्याचा प्रयत्न केला. प्रत्येक वेळी धनश्रीचा लोभस चेहरा मला टिपता आला. हे ठरलेलं शूट संपवायला आम्हाला साधारणपणे तीन – साडेतीन तास गेले. आमचं पॅकअप होणार तितक्यात मी धनश्रीला पारंपरिक वेषभूषेतल्या शूटपेक्षा निराळं शूट करण्याची कल्पना बोलून दाखवली.

धनश्रीचा चेहरा मॉडर्न लूकमध्ये अधिक चांगला दिसेल असं मला सारखं वाटत होत. धनश्री खरं तर थकली होती. पुढे मेकओव्हर करावा लागणार होता. मेकअप, हेअर हे सारं पुन्हा वेगळ्या धाटणीचं करावं लागणार होतं. तशी त्या शूटची गरज होती. आधीच्या शूटच्या थकव्यामुळे तिचा चेहरा या शूटसाठी तयार नव्हता. आपण पुन्हा नंतर कधीतरी शूट करू असं ती एक-दोनदा बोललीही. मात्र तिच्याही डोक्यात विचारांची चलबिचल सुरू असल्याचं मला लक्षात आलं. म्हणून मी सेटवरच्या लाईट्स, कॅमेरा न काढता ते तसंच ठेवायला सांगितलं. धनश्रीचा विचार काही क्षणांतच बदलला आणि आम्ही ब्रेक घेऊन पुढच्या शूटच्या तयारीसाठी लागलो.

या नव्या मेकओव्हरची गरज वेगळी होती. धनश्रीचा लूक मॉडर्न होता. आधी धनश्री पारंपरिक वेशभूषेत…साडीत होती, तर आता ती लॉन्ग गाऊनमधे, ग्लॅमरस लूकमधून समोर येणार होती. मेकअप, हेअर अगदी वेगळंच होतं. या सगळ्याला न्याय देता यावा अशी लाइटिंगची, फोटोशूटची माझ्यावर जबाबदारी होती. धनश्री तासाभरात मेकअपरूममधून बाहेर आली अन् तिचं रूपडं पाहण्याजोगंच होतं. धनश्रीचा पेहराव, हेअर आणि मेकअप यातून ती मराठमोळी प्रियांका चोप्रा वाटावी अशीच समोर आली होती. इतका तिचा चेहरा प्रियांका चोप्राशी मिळता जुळता वाटत होता.

आम्ही शूटला सुरुवात केली. धनश्रीच्या चेहऱयावर स्मितहास्य होतं. जणू काही हे पहिलंच शूट असावं. आधीच्या शूटचा थकवा नाही, चेहऱयावर दमलेले भाव नाहीत, किंबहुना त्याचा मागमूसही नाही. हसऱया चेहऱयाची धनश्री इथे मला टिपता आली, तर नंतर मादक चेहरा, स्वाभिमानी, गंभीर चेहऱयाची असे वेगळे हावभाव असलेली धनश्री मला टिपता आली. चेहऱयावर वेगळे भाव काही सेकंदांचा वेळ न दडवता धनश्रीला व्यक्त करता येत होते. धनश्री इथेच वेगळी आहे. कॅमेरा फ्रेंडली आणि फोटोजेनिकही.

प्रत्येक शूटचं लाइटिंग वेगळं होतं. तशी त्याची गरजही होती. एका फोटोशूटच्या वेळी नेमके किती लाईट्स लागतात? तर कितीही! म्हणजे अगदी एका लाईटपासून सात ते आठ. फोटोशूट करताना चेहऱयावर टाकण्यासाठी सगळ्यात आधी प्रकाशाचा स्रोत म्हणजेच लाईट ठरतो. मॉडेल मेकअप करत असताना मिळालेल्या वेळेत बाहेर स्टुडिओत या सगळ्याची तयारी करणं सोपं जातं. म्हणजे मॉडेलला विनाकारण यासाठी थांबावं लागत नाही. फोटोग्राफरसोबत उत्तम सहायक टीम असेल तर त्याची व्यवस्था लावणं हे स्टुडिओत सहज शक्य होतं. आम्ही धनश्रीचं हे मॉडर्न लूकमधलं शूट आयत्यावेळी ठरवलं होतं, परंतु शूटची कल्पना डोक्यात इतकी भिनली होती आणि तगडी सहायक टीम असल्याने हे शूट काही तासांतच आम्हाला संपवता आलं.

धनश्रीचा चेहरा नेमका कशात जास्त चांगला दिसतो? पारंपरिक वेशभूषेत की मॉडर्न लूकमध्ये याचं उत्तर आजही देणं तसं कठीण आहे. धनश्रीचा चेहरा दोन्हीला समान न्याय देणारा आहे. फोटो कितीही वेळा जरी पाहिले तरी एकदा वाटतं पारंपरिक वेशभूषेत धनश्री अधिक खुलते. मात्र मग मॉडर्न लूक पाहिला की, इथे ती अधिक भावते. जेव्हा जेव्हा या फोटोंचा उल्लेख होतो तेव्हा तेव्हा हे चक्र असंच सुरू होतं आणि नेमकं उत्तर देणं कठीण जातं. धनश्रीचा चेहरा बोलका आहेच. मात्र तिचा स्वभाव परिस्थितीला जुळवून घेणारा, मदतशीर आणि म्हणूनच धनश्रीसोबत फोटोशूट करणं हा नेहमीच अविस्मरणीय अनुभव ठरतो.

धनेश पाटील
dhanuimages@gmail.com

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..