नवीन लेखन...

ठाणे शहराच्या सांस्कृतिक चळवळीतील माझे योगदान

ठाणे रंगयात्रा २०१६ मधील कुमार सोहोनी यांचा लेख.


मी, नरेन्द्रकुमार नरहर सोहोनी म्हणजेच कुमार सोहोनी. माझा जन्म (31-03-1955) ठाण्यातच झाला. माझे शालेय शिक्षण बालविकास मंदिर, ठाणे आणि मो. ह. विद्यालय, ठाणे येथे झाले. महाविद्यालयीन शिक्षण ठाणा कॉलेज ऑफ कॉमर्स येथे झाले. माझी पत्नी सौ. श्रद्धा ही ठाण्यातलीच (पूर्वाश्रमीची उज्ज्वला टकले) आणि आमचा विवाहही ठाण्यातल्या सीकेपी हॉलमध्ये झाला. माझ्या रंगमंचीय कारकीर्दीची सुरुवात 1961-62 साली ठाण्याच्या राष्ट्र सेवादल कला पथकातूनच झाली आणि मी 51 नाटके दिग्दर्शित केल्याप्रीत्यर्थ मी दिग्दर्शित केलेल्या सहा नाटकांचा ‘कुसो महोत्सव’ गतवर्षी 25 ते 31 मार्च 2015 मध्ये गडकरी रंगायतन येथेच झाला. थोडक्यात सध्या जरी मी मुलुंडला राहत असलो तरी 100 टक्के ठाणेकरच आहे.

रंगभूमीवर मी पहिलं पाऊल वयाच्या सहाव्या वर्षी टाकलं. नक्की दिवस आठवत नाही, पण 1961-62 मध्ये गाण्यांच्या निमित्ताने रंगभूमीशी माझी ओळख झाली.

त्या काळात आजच्या सारखी इतर माध्यमे उपलब्ध नव्हती. दूरदर्शन तर अस्तित्वातच नव्हते आणि ‘सिनेमा’ तोसुद्धा सिंगल क्रीन रूपात पाहिला जायचा. अशोक आणि प्रभात अशी दोनच सिनेमाची थिएटर अस्तित्वात होती आणि तीही एअरकंडिशन नसलेली. 1979पर्यंत गडकरी रंगायतन हे नाट्यगृहही अस्तित्वात नव्हते. नाटके सादर केली जायची ती मो. ह. विद्यालय, न्यू इंग्लिश स्कूल आणि बेडेकर विद्यामंदिर या शाळांच्या बांधलेल्या (ओपन एअर थिएटर) खुल्या रंगमंचावर. इथे व्यावसायिक नाटके सादर व्हायची तीदेखील रात्रीचीच. मुंबईत छबिलदास चळवळ चालू होती. त्याचप्रमाणे मराठी ग्रंथ संग्रहालय ठाणे, मावळी मंडळ ठाणे, आर्य क्रीडा मंडळ ठाणे येथे प्रायोगिक रंगमंचाची चळवळ हळूहळू तग धरू लागली होती. पण सांस्कृतिक कार्यक्रम प्रामुख्याने कलापथकांद्वारे सादर केले जायचे. ज्यात समरगीते, लोकगीते, लोकनृत्य यांचा भरणा असायचा.

माझी आई सौ. शोभना नरहर सोहोनी आणि वडील श्री. नरहर त्रिंबक सोहोनी हे राष्ट्र सेवादलाच्या कलापथकातून कामे करीत असत. मुख्य शाखेत लीलाधर हेगडे, वसंत बापट, निळू फुले, राम नगरकर असे लोक होते. तर ठाण्याच्या कलापथकात मनोहर साटम, प्रभाकर साठे, आत्माराम चिखले, माझी आई कामे करत असत. त्यात प्रामुख्याने समरगीते, लोकगीते आणि नंतर लोकनाट्य असा तीन-साडेतीन तासांचा मनोरंजनाचा कार्यक्रम असे. माझी आई दोन्ही कलापथकांतून काम करायची. मलाही गाण्याची आवड असल्याने मी तिच्याबरोबर जाऊ लागलो. आई संगीत विशारद होती. तिने मला ठाण्याच्या गांधर्व विद्यालयात गाणे शिकायला पाचव्या वर्षीच पाठवले होते. गवयाचे पोर सुरातच गायचे या उक्तीनुसार मला उपजतच संगीताचा कान आणि गळा लाभला होता. मी छोटा शाहीर म्हणून समरगीते, लोकगीते गाऊ लागलो आणि रंगमंचावर पहिले पाऊल 1961-62 साली टाकले. आज 53 वर्षे मी रंगमंचावर गायक, नट, दिग्दर्शक, नेपथ्यकार, निर्माता, प्रकाशयोजनाकार म्हणून काम करतो आहे.

1961-62 साली चिनी आक्रमण झाल्यावर जनजागृतीसाठी ‘चिनी आक्रमणाचा फार्स’ हा कार्यक्रम कलापथकाद्वारे सादर केला जाई. त्यात मी भाग घेऊ लागलो. ‘धनगर राजा वसाड गावाचा’ हे लोकगीत मी रंगमंचावर गायचो आणि पाच-सहा वर्षांचा चिमुरडा तालासुरात आणि अभिनय करत गातोय याचे त्या काळात प्रेक्षकांना खूप अप्रूप वाटायचे. माझी लोकगीते खूपच लोकप्रिय झाली आणि ‘कलापथकातला छोटा शाहीर’ अशी माझी ख्याती झाली. राष्ट्र सेवादलाच्या ठाणे कलापथकातून भाग घेऊ लागलो. गाण्यांबरोबरच शाहीर दादा कोंडके लिखित ‘मुंबईची लावणी’, व्यंकटेश माडगुळकर लिखित ‘कुणाचा कुणाला मेळ नाही’, ‘बिनबियांचे झाड’, पु. ल. देशपांडे लिखित ‘पुढारी पाहिजे’ अशी वगनाट्ये सादर होऊ लागली. त्यामध्ये मी भाग घेऊ लागलो. राष्ट्र सेवादलाच्या कलापथकाबरोबरच माझी आई नाटकांतून कामे करीत असे. श्याम फडके लिखित ‘तीन चोक तेरा’, ‘काका किशाचा’ या नाटकातून आई अभिनय करीत होती. ठाण्यातल्याच हौशी लोकांनी व्यावसायिक रंगमंचावर ‘तीन चोक तेरा’ सादर केले, ज्यात विठ्ठल पणदूरकर, ठाण्यातलेच प्रभाकर केळुसकर, बाळ परांजपे, कमलाकर टाकळकर, विनोद दिवेकर, माझी आई असे कलाकर होते. सुप्रसिद्ध अभिनेते मुकुंद कोठारे यांनी ते नाटक बसवले होते. नंतर आईने ‘काका किशाचा’चे व्यावसायिक प्रयोगही केले. त्या काळात हौशी नाट्यसंस्था, मुंबईच्या वा इतर नामवंत दिग्दर्शकांना बोलावून नाटके बसवीत असत आणि त्याचे प्रयोग प्रामुख्याने गणपती उत्सव, नवरात्रोत्सव, गॅदरिंग अशा काळात करीत असत. ठाण्यातल्या अनेक संस्था अशी नाटके करीत असत. नाट्यमन्वंतर, मित्रसहयोग, नाट्याभिमानी, मावळी मंडळ ठाणे अशा संस्थांनी अनेक जुनी-गाजलेली नाटके ठाणेकर अभिनेत्यांना घेऊन केलेली मी पाहिलेली आहेत. कमलाकर सारंगांनी मावळी मंडळ ठाणे संस्थेचे ‘श्रीमंत’ नाटक बसवले होते, ज्याचे 50-60 प्रयोग त्यावेळी झालेले मला आठवताहेत. अशोक साठे यांनी ‘वेगळं व्हायचंय् मला’, ‘घराबाहेर’ अशी नाटके बसवली, ज्याचे गणेशोत्सवात प्रयोग केले आणि तिकीट लावूनही प्रयोग केले. या प्रयोगातून मिळणाऱ्या पैशांवरच ही सर्व मंडळी राज्य नाट्यस्पर्धेत नाटके सादर करीत असत. दिवसभर नोकरी वा व्यवसाय करून रात्री तालीम करायच्या आणि स्पर्धेत नाव कमवून व्यावसायिक नाटकात स्थिरस्थावर व्हायचे अशी प्रथाच त्यावेळच्या रंगकर्मीची होती. विनोद दिवेकर, गणा प्रधान, कमलाकर टाकळकर, राम मुंगी, शशी जोशी, श्रीराम देव, अरुण वैद्य, विजया वैद्य, मंजिरी देव, रजन ताम्हाणे, सुरेश ताम्हाणे, कुंदा गुप्ते, वैजयंती चिटणीस, माधुरी भागवत असे अगणित ठाण्यातले कलाकार रंगभूमीवर अवतरले, स्थिरावले आणि प्रसिद्धही झाले. यांना मार्गदर्शन करणारेही अनेक थोर त्या काळात ठाण्यात कार्यरत होते. श्याम फडके, प्रा. श्रीहरी जोशी, शशिकांत कोनकर यांसारखे लेखक ठाण्यातलेच. अशोक साठे, यशवंत पालवणकर, भालचंद्र रणदिवे, केशवराव मोरे, शशी जोशी यांनी अनेक कलाकार घडवले आणि प्रकाशात आणले. शिवाय व्यावसायिक नाटक, सिनेमात नावारूपास आलेले रवी पटवर्धन, सुहास जोशी, रवींद्र दिवेकर, माधव आचवल, मामा पेंडसे, कमलाकर टाकळकर यांचे वास्तव्य ठाण्यातच असल्याने ते ‘ठाणेकर’च आहेत.

याच सुमारास मी एस्.एस्.सी. झालो आणि ठाणा कॉलेजमध्ये कॉमर्सचे पदवी शिक्षण घेत असताना सोबतच्या मित्रांनी activity करायचे ठरवले. त्या काळात महाराष्ट्र स्पर्धा ही प्रमुख activity होती. आम्ही राहत असलेल्या चेंदणी भागातील मी स्वत, संजय दीक्षित, सुभाष मालेगावकर, उज्ज्वला टकले, अभय भोकरी असे तरुण मित्र एकत्र जमलो आणि नाट्यसंस्था स्थापन करायचे ठरवले. स्पर्धेत भाग घेण्यासाठी पैसे गोळा करायला हवेत म्हणून शाहीर दादा कोंडके यांचा ‘मुंबईची लावणी’ हा कार्यक्रम करायचा असे ठरले. प्रथम काही गीते व नंतर ‘मुंबईची लावणी’ असा दीड तासाचा कार्यक्रम. त्यातल्या त्यात मीच अनुभवी; शिवाय गायकही असल्याने अभिनय, गायन, दिग्दर्शन अशी जबाबदारी स्वीकारून कार्यक्रम बसवला आणि त्याचा जाहीर कार्यक्रमही मिळाला. ठाणे-मुलुंड नाक्यावर असलेल्या मॉडेला वुलन मिल्स येथील सत्यनारायणाच्या पूजेच्या निमित्ताने 4 मे 1973 रोजी ‘मुंबईची लावणी’ हा कार्यक्रम सादर झाला. दिग्दर्शक म्हणून मी माझे पहिले पाऊल टाकले आणि त्याच रात्री कार्यक्रम संपल्यावर वसंत बापट (कवी वसंत बापट नव्हे… शिक्षक वसंत बापट, जे न्यू इंग्लिश स्कूलचे शिक्षक होते आणि नंतर शिक्षक आमदार झाले) यांच्या अध्यक्षतेखाली ‘कलासरगम’ या नाट्यसंस्थेची स्थापना झाली.

ठाण्याच्या सांस्कृतिक चळवळीत महत्त्वाची भूमिका बजावणारी संस्था ‘कलासरगम’ ठाणे या संस्थेतून पुढे अनेक कलाकार तंत्रज्ञ पुढे आले, नावाजले. ज्यामध्ये विजय जोशी (आत्ताचे प्राचार्य विजय जोशी), दिलीप पातकर, नरेंद्र बेडेकर, उदय सबनीस, आमदार संजय केळकर, सुषमा देशपांडे, वासंती वर्तक, संपदा कुलकर्णी, प्रा. अशोक बागवे, साधना सोहोनी अशी अनेक मंडळी नावारूपास आली. त्यापैकी काही तर रंगभूमी, दूरदर्शनवर घट्ट पाय रोवून आहेत. याच सुमारास कल्याणमधून अभिवादन-कल्याण येथे अरविंद केळकर, रवींद्र लाखे तर मुलुंडमधून प्रदीप दळवी, नितीन बगवाडकर, नितीन केणी Zee Talkies चे स्पर्धा करीत होते. त्याचवेळी 1975 सालात एक जाहिरात आली ’scholarships to the young workers in different Cultural fields.’ ही केंद्र सरकारची जाहिरात 15 ऑगस्ट 1975 ला आली. मी नाटक विभागात नाट्यविषयक शिष्यवृत्तीसाठी अर्ज केला. अर्जासोबत स्पर्धकाला ओळखणाऱ्या त्या क्षेत्रातील दोन व्यक्तींची Referee म्हणून नावे द्यायची होती. इथे पुन्हा ‘ठाणेकर’ मदतीला धावून आले. सुप्रसिद्ध लेखक ‘श्याम फडके आणि नटवर्य मामा पेंडसे.’ श्याम फडके यांच्या ‘एक होतं भांडणपूर’ या बालनाट्यात मी अभिनय केला होता. शिवाय कलापथकातील माझी कामे त्यांनी पाहिली होती. तसंच मामा पेंडसे यांनी माझी एकांकिका व नाटकातली कामे पाहिली होती.

दोघांनीही माझ्याबद्दलची माहिती गुप्तपणे केंद्र सरकारला पाठवली. काही हजार अर्जांमधून 250 जणांना अंतिम निवडीसाठी दिल्लीच्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा येथे मुलाखतीसाठी बोलावण्यात आले. त्यातून फक्त दोघांनाच शिष्यवृत्ती मिळणार होती. त्या अडीचशे जणात मी होतो. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा या संस्थेतून शिक्षण घेतलेल्या सुहास जोशी या ठाण्यात राहायला आल्या होत्या. अनेक व्यावसायिक नाटकातून अभिनय करून नावारूपास आलेल्या सुहास जोशींना मी भेटलो. आमच्या संस्थेच्या एकांकिका, नाटके त्यांनी पाहिली असल्याने माझी त्यांची गट्टी जमली होती. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा, इब्राहिम अल्काझी याबाबत मला फारच कमी माहिती होती. सुहासने ती माहिती दिली. एवढ्या स्पर्धकांमधून आपला कसा निभाव लागणार ही भीती होती. पण संधी मिळाली तर प्रशिक्षण घ्यायचे आणि याच क्षेत्रात नाव कमवायचे असा निर्धार केला आणि पूर्ण तयारीनिशी दिल्लीला गेलो. 31 मार्च 1976 रोजी माझा इंटरव्ह्यू होता. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा, नवी दिल्ली येथे मी गेलो आणि कमलाकर सोनटक्के, एम. के. रैना, बी. व्ही. कारंथ, दीना पाठक आणि इब्राहिम अल्काझी यांनी माझा इंटरव्ह्यू घेतला. तब्बल 50 मिनिटे इंटरव्ह्यू झाला आणि सिडकोमधे सिव्हिल ड्राफ्ट्समनची नोकरी करणारा मी, बी.कॉम.ची परीक्षा आणि इंटरव्ह्यू एकाचवेळी पास झालो. निरंजन गोस्वामी याला प्रथम क्रमांक आणि मला दुसरा क्रमांक मिळाला. निरंजन गोस्वामीने ही शिष्यवृत्ती पॅन्टो माइमसाठी कोलकात्यात घेतली. मी मात्र नॅशनल स्कूल ऑफ ड्रामासाठी घेतली. तीन वर्षांसाठी रुपये 350 प्रति महिना – NSD च्या स्वत:च्या  Scholarships असतात, पण केंद्रीय शिष्यवृत्ती मिळवून तिथे जाणारा मी एकमेव होतो. या शिक्षणासाठी मामा पेंडसे, श्याम फडके आणि सुहास जोशी असे तिघे ठाणेकरच मदतीला धावून आले.

मी तीन वर्षाचा अभ्यासक्रम यशस्वीरीत्या पूर्ण केला आणि मुंबईत आलो. 1979 साली ठाण्यातून आम्ही मुलुंडला शिफ्ट झालो. यादरम्यान ठाण्यात नाट्यचळवळ खूपच बहरली होती. आता मला व्यावसायिक नाटकांचे वेध लागले होते. कलावैभवच्या मोहन तोंडवळकरांकडे गेलो. सांगितले, मी NSD चा कोर्स यशस्वीरीत्या पूर्ण केला आहे. पण त्यांनी ‘इथे काय ते करून दाखवा, मग बघू’  असे सांगितले. त्यानंतर कुणाकडेही काम मागायचे नाही असा ‘पण’ केला जो आजतागायत पाळला आहे.

मुलुंडला आल्याने ‘संस्था-मुलुंड ही संस्था सुरू केली. ‘कलासरगम’मधून विजय जोशी, दिलीप पातकर, अशोक साठे, विलास कणेकर असे दिग्दर्शक यशस्वीरीत्या नाटके दिग्दर्शित करीत होते. त्यांना बाजूला सारून स्वत नाटक करणे मला स्वतला पटले नाही आणि एका म्यानात किती तलवारी ठेवायच्या असा विचार करून राज्य नाट्यस्पर्धेच्या अंतिम फेरीचा गड सर करायची तयारी सुरू केली. आजवर 1979पर्यंत अशोक साठे यांनी अनेक उत्तम नाटके सादर केली, जी ठाणे केंद्रातून अंतिम फेरीत गेली. पण अंतिम फेरीत प्रथम क्रमांक मिळवू शकली नाहीत. पैकी ‘सापळा’, ‘आसक्ती कसली मजला’, ‘चक्रावर्त’, ‘अंधारयात्रा’ ही नाटके तर दर्जेदार होती. विजय जोशीने ‘अश्वमुद्रा’, ‘विठ्ठला’, ‘असायलम’ सारखी उत्तम नाटके केली. अरविंद केळकरने ‘अनुष्ठान’ नाटक केले. विलास कणेकरने ‘लहरोंका राजहंस’ केले, पण अंतिम फेरीत प्रथम क्रमांक मिळवण्याचे भाग्य कुणालाच प्राप्त झाले नाही. NSD तून आल्यानंतर ‘अरूपाचे रूप’ (1980), ‘आषाढातील एक दिवस’ (1981), ‘अश्मपुष्प’ (1984), ‘मा अस् साबरीन’, ‘राजा ईडिपस’ (1983), ‘अथं मनुस जगन हं’ (1984) अशी नाटके केली. ‘अथं मनुस जगन हं’ या नाटकाला अंतिम फेरीत प्रथम क्रमांक मिळाला. त्यावर्षी निर्मिती, लेखन, दिग्दर्शन, नेपथ्य, प्रकाशयोजना, अभिनयाची दोन पारितोषिके, नाट्यदर्पणचे दोन पुरस्कार, नाट्य परिषदेचे तीन पुरस्कार आणि इतर अशी 22 पारितोषिक प्राप्त झाली आणि 24 व्या नाट्यस्पर्धेत ठाणे केंद्राचे नाव यशस्वीरीत्या झळकावण्याचा बहुमान मला प्राप्त झाला.

मी दिल्लीला असतानाही ठाण्यातली चळवळ अजिबात थंडावली नव्हती. 1976-77-78 या तीनही वर्षी ‘उन्मेष’ आणि ‘आयएनटी’ या आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेत ठाण्याच्या बी. एन. बांदोडकर महाविद्यालयाने बाजी मारली होती. 76 साली ‘अॅश इज बर्निंग’, 77 साली ‘सुनिला पारनामे शाळेत चालली होती’ या एकांकिका उन्मेष, आयएनटी स्पर्धेत प्रथम क्रमांकाची पारितोषिक प्राप्त एकांकिका ठरल्या. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरली ठाण्याचीच उज्ज्वला टकले. (इथेही दुरून माझा सहभाग आहे, कारण उज्ज्वला टकले ही माझी पत्नी आहे.) 79 साली मी दिग्दर्शित केलेल्या ‘तमासगीर’ एकांकिकेला आणि उज्ज्वला टकले यांना स्पर्धांमधून पारितोषिके मिळाली. मी दिल्लीत असताना विजय जोशीने समर्थपणे ‘कलासरगम’ संस्था ठाण्यात भरभराटीस आणली. ठाण्याच्या सांस्कृतिक चळवळीत महत्त्वाचे स्थान कलासरगमने प्राप्त केले.

‘अथं मनुस जगन हं’ हे नाटक माझ्या करिअरमधला टर्निंग पॉइंट ठरला. नाटकावर पारितोषिकांची बरसात तर झालीच, पण नाटकाच्या नाट्यावलोकनावर खूश होऊन डॉ. श्रीराम लागू माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. नुसता आशीर्वादच नाही तर 25 पात्र असलेले नाटक सादर करण्यासाठी आर्थिक मदत केली. ठाण्यातले 25 हौशी कलाकार व्यावसायिक रंगभूमीवर वावरू लागले. डॉ. श्रीराम लागू सादर करीत आहेत, ‘अथं मनुस जगन हं’… या शीर्षकामुळे विजय तेंडुलकर, वि. वा. शिरवाडकर, वसंत कानेटकर, पु. ल. देशपांडे, डॉ. जब्बार पटेल, डॉ. काशिनाथ घाणेकर, प्रभाकर पणशीकर अशा अनेक मान्यवरांनी ‘अथं मनुस…’ पाहिले आणि कुमार सोहोनी हे नाव एक दिग्दर्शक म्हणून चर्चिले जाऊ लागले. मग तर अनेक उत्तम नाटके माझ्याकडे आपणहून चालत आली. ‘अग्निपंख’ – डॉ. श्रीराम लागू, सुहास जोशी, स्वाती चिटणीस अभिनीत नाटकाने सुरुवात झाली. मग भक्ती बर्वे – सतीश पुळेकर यांचे ‘रातराणी’, दिलीप प्रभावळकर, अश्विनी भावे, अरुण नलावडे अभिनीत ‘वासूची सासू’, निळू फुले, मधु कांबीकर, सुनीला प्रधान यांचे ‘जंगली कबुतर’, शिवाय सतीश पुळेकर, सुहास पळशीकर, निशिगंधा वाड, जयवंत वाडकर यांचा अभिनय असलेल्या ‘कुणीतरी आहे तिथं’ या रहस्यप्रधान थ्रीलरने तर मराठी रंगभूमीवर आलेली बुकिंगची मरगळ दूर झाली. मोहन जोशी, स्मिता तळवळकर, सविता प्रभुणे यांचे ‘देखणी बायको दुसऱ्याची’, डॉ. श्रीराम लागू – मंगेश कुलकर्णी यांचे ‘डॉ. हुद्दार’ आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सामाजिक कृतज्ञता निधीसाठी केलेले 35 प्रयोगाचे ‘लग्नाची बेडी’ (1987) हा माझ्या त्या काळातला नाट्यकळस होता. डॉ. श्रीराम लागू , सुहास जोशी, निळू फुले, रोहिणी हट्टंगडी, सुधीर जोशी, भारती आचरेकर, सदाशिव अमरापूरकर आणि तनुजा अशी अभिनेत्यांचा संच असलेल्या नाटकाचा दिग्दर्शक, नेपथ्यकार, प्रकाशयोजनाकार आणि अभिनेता मी कुमार सोहोनी होतो.

यानंतर डॉ. श्रीराम लागूंच्या मदतीने, आशीर्वादाने माझा मोर्चा चित्रपटाकडे वळवला. डॉ. लागूंमुळे एन. चंद्रांकडे मी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून ‘तेजाब’ केला आणि स्वतच्या कुसोफिल्म्स्ने मी निर्माता-दिग्दर्शक म्हणून ‘एक रात्र मंतरलेली’ हा सिनेमा केला (1990). त्यानंतर 1990 ते 2002 या 12 वर्षांत दहा सिनेमे दिग्दर्शित केले. ‘एक रात्र मंतरलेली’, ‘आहुती’, ‘पैसा पैसा पैसा’, ‘बजरंगाची कमाल’, ‘कमाल माझ्या बायकोची’, ‘वहिनीची माया’, ‘जोडीदार’ हे सिनेमे खूपच गाजले. याचबरोबर ‘छडी लागे छमछम’, ‘रेशमगाठ’, ‘गिल्टी’, ‘लपून छपून’, ‘निरुत्तर’ या सिनेमांनी चांगला व्यवसायही केला आणि महाराष्ट्र राज्य शासन आणि झी गौरव पारितोषिके प्राप्त केली.

मला महाराष्ट्र राज्य शासनाचे पुरस्कारही मिळाले. या काळात दूरदर्शनवर 1990-91 मध्ये ‘संस्कार’ नावाची मालिकाही दिग्दर्शित केली, जी खूपच गाजली. इतकी की आजही ‘संस्कार’चा दिग्दर्शक म्हणून 25 वर्षांनंतरही माझी ओळख टिकून आहे. चित्रपट मालिकांमध्ये स्थिरस्थावर झाल्यावर पुन्हा मोर्चा नाटकाकडे वळवला आणि नाटक-सिनेमा-मालिका या तीनही विभागात यश मिळवले. पण ‘किमयागार’ या दैनंदिन मालिकेनंतर मालिका हा विषय बंद करून फक्त नाटक-सिनेमाकडे लक्ष केंद्रित केले. ‘देहभान’ (नीना कुलकर्णी, गिरीश ओक, मुक्ता बर्वे), ‘क्षण एक पुरे’ (बाळ धुरी, स्मिता तळवळकर, शैलेश दातार), ‘अश्रुंची झाली फुले’ (श्रेयस तळपदे, अरुण नलावडे, प्रसाद पंडित), ‘सुखांशी भांडतो आम्ही’ (गिरीश ओक, चिन्मय मांडलेकर), ‘मी रेवती देशपांडे’ ( मोहन जोशी, रमेश भाटकर), ‘मायलेकी’, ‘माणसा माणसा हुप्प’, ‘जन्मरहस्य’, ‘त्या तिघांची गोष्ट’, ‘कहानीमे ट्विस्ट’ अशी एकाहून एक सरस नाटके केली. गतवर्षी 51 नाटके केल्याबद्दल एक नाट्य महोत्सव माझ्या जन्मभूमीत गडकरी रंगायतन येथे साजरा केला. जो एकमेव महोत्सव ठरला. कारण अनेकदा सिनेमाच्या दिग्दर्शकांचे Retrospective महोत्सव भरवले गेले आहेत. पण रंगमंचावर माझी सहा नाटके एकाचवेळी आपापले प्रयोग करत होती आणि त्यांचा महोत्सव ही एक अद्वितीय घटना होती.

नेहमीप्रमाणे या इव्हेंटची दखल मीडिया आणि वर्तमानपत्रांनी फारशी घेतली नाही. पण रसिकांनी आणि ठाणेकर मित्रमंडळींनी त्याचे आवर्जून कौतुक केले. आजवर 53 नाटके, 12 एकांकिका, 17 मराठी सिनेमा, 8 दूरदर्शन मालिका, 3 टेलिफिल्म्स् आणि एक नाट्य दिग्दर्शनाबद्दलचे पुस्तक ही माझी शिदोरी आहे. जी एका ठाणेकराला अभिमान वाटावी अशीच आहे. आजवर महाराष्ट्र व्यावसायिक नाट्यस्पर्धांची 14 पारितोषिके मिळवणारा मी ठाणेकर आहे, याचा मला अभिमान आहे आणि माझ्याबद्दलची ही माहिती मुद्दाम सांगण्याचे कारण मी आज आहे तो ठाण्याचा सुपुत्र असल्यानेच आहे, याचा मला अभिमान आहे!

कुमार सोहनी -9820024560

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..