नवीन लेखन...

स्वॅब

मराठी विज्ञान परिषदेच्या ‘पत्रिका’ या मासिकातील डॉ. संजय ढोले यांची ही पूर्वप्रकाशित कथा


सकाळची नीरव शांतता. पक्ष्यांचा किलकिलाट सुरू झाला होता. सहा-सव्वासहा झाले होते. सूर्योदय व्हायचा होता. प्रकाश व अंधाराच्या सीमेवरील तेवढा संधिप्रकाश होता. रस्त्यावर अजूनही तशी वर्दळ नव्हतीच.

मुख्य रस्त्यालगत व पुणे विद्यापीठाच्या आवारात असलेले चतुःशृंगी पोलीस स्टेशनही शांत होते. कुठलीही गडबड नव्हती. काही रात्रपाळीचे पोलीस बाहेर पडले होते, तर काहींची सकाळची ड्यूटी सुरू झाली होती. शेजारच्या खोलीत सीनिअर इन्स्पेक्टरही आले होते. जो-तो आपापल्या कामात व्यग्र होता.

तेवढ्यात एका टेबलावरचा फोन घणघणला.
“ट्रिंगऽऽ ट्रिंगऽऽ”
पुढे रिंग अधीरतेने वाढत गेली आणि वातावरणात एक
प्रकारचे गांभीर्य निर्माण झाले. थोड्याच वेळात आतल्या खोलीतून एक पोलीस शर्टाची बटणे लावत आला व माउथपीस कानाला लावीत म्हणाला,
“हॅलोऽऽ, चतुःशृंगी पोलीस स्टेशन.
“साहेब! मी राधा कामवाली.” तिच्या आवाजात अगतिकता होती.
“बरं मगऽऽ? सकाळीसकाळी का फोन केला?” पोलिसाचा नेहमीचा संशयित स्वर.
“साहेब, तुम्ही पोलीस बोलता ना?”
“होय. मीच पोलीस कॉन्स्टेबल सखाराम सातव. बोला, तुम्ही घाबरू नका.” सातव धीर देत म्हणाले.
पलीकडून आश्वासक स्वर येताच राधा म्हणाली,
“भाऊ. बघा ना. आमचं सायेब नुसतंच निपचित पडल्यात!
हालचालच नाही. काहीतरी वंगाळ झालंय बघा!”
“कोण साहेब? बाई नीट सांगा. त्यांचं नाव काय? गाव काय? कुठे
राहतात? आधी तुम्ही शांत व्हा. बोला…
“कॉन्स्टेबल सातव पुन्हा समजावीत म्हणाले.
‘अहो! पंचशील साहेब. पांडुरंग पंचशील. मोठे शास्त्रज्ञ आहेत!” राधा कापऱ्या आवाजात उत्तरली.
“कोण?… बाई पुन्हा सांगा.” सातवांनी खात्री करून घेण्यासाठी पुन्हा विचारले.
“पांडुरंग पंचशील!”
“काय? पांडुरंग पंचशील? !!” सातव आश्चर्याने, मोठ्याने उद्गारले.
तेवढ्यात कॉन्स्टेबल सातवांचा मोठा आवाज ऐकून आत बसलेले सीनिअर पोलीस इन्स्पेक्टर शिवकांत शेलार पुढ्यात येत म्हणाले, “काय झालं सातव? पांडुरंग पंचशिलांचं काय झालं?”
“व्हय साहेब! पंचशील साहेबच !!” राधाने पलीकडून सांगताच, सातवांनी शेलारांकडे पाहिले आणि माउथपीसवर हात ठेवत म्हणाले, “हो साहेब! पांडुरंग पंचशील. घरात निपचित पडलेत म्हणे!
“काय! निपचित? कोण बोलतंय तिकडून? ” इ. शेलारांचा प्रश्न.
“त्यांची मोलकरीण, राधा.” सातव उत्तरले.
“बघूऽऽ” सातवांच्या हातातून माउथपीस स्वतःकडे घेत व कानाला लावत शेलार पुढे म्हणाले, “बाई, मी सीनिअर इन्स्पेक्टर शेलार बोलतोय. काय झालंय पंचशील सरांना?”
“साहेब ! माहीत नाही. पण हालचालच करीत नाहीत. मीबी लांबूनच पाह्यलं. अजूनही तशेच आहेत. म्हणून घाईघाईनं तुमास्त्री फोन केला!” राधाच्या बोलण्यात घाई व तेवढीच काळजी होती.
“बाई, काळजी करू नका. तुम्ही तिथंच थांबा. त्यांच्या औंधमधील डी. पी. रोडवरच्या बंगल्यावरच आहेत ना?”
“व्हय! साहेब इथंच. मी थांबते. तुम्ही या.” राधाचा थरथरता स्वर.
इ. शेलारांनी माउथपीस क्रेडलवर ठेवला व सातवांकडे पाहत म्हणाले,
“सातव! काहीतरी गंभीर दिसतंय. पंचशील म्हणजे मोठं व्यक्तिमत्त्व आहे. चला, आपल्याला बघावं लागेल.” “साहेब! लॉकडाउनपण आहे. पोलीस यंत्रणा पूर्ण कामाला लागली आहे.” सातवांनी आठवण करून दिली.

“सातव! लॉकडाउन असलं तरी यातून आपल्याला सूट नाही.एखादा गुन्हा किंवा अपघात घडला की आपल्याला जावंच लागेल. या लॉकडाउनमध्येही मुख्य ड्यूटी आहेच की! चला, तुम्ही असलात तरी भरपूर झालं. शेडगेला लागलीच जीप काढायला सांगा आणि हो, शिपाई मोरेला सोबत घ्या.”

इन्स्पेक्टर शेलारांनी आदेशच दिला. पंचशिलांची बातमी म्हणजे महत्त्वाची होती. कारण, समाजातील ते एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्व होते याची जाणीव शेलारांना होती.

शेडगेने लागलीच जीप काढली. सातव व मोरे मागे बसले आणि इ. शेलार पुढे बसताच शेडगेने जीप यूटर्न घेत औंधच्या दिशेने घेतली. त्याच वेळी इ. शेलारांनी एका हॉस्पिटलच्या अॅम्ब्युलन्सला मोबाइलवरून फोनही केला.

पांडुरंग पंचशील. डॉ. पांडुरंग पंचशील. भारतातील एक नामवंत विषाणू शास्त्रज्ञ. पुणे विद्यापीठाच्या आवारात असलेल्या राष्ट्रीय कोशिका व पेशी विज्ञान संस्थेमधील ज्येष्ठ शास्त्रज्ञ. साठीकडे झुकलेले, मध्यम बांध्याचे, बुटकेसे, पांढरे केस व फ्रेंचकट दाढी असलेल्या डॉ. पंचशिलांचे व्यक्तिमत्त्व देखणे. साठ वर्षे वय असले तरी अंगकाठी चांगली व सुदृढ. त्यांना एक मुलगा. पण कॅनडात स्थायिक झालेला आणि एक वर्षापूर्वीच त्यांच्या सुविद्य पत्नीचे निधन झालेले. त्यामुळे ते एकटेच बंगल्यात राहत होते आणि राधा व तिचा पती त्यांची मनोभावे सेवाशुश्रूषा करीत असत. पत्नी गेल्यानंतर मात्र डॉ. पंचशिलांनी स्वतःला कामात व प्रयोगशाळेत गुंतवून घेतले होते. पत्नीच्या निधनाने ते खचले होते. पण आताच्या जगातील विषाणूच्या प्रादुर्भावामुळे त्यांनी स्वतःला संशोधनात झोकून दिले होते.

गेले तीन महिने सर्व जग आणि भारतातसुद्धा लॉकडाउन होते. कारण, एका अज्ञात विषाणूने थैमान माजवून, अवघी मानवसृष्टीच वेठीस धरली होती. कोट्यवधी मानव बाधित होऊन, जगात पाच कोटींच्या वर लोक मृत्युमुखी पडले होते. त्यात भारतातीलच एक कोटी लोकसंख्या होती आणि हे सत्र सुरूच होते.

अवघ्या जगातील संशोधन संस्था या विषाणूच्या अभ्यासाला लागल्या होत्या. त्याच्यावर औषध शोधण्याचे प्रयत्न होत होते. पण स्वतःच उत्परिवर्तित करणारा हा विषाणू सतत त्याचे आर. एन.ए., डी.एन.ए. बदलत असल्याने, जगातील सर्व शास्त्रज्ञ गोंधळले होते. पण प्रयत्न मात्र होतच होते. त्यांतीलच डॉ. पांडुरंग पंचशील होते. म्हणूनच भारताचे त्यांच्याकडे व ते करीत असलेल्या संशोधनाकडे लक्ष होते. जग आशेने पाहत होते.

विषाणूंपासून बचाव करण्यासाठी अवघी मानवसृष्टी घरात बंदिस्त होती. सध्या त्याच्यापासून वाचण्यासाठी हाच एकमेव मार्ग व पर्याय होता. म्हणून सर्व पृथ्वीच बंदिस्त झाली होती.

शेडगेनी बरोबर डॉ. पंचशिलांच्या बंगल्यासमोर जीप उभी केली. सर्वांनीच मास्क परिधान केलेले होते. अॅम्ब्युलन्सपण येऊन थांबली होती. इ. शेलार उतरताच, राधा व तिचा पती समोर आले. राधा म्हणाली, “साहेब ! मीच राधा. मीच फोन केला होता.” राधाच्या डोळ्यांत अश्रू होते. कारण, डॉ. पंचशिलांचे तीच सर्वकाही करीत होती.
“बरं! कधी झालं हे?”
“माहीत नाही! पण मी सकाळीच आले तेव्हा साहेब आता पडलेले आहेत, तसेच होते. आताही तसेच आहेत साहेब ! का झालं असेल त्यास्त्री?” राधाचा कंठ दाटून हुंदका फुटला होता.
“बाई! घाबरू नका! तेच मी बघतो आहे. ”

इ. शेलारांनी खोलीत प्रवेश केला. सगळ्यांच्याच चेहऱ्यांवर मास्क होते. प्रत्येकालाच जपून राहावे लागणार होते. कारण, अज्ञात विषाणूचा प्रादुर्भाव मोठा होता आणि डॉ. पंचशिलांचा मृत्यू कशाने झाला हे नेमके माहीत नव्हते.

इ. शेलारांनी खोलीचे अवलोकन करून घेतले व त्याच वेळी सातव, मोरे व शेडग्यांनी आजूबाजूचा परिसर पिंजून काढला. पण काहीही संशयास्पद आढळले नाही. हा मृत्यू नैसर्गिक होता का? की विषाणुबाधित? इ. शेलारांना काहीच कळत नव्हते. पण डॉ. पंचशील हे नामवंत विषाणुतज्ज्ञ होते हे त्यांना माहीत होते आणि नुकताच त्यांनी, त्यावरील प्रभावी औषधाचा शोध लावल्याची चर्चाही होती. म्हणून भारतातील लोक त्यांच्याकडे आशेने पाहत होते.

इ. शेलारांनी वॉर्डबॉयना पंचशिलांचा मृतदेह हॉस्पिटलला नेण्यास सांगताच, दोघा वॉर्डबॉयनी स्ट्रेचरवर पंचशिलांचा मृतदेह ठेवला आणि अॅम्ब्युलन्समध्ये स्लाइड केला. वॉर्डबॉयनी पी. पी. ई. किट परिधान केले होते. तत्पूर्वी त्यांनी पंचशिलांचा मृतदेह पूर्णत: निर्जंतुक केला होता.

त्या वेळीही इ. शेलारांनी अवलोकन करून घेतले. पण शरीरावर कुठल्याही खाणाखुणा नव्हत्या. त्यांचा श्वासोच्छ्रास बंद होता. याचा अर्थ ते मृत्यू पावले होते हे शेलारांच्या लक्षात आले होते. पण हॉस्पिटलच्या रिपोर्टशिवाय हे जाहीर होणार नव्हते.

अॅम्ब्युलन्स सिव्हिल हॉस्पिटलच्या दिशेने वेगाने पळू लागली. इ. शेलारांनी लागलीच मोबाइल काढला व कानाला लावला. “सर! मी इ. शेलार. चतृःशृंगी पोलीस स्टेशनमधून बोलतोय.
“हं! बोला शेलार.” पलीकडून पुण्याचे पोलीस आयुक्त मोडक बोलत होते.

“सर ! एक वाईट बातमी आहे. नामवंत शास्त्रज्ञ डॉ. पंचशील त्यांच्या घरात, मृतावस्थेत आढळलेत.” इ. शेलारांनी सांगितले.
“काय म्हणताय शेलार ! डॉ. पंचशील? … कालच माझं त्यांच्याशी
बोलणं झालंय! या विषाणुयुद्धाचं ते सारथ्य करीत होते. आज किंवा उद्या त्यांनी शोधलेलं औषधही ते जाहीर करणार होते. खूप उत्साहात होते. मानवासाठी खूप मोठं काम हा शास्त्रज्ञ करीत होता. निसर्गपण किती परीक्षा घेणार आहे? दिवसागणिक लाखो लोक या विषाणूमुळे मरत आहेत. डॉ. पंचशिलांच्या रूपानं पर्याय मिळत होता, तर हा आघात! काय म्हणावं शेलार?”
“काय सर?”
“एनी अॅसॉल्ट? काही घातपात? ” आयुक्तांची शंका.
“सर! मी पाहिलं. पण तसं तरी दिसत नाही. शरीरावर एकही व्रण नाही. ” इ. शेलारांनी माहिती दिली.
“ठीक आहे शेलार. आपल्याला सतर्क राहावं लागेल. अॅसॉल्ट नसेल तर चांगली गोष्ट आहे. पण विषाणूनंच त्यांचा जीव घेतला असेल, तर अवघड आहे.” आयुक्त मोडक निराशेने पुढे म्हणाले, “ओ.के., कीप मी इन्फॉर्ड. आता मीडियात ही प्राइम न्यूज राहणार आहे. आपण तयार राहायला हवं. ”
““ओके. सर !” इ. शेलारांनी मोबाइल बंद केला आणि शेजारीच उभ्या असलेल्या राधाकडे वळत ते म्हणाले,
“बाई! किती वर्षं झाली तुम्ही काम करीत आहात इथं?”
“साहेब ! दहा वर्षं झाली. मॅडम गेल्यानंतर मी व माझं मालकच सरांचं सगळं बघत होतो. खूप सज्जन माणूस!” राधाने डोळ्याला पदर लावला.
“साहेब ! मी नेहमीच रात्री एक वाजता जाते.
माझं मालक घ्यायला येतात. आम्ही शेजारीच, झोपडपट्टीत राहतो आणि पाह्यजे तेव्हा येऊ शकत होतो.” राधाने सांगितले.
“त्यांना काही त्रास होत होता का?” इ. शेलार.
“नाही. फ्रेश झाले. जेवण केलं. शतपावली केली आणि मी जाईपर्यंत ते वाचीत बसले होते. त्यांच्याकडे बघून असं काहीही वाटत नव्हतं.” राधाला पुन्हा भरून आले.
“ठीक आहे राधाबाई! मला जेव्हा गरज लागेल तेव्हा बोलावून घेईन आणि हो, मास्क घाला. दिवस चांगले नाहीत.” इ. शेलारांनी आठवण करून दिली.
“व्हय साहेब. पण आमच्या सरांचं काय झालं?” राधाचा भाबडा प्रश्न.

“ते आता या जगात नाहीयेत. सांभाळा स्वतःला. ” इ. शेलार बोलले व माघारी वळले. राधा व तिचा पती पाहतच राहिले. अविश्वासाने. इ. शेलार जीपमध्ये बसताच शेडगेनी जीप सुरू केली व मुख्य रस्त्यावर आणली. राधा व तिचा पती जीपकडे स्थितप्रज्ञासारखे बघत राहिले होते. शून्यवत. त्यांचे आयुष्यच उघडे पडले होते.

सकाळचे साडे आठ वाजून गेले होते. जीप पोलीस स्टेशनाकडे पळत होती. लॉकडाउनमुळे रस्ते ओस होते. काही वेळातच प्रत्येक चॅनलवर ही ब्रेकिंग न्यूज असणार होती. पण इ. शेलारांच्या डोक्यात सारखा विचार घोळत होता. जे काही घडले होते, ते रात्री एक ते पाचच्या दरम्यानच घडले होते. आता मेडिकल रिपोर्ट काय सांगतोय त्याच्यावरच इ. शेलारांची दिशा ठरणार होती.

दहा वाजले आणि प्रत्येक चॅनलवर ‘ब्रेकिंग न्यूज’ म्हणून बातमी झळकू लागली. ‘डॉ. पांडुरंग पंचशील, प्रसिद्ध विषाणू शास्त्रज्ञ आपल्या राहत्या घरात मृतावस्थेत आढळले. मृत्युसमयी त्यांचं वय साठ होतं. ‘ डॉ. पंचशिलांच्या मृत्यूने एकच खळबळ उडाली. विषाणूंमुळे मृत पावलेल्या आकड्यांसोबत डॉ. पंचशिलांची बातमी ठळकपणे दिसू लागली. भारतातील प्रत्येक जण हळहळत होता. कारण, त्यांचा मृत्यू विषाणूंमुळे झाल्याचे सिद्ध झाले होते. त्यांच्या व्हिसेरात श्वसनक्रिया बंद पडल्यामुळे, मृत्यू झाल्याची नोंद झाली होती आणि मृत्युसमयी तेही विषाणुबाधित झाले होते. विषाणूंचा प्रादुर्भाव एवढा दांडगा होता, की त्यांना कुठलीही संधी मिळाली नव्हती. विषाणूंनी क्षणात त्यांच्या फुप्फुस व श्वसनयंत्रणेवर हल्ला केल्याचे सिद्ध झाले होते. म्हणूनच आश्चर्य व्यक्त होत होते आणि हळहळही. आजच ते त्यांचे संशोधन जाहीर करणार होते. कारण, या अज्ञात विषाणूचा समूळ नायनाट करणारा मॉलेक्यूल त्यांनी शोधून काढला होता. त्याचा अंतिम प्रयोग विषाणूंवरही झाला होता. त्या मॉलेक्यूलच्या आधारानेच त्यांना भारतच नाही, तर हे जगच विषाणुमुक्त करायचे होते.

डॉ. पंचशिलांचे हे संशोधन सर्वांनाच ठाऊक होते. त्यामुळे प्रत्येक जण त्याची चातकासारखी वाट पाहत होते. पण आता सगळेच थांबले होते. त्यांनी शोधलेला मॉलेक्यूल त्यांच्या सोबतच गेल्याची भावना प्रत्येकाच्या मनात रुजली होती. आंतरराष्ट्रीय पातळीवरही याचे पडसाद उमटले होते.

टीव्हीवर तज्ज्ञांची चर्चा होऊ लागली. बहुतांशी तज्ज्ञांचे मत पडले, की डॉ. पंचशीलसारख्या विषाणू शास्त्रज्ञांनी विषाणूंना गृहीत कसे धरले? त्यांनी स्वतःची सुरक्षा का केली नाही? पण ते नियमित पी.पी.ई. किट व निर्जंतुकांचा वापर करीत असत, असे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. पण तरीही, विषाणूने हा डाव कसा साधला हा प्रत्येकाच्याच मनात प्रश्न होता. एखाद्या बेसावध क्षणी विषाणूने संधी घेतल्याचे म्हटले जात होते.

पण त्यांच्या रूपाने पुढे येणारा एक सक्षम पर्याय नेस्तनाबूत झाला होता. जग पुन्हा अधांतरी झाले होते. विषाणूंचे अधिराज्य अजूनही राहणार म्हणून प्रत्येक मानव शहारला होता.

भारतीय पेशी आणि कोशिका संस्थेच्या संचालकांनी लागलीच एक बैठक बोलावून डॉ. पंचशील यांच्या सोबत संशोधन करणारे व सतत त्यांच्या सोबत असणारे त्यांचे सहकारी शास्त्रज्ञ, डॉ. श्रीकर पानगे यांच्यावर ग्रूप संशोधनाची जबाबदारी टाकली. डॉ. श्रीकर हे चाळिशीतले, गोरेगोमटे व बांधेसूद व्यक्तिमत्त्व होते. ते चार्मिंग व उत्साही होते. बरीच वर्षे ते परदेशात संशोधन क्षेत्रात होते आणि मुख्यत्वे त्यांचा विषयही विषाणूच असल्याने पेशी विज्ञान संस्थेत शास्त्रज्ञ म्हणून रुजू झाल्यानंतर, डॉ. पंचशिलांनी त्यांना आपल्या कळपात ओढले होते. डॉ. श्रीकर हुशार होते आणि अशा पॅन्डेमिक स्थितीत डॉ. श्रीकर, डॉ. पंचशिलांच्या खांद्याला खांदा लावून संशोधनात गढून गेले होते.

डॉ. पंचशिलांचा संशोधक विद्यार्थ्यांचा ताफाही मोठा होता. जबाबदारी आल्यानंतर, डॉ. श्रीकरनी लागलीच एक मीटिंग घेऊन, प्रत्येक संशोधक विद्यार्थ्याला भविष्याविषयी आश्वस्त केले होते. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात डॉ. श्रीकरांविषी आदर निर्माण झाला होता.

लॉकडाउन असल्याने, जगातील सर्व विमानसेवा बंद होत्या. त्यामुळे डॉ. पंचशील यांचा मुलगा, सून व नातवाला येणे शक्य झाले नव्हते; पण डॉ. श्रीकरांनी ही उणीव भरून काढली. डॉ. पंचशिलांचा अंत्यविधी डॉ. श्रीकरांनी चार-पाच जणांच्या उपस्थितीतच केला होता.

भारतातील नामवंत शास्त्रज्ञ व राजकीय मंडळींनी डॉ. पंचशिलांना श्रद्धांजली अर्पित केली होती.

दुसऱ्या दिवशीच डॉ. श्रीकरांनी पत्रकार परिषद घेऊन, डॉ. पंचशिलांचे स्वप्न नियोजनानुसार येत्या दोन दिवसांतच साकार करणार म्हणून भारतातील प्रत्येकालाच आश्वस्त केले. “त्यांनी शोधलेल्या मॉलेक्यूलचा मीही सहप्रवासी असल्याने मला त्यांची मिश्रणं ज्ञात आहेत. फक्त येत्या चोवीस तासांत काही प्रयोग करून, परवा हे औषध भारती आयुर्मान संस्थेकडे मान्यतेसाठी पाठवले जाईल. मी फक्त आता निमित्त आहे,” असे नमूद करून डॉ. श्रीकर म्हणाले, “तो मॉलेक्यूल डॉ. पंचशिलांचाच होता आणि त्यांच्या नावाशीच तो चिरकाल जोडला जाणार आहे. फक्त मानवाला मुक्त करण्याचं त्यांचं स्वप्न मी पूर्ण करणार आहे.”

टीव्ही चॅनलवर डॉ. श्रीकरांच्या छबी झळकू लागल्या. भारतीय व एकूण जगाच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या. आता डॉ. श्रीकरांच्या प्रत्येक हालचालीकडे भारतीयांचे लक्ष लागून राहिले.

आणि डॉ. पंचशिलांच्या मॉलेक्यूलला मान्यता मिळताच, शासनातर्फे त्यांची निर्मिती होऊ लागली. अतिशय अल्पदरात भारतीयांच्या धमन्यांमधून हा मॉलेक्यूल खेळू लागताच, अज्ञात विषाणूचा निचरा होऊ लागला आणि भारत सरकारने साऱ्या जगाला हा मॉलेक्यूल देताच, प्रत्येक जण विषाणुमुक्त होऊ लागला. विषाणुबाधितांची संख्या प्रत्येक देशात झपाट्याने कमी झाली. लोक रस्त्यावर हिंडू-फिरू लागले. प्रत्येक मानव मुक्त झाला आणि आर्थिक व्यवहारही होऊ लागले. जीवनमान पूर्वपदावर येऊ लागले. डॉ. पंचशील जगातील बाराशे कोटी लोकांचा एक भाग झाले होते आणि त्याला केवळ डॉ. श्रीकर कारणीभूत होते. त्यांनी यात अतिशय प्रामाणिक आणि निरपेक्ष भावनेतून काम केले होते. याची नोंद निश्चितपणे भारत सरकारने घेतली होती. शिवाय, मॉलेक्यूलमुळे भारताची आर्थिक स्थिती ही पूर्वपदावर येऊन वेगाने पुढे जाऊ लागली होती.

महिन्याभरातच भारतातील जीवन सुरळीत झाले होते. विषाणुमुक्त झाल्याने प्रत्येक जण मुक्तपणे स्वातंत्र्य भोगत होता. सोशल डिस्टन्सिंगची गरज आता राहिली नव्हती. कारण, डॉ. पंचशील नावाचा रेणू प्रत्येकाच्या शरीरात संरक्षक म्हणून उपस्थित होता.

पण अजूनही विषाणूला उद्धस्त करणाऱ्या मॉलेक्यूलच्या शोधकाला विषाणुबाधा का व कशी झाली, हे एक रहस्यच राहिले होते. आताशी कुणाच्याही मनात हा प्रश्न उपस्थित राहत नव्हता. पण डॉ. पंचशिलांच्या काही संशोधक विद्यार्थ्यांच्या मनांत सातत्याने हे प्रश्न उमटत होते आणि ते अस्वस्थ होत होते. नियमित काळजी घेणारे डॉ. पंचशील त्या दिवशी एवढे निष्काळजी का झाले? हा प्रश्न त्यांना अस्वस्थ करीत होता.

या अस्वस्थतेतूनच दोघा संशोधक विद्यार्थ्यांनी चतुःशृंगी पोलीस स्टेशनात प्रवेश केला होता. इ. शेलार कुठलीतरी कागदपत्रे चाळीत होते.

“सर, आत येऊ?”
इ. शेलारांनी समोर पाहिले. दोन तरुणांना पाहून ते सावरून बसले आणि म्हणाले,

“या ना!” पुढे खुर्चीकडे निर्देश करीत म्हणाले, “बसा.” आणि ते अपेक्षेने पाहत राहिले. कुठून सुरुवात करावी या गोंधळात असतानाच त्यांतील एक तरुण म्हणाला,

“सर! मी रमण आणि हा माझा मित्र राम. आम्ही दोघंही डॉ. पंचशील यांचे विद्यार्थी. त्यांच्या हाताखाली आम्ही पीएच.डी. करीत होतो आणि आताही डॉ. श्रीकर पानगे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही संशोधन सुरूच ठेवलेलं आहे.”

“बरं… ते मला माहीत आहे. डॉ. पंचशील यांच्यानंतर तुम्हां सर्वांची जबाबदारी डॉ. श्रीकरांनी घेतली हे माहीत आहे. तुमची त्याविषयी काही तक्रार आहे का?”

“नाही सर! आमची तक्रार कोणाविषयी नाही. डॉ. श्रीकर इज अॅन आउटस्टॅण्डिंग सायंटिस्ट. त्यांची आम्हांला खूप मदत होते आहे. किंबहुना, पूर्वीपेक्षाही आमचं काम वेगानं चालू आहे.” रामने वस्तुस्थिती सांगितली.

“मग काय प्रॉब्लेम आहे? ” इ. शेलारांचा पुन्हा प्रश्न.
रमण व राम थोड्या विचारात पडले. त्यातच रमण म्हणाला,
“सर ! मला माहीत नाही, हे बरोबर की चूक. पण डॉ.
पंचशिलांचा मृत्यू विषाणूनं व्हावा हे आमच्या पचनी पडत नाहीये!”,

“हो सर! ज्या माणसानं आपलं उभं आयुष्य विषाणूंच्या सोबत घालवलं, त्यांच्याशी दोन हात केलेत आणि ज्याच्यावर ते संशोधन करीत होते, त्याचीच बाधा होऊन मृत्यू येणं हे संभवत नाही सर !” रामने शंका व्यक्त केली.

“काय आहे राम, रमण कुठंतरी गाफीलपणा झाला असेल.” इ. शेलार म्हणाले.

“नाही सर! मुळीच नाही. सर खूप पंक्च्युअल होते. काळजी घेत होते. आणि रात्री ते आठपर्यंत आमच्या समवेत होते. म्हणूनच त्यांचा मृत्यू हा विषाणूनं झाला हे पटत नाही.

“काय? आठपर्यंत तुमच्या सोबत होते? ”
“हो सर !”
“पण ते तर रिपोर्टमध्ये सिद्ध झालंय.” इ. शेलारांनी आठवण करून दिली.

“मान्य आहे सर. आम्हांला तसं म्हणायचं नाहीये. आम्हांला एवढंच म्हणायचं आहे, की त्यांचा मृत्यू नैसर्गिक नाही.” रामने सरळ सांगितले.

“म्हणजे!? मी नाही समजलो?” इ. शेलार थोडे गोंधळले.
“म्हणजे, ते स्वतः एवढे प्रोटेक्टिव्ह होते, की त्यांना विषाणूंनी गाठणं शक्य नाही. पण त्यांचा मृत्यू तर विषाणूनंच झालेला आहे हे मान्य. तेच आम्हांला अस्वस्थ करीत आहे सर.” रमणने पुन्हा अस्वस्थता दर्शविली.

“मी समजू शकतो. तुम्ही सर्वच सरांच्या जवळचे विद्यार्थी आहात. डॉ. पंचशील तुमचे आवडते शिक्षक होते. म्हणून कदाचित तुमची अस्वस्थता जास्त असेल. तरीही आय विल लूक इन टू धिस मॅटर. त्यांची फाईल अशी झालेलीच नाहीये. पण तरी मी पाहतो.” इ. शेलार आश्वासक बोलले.

“थँक यू सर !” दोघेही उठले आणि त्यांनी इ. शेलारांशी हस्तांदोलन केले. मागे वळणार तेवढ्यात इ. शेलार म्हणाले, “तुम्हांला कुणावर संशय आहे का?”
“नाही सर, तसा आमचा कुणावरही संशय नाही. सर्व सुरळीत चालू आहे. किंबहुना, ही अस्वस्थता तुमच्यापुढं दर्शविली एवढंच. रमण उत्तरला.

“इ. शेलारांनी फक्त स्मित केले. रमण व राम बाहेर पडले. आता मात्र या दोघा संशोधक विद्यार्थ्यांच्या अस्वस्थतेने इ. शेलारांची चलबिचल झाली. ‘रात्री एक ते पाचच्या दरम्यान त्या रात्री नेमके काय झाले?’ या विचाराने मात्र इ. शेलारांच्या डोक्यात किडा वळवळायला लागला होता.

दुसऱ्या दिवशीच त्यांनी शेडगेला जीप काढायला सांगितली आणि सातव व मोरेला सोबत घेऊन ते डॉ. पंचशिलांच्या बंगल्याकडे जाऊ लागले.

रात्री एक ते पाचच्या दरम्यान काहीतरी घडले असणार यावर आता इ. शेलारांचे मत ठाम होत चालले होते.

बंगला येताच, राधाला बोलावणे पाठवले. राधा धावतपळतच आली. तिचा पती बाहेर गेला होता. बंगल्याची चावी देखभाली व स्वच्छतेसाठी डॉ. पंचशिलांच्या मुलांनी राधाकडेच दिली होती. बंगल्याची जबाबदारीच तिला दिली होती. ती पुढे येत म्हणाली,

“काय साहेब?”
“जरा बंगला उघडा. थोडी तपासणी करायची आहे. काही सापडतं का ते बघतो.” इ. शेलारांनी सरळ सांगितले.

“जी साहेब.” राधाने लागलीच बंगला उघडून दिल. सातव, मोरे व शेडगे कामाला लागले. खोलीन् खोली आणि परिसर धुंडाळून काढला. पण काहीही सापडले नाही. शेडग्यांनी मुद्दामच जिथे डॉ. पंचशील मृत पावले होते, तेथील खोलीत नजर टाकली. कोपरान् कोपरा पाहिला. पण दृष्टिपथात काहीच सापडले नाही. इ. शेलार राधाजवळ येत म्हणाले,

“राधाबाई! त्या दिवशी रात्री पंचशील सर किती वाजता आले होते?”
“सायेब, नऊ वाजले असतील?” राधाने आठवून सांगितले.
“तेव्हा कसे होते ते? म्हणजे, प्रकृती चांगली होती की…?” मध्येच वाक्य खंडित करीत राधा म्हणाली, “खूप चांगली होती. त्यांना असं काही झालं असेल याचा इश्वासच बसत नाही. त्यांना काही असतं तर मलाबी झालंच असतं की! मी सारखी त्यांच्या आजूबाजूला असायची आणि सारखं ते मलाबी काळजी घ्यायला सांगायचे.” राधाने स्पष्टच सांगितले. “म्हणजे, तू असेपर्यंत ते अगदी ठणठणीत होते.” इ. शेलार.
“होय साहेब.” राधाने पुष्टी दिली.

“ठीक आहे राधा. लागलं तर मी बोलवीन. थांब. मी पुन्हा एकदा त्यांची खोली बघून घेतो. मग बंगला लावून घे.” इ. शेलार म्हणाले व लागलीच आतल्या खोलीत शिरले. या वेळी मात्र ते काळजीपूर्वक निरीक्षण करू लागले. दहा मिनिटे ते कोपरान् कोपरा पाहू लागले आणि एका कोपऱ्यात, अंधूकशा प्रकाशात एक छोटीशी वस्तू चमकली. इ. शेलारांनी ती काळजीपूर्वक न्याहाळली आणि त्यांचे डोळे विस्फारले. ते ‘स्वॅब’ होते. छोटेसे. विषाणू कॅरी करणारे स्वॅब.

इ. शेलारांनी अतिशय काळजीपूर्वकरीत्या कुठेही स्पर्श न करता ते स्वॅब प्लॅस्टिकच्या पिशवीत टाकले आणि ते बाहेर पडले. या वेळी त्यांच्या चेहऱ्यावर काहीतरी सापडल्याचे समाधान होते.

जीप हमरस्त्यावर येऊन वेगाने पळत होती. रहदारी चांगलीच होती. पण इ. शेलारांच्या कानांत आता कुठलाही गोंगाट नव्हता. स्वॅबच्या मागे आता त्यांची विचारचक्रे फिरू लागली होती.

दुसऱ्या दिवशी लागलीच इ. शेलारांनी रमण व रामला बोलावून घेतले आणि त्यांच्याशी सखोल चर्चा केली. स्टॅबमागचे रहस्य आता हळूहळू उलगडू पाहत होते. त्यांच्या डोक्यात स्पष्टता येत होती.

रमण व राम जाताच, त्या रात्रीच्या एक ते पाचच्या दरम्यानचा अन्वयार्थ समजताच, इ. शेलार आश्चर्यचकित झाले होते. क्षणभर त्यांचा विश्वासच बसत नव्हता.

सायंकाळी सहा वाजता इ. शेलार, शेडग्यांना घेऊन भारतीय पेशी व कोशिका विज्ञान संस्थेकडे जाऊ लागले. जीप संस्थेच्या प्रांगणात येताच, इ. शेलार उतरले व म्हणाले, “शेडगे! इथंच थांबा. मी आलोच!”
इ. शेलार झपाझपा जिना चढत वर गेले व पहिल्या मजल्यावरील डावीकडच्या प्रयोगशाळेत शिरले.
प्रयोगशाळा संपूर्ण वातानुकूलित व काच तावदानात होती आणि तिथे विविध प्रकारची अद्ययावत उपकरणे होती. पेशी सोबतच वेगवेगळ्या विषाणूंवर तेथे मोठ्या प्रमाणात संशोधन होत होते. प्रयोगशाळेत कुणीच नव्हते. फक्त कोपऱ्यात एक गृहस्थ प्रयोग करण्यात व्यस्त होते. ते पाठमोरे होते. त्यामुळे त्यांचा चेहरा मात्र दिसत नव्हता. इ. शेलार म्हणाले,
“एक्स्क्यूज मी!”
त्या गृहस्थांनी मागे वळून पाहिले व ते उठतच आनंदाने म्हणाले, ‘ओऽ इन्स्पेक्टर शेलार! या ना!”
“सर! आपण डॉ. श्रीकर पानगे. राइट.” इ. शेलारांनी, डॉ. श्रीकरांचा चेहरा टीव्हीवर पाहिला होता. त्यामुळे ओळखणे सहजसोपे झाले. ते पुढे म्हणाले, “पण तुम्ही मला…”
“श्योरऽऽ ओळखतो! एक तर तुम्ही कॅम्पसवर असता आणि दुसरं म्हणजे, डॉ. पंचशिलांच्या केसशी तुम्ही निगडित आहात. राइट? ” मध्ये राउण्ड टेबल असलेल्या खुर्चीकडे निर्देश करीत डॉ. श्रीकर म्हणाले.
इ. शेलार लागलीच बसले व हस्तांदोलन करीत डॉ. श्रीकर पानगे त्यांच्या समोरच बसले व म्हणाले,
“बोला इन्स्पेक्टर शेलार. काही काम होतं?” डॉ. श्रीकर स्मितहास्य करीत म्हणाले.
इ. शेलारांनी प्रथम नुसतेच खोलवर पाहिले. आजूबाजूला अंदाज घेत ते सावरून बसले व त्यांनी खिशातून स्वॅबची पॉलिथीन बॅग काढली व टेबलावर ठेवत म्हणाले, “डॉ. श्रीकर. या स्टॅबला ओळखता? ”
डॉ. श्रीकरांनी काहीच प्रतिक्रिया दिली नाही. त्यांनी क्षणभर डोळे बंद केले आणि ते शांतपणे म्हणाले,
“स्मार्ट हं इन्स्पेक्टर शेलार ! हो, मीच हाताळलेली स्वॅब आहे.
सरळ उत्तर आलेले पाहून इ. शेलार बुचकळ्यात पडले आणि म्हणाले,
“ही कुठे सापडली माहीतेय डॉ. श्रीकर? ”
“हो इ. शेलार. ही तुम्हांला डॉ. पंचशिलांच्या बंगल्याच्या खोलीत सापडली, राइट!” डॉ. श्रीकर अजूनही शांतच होते.
“काय, हे तुम्हांला माहीत होतं?” शेलार आश्चर्याने उद्गारले.
“हो! मी ही कृती मुद्दामच केली. तुमच्यासारखा होतकरू, प्रामाणिक पोलीस अधिकारी निश्चितच माझ्यापर्यंत येईल याची खात्री होती मला!” डॉ. श्रीकरांनी स्पष्ट सांगितले.
“सर ! यापुढे तुम्ही आरोपी सिद्ध होणार आहात.” इन्स्पेक्टर शेलार कळकळीने म्हणाले.
“यस इन्स्पेक्टर शेलार! याची पूर्ण जाणीव आहे मला.” डॉ. श्रीकर म्हणाले.
“तरीसुद्धा? पण का? का केलं हे तुम्ही? तुमच्यासारख्या शास्त्रज्ञानं ही अशी कृती का केली? सर प्लीज सांगा!” इ. शेलार उद्गारले.
“सांगतो शेलार. काय घ्याल? चहा, कॉफी?”
“नको! या व अशा वेळी काहीही नको!”
“ठीक आहे. सांगतो. ” डॉ. श्रीकर समोरच्या बाटलीतले पाणी प्यायले व पुढे बोलू लागले, “मी हे मुद्दामच केलं इन्स्पेक्टर शेलार. डॉ. पंचशील हे अतिशय हुशार शास्त्रज्ञ होते. त्यांच्या संशोधनात सहकारी म्हणून माझाही वाटा होता. पण त्या अज्ञात विषाणूला मारणारा मॉलेक्यूल जेव्हा त्यांनी शोधला, तेव्हा ते केवढे उत्साहित झाले होते.
मोठा ब्रेक थ्रू होता तो!”
“तो कसा डॉ. श्रीकर?”

“कारण, शेलार, जीवाणू आणि विषाणूमध्ये मोठा फरक आहे. जीवाणूकडे स्वतःचं पुनरुत्पादन करण्यासाठी स्वतःची यंत्रणा असते आणि ती पेशींपेक्षा वेगळी असल्यानं त्यावर प्रतिजैविकं शोधणं सहज शक्य आहे. पण विषाणू हा विषारीच असतो. पुनरुत्पादन करायला त्याची स्वतःची अशी यंत्रणा नसते, म्हणून माणसाच्या पेशीतील यंत्रणा विषाणू वापरतात. त्यामुळं औषध शोधणं कठीण असतं. खरं तर, तो फक्त एक डीएनए, आरएनए असलेला एक कण असतो आणि त्यावर प्रोटीनचं संरक्षक आवरण असतं. या प्रोटीनवरच संक्रमण अवलंबून असतं. डॉ. पंचशिलांनी नेमकं हेच हेरलं. ज्या पेशीच्या रिसेप्टरमधनं हे विषाणू आत जाऊन, डीएनएशी बॉण्ड तयार करतात, तीच यंत्रणा शोधून त्यांनी हायड्रॉक्सिल आणि रॅडिकल्स यांच्या मिश्रणातून रेणू तयार केला आणि विषाणूंच्या डीएनएला रोखून धरलं. हा ब्रेक थ्रू होताच. पण पुढं कुठल्याही उत्परिवर्तित होणान्या अशा विषाणूला त्यांनी मॉलेक्यूलनं प्रतिबंध केला हे फार महत्त्वाचं होतं. ” डॉ. श्रीकरांनी थोडक्यात सांगितले.

“सर! मग एवढं सगळं सुरळीत होतं तर मग…’ मध्येच इ. शेलारांचे वाक्य खंडित करीत डॉ. श्रीकर म्हणाले, “ते मी सांगणारच आहे इन्स्पेक्टर शेलार. पण त्याआधी डॉ. पंचशिलांचं महत्त्व आणि संशोधनाची पार्श्वभूमी मी सांगितली.

मॉलेक्यूल शोधल्यानंतर माझा आग्रह होता तो भारतीयांसाठी.”
“म्हणजे?” इ. शेलार.
“म्हणजे, तुम्ही जिथं बसला आहात, तिथंच काही दिवसांपूर्वी दोन व्यक्ती आल्या होत्या. मीही अनवधानानेच तिथं आलो. तो मॉलेक्यूल डॉ. पंचशिलांना परदेशस्थ कंपनीला विकायचा होता आणि त्यासाठी त्यांना कोट्यवधी डॉलर मिळणार होते! मी त्यासाठी त्यांना विरोध केला.” डॉ. श्रीकर म्हणाले.
“का सर?” इ. शेलार.
“कारण, डॉ. पंचशील क्षणात कोट्यधीश होणार होते. पण परदेशस्थ कंपनी गडगंज पैसा उभारणार होती. अब्जावधी डॉलर्स आणि ज्या भारतात तो मॉलेक्यूल शोधला गेला, त्यालाच ते औषध नंतर विकत घेण्यासाठी अब्जावधी रुपये खर्च करावे लागणार होते. कारण, आपली सव्वाशे कोटी लोकसंख्या आहे. त्या सर्वांनाच लस द्यावी लागणार होती. माझं म्हणणं असं होतं, की ही लस व मॉलेक्यूल आपण गोरगरिबांसाठी वापरून, आपल्या भारताची आर्थिक बाजू मजबूत करू.”

“मग ऐकलं त्यांनी?”
“नाही, ते ठाम होते. उलटपक्षी, ते मला यात सामील करून घ्यायला आग्रही होते. पण माझ्या देशाशी मला प्रतारणा करायची नव्हती. म्हणून मी तडक बाहेर पडलो होतो.” डॉ. श्रीकर थोडे निवांत झाले.

“मग त्यांनी करार केला?” इ. शेलारांनी विचारले.
“होय, आणि हा करार अतिशय गुप्तपणे केला होता.
“ आणि मग पुढं तुम्ही…?”
“होय! माझ्यापुढं पर्यायच नव्हता! मी निर्णय घेतला होता. पण तत्पूर्वी मी त्या मॉलेक्यूलचं सूत्र डोक्यात साठवून सगळ्या फाईल्स उडवल्या होत्या!” डॉ. श्रीकरांनी वेगळीच बाजू मांडली.

“पण सर! हत्येसाठी लोक अस्त्र वापरतात. तुम्ही विषाणू हेच अस्त्र वापरलं. ते कसं शक्य झालं? ” इ. शेलारांचा प्रश्न.

“इन्स्पेक्टर शेलार, रूढार्थानं मला त्यांचा खून करायचा नव्हता. मला वध करायचा होता, त्यांच्या अपप्रवृत्तींचा. त्यासाठी मी त्यांचंच विषाणू अस्त्र वापरलं.” डॉ. श्रीकरांनी सांगितले.

“पण सर, एवढ्याश्या स्वबमधनं शक्य झालं? ते कसं?” “कारण, द्रव्याच्या एका थेंबात अब्जावधी विषाणू असतात. एका विषाणूचं वजन ०.८५ ऑटोग्रॅम म्हणजे ०.८५ x १० – १८ ग्रॅम एवढं नगण्य असतं आणि एका माणसाला बाधित होण्यासाठी सत्तर अब्ज एवढे विषाणू पुरेसे असून त्यांचं वजन ०.०५ मायक्रोग्रॅम एवढं असतं. मग मी आकडेमोड केली. जर का एक ग्रॅम एवढे विषाणू शरीरात सोडले, तर काही मिनिटांतच फुप्फुस व श्वसननलिकेचा ताबा घेऊन हृदयक्रिया बंद पडते आणि मी हीच मात्रा त्यांना दिली. ” डॉ. श्रीकरांनी सखोल स्पष्टीकरण दिलं.
“ते कसं?”

“मला माहीत होतं, त्यांची बाई रात्री एकपर्यंत असते. सध्या लॉकडाउनमध्ये सर्व रस्ते निर्जन आहेत आणि मी समोर दिसल्यानंतर डॉ. पंचशिलांनी मला आत घेतलं. त्यांना वाटलं, माझं मतपरिवर्तन झालं. तसं त्यांनी बोलूनही दाखवलं. पण मीच त्यांना समजावून पाहिलं. ते त्यांच्या निर्णयावर ठाम होते. शेवटी मी नकळत त्यांच्या कानाखाली विषाणूची मात्रा इंजेक्ट केली. प्रथम त्यांना काहीच कळलं नाही आणि नंतर ते ग्लानी येऊन पलंगावर पडले. मी इंजेक्शन बॅगेत टाकलं. त्याच वेळी स्वॅब खाली पडलं व घरंगळत कोपऱ्यात गेलं. मी क्षणभर पाहिलं. हसलो, आणि तसंच सोडून बाहेर पडलो. रात्री कुणीही नव्हतं. रस्ते निर्मनुष्य होते. मला मात्र हलकं वाटत होतं. माझ्या भारतासाठी मला काहीतरी करायचं होतं.” डॉ. श्रीकरांनी सर्वच खुलासेवार सांगितलं.

इ. शेलारांनी शांतपणे पाहिलं. ते अस्वस्थ झाले होते. समोरही नामवंत शास्त्रज्ञच होता. ते म्हणाले,

“सर ! काय बोलू? आता सर्व स्फटिकासारखं स्वच्छ झालं आहे.
नितळ असं. एवढं सगळं होऊनही तुम्ही तो मॉलेक्यूल डॉ. पंचशिलांच्या नावानंच पुढं आणलात आणि प्रत्येक भारतीयाच्या शरीरात प्रथम तुम्हीच खेळवलात. सर, आणि तुम्ही जनतेला विषाणूंपासून मुक्त केलंत. पुढं जगातील सर्व हजार कोटी लोकांना ह्या मॉलेक्यूलच्या रूपानं जीवनदान देऊन, भारताला आर्थिक महासत्ताही बनवून दिलंत. सर! केवळ तुमच्यामुळं माझ्या शरीरातही तुमचा मॉलेक्यूल खेळतोय आणि माझं विषाणूंपासून संरक्षण करतोय!” इ. शेलार भाववश झाले.

मॉलेक्यूल नाही. तो डॉ. पंचशिलांचाच!” डॉ. श्रीकर “माझा हसत म्हणाले.
“नाही सर ! माझ्या दृष्टीनं तो मॉलेक्यूल तुमचाच. यू डिझर्व्ह इट!”
“इन्स्पेक्टर शेलार, एक सांगू? विनंती म्हणा हवं तर? ” डॉ. श्रीकर विनंतिपूर्वक म्हणाले.
“बोला ना सर !”

“डॉ. पंचशील हे मोठे शास्त्रज्ञ होते. प्रतिष्ठित होते. त्यांची जनमानसातील प्रतिमा तशीच राहावी अशी माझी इच्छा आहे. त्यांचं हे गुपित तुम्ही कुठंही सांगणार नाहीत. ते देशभक्तच होते ही प्रतिमा दृढ व्हावी. त्या बदल्यात मी शिक्षा भोगण्यास तयार आहे. आज माझा भारत मुक्त श्वास घेत आहे यातच मी भरून पावलो! कसं न्याल इन्स्पेक्टर शेलार? बेड्या घालून? मी तसाही तयार आहे.” डॉ. श्रीकर स्मितहास्य करीत म्हणाले.

“सर ! काय म्हणताय तुम्ही हे ! सर सॉरी, पण मला पुढं हे करायला मिळणार नाही!”

इन्स्पेक्टर शेलार हेलावले व आवेगाने उठले. त्यांनी डॉ. श्रीकर पानगे यांना एक कडकडीत सॅल्यूट ठोकला. या वेळी त्यांचा कंठ दाटून आला होता. डॉ. श्रीकर उठले आणि त्यांनी हळूच शेलारांचा खांदा दाबला व ते पुढे निघाले. डॉ. श्रीकरांच्या चालीत आत्मविश्वास होता.

इन्स्पेक्टर शेलार, कोट्यवधी लोकांचे प्राण वाचवून त्यांना मुक्त करणारा महान शास्त्रज्ञ बंदीवासाकडे जाताना हवालदिलपणे पाहत होते.

– डॉ. संजय ढोले
भौतिकशास्त्र प्राध्यापक
sddhole@gmail.com

मराठी विज्ञान परिषदेच्या ‘पत्रिका’ या मासिकातील डॉ. संजय ढोले यांची ही पूर्वप्रकाशित कथा

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..