नवीन लेखन...

आयुका आणि चार्ल्स कोरिया

आयुका या विख्यात संस्थेची वास्तू ही चार्ल्स कोरिया यांच्या मार्गदर्शनाखाली उभारण्यात आली. या निमित्ताने आयुकाचे संस्थापक-संचालक प्रा. जयंत नारळीकर यांचा चार्ल्स कोरिया यांच्याशी निकटचा संबंध आला. प्रा. नारळीकरांनी लेखणीबद्ध केलेल्या, चार्ल्स कोरिया यांच्या या काही आठवणी…

मराठी विज्ञान परिषदेच्या ‘पत्रिका’ या मासिकातील प्रा. जयंत नारळीकर यांचा हा पूर्वप्रकाशित लेख


१९८८ मधली ही घटना. हैदराबाद येथील सेंटर फॉर सेल्युलर अॅण्ड मॉलेक्यूलर बायॉलॉजीच्या (CCMB) नव्या संकुलाचा उद्घाटन समारंभ होता. त्या निमित्ताने काही नामवंतांची व्याख्याने आयोजली होती. त्यांत फ्रांसिस क्रिक सारखे नोबेल पारितोषिक विजेते होते, तसेच जीवशास्त्राशिवाय इतर विषयांवर अभ्यास-संशोधन करणारेपण होते. माझा ह्या दुसऱ्या प्रकारच्या निमंत्रितांमध्ये समावेश होता.

पहिल्या सकाळी न्याहारीच्या वेळी मी एका टेबलाशी पेपर वाचत बसलो असता, माझ्या कानावर शब्द पडले, “प्रोफेसर नार्लीकर, तुम्हांला डिस्टर्ब करू का? माझं नाव चार्ल्स कोरिया!” एक उंच व्यक्ती स्मितहास्य करत म्हणाली. मी ह्या गृहस्थांना पूर्वी कुठेतरी पाहिले होते. पण प्रत्यक्ष गाठ आत्ताच पडत होती. मी त्यांना म्हटले, “आपले फोटो पाहिले होते. पण प्रत्यक्ष भेट आजच होत आहे. आपणही ह्या कॉन्फरन्ससाठी आलात काय? ” एक विख्यात वास्तुरचनाकार सीसीएमबीच्या कॉन्फरसला कसा? कोरियांनी खुलासा केला – CCMBचे संचालक पुष्पा भार्गव, यांच्या आमंत्रणावरून ते इथे आले. पुष्पाच्या ओळखी दूरवर पसरल्या असल्याने त्यांत काही आश्चर्य नव्हते.

एक प्रतिभावंत वास्तुशिल्पकार म्हणून चार्ल्स कोरियांचे नाव माहीत असले तरी प्रत्यक्ष भेटीची ही पहिलीच वेळ. केंब्रिज विद्यापीठात ‘जवाहरलाल नेहरू प्राध्यापक’ म्हणून त्यांना आमंत्रित केले होते. त्या संदर्भात आमच्या केंब्रिजबद्दल गप्पा झाल्या. ब्रेकफास्ट झाल्यावर आम्ही एकमेकांची रजा घेतली. यथा काष्ठं च काष्ठं च… ह्या न्यायाने आमची पुन्हा भेट होईल का याची माझ्या मनात शंका होती.

पण तसे घडायचे नव्हते!

आमच्या ब्रेकफास्ट मीटिंगला ताजा कलम म्हणून चार्ल्सने मंगलाला आणि मला जेवायला त्याच्या मुंबईच्या घरी आमंत्रित केले. निमित्त होते फ्रांसिस क्रिक ह्या नामवंत शास्त्रज्ञाला भेटायचे. डी. एन. ए. च्या सहशोधकाला मी पूर्वी पाहिले होते. आता प्रत्यक्ष भेटीची संधी होती. त्या रात्रीपर्यंत अनुत्तरित राहिलेला एक प्रश्न मला क्रिकला विचारता आला. “मी असे ऐकले की तुम्ही आणि खगोलशास्त्रज्ञ फ्रेड हॉएल यांनी एकाच फ्लाइटने शेजारी बसून लंडन ते न्यूयॉर्क प्रवास केलात. निघताना हॉएलनी तुम्हांला एक खगोलशास्त्रीय कूट प्रश्न विचारला. परतफेड म्हणून तुम्ही हॉएलना जीवशास्त्रातला एक कूट प्रश्न विचारलात. न्यूयॉर्क येईपर्यंत तुम्ही दोघांनी परस्परांना घातलेले आव्हानात्मक प्रश्न सोडवलेत. हे खरे का? ” क्रिक हसून उद्गारले, “हे अर्धसत्य आहे! वास्तविक प्रश्न फक्त मी हॉएलना घातला होता, तो त्यांनी सोडवला.

ह्यानंतर आमची चर्चा फ्रेड हॉएल आणि खगोलविज्ञानाकडे वळली. चार्ल्स म्हणाला, “मी जयपूर येथील भूतकालीन विज्ञानाच्या केंद्राच्या रचनेत गुंतलो आहे. मंडल ही कल्पना वास्तूतून व्यक्त करीत आहे. मला कधी कधी वाटते, की वर्तमानातल्या खगोल कल्पनांना असेच शिल्परूप देता यावे. त्यावेळी अर्थातच आम्हा सर्वांना (चार्ल्स धरून) असे वाटले, की ही इच्छा कल्पनेपुरतीच मर्यादित राहणार.

*****

१९८८ हे वर्ष माझ्यासाठी संक्रमणाचे होते. विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष प्रा. यशपाल यांनी ‘इंटर युनिव्हर्सिटी सेंटर्स’ ह्या संकल्पनेला उचलून धरले. जर एखाद्या महत्त्वाच्या विषयात शिक्षण-संशोधनासाठी विद्यापीठ क्षेत्रात सोय नसेल तर त्या विषयाला वाहिलेले राष्ट्रीय केंद्र उभारून ती उणीव भरून काढायची त्यात योजना होती. विद्यापीठ क्षेत्रातील शिक्षक व संशोधनाचे विद्यार्थी अशा केंद्राचा वापर करून ज्या नियोजित विषयात आपली गुणवत्ता वाढवू शकतील अशा अप्रचलित, पण महत्त्वाच्या विषयात खगोलविज्ञान बसत असल्याने, त्यासाठी इंटर – युनिव्हर्सिटी फॉर अॅस्ट्रोनॉमी अॅण्ड अॅस्ट्रोफिजिक्स (IUCAA) ह्या संस्थेची निर्मिती करावी का, हा प्रश्न त्यांनी उपस्थित करून तसे केंद्र कशा प्रकारचे असावे यावर सविस्तर अहवाल तयार करायची जबाबदारी माझ्यावर सोपवली.

काही महिन्यांतच असा अहवाल यशपाल यांच्या टेबलावर हजर झाला. “तो अहवाल स्वीकारून IUCAA (आयुका) ची निर्मिती करायचा निर्णय मी घेईन – पण एका अटीवर ! तू ह्या केंद्राचे संचालकत्व स्वीकारून तिची अहवालाप्रमाणे निर्मिती कर.” ही यशपालांची गुगली परतवताना मी आयुका निर्मितीचे आव्हान स्वीकारले.

आयुका – निर्मितीच्या कामासाठी मला मदत करायला दोघे जण आपण होऊन पुढे आले: नरेश दधीच आणि अजित केंभावी. नरेश पुणे विद्यापीठात अध्यापक होता, तर अजित टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च येथे माझा (पूर्वी विद्यार्थी व आता) सहकारी होता. अहवालाबरहुकूम पुष्कळ गोष्टी करायच्या होत्या. त्यांपैकी एक महत्त्वाचा निर्णय होता आयुकाच्या इमारतीसाठी उत्तम वास्तुरचनाकार निवडणे.

एका रात्री जेवणानंतर आम्ही तिघे उत्तम वास्तुविशारद कसा मिळवावा यावर चर्चा करीत होतो. मी म्हटले “योगायोग आहे. काही महिन्यांपूर्वी मी चार्ल्स कोरियांना भेटलो होतो… तेव्हा त्यांनी आधुनिक खगोलावर अभ्यास/ संशोधन करणारी संस्था कशी असेल यावर आपले कुतूहल व्यक्त केले होते…” माझे वाक्य संपते न संपते तो नरेश उदगारला, “मग वाट कशाची पाहतोस? त्यांना ताबडतोब फोन कर !” अजितनेपण त्याला दुजोरा दिला. ‘कल करे सो आज कर, आज करे सो अब’ ह्या माझ्या कार्यप्रणालीत हे बसत होते. सुदैवाने चार्ल्स फोनवर भेटला.

अशा अवेळी फोन करायचे धारिष्ट दाखवल्याबद्दल माफी मागत मी चार्ल्सला विचारले. “ एका नव्या प्रकारच्या खगोलकेंद्राची निर्मिती करायची जबाबदारी मी स्वीकारली आहे. त्या केंद्राच्या इमारती बांधायला मला तुमचे मार्गदर्शन लाभेल का? ” प्रश्न विचारताना मला शंका होती, की मोठाले प्रकल्प

————————————————————————

हाताळणारा हा गृहस्थ आमच्या तुलनेने लहान अशा केंद्राच्या रचनेत कितपत लक्ष घालेल. पण चार्ल्सने फोनवर तत्काळ होकार कळवला आणि त्याच्या घरी जेवायला गेलो असताना व्यक्त केलेली आशा पुन्हा व्यक्त केली. जयपूरच्या पुराण केंद्राची रचना केल्यावर आता पुण्यात आयुकाची निर्मिती करायला त्याला निश्चितच आवडणार होते.

**
त्यानंतर वेगाने प्रगती झाली. एका आरंभीच्या काळातल्या आमच्या चर्चेसाठी मी केंब्रिज एन्सायक्लोपीडिया आणला होता. खगोलीय वस्तूंची उत्कृष्ट छायाचित्रे पाहून चार्ल्स खूप प्रभावित झाला. इतकेच नव्हे, आमच्या त्यानंतरच्या चर्चासत्रात चार्ल्स हजर झाला तो त्या एन्सायक्लोपीडियाला आपल्याबरोबर आणून ! त्याने एक प्रत स्वत: करिता विकत घेतली होती. यातील चित्रे व नकाशे पाहून मला खगोलाबद्दल माहिती मिळेल. तिचा आपल्या प्रकल्पासाठी उपयोग होईल. एक अनुभवी वास्तुशिल्पी अशा तऱ्हेने आपल्या ज्ञानाचे क्षितिज वाढवत होता.

आयुकाचे उद्दिष्ट काय? तेथे येणारे लोक कुठल्या क्षेत्रातले? तुमच्या लेक्चर-सेमिनारला किती उपस्थिती असेल? आदी प्रश्न विचारताना त्याला कशा तऱ्हेची इमारत असावी, याबद्दल प्रारंभिक कल्पना करण्याजोगी माहिती मिळे. खुद्द इमारतींच्या रचनेचे रूप ठरवायचा अधिकार त्याचा. पण ग्राहक म्हणून आम्ही वेळोवेळी केलेल्या सूचना त्याने विचारात घेतल्या आणि अमलात आणल्या. त्याची काही उदाहरणे पाहा.

१. मुख्य इमारतीच्या केंद्रस्थानी काहीतरी दर्शनीय-लक्षणीय असावे.
त्यासाठी माझ्या पत्नीने (मंगला) फूकोचा लंबक सतत दोलन करताना दाखवावा ही कल्पना त्याला एकदम अपील झाली.

२. खगोल केंद्रात कुठेतरी एक घुमट असावा अशी चार्ल्सची कल्पना. त्याची जागा निश्चित झाली. आयुकातील शास्त्रज्ञ नारायण चंद्र राणा याने सुचवले – घुमटाला लहान भोके करा. त्यातून सूर्यप्रकाश आला की घुमटामध्ये तारे चकाकत आहेत असा भास होतो.

चार्ल्स कोरिया यांनी आरेखन केलेल्या भारतातील प्रमुख इमारती:

१. पोर्तुगीज चर्च, दादर, मुंबई
२. कांचनगंगा अपार्टमेंट, केम्प्स कॉर्नर, मुंबई
३. ब्रिटिश काउन्सिल इमारत, नवी दिल्ली
४. कला अकादमी, पणजी, गोवा
५. महात्मा गांधी स्मारक, साबरमती आश्रम, अहमदाबाद

चार्ल्स कोरिया यांना मिळालेले महत्त्वाचे पुरस्कार:

१. पद्मश्री पुरस्कार: १९७२
२. इंटरनॅशनल आर्किटेक्ट युनियनचे सुवर्णपदक: १९८४
३. रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ ब्रिटिश आर्किटेक्ट्स सुवर्णपदक: १९८४
४. आगा खान पुरस्कार (वास्तुरचनेसाठी ): १९९८
५. पद्मविभूषण पुरस्कार: २००६

३. एका चौकात दोन वटवृक्ष होते. त्यांचे काय करायचे? संपूर्ण बांधकामात वृक्षतोड न करायचे आमचे धोरण होते. अजित केंभावीने सुचवले, की त्यांना परस्पराभोवती फिरणारे तारे समजू या. त्यांचे परस्परांभोवती फिरण्याचे नियम जवळपास दाखवावेत. निसर्गातून गणित निर्माण होईल.

अशा अनेक कल्पना आयुकाच्या वास्तूत साकार झालेल्या दिसतील.

आयुकाच्या इमारती २८ डिसेंबर, १९९२ ह्या दिवशी राष्ट्राला समर्पित करायच्या होत्या. त्या दृष्टीने आवश्यक ते बांधकाम पूर्ण करायच्या दिशेने आमचे डोळे लागले होते. अशा वेळी चार्ल्सचे डोके अजून काही सुधारणा हवी अशा विचारांनी भरले होते. त्यांतील एक कल्पना त्याने कार्यवाहीसाठी मांडली. त्याने विचारले, “तुमच्या विषयात आजपर्यंत जे शास्त्रज्ञ होऊन गेले त्यांतील निवडक चार कोणते? तुम्ही कुठली चार नावे निवडाल? ’’ पुष्कळ चर्चेनंतर मी व माझ्या सहकाऱ्यांनी चार नावे सुचवली ती अशी: आर्यभट्ट, गॅलिलिओ, न्यूटन आणि आइन्स्टाइन! “पण ही नावे कशासाठी? ” आम्ही विचारले. चार्ल्स म्हणाला, “माझी सूचना अशी. ह्या शास्त्रज्ञांचे ८-१० फूट उंच पुतळे करून आयुकाच्या मधल्या कुंडाच्या चारी बाजूला उभे करायचे. आपल्या सर्वांपेक्षा ते लोक कर्तृत्वाने उच्चता गाठलेले होते, हे त्यांच्या उंचीने अवगत होईल. त्यांच्या शेजारी उभे राहणाऱ्या आपणां सर्वांना आपल्या क्षुद्रतेची जाणीव होईल.

कल्पना चांगली होती, पण कमी वेळात पुतळे कोण करणार? ती जबाबदारी चार्ल्सने पत्करली. गणेशोत्सवात मोठाल्या मूर्ती करणारा एक मुंबईतला कारागीर त्याला माहीत होता. त्याचे नाव होते पाटकर. त्याच्याकरवी त्याने हे काम करवून घेतले आणि समर्पणापूर्वी चारही पुतळे योग्य जागी बसवले.

मात्र, एका घटनाक्रमावर आमचा कसलाही कंट्रोल नव्हता. ६ डिसेंबर रोजी बाबरी मशीद पाडण्याच्या घटनेचे पडसाद इतरत्र उमटले. विशेषत: मुंबईत प्रचंड प्रमाणात दंगे झाले. आयुकाभोवतालच्या परिसरात काही भिंतींना विशेष प्रकारचे टाइल लावायचे होते; पण त्यातले निपुण कारागीर मुंबईतून यायचे होते. आसपासची परिस्थिती स्फोटक असल्याने हे कारागीर पुण्याला यायला बिचकत होते. परिस्थिती निवळल्यावरच ते येणार. पण आम्हांला आणि वास्तुरचनाकार म्हणून कोरियाला चिंता होती, की हे काम समर्पणापूर्वी होईल का? अन्यथा उघड्या बोडक्या भिंती एकंदर इमारतीची शोभा नष्ट करतील. अखेर परिस्थिती सुधारली आणि ते कारागीर हजर झाले तेव्हा अवघे दोन दिवस उरले होते! पण आमच्या काळजीचे मूळ समजताच त्यांनी आश्वासन दिले. आम्ही तुमच्या समारंभापूर्वीच हे काम उरकून टाकू – जरी त्यासाठी रात्रीचा दिवस करावा लागला तरी ! त्यांनी शब्द खरा केला. २८ डिसेंबर उजाडला तेव्हा सर्व भिंतींवरचे काम पूर्ण झाले होते. माझी एक आठवण आहे. २७ डिसेंबरच्या रात्री काम चालू असताना मी तेथे चक्कर मारली तेव्हा चार्ल्स कोरिया ते काम पाहत उभा होता. काम त्याच्या अपेक्षेप्रमाणे पूर्णत्वास गेल्याचे त्याला पाहायचे होते.

आज चार्ल्स आपल्यामध्ये नाही; पण त्याच्या अनेक आठवणी आम्हांला चिरंतर साथ देतील… धंदेवाईक वास्तुरचनाकार म्हणून नव्हे, तर एक कौटुंबिक मित्र म्हणून! आमचे काही मुद्द्यांवर वाद झाले, पण आम्ही एकमेकांना सांभाळून घेतले. ‘वादे वादे जायते तत्त्वबोध: ‘ ह्या नियमाने आम्हांला चार्ल्सपासून बरेच काही शिकायला मिळाले. आयुकाचे स्वप्न साकारण्यात त्याचा मोलाचा वाटा आहे.

-प्रा. जयंत नारळीकर
jvn@iucaa.ernet.in

मराठी विज्ञान परिषदेच्या ‘पत्रिका’ या मासिकातील हा पूर्वप्रकाशित लेख 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..