नवीन लेखन...

नाट्यदर्पण रजनी चालवणारे सुधीर दामले

जन्म.१३ जुलै

जेव्हा हिंदी चित्रपट सृष्टीत ‘फिल्मफेअर अवॉर्ड्स’ ची मोहिनी मराठी रसिकांना पडत होती, तेव्हा मराठी नाट्यसृष्टीसंदर्भात कोणताही मोठा असा सोहळा होत नसे.अपवादात्मक म्हणजे महाराष्ट्र शासन आयोजित हौशी नाट्य स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ किंवा आळतेकर – कोल्हटकर नाट्यस्पर्धांचे बक्षीस समारंभ. परंतु संपूर्ण नाट्यविश्वाला एकत्रित आणणारा, गुणगौरव करणारा समारंभ होतच नव्हता. हिंदीतील फिल्मफेअर, स्क्रीन अवॉर्ड्स नाईट्सच्या धर्तीवर आपण एक कार्यक्रम करावा हि संकल्पना सुप्रसिद्ध विनोदी अभिनेते गणेश सोळंकी ह्यांनी नाट्यदर्पणच्या संपादकांना म्हणजेच सुधीर दामले यांना सुचवली आणि त्यातूनच जन्माला आली ‘ नाट्यदर्पण – रजनी’.

’नाट्यदर्पण’चे सुधीर दामले हे त्याकाळी ‘नाट्यदर्पण’ नावाचे एक मासिकही चालवत असत. त्याला जोडून त्यांनी १९७५ साली ‘नाट्यदर्पण रजनी’ सुरू केली होती. मराठी नाट्य आणि चित्रपट क्षेत्रातल्या विविध कलाकारांना त्या सोहळ्यात पुरस्कार दिले जात. हिंदी सिनेमाच्या क्षेत्रात ‘फिल्मफेअर ॲवॉर्ड्‌स’चे जे स्थान आहे तेच मराठी कलाजगतात या ‘नाट्यदर्पण सन्मानचिन्हां’ना मिळाले होते. त्या रजनीचा भव्य आणि दिमाखदार सोहळा दर वर्षी साजरा होत असे.
पहिला सोहळा १० जुलै १९७५ साली मुंबईच्या साहित्य संघात पार पडला. मात्र तेव्हा संयोजकांना, सहभागी कलावंतांना पुसटशी देखील कल्पना नव्हती कि ह्यातून एक ”सांस्कृतिक चळवळ” आकाराला येईल.

केवळ वेगळ्या प्रकारचा करमणूक कार्यक्रम करावा, त्यात ठराव मांडणे, भाषणबाजी नसावी !! रंगकर्मी -प्रेक्षक स्नेहसंमेलन घडवावे इतकीच अपेक्षा होती. पहिल्या वर्षाच्या रजनीमध्ये संकल्पना व सूत्रसंचालन गणेश सोळंकी, प्रमुख पाहुणे विद्याधर गोखले होते. त्यावेळी नटी -सूत्रधार प्रवेश आशालता,गणेश सोळंकी, अरविंद पिळगांवकर ह्यांनी सादर केला. कल्पकता, नावीन्य हा आत्मा असल्याचे पहिल्याच वर्षी जाणवले,

उदाहरणार्थ: ‘श्रीयुत’ ही एकांकिका नामवंत कलाकारांनी म्हणजेच डॉ.काशिनाथ घाणेकर, आशा काळे, मनोरमा वागळे,जयंत सावरकर आणि स्वतः सोळंकी यांनी सादर केली, राजा मयेकर, संजीवनी बिडकर,रंजना देशमुख, मधु कडू शाहीर साबळे आणि पार्टीचे कलाकार, ह्यांनी लोकनाट्य पद्धतीने केली. शिवाय हार्मोनियम सोलो -गोविंदराव पटवर्धन ,आशा खाडिलकर- अलका जोगळेकर नाट्यगीत जुगलबंदी,गोविंदराव अग्नी ह्यांचे नाट्यसंगीत ,शिवाय आजचे मराठी नाटकवर चर्चा व शेवटी रामदास कामत ह्यांची भैरवी. आणि त्याच मुहूर्तावर नाट्यदर्पण रजनी रसिकमान्य झाली.

नाट्यदर्पण रजनीची ठळक वैशिष्टये – आज ऐशीचे दशक पार केलेले सुधीर दामले मोठ्या उत्साहाने सांगू लागतात, ‘ त्याकाळी नाट्य परिषदेचा कलाकार मेळावा होत असे, सोळंकी ह्यांनी असा सोहळा असावा असे सुचवले,तेव्हा पुरुषोत्तम दारव्हेकर व मी दोघांनी हि संकल्पना उचलून धरली आणि पहिली रजनी साकारली. भाषणबाजी नसावी,कलाकार व प्रेक्षकांनी एका संध्याकाळी एकत्र यावे, त्यावेळी करमणुकीचे कार्यक्रम व्हावेत असे प्रारंभीचे स्वरूप आमच्या मनात होते. पुढे आम्ही हा सोहळा अनेकवर्षे राबवला ,ह्याकामी अनेकांचे मोलाचे सहकार्य मिळाले,त्यांची पत्नी जयश्री त्यांनी मोठी जबाबदारी पेलली. कुठेही इव्हेंट घडवण्याचा उद्देश्य नव्हता, नाट्यसृष्टीने पुरस्कार द्यावेत, त्यानिमित्ताने सर्वजण एकत्र यावेत. पहाटेपर्यंत कार्यक्रम करावेत. कल्पकता, नावीन्य ह्यातून एकत्र येणे हे आम्ही सांभाळले. नाट्यदर्पण प्रतिष्ठानतर्फे आयोजन केले गेले. मार्केटिंग नव्हते ,हळूहळू जशी लोकप्रियता वाढू लागली,तस-तसे मदतीचे हात पुढे आले. पण कोणाचे दडपण, बंधन मानले नाही. संपूर्ण नाट्यसृष्टी तालमी करणे, परफॉर्मन्स करणे ह्याकरिता एकत्र येत होते. फिल्मफेअरप्रमाणे नाटक-क्षेत्रासाठी विविध पुरस्कार दिले जात होते. वर्षभर सर्व नाटके पाहण्यासाठी तज्ञांची समिती नेमली जात होती, त्यांचा निर्णय अंतिम असायचा खर्च वाढत गेला ,तसे त्यांनी बॅंका,एलआयसी,सरकार,काही उद्योगपती ह्यांच्याकडे आर्थिक पाठबळ मागितले,ते मिळत राहिले. छोटे -मोठे कलावंत मात्र कोणतेही मानधन हे घेता तालीम करून सहभागी होत होते. म्हणूनच हा रजनी हा घरगुती सोहळा वाटायचा, आजही अनेक कलाकार व रसिकांच्या मनात रजनीचे कार्यक्रम हे स्मरण-रंजनाचे साधन झाले आहे.

पुढील पंचवीस रजनीचे वैशिष्टय आणि वैविध्य – सतत पाच वर्षे सोळंकींचे सूत्रसंचालन होते, डॉ रांगणेकर लिखित -सुपर गोची (तेव्हा अच्युत वझेचे गोची गाजत होते), दिग्दर्शक शशिकांत निकते, लोकप्रिय गुंतता हृदय नाटकाचे लोकनाट्य -‘ काळीज माझे गुंतल ग ! थिएटर अकादमीने मर्ढेकरांचे ‘ बदकांचे गुपित’ सादर केले,चंद्रकांत काळे,माधुरी पुरंदरे वीणा देव (दिग्दर्शन -संगीत आनंद मोडक),१९७८ ची रजनी मात्र थेट षण्मुखानंद हॉलमध्ये ,डॉ रांगणेकर व दिग्दर्शक कमलाकर नाडकर्णी ह्यांचे ‘एक नाट्यदडपण’ शिवाय मत्स्यगंधा ते महानंदा असा अनोखी नाट्यसंगीत प्रवास.

अंध कलाकारांचा ‘गांधारी’ हा आविष्कार दिग्दर्शक- सुरेश खरे कुमार आनंद भाटे इथेच गायले व आनंद-गंधर्व उपाधी मिळवली. बाबासाहेब पुरंदरे- दारव्हेकर मास्तर ह्याचा बिनपात्री- माध्यान्हीचा काळोख, दिलीप प्रभावळकरांचे ‘नि:शब्द नाट्य’,यशवंत दत्त -शेरोशायरी, शन्ना नवरे , वाहतो ही कॉमेडीची जुडी! ‘सदाफुली म्हणजेच सुहासिनी मुळगावकर ह्यांनी खेळीमेळी कार्यक्रम केला. १९८७ ची रजनी चक्क धोबीतलाव येथील खुल्या नाट्यगृहात-रंगभवनात सादर झाली. इंग्रजी नाटके गाजवणारे भरत दाभोळकर प्रथमच रजनीत दाखल झाले त्यांनी ‘बॉटम्स अप’ पेश केले. बालगंधर्व जन्मशताब्दीनिमित्त ‘नमन नटवरा ‘ हा दृक-श्राव्य कार्यक्रम सादर झाला लेखन -संकल्पना अरुण आठल्ये आणि निवेदन श्रीराम लागू ह्यांचे होते.

पंचविसावी – अखेरची नाट्यदर्पण रजनी रंगभवनात रंगली, हजारोंचे स्नेहभोजन – त्या वर्षीचे सूत्र-संचालन प्रशांत दामले, मृणाल कुलकर्णी यांनी केले. अध्यक्ष होते वसंत बापट. प्रमुख पाहुणे बाळासाहेब भालेराव लाभले. त्या वेळी मान्यवरांना ‘नाट्यव्रती’ पुरस्कार देण्यात आले. बखर नाट्यदर्पणची ग्रंथाचे शानदार प्रकाशन झाले.
सुरेश खरे यांनी केलेला ‘रजनी अशी रंगली’ हा चोवीस वर्षे सादर झालेल्या रजनीचा चित्रफीतरुपी आढावा सादर केला गेला.

भैरवी व नि:शब्द भैरवी सादर झाल्यावर प्रेक्षकांनी कलाकारां समवेत स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला आणि’ या पंचवीस वर्षीय नाट्यदर्पण रजनीने सांस्कृतिक क्षेत्रातून कायमची ‘एक्झिट’ घेतली. नाट्यदर्पण रजनीच्या वाटचालीत सुहास कामत, प्रमोद लिमये,अरविंद भानू, सुहास वीरकर, अजितेम जोशी, हेमंत बट्टमवार, जयंत सहस्रबुद्धे, प्रमोद काळे, शिरीष केतकर,सुनीती काळे ,प्रभाकर जोगदंड,शेखर शेट्ये, गणपत शिवगण अश्या निष्ठावान कार्यकर्त्यांचा फारच मोठा वाटा होता. त्यांना सुधीर दामले म्हणजे दामलेकाका आणि जयश्री वहिनी ह्यांचे पाठबळ असायचे. सुधीर दामले यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

— राजीव माधव जोशी.

संकलन: संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4227 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..