नवीन लेखन...

सोनेखरेदीपूर्वी…

डिसेंबरअखेरपर्यंत चालणार्‍या सणासुदीच्या दिवसांमध्ये आपल्या देशात मोठ्या प्रमाणावर सोनेखरेदी केली जाते. ब्रॅंण्डेड बार्स, कॉईन्स आणि दागिन्यांच्या स्वरूपात ही सोनेखरेदी केली जाते. पण, आता गोल्ड इटीएफसारखे अधिक सुरक्षित आणि आकर्षक पर्याय उपलब्ध झाले आहेत. या पर्यायांचा उपयोग करावा असे तज्ज्ञांचे मत आहे.

नेहमी चांगला परतावा देणार्‍या सोन्याच्या बाजारपेठेविषयी.

दिवाळी आणि दसरा या दोन सणांना सोनेखरेदी झालीच पाहिजे, असा अनेकांचा आग’ह असतो. भारतीय संस्कृतीमध्ये सोन्याला महत्वाचे स्थान आहे. सोने म्हणजे केवळ गुंतवणूक असा विचार केला जात नाही. सोनेखरेदीला भावनिक, कौटुंबिक, सामाजिक आणि सांस्कृतिक असे अनेक संदर्भ असतात. मोठे आर्थिक संकट कोसळल्याशिवाय सोने विकायचे नाही, असा जण सामाजिक संकेतच आहे. या पार्श्वभूमीवर सोनेखरेदीकडे गुंतवणुकीचा पर्याय म्हणून पाहण्याची गरज आहे. वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या मते जून 2010 ला संपलेल्या वर्षात भारतीयांनी 755 टन सोने खरेदी केले. त्या वर्षी सोन्याच्या मागणीत 22 टक्क्यांची वाढ झाली. भारत आणि चीन या देशांमध्ये सोन्याला मोठ्या प्रमाणावर मागणी असते. सोन्याच्या मागणीत दर वर्षी 23 ते 24 टक्क्यांची वाढ होण्याची अपेक्षा असून त्यासाठी सोन्याच्या दागिन्यांची हौस हे सर्वात मोठे कारण ठरणार आहे. सोन्याच्या मागणीत वाढ झाल्यावर त्याची किंमतही वाढत जाईल. गेल्या चार-पाच वर्षांपासून सोन्याच्या दरांमध्ये दर वर्षी 24 ते 25 टक्क्यांची वाढ होत आहे. पुढील काही वर्षांमध्येही अशीच वाढ होत राहील असे तज्ज्ञांना वाटते.दिवाळीला विशेषत: धनत्रयोदशीला एक ग्रॅम तरी सोनेखरेदी करावी असा विचार अनेकजण करतात. सोने खरेदी करताना बरेचदा दागिने घेतले जातात, पण या दिवाळीला सोन्यात गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञ काय सांगतात याकडे लक्ष द्या. गुंतवणूक म्हणून सोनेखरेदी करायची असेल तर कोणताही मुहूर्त पाहण्याची गरज नाही. पण प्रत्यक्ष सोने खरेदी करताना इतर कोणते पर्याय उपलब्ध आहेत, याचीही माहिती करून घ्यावी. ब्रॅंडेड गोल्ड बार्स’, ‘कॉईन्स’ आणि ‘गोल्ड एक्स्चेंज ट्रडेड फंड्स’ (गोल्ड ईटीएफ) या पर्यायांचा विचार व्हायला हवा. या प्रकारच्या गुंतवणुकीतून अधिकाधिक परतावा मिळावा या हेतूला प्राधान्य द्यावे. यापैकी काही पर्यायांमध्ये विक्रीची प्रक्रिया काहीशी गुंतागुंतीची असते.

सोन्याच्या दरांमध्ये सातत्याने वाढ होत असते. त्यामुळे सोन्यातील गुंतवणूक काही काळाने नक्की चांगला परतावा देते. शिवाय शेअर्सप्रमाणे सोन्याचे दर अचानक कोसळत नाहीत. त्यामुळे त्यातील गुंतवणुक सुरक्षितही असते; परंतु सणासुदीच्या काळात सोन्याचे दर वाढतात, तसेच जुलै ऑगस्टमध्ये आणि पितृपक्षात हे दर काहीसे कमी असतात. म्हणून सणासुदीची वाट न पाहता दर कमी असताना सोनेखरेदी करणे योग्य ठरते. या क्षेत्रातील तज्ज्ञ सोने खरेदी करताना भावनांना फारसे महत्व देत नाहीत. सोन्यात गुंतवणुक करताना दागिन्यांना ते सर्वात कमी प्राधान्य देतात. गोल्ड इटीएफ, ब्रॅंडेड बार्स, कॉइन्स आणि त्यानंतर दागिने असा प्राध्यान्यक्रम ठरलेला असतो. गोल्ड इटीएफ प्रत्यक्ष सोनेखरेदीप्रमाणेच असतात. हवे तेव्हा विकता येत असल्याने गोल्ड इटीएफ हा पर्याय योग्य ठरतो. शेअर्सप्रमाणेच गोल्ड इटीएफ खरेदी करतानाही डिमॅट अकाउंट असणं गरजेचे असते. गोल्ड इटीएफचा पर्याय आकर्षक ठरण्याची अनेक कारणे आहेत. ‘झिरो स्टोअरेज’ किंमत, सोन्याच्या दर्जाची खात्री आणि गोल्ड इटीएफचे युनिट्स इंटरनेटवरून (ऑनलाईन) खरेदी करण्याची सोय ही या करणांपैकी महत्वाची कारणे आहेत. गोल्ड इटीएफमध्येही कमी ‘एक्स्पेंस रेशो’ आणि किमान ‘ट्रॅकिंग एरर’ असलेला फंड निवडावा. यात गुंतवणूक सल्लागार आपली मदत करू शकतो. प्रत्यक्ष सोनेखरेदीच्या तुलनेत गोल्ड इटीएफचा आणखी एक फायदा म्हणजे करबचतीच्या दृष्टीने हे फंड्स अधिक उपयोगी ठरतात. या फंडची खरेदी केल्यानंतर एका वर्षाने ती गुंतवणूक ‘लाँग टर्म कॅपिटल गेन्स’ मानली जाते. प्रत्यक्ष सोन्याच्या बाबतीत मात्र त्यासाठी गुंतवणूकदाराला तीन वर्षे वाट पाहावी लागते.स्टॉक्स आणि बाँड्स शहरी भागात तेही ठरावीक वर्गातच लोकप्रिय होत आहेत. परंतु, ग्रामीण आणि निमशहरी भागात मात्र अजूनही प्रत्यक्ष सोनेखरेदीलाच महत्त्व दिले जाते. पुढील काळात ग्रामीण भागात मोठी आर्थिक प्रगती अपेक्षित असून या भागात सोन्याच्या खरेदीचे प्रमाण वाढणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. अशा परिस्थितीत शहरी भागात गोल्ड इटीएफबद्दल झालेली जनजागृती ग्रामीण भागातही पोहोचू शकेल. सुटसुटीत आणि चांगला आर्थिक परतावा मिळण्यासाठी डोळे झाकून सोनेखरेदी करण्यापेक्षा त्यातील पर्यायांची माहिती घ्या आणि सारासार विचार करूनच अंतिम निर्णय घ्या.

— महेश जोशी
(अद्वैत फीचर्स)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..