” कूल डाऊन भांडारकर , कूल डाऊन ”
अशी कथेची सुरुवात केली आणि नंतर दोन दिवस , कथेचा एक शब्दसुद्धा लिहिला नाही .
म्हणजे लिहिताच आलं नाही काही .
पेन आणि पॅड हाती घेतलं की डोळे भरून यायचे .
अस्वस्थता यायची .
वाटायचं , हे कथानक आपण लिहायलाच हवं का ?
भांडारकर आणि त्यांची बायको राधा यांची मनःस्थिती उलगडायला हवीच का ?
बुद्धिमान असणाऱ्या , सातत्याने मेरीटमध्ये येणाऱ्या , विचारवंत असणाऱ्या , कुटुंबसंस्थेला जपण्यासाठी धडपडणाऱ्या , प्रवाहाविरुद्ध पोहणाऱ्या , काळाची पावले ओळखून त्याप्रमाणे स्वतःमध्ये बदल घडविणाऱ्या भांडारकरांच्या मुलाचं – विशालचं दुःख मांडायलाच हवं का ?
नोकरी मिळविण्यासाठी , लाखो रुपयांची लाच मागणाऱ्याना , विरोध करता न आल्यानं आणि गुणवत्तेची कदर न करणाऱ्या व्यवस्थेला , चार शब्द सुनवता न आल्यानं , हताश होऊन बळी पडणाऱ्या तरुणाईचं दुःख वेशीवर टांगायलाच हवं का ?
असे असंख्य प्रश्न माझ्या डोळ्यासमोर उभे राहत होते .
प्रश्नोपनिषद मनात वादळ निर्माण करीत होतं.
आजूबाजूला बळी पडणारी नवीन पिढी दिसत होती .
मध्यमवर्गीय कुटुंब व्यवस्था नोकरीच्या आशेनं कर्जबाजारी होताना आणि नंतर उद्ध्वस्त होताना दिसत होती .
सगळं वास्तव त्या प्रश्नोपनिषदातून मनाला हलवून टाकत होतं.
त्यामुळं कथेला शीर्षक सुचलं होतं .
प्रश्नोपनिषद
कथानक थोडं वेगळं होतं .
मध्यमवर्गीय तेव्हा मुंबईतून उपनगराकडे हाकलला जाऊ लागला होता .
भांडारकर असेच एक मध्यमवर्गीय .
कर्ज काढून उपनगरात ब्लॉक घेऊन , लोकलच्या रोजच्या गर्दीत स्वतः कणाकणानं मरायला झोकून देणारे .
विशालला नोकरीची संधी आलेली पण दीड लाखाची लाच मागितल्यानं तो हबकलेला .
पण नोकरी चांगली म्हणून भांडारकर त्यासाठी आणखी कर्ज काढतात .
ते पैसे दिल्यानंतर विशालकडे मॅनेजमेंटची पैशांची वाढीव मागणी होते .
वडिलांची ओढाताण तो पाहतो .
घरातील असेल नसेल ते विकून भांडारकर त्याला पैसे उपलब्ध करून देतात .
आणि विशाल जेव्हा ते द्यायला जातो तेव्हा त्याला कळतं की मेरीटमध्ये न बसणाऱ्याला , मॅनेजमेंटने जास्त पैसे घेऊन विशालला डावललंय .
तो उद्ध्वस्त होतो .
सगळं कुटुंबच उद्ध्वस्त होतं .
कथा इतकीच आहे .
पण मला त्यातून बरेच कंगोरे उलगडायचे होते .
व्यवस्था माणसाला , माणुसकीला , भावनांना संपवून टाकते .
क्षितीज भासमान असतं आणि ते कधीच हाती लागत नाही .
उमेद संपावणारी मंडळी आपल्या आजूबाजूला भरपूर असतात .
भरारी घ्यायला झेपावणाऱ्यांचे पंख छाटण्यात अनेकांना आसुरी आनंद मिळत असतो .
आणि एखाद्या घरातल्या तरुणाची आत्महत्या ही घरातल्या सगळ्यांना मानसिक , शारीरिक दृष्ट्या संपवून टाकणारी असते .
प्रश्नोपनिषद संवेदनशील माणसाला सैरभैर करून सोडते.
कथा लिहिताना मी याचा अनुभव घेतला .
सगळी कथा ठाणे रेल्वे स्टेशनवर घडते .
त्यामुळे आपल्याच नादात असणारी आणि सतत पळणारी गर्दी , कोलाहल , ओव्हरफ्लो होणाऱ्या लोकल्स , त्यात घुसण्यासाठी होणारी जीवघेणी कसरत , पोलिसांची , दांडगटांची अरेरावी , मग्रूर मस्तवाल रिक्षावाले , टोळ्यांनी हिंडणारे आणि नाडणारे तृतीयपंथी , त्यातच चिकाटीने व्यवसाय करणारे फेरीवाले आणि या सगळ्यात सतत मागे पडत जाणारे भांडारकर मला व्यवस्थित रेखाटता आले . स्टेशनवरच रेल्वेखाली आत्महत्या केलेल्या मुलाच्या आठवणीनं व्याकुळ होणारं त्यांचं मन आणि रेल्वेच्या रुळांची रक्तमाखली आठवण मांडता आली.
तिन्ही व्यक्तिचित्रे रेखाटताना वर्तमानातले अनेक संदर्भ उपयोगात आले .
स्टेशन हे स्थळ निवडल्याने एक प्रकारची गतिमानता आली .
व्यवस्थेतला पोकळपणा आणि समाजाची भावनाहीनता मांडता आली .
कथेच्या शेवटी , स्टेशनबाहेर बेरोजगारांचा मोर्चा निघालेला असतो आणि त्यातून दंगल सुरू झालेली असते .
घरी जाण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या भांडारकराना , दंगलीतील इसम म्हणून पोलीस बेदम मारहाण करतो .
आणि ते निपचित पडल्यावर कर्तव्य केल्याच्या समाधानात पोलीस निवांत होऊन तंबाखू मळू लागतो .
इथे कथा संपते .
आणि प्रश्नोपनिषद खऱ्या अर्थाने सुरू होते …
– डॉ . श्रीकृष्ण जोशी , रत्नागिरी
८९५१९०६७०१
माझ्या एका कथेची ही जन्मकथा आहे .
सन २००० च्या महाराष्ट्र टाइम्स च्या दीपावली अंकात ती प्रसिद्ध झाली होती .
आवडल्यास नावासह सर्वदूर पाठवायला हरकत नाही


Leave a Reply