नवीन लेखन...

सिंहगड ते रायगड – ट्रेक – भाग २

राजगड – तोरणा -वेल्हा- मोहरी

काल रात्री आमचा मुक्काम मुख्य कॅम्प पासून थोडा दूर राजगडावरील बारूदखान्यात होता. रोज दमायला एवढ होत असे की कोणत्याही ठिकाणी लगेच झोप लागायची. बरोबर पहाटे चार वाजता आम्हाला इन्स्पेक्टर यादव बेड टी साठी बोलवायला आले. राजगडाच्या त्या कडाक्याच्या थंडीत बेड टी हवाच होता. त्या थंडीत झटपट आवरून तयार होणे म्हणजे एक दिव्य होते. त्यातून  आज थंडीच्या जोडीला बोचरे वारे पण सुटले होते. तरी पण आम्ही सर्व जण आवरून वेळेवर  तयार होतो.  नंतर नाश्ता चहा झाला. पैक लंच घेऊन आम्ही राजगडाचा निरोप घेतला त्यावेळी साडेसहा वाजले होते. अजुन सूर्यास्त व्हायचा होता. आम्ही काल ज्या वाटेने संजीवनी माचीवर गेलो होतो आज  त्याच अवघड वाटेने परत एकदा गडाच्या संजीवनी माचीच्या दिशेने आमची पावलं पडू लागली. फरक एवढाच की काल आमच्याजवळ कोणता ओझं नव्हत तर आज पाठीला सैक आणि हातात वाटर बैग. थोडा वेळाने आम्ही माचीवरल्या अळू दरवाजाने राजगड किल्ल्यातून बाहेर पडलो. राजगडाची संजीवनी माची आणि तोरण्याची बुधला माची यांना जोडणारी जी एक डोंगर सोंड आहे त्या वाटेवर जाण्यासाठी जी वाट आहे त्या वाटेपाशी आलो आणि सर्व जण थबकले. कारण ही वाट म्हणजे प्रचंड अशा उताराची गुळ गुळीत छोटे दगड असणारी घसरगुंडीची  होती. वाटेवर आधारासाठीअगदी झुडूप देखील नव्हते. ऐन थंडीत पण ती वाट पाहुन अनेकांना घाम फुटला. कारण वाटेवर पाय ठेवला तर घसरायला होत होते. तिरके पाय टाकत तोल सांभाळत ती वाट उतरणे म्हणजे एक दिव्य होते. या वाटेवर कॅम्प लीडर्स आणि आमच्यातले काही यांनी खूप मदत केली.मुलींच्या आणि काही मुलांच्या सैक, वाटर बैग वेगळ्या खाली नेण्यात आल्या. त्यामुळे त्यांना वाट पार कारण सोप गेलं. मला ही वाट उतरताना तोल जाऊन पडू अशी मनात थोडी भीती वाटत होती, पण प्रत्यक्ष वाट उतरताना फार त्रास झाला नाही. सर्वजण सुरक्षित पणे वाट उतरले. ती वाट उतरताच आम्ही आता गडा पासुन दूर सपाट जागी आलो.मागे वळून पाहिले तर  राजगड मोठ्या  दिमाखात चमकत होता.त्याच्या कडे पाहताना मन भरून येत होते.

आम्ही राजगडाचा निरोप घेत त्या डोंगर सोंडेवरून  तोरण्याच्या दिशेने निघालो. ही वाट तशी सोपी होती पण संपता संपत नव्हती. आम्हाला अशी सूचना होती की कोणत्याही परिस्थितीत मुख्य वाट सोडायची नाही. कारण मुख्य वाटेतून  अनेक छोट्या छोट्या वाटा फुटल्या होत्या त्यामुळे चुकण्याची शक्यता होती. आमच्या वाटेवर अनेक ठिकाणी दगडांवर खडूने  YHA असे मार्किंग पाहायला मिळत होते.त्यामुळे वाट चुकण्याची शक्यता कमी होती. आजू बाजूला कारवीचे गच्च रान माजले होते. स्लाईड शो मधे असे विधान ऐकले होते की एक वेळ हिडींबेच्या डोक्यातील उ सापडेल पण या वाटेत हरवलेला हत्ती सापडणार नाही. थोडक्यात काय सर्वांनी ग्रुप मधे मुख्य वाट न सोडता चालणे श्रेयस्कर आणि शहाणपणाचे होते.

परत एकदा चालणाऱ्यांचे ग्रुप पडले. ग्रुप लीडर देवळे,हेमंत दामले, श्रीरंग करंदीकर, मुंबईचे पोलीस इन्स्पेक्टर यादव आणि मी नेहेमी प्रमाणे आघाडीवर होतो. यादव यांनी तर या आधी दोन वेळा हा ट्रेक केला होता आता परत तिसऱ्यांदा आले होते त्यामुळे त्यांना बरीच माहिती होती. त्यांची थिअरी अशी की वर्षातून एकदा हा ट्रेक केला की आपली तब्यत ठणठणीत राहते. ते आम्हाला त्यांचे पोलीस खात्यातील अनुभव पण सांगत होते. त्यामुळे कंटाळा येत नव्हता.

आम्ही चालत होतो ती वाट अवघड नसली तरी संपता संपत नव्हती. आमच्यातील स्लो चालणारे बरेच मागे राहिले होते. अर्थात त्यांना सांभाळून आणण्याला दुसरे ग्रुप लीडर रानडे त्यांच्या सोबत होते. आम्ही अधून मधुन थांबून विश्रांती घेत होतो, गप्पागोष्टी करीत होतो. थोड्या वेळाने आम्हाला तोरण्या किल्ल्याचा बुधला दूरवर  दिसु लागला. आम्हाला बुधला माचीतून तोरणा किल्ल्यात प्रवेश करायचा  होता. साधारण बाराच्या तळपत्या उन्हात आम्ही बुधल्यापाशी पोचलो. जवळ जवळ पाच सहा तास चाल झाली होती. आमच्या अंगातून घामाच्या धारा वाहत होत्या. जवळ पोचताच बुध्ल्याचा कठीण पण आमच्या लक्षात आला. जमिनीशी ९० अंशाचा कोण करणारी ती काळ्या दगडांची कठीण वाट प्रस्तारोहण करूनच चढावी लागणार होती. त्याला  युथ होस्टेल चे स्वयंसेवक त्या वाटेवर मार्ग दर्शनासाठी,धीर देण्यासाठी उभे होते. थोड्याच वेळात देवाचे नाव घेत आम्ही बुधला चढू लागलो. स्वयंसेवक सांगत होते त्या दगडांच्या खोबणीत हात टाकून शरीर वर उचलून घेत आम्ही बुधला चढत होतो. राजगडाचा बालेकिल्ला चढल्यामुळे थोडा आत्मविश्वास होता. मात्र स्वयंसेवक योग्य मार्गदर्शन करीत होते. थोड्याच वेळात आम्ही बुधला माचीवर आलो. मागे वळून पहिले तर राजगडावरून तोरण्याकडे आम्ही ज्या वाटेवरून आलो ती खूप मोहक दिसली. आमच्यातील स्लो चालणारे चांगलेच दमलेले दिसत होते. हळू हळू पावलं टाकत ते येताना दिसत होते. आमचे दुसरे ग्रुप लीडर रानडे त्यांच्या सोबत होते. त्यातच आमच्या तुकडीतील एक मुलगी सरिता, बुधल्याच्या पायथ्याशी भोवळ येऊन पडल्याच कानावर आलं. आता हे लोक एवढी अवघड वाट चढून कसे वर येतील याची चिंता वाटू लागली.

आम्ही आधीच उन्हाने हैराण झालो होतो, प्रचंड दमलो होतो. तरी पण कोणी तरी सुचवलं की आपण बुधला माचीवर पाण्याचा शोध घ्यावा कारण बहुतेकांकडील पाण्य्याचा साठा संपला होता. इथे यादव मदतीला आले. त्यांनी दाखवलेल्या तलावातून आम्ही पाणी भरून घेऊन आलो आणि मागून येणाऱ्या आमच्या तुकडीतील मित्र मैत्रीणीना पाण्याची सोय करून दिली. थोड्याच वेळात सरीतासकट सर्व जण बुधला चढून आले. आणि आम्ही निश्वास सोडला. आम्ही केलेली पाण्याची सोय सर्वांनी नावाजली.

त्यानंतर बुधला माचीवरून आम्ही गडाच्या दिशेने चालू लागलो. दोन्ही बाजूला खोल दरी आणि मध्यभागी असणाऱ्या चिलखती बुरुजावरून आम्ही चालत होतो. वाट काही संपत नव्हती. तोरणा आपले प्रचंड गड हे नाव सार्थ करीत होता. अखेर आम्ही तोरण्याचा दरवाजा गाठला आणि धन्य वाटले. आम्ही तोरणा गाठला होता. झुंजार बुरुजाकडे जाणाऱ्या वाटेवर असणाऱ्या तोरणेश्वर या शंकराच्या मंदिरात बसून आम्ही जेवण उरकले. जेवण झाल्यावर थोडावेळ मंदिरातच विसावलो.त्यानंतर तोरणा गड पाहण्याचा कार्यक्रम होता. आमच्या तुकडीतील काही शिलेदार दामले होते त्यांनी देवळातच आराम करण्याचा निर्णय घेतला आणि आम्ही बाकी लोक तोरणा गड पाहायला निघालो.

 तोरणा हा शिवाजी महाराजांनी घेतलेला पहिला किल्ला.हा किल्ला घेऊन त्यांनी स्वराज्याचे तोरण बांधले असे म्हटले जाते. समुद्र सपाटीपासून याची उंची ४६०३ फुट आहे.या गडाचा विस्तार प्रचंड आहे त्यामुळे या गडाला प्रचंडगड असे नाव पडले. त्यानंतर आम्ही मेंगाई देवीचे प्राचीन मंदिर बघितले. तोरण्यावर मुक्कामाला येणारी मंडळी या देवीच्या देवळात मुक्काम करतात. त्यानंतर आम्ही तोरणजाई देवीचे एक छोटेसे मंदिर पाहिले असे म्हणतात याच जागी शिवाजी महाराजांना मोहरा सापडल्या त्याचा वापर राजगड सारखा बुलंद बेलाग किल्ला बांधण्यासाठी महाराजांनी केला.  त्यानंतर आम्ही झुंजार माची पाहायला गेलो. ही वाट तशी कठीण असल्याने आम्ही प्रत्यक्ष माचीवर गेलो नाही. गडाची दुसरी माची बुधला माची ती तर पाहुनच आम्ही गडात प्रवेश केला होता. गडावर बालेकिल्ला म्हणतात अशी एक उंच जागा आहे पण केवळ अवशेष आढळतात.गडावरून राजगड, सिंहगड, रायगड, लिंगाणा, पुरंदर आदी किल्ले न्याहाळता येतात. मुळात या गडाचा पसारा एवढा आहे की सर्व गोष्टी नीट न्याहाळून पहायच्या झाल्या तर एक दिवस पण पुरणार नाही. एकतर राजगड पासुन एवढी मजल मारल्यामुळे आम्ही तसे थकलो होतो आणि तोरणा उतरून पुढल्या मुक्कामी वेल्हा इथे जायचे होते. त्यामुळे तोरणा पाहुन झाल्यावर थोडी विश्रांती घेऊन आम्ही वेल्ह्याला जायला निघालो. तोरणा गडाच्या पायथ्याशी वेल्हा हे गाव वसलेले आहे. गडाच्या बिनी  दरवाजातून आम्ही गड उतरू लागलो. इथे रेलिंग सकट मोठ्या दगडी पायऱ्या आहेत.पायऱ्या तशा उंच आहेत आणि डोळे फिरवणारा उतार आहे. खाली उतरताना थोडे जपून उतरावे लागते, आधारासाठी रेलिंग आहे. पायऱ्या उतरून आल्यावर एक तशी सोपी पण वळणा वळणाची उतरणारी पाउलवाट लागली. वाट खूपच सोपी होती. उतार असल्याने श्रम पण जाणवत नव्हते. मागे वळून पाहिल्यावर प्रचंड गडाची उंची जाणवत होती. थोड्याच वेळात ती नागमोडी पाऊलवाट चालून आम्ही वेल्ह्यात पोचलो.

वेल्हा हे पुणे जिल्ह्यातील एक तालुक्याचे गाव आहे. आज पाच दिवसानंतर डांबरी सडक, माणसांची वर्दळ, बाजार, एखादी शासनाची बस अशा  गोष्टी पाहत होतो. गेले पाच दिवसात आमचा धकाधकीच्या जीवनाशी असलेला संपर्क  पूर्णतःतुटलेला होता. आम्ही निसर्गाच्या सान्निध्यात आणि शिव्स्मृतींशी निगडीत वातावरणात पूर्णतः रमलो होतो.

डांबरी सडक तुडवत  थोड्याच वेळात आम्ही वेल्हा कॅम्प वर पोचलो. आता साडेसात वाजत आले होते. बारा तासाहून अधिक चाल झाली होती ती पण दमवणारी. वेल्हा कॅम्प ने आमचे स्वागत कांदा भाजी आणि चहा यांनी केली.त्याची आम्हाला आवश्यकता होतीच. दोन्ही गोष्टी खूप छान होत्या. श्रम परिहार झाला. वेल्हा कॅम्प चे वातावरण अतिशय प्रसन्न वाटले. आमची रहायची व्यवस्था पण एका इमारतीच्या ऐसपैस अशा व्हरांड्यात केली होती. वेल्ह्यात कोणालाच टेंट मधे झोपावे लागले नाही. जेवण पण खूप टेस्टी आणि कॅम्प फायरला पण खूप मजा आली.

 वेल्ह्यात अर्धा ट्रेक पूर्ण होतो. ज्याला कोणाला काही अडचण असेल  किंवा कोणत्याही कारणासाठी पुढे येणे झेपणार नसेल त्याला  ट्रेक इथे संपवण्याची सोय. वेल्ह्यातून त्याला पुण्याला परतण्याची सुविधा दिली गेली होती. आमच्या तुकडीतील दोन मुली आणि दोन मुलगे अशी चार मंडळी यांनी इथून परत जायचा निर्णय घेतला.राजगड तोरणा अशी दौड मारूननंतर तोरणा बघुन वेल्ह्यात पोचायला आम्हाला बारा तासांहून अधिक वेळ लागला होता. दिवसभराच्या श्रमाने आम्ही एवढे दमलो होतो की कॅम्प फायर झाल्यावर आम्ही अंथरुणावर अंग टाकले आणि क्षणार्धात झोपेच्या अधीन झालो…….

वेल्ह्यातील ती सकाळ फारच आल्हाददायक होती. बरेच दिवसांनी दगड धोंड्यात न झोपता सपाट अशा व्हरांड्यात झोपल्यामुळे झोप खूपच छान झाली तसेच थंडीचा त्रास पण कमी जाणवला. बेड टी घेऊन आम्ही काही उत्साही मंडळी गावातून फेर फटका  मारण्यासाठी बाहेर पडलो. गाव हळू हळू जागा होत होता. आम्हाला गावातून त्या सकाळी फिरताना खूप प्रसन्न वाटत होत.आमच्या तुकडीत एक सातारचे बॉडी बिल्डर होते.त्यांना सर्व पेहेलवान असे म्हणत. ते खूप शांत होते. मला आता त्यांच नाव आठवत नाहीये. त्यांनी कोणाला तरी गाठून धारोष्ण दुध मिळवलं.त्यांच्या बरोबर आम्ही सर्वांनी पण दुधाचा आस्वाद घेतला. त्यानंतर आम्ही आमच्या कॅम्पवर परतलो. नाश्ता चहा झाला. आतापर्यंतच्या कॅम्पच्या तुलनेत  वेल्ह्यातील नाश्ता व चहा पण खूप लज्जतदार होता. सर्वानीच त्याची तारीफ केली.

वेल्हा कॅम्प सोडून पुढील वाटचाल करण्यापूर्वी आम्ही आमच्या तुकडीतील परत जाणाऱ्या चौघांचा निरोप घेतला. गेले पाच दिवस आमच्या बरोबर असणारे साथीदार आता नसणार म्हणुन थोडं वाईट पण वाटलं. या पाच दिवसात आम्ही सर्व एकमेकांच्या खूप जवळ आलो होतो. बरोबर ८.३० वाजता आम्ही वेल्हा सोडलं आणि डांबरी सडक चालू लागलो. वेल्हा हे तालुक्याचे ठिकाण असल्याने रस्त्याला वर्दळ होती. अधून मधुन एखादी शासनाची बस दर्शन देत होती. बाजार पेठ होती. मंडळी दुकानातून बिस्किट्स व इतर खाद्यपदार्थ घेऊन पुढच्या प्रवासाची तरतूद करत होती. कारण आता परत पुण्याला पोचेपर्यंत आम्हाला शहराचं दर्शन होणार नव्हत. गावची हद्द संपेपर्यंत वेल्हा कॅम्पचे लीडर्स आम्हाला सोडायला आले होते. थोड्याच वेळात डांबरी सडक संपून एक कच्चा रस्ता लागला. आता उन जाणवू लागले होते. आता सर्व जण साधारणपणे एकाच स्पीडने चालत होते. सर्वात पुढे इन्स्पेक्टर यादव, करंदीकर दामले आणि मी होतो. सात आठ किलोमीटर अंतर कच्च्या रस्त्याने तुडवल्यावर थोडे विसावलो. नंतर एक छोटासा ओढा लागला. आम्ही तिथे पाणी भरून घेतले. नंतर एका छोट्या पाऊलवाटेला वळलो. नागमोडी छोटीशी पाउलवाट बाजूला गर्द झाडी. ज्यास्त चढ उतार नाही. चालायला तशी सोपी वाट. वाटेच्या दुतर्फा कमरेएवढ्या उंचीची फुलझाडे आणि कारवीचे रान. आतापर्यंत चाललेल्या वाटेत ही वाट बरीच सोपी वाटली. अखेर पाच तास वाट तुडवल्यावर आम्ही मोहरी या छोट्याशा खेडेगावात पोचलो. थोड्याच वेळात आम्हाला एक पठार दिसायला लागले. तेच होते आम्ही मुक्काम करणार होतो ते मोहरीचे पठार. आता दुपारचा एक वाजून गेला होता.कडक उन्हामुळे घामाघूम व्हायला झाले होते.पठाराच्या सुरवातीला एक छोटीशी घुमटी लागली. दूरवर टेंट दिसत होते. टेंटच्या बाजूला भगवा फडकत होतो. वास्तविक देवळापाशी कोणीतरी कॅम्प लीडर आम्हाला स्वागत करायला यायला हवा होता. तो का आला नसावा याचे आश्चर्य करीत आम्ही मैदान तुडवत टेंटच्या दिशेने निघालो. टेंट पाशी पोचायला आम्हाला पंधरा मिनिटे लागली. मी रानडे यादव टेंट मधे घुसलो तेव्हा टेंट मधे झोपलेला मोहरी कॅम्प लीडर जागा झाला आणि म्हणाला “वेलकम टू मोहरी” त्याचे ते तसे वेलकम पाहुन आम्हाला हसू आवरेना. आता आमच्या मागे बाकी तुकडी पण आली होती. नंतर सर्व खुलासा झाला. पुण्यातून निघालेली आमची  तुकडी नंबर ३ होती. याच्या आधीच्या दोनही तुकड्या मोहरीला संध्याकाळी ६.३० च्या आधी आल्या नव्हत्या, आणि  आमची सर्व तुकडी १.३० वाजता हजर झाली होती. आमच्या सर्वांच्या मना अभिमानाने ताठ झाल्या.आम्ही मोहरीला लवकर पोचण्याचा उच्चांक गाठला होता.

विलास गोरे
९८५०९८६९३४

Avatar
About विलास गोरे 22 Articles
मी आय डी बी आय बँकेत एन पी ए विभागात (कर्ज वसुली) व्यवस्थापक पदावर काम करतो, मला ३५ वर्षाहून अधिक काळ बँकेच्या विविध विभागात काम करण्याचा अनुभव आहे, मी कॉमर्स पदवीधर असून कायद्याचा अभ्यास पण पूर्ण केला आहे (B, COM , L L B). मी शेअर मार्केट मध्ये नियमित गुंतवणूक करतो व शेअर मार्केट व इतर investment चा मला २५ वर्षाहून अधिक अनुभव आहे. मला हिंदी चित्रपट संगीत, मराठी साहित्य, किल्ल्यांवर भटकंती तसेच इतर पर्यटन याची आवड आहे.मी काही कथा , लेख,व्यक्तिचित्रण लिहू इच्छितो.
Contact: YouTube

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..