नवीन लेखन...

श्रीयुत विसरभोळे

“एक वेळ पोलीस होऊन पहा, मग त्याची काय अवस्था असते, त्याचा अनुभव येईल. ” मी जीव तोडून सांगत होतो, पण समोरचा ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता.

त्याचा एकच हेका होता, “साहेब तुम्ही मला मुर्ख समजता का? बावळट समजता? आम्ही तुमच्याकडे तक्रार घेउन येतो आणि तुम्ही आम्हालाच ज्ञान शिकवता?

मी शांतपणे हाताची घडी घालून ऐकत होतो. मी, माझ्यातील पोलिसाला शांत बसण्याचा आदेश दिला होता.

साधारण १९९४ सालातील हा प्रकार असावा. १९९३ मधील साखळी बॉम्बस्फोट, बाबरी मस्जिद दंगल अशा अनेक घटनांची मालिका चालू होती. आणि पोलीस खात्यातील शिपायापासून ते महासंचालकापर्यंत सर्वजण बंदोबस्तामध्ये आणि गुन्हे तपासामध्ये व्यस्त होते.

तसं पाहिलं तर पोलीस खातं हे बाराही महिने चोवीस तास कसल्या ना कसल्या तरी बंदोबस्तात व्यस्त असतंच. पोलिसांना बंदोबस्ताला जाण्यासाठी काही कारण लागतंच असं काही नाही.

कोणत्याही वेळी आणि कशासाठीही बंदोबस्त करावा लागतो. पोलीस खात्यातील जवानांना बंदोबस्ताची आणि तपासाची सवयच लागलेली असते. अगदी खाजगी हौसींग सोसायटीची सभा असो नाहीतर देश पातळीवरील नेत्याची सभा असो, मोर्चा, बंद उपोषण हे तर पोलिसांच्या पाचवीला पुजलेले असतात. अशा अनेक प्रकारच्या घडामोडी चालू असतांना जनतेला मात्र पोलीस चोवीस तास रस्त्यावर उभा दिसावा लागतो.

आणि रस्त्यावर दिसला तरी त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन काय असतो कसा असतो, हे मी सांगण्याची गरज नाही.

तर मी असाच वीस वर्षापूर्वी ठाण्याला एका पोलीस ठाण्यात होतो. मार्च महिना सुरु झाला होता. साधारण मराठी वर्षाची सुरुवात झाली म्हणजे वेगवेगळे सण, उत्सव, यात्रा यांची चंगळ असते. मी मुद्दाम ‘चंगळ’ हा शब्दप्रयोग केला, कारण जनतेसाठी हा चंगळवाद म्हणजे आनंद घेण्याची, मजा करण्याची वेळ असते आणि पोलीस मात्र बंदोबस्त करतांना जनतेच्या चेहऱ्यावरील आणि डोळ्यातील आनंद पाहून त्यातच आनंद मानत असतो. पोलिसांना इतरांच्या म्हणजे जनतेच्या आनंदातच आपला आनंद मानून काम करावं लागतं.

रविवारचा दिवस होता. इतर शासकीय बिगर शासकीय खात्याला रविवार सुट्टीचा दिवस असतो. ते सर्व लोक आपापल्या कुटुंबियांत रममाण झालेले असतात.

काही कुटुंबियांसह विक- एंड साजरा करण्यासाठी पिकनिक पॉईंटला जातात. काहीजण कुटुंबियासह नातेवाईकांकडे जातात किंवा मित्रांना घरी बोलावून एखाद्या पार्टीचे आयोजन करतात. याही पलिकडे काही लोक आठवडाभर काम केल्यामुळे रविवारचा दिवस आराम करण्यात घालवतात.

मतितार्थ एकच. जो-तो आपापल्या परीने आनंद घेत असतो, मजा करत असतो आणि यासर्व वरील बाबींपासून अलिप्त असलेला आणि इच्छा असूनही कुटुंबियांसोबत न राहणारा एक प्राणी आहे, तो म्हणजे ‘पोलीस.’ हो. मी मुद्दाम ‘प्राणी’ हा शब्दप्रयोग केला. जसा मानवप्राणी असतो, तसा हा मानवप्राण्यामधील एक वेगळा, त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन निराळा असलेला प्राणी म्हणजे ‘पोलीस.”

मी असाच रविवारच्या दिवशी एका पोलीस ठाण्यात कार्यरत होतो. रविवारचा दिवस असल्याने तसा कोणता महत्त्वाचा बंदोबस्त नव्हता. पण सकाळपासून एक-दोन घरफोडीच्या घटना घडल्या होत्या.

मी आणि माझ्या बरोबरच्या सहकाऱ्यांनी सकाळपासून घरफोडी झालेल्या ठिकाणी जाउन त्यांच्या तक्रारी दाखल केल्या होत्या. वरिष्ठांना माहिती देउन तपास सुरु केला होता. एव्हाना दुपारचे दोन वाजून गेले होते. मी आणि माझे हवालदार सोनार पोलीस ठाण्यात परत आलो. येऊन खुर्चीत बसलो.

“साहेब, दोन वाजून गेलेत, जेवण करताय ना? ” माझा ऑर्डर्ली चव्हाण यानं मला विचारलं.

“होय चव्हाण, चल, सोनार हवालदाराला बोलाव, ” असं म्हणत मी खुर्चीवरुन उठलो.

पोलीस स्टेशनसमोर एक गृहस्थ त्यांची स्कुटर पार्क करुन धावत माझ्या समोर आले. त्यांच्या चेहऱ्यावरुन ते घाबरलेले दिसत होते व चिंताग्रस्तही वाटत होते. मी खुर्चीत बसत म्हणालो,

“या. आत या… बसा.

“साहेब नमस्कार”, ते म्हणाले.

“नमस्कार.” मी त्यांना प्रतिनमस्कार करुन त्यांना बसायला सांगितलं.

“बोला, काय समस्या आहे? काय झालं? ” मी विचारलं.

“साहेब, जरा पाणी मिळेल का? ” त्या गृहस्थानं विचारलं. त्याबरोबर माझ्या एका सहकाऱ्याने पाण्याची बाटली आणून दिली. त्या गृहस्थाने जवळजवळ अर्धी बाटली पाणी पिऊन, बाटली खाली ठेवून, रुमालाने तोंड पुसले व कपाळावरील घाम पुसून रुमाल खिशात ठेवला.

त्या गृहस्थाच्या हालचाली मी बारकाईने निरखत होतो. तो मध्यमवर्गीय कुटुंबातला गृहस्थ, साधं राहणीमान. परंतु शरिराच्या हालचालींवरुन थोडासा वेंधळा वाटत होता.

“साहेब,” त्याच्या आवाजाने माझी तंद्री भंग पावली.

“बोला, मिस्टर काय झालं?” मी विचारलं.

‘साहेब…. मी………….,” त्याने स्वत:च सांगून बोलण्यास सुरुवात केली.

“साहेब, मी एका बँकेत कॅशिअर म्हणून काम करतो. माझी पत्नी सुध्दा एका खाजगी कंपनीत काम करते. आम्ही मुलूंडला राहतो.”

“बोला, काय घडलंय ते सांगा,” मी म्हणालो.

“साहेब, मी आणि माझी पत्नी आज सुट्टी असल्याने घरीच होतो. दुपारी एक वाजता जेवण झाल्यानंतर आम्हाला माझ्या एका मित्राच्या घरी ठाण्याला जायचे होते. दुपारी जेवण करुन मी आणि माझी पत्नी घरातून बाहेर पडलो. ती वेळ साधारण दिड वाजण्याची होती.” त्या गृहस्थाने थोडा वेळ थांबून एक दिर्घ श्रास घेतला व पुन्हा बोलू लागला.

“साहेब, मी आणि माझी पत्नी बिल्डींग मधून खाली बोलत आलो. मी माझी स्कुटर स्टॅन्डवरुन काढली. माझी पत्नी मागे बसली. आणि आम्ही दोघे बोलत बोलत हायवेने येत होतो. नितिन कंपनी सिग्नलजवळ स्कुटर हळू केली. त्यावेळी मी मागे वळून पाहिले. तर स्कुटरवर माझी पत्नी नव्हती. मी स्कुटर थांबवून पाहिलं.

साहेब, मी माझी पत्नी कोठेतरी पडली असावी म्हणून मी पुन्हा मुलूंड चेकनाक्यापर्यंत जाउन रोडला शोधून आलो. परंतु कुठेच माझी पत्नी सापडली नाही. साहेब, लवकर काहीतरी करा.” ते गृहस्थ म्हणाले.

“ठिक आहे, तुम्ही मला सांगा, तुम्ही घरातून दोघेजण बरोबर निघाला होता? ” मी विचारलं.

ते गृहस्थ रागाने लाल होवून म्हणाले,

“तुम्ही काय मला मुर्ख समजता की बावळट? ”

“अहो, मला तसं नाही म्हणायचं, कदाचित तुम्ही आला असाल बरोबर,

पण……

मला पुढे बोलू न देता ते मध्येच अडवत म्हणाले.

“पण …… पण…… म्हणजे तुम्हाला काय म्हणायचे आहे? माझी बायको माझ्याबरोबर आलीच नव्हती? ” ते गृहस्थ बऱ्यापैकी गरम होउन बोलत होते. “तुम्ही पोलीस लोक आमची तक्रार ऐकून न घेता अगोदरच तुमचं मत प्रदर्शन करता, हे बरोबर नाही.

मी आता शांतपणे त्यांचं बोलणं ऐकत होतो. ते बोलून झाल्यावर माझ्याकडे पहात म्हणाले, “साहेब, काही हालचाल करणार आहात की, हाताची घडी घालून माझ्याकडे बघतच बसणार आहात? ”

“तुमचं बोलून झालं असेल आणि मी काय बोलतो हे तुम्ही ऐकणार असाल, तर बोलतो.’

“अहो बोला, विचारा काय विचारायचं ते.” गृहस्थ म्हणाले.

‘आपण असं करुया, तुमच्या घरी फोन आहे का? ” मी विचारलं.

“हो, आहे. पण घरी फोन करुन काय उपयोग? मी व माझी बायको दोघेही एकत्रित बाहेर पडलो आहोत” ते गृहस्थ म्हणाले.

“तुमचं म्हणणं पटतयं मला, पण एक फोन करुन खात्री करायला काय हरकत आहे? ” मी म्हणालो.

“म्हणजे मी खोटं बोलतोय, असं तुम्हाला म्हणायचं आहे का? ” ते गृहस्थ आता खूपच चिडून बोलत होते.

ते पोलिसांवर चिडत होते, ते त्यांच्या पत्नीवरील प्रेमापोटी चिडले होते. आम्हा पोलिसांना नियमितपणे असे लोक भेटत असतात. ते कधी चिडतात, कधी शिव्याही देतात, अगदी निषेध व्यक्त करतात, पोलिसांना असं चिडून, वैतागून चालत नाही. पण असे काही लोक पोलीस ठाण्यात आले म्हणजे कधी कधी परिस्थितीनुसार व व्यक्तीपरत्वे कडक व्हावं लागतं. पण जास्त वेळ कडक शिस्त ठेउन चालत नाही.


हे इ-पुस्तक खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. 
https://marathibooks.com/books/ghar-haravalela-police-by-vyankat-patil/

लेखक : व्यंकट पाटील (सेवानिवृत्त सहाय्यक पोलिस आयुक्त, मुंबई पोलिस)
प्रकाशक : मराठीसृष्टी / Marathisrushti
किंमत : रु. १००/-
सवलत किंमत : रु. ५०/-


मी चव्हाण आणि सोनार हवालदार यांना काही सूचना देउन त्या गृहस्थाबरोबर पाठवून दिले. ते गृहस्थ ज्या मार्गावरुन आले होते, त्या मार्गावरील व आजुबाजूच्या परिसरातील दवाखाने, मोठी हॉस्पीटल्स इत्यादी ठिकाणी मी स्वत: फोन करुन खात्री केली. परंतु अशी कोणीही महिला जखमी स्थितीत किंवा आजारी असल्याच्या कारणासाठी आलेली असल्याचे आढळून आले नाही. मी जवळपासच्या पोलीस स्टेशनला फोन करुन वरील महिलेचे वर्णन देवून अशी कोणी महिला मिळाली किंवा तिचेबद्दल काही माहिती मिळाल्यास देणेबाबत संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना विनंती केली. या सर्व गडबडीत तास दिड तास कसा गेला हे समजलंच नाही.

चव्हाण हवालदारनं केबीनमध्ये टेबलावर ठेवलेल्या जेवणाचा मला विसर पडला होता. मघापासून कामात व्यस्त असल्यामुळे खाण्याकडे लक्ष नव्हतं. पण आता थोडी उसंत मिळाल्याबरोबर पोटात ओरडत असलेल्या कावळ्यांची जाणीव झाली. परंतु मी एकटाच होतो.

चव्हाण आणि सोनार यांच्या शिवाय एकट्याने जेवणं माझ्या संस्कृतीत बसत नव्हतं. शिवाय मनालाही पटत नव्हतं. मी तसाच विचार करत बसलो होतो. साधारण चार वाजता चव्हाण व सोनार हवालदार आणि ते गृहस्थ सर्व ठिकाणी शोध घेउन परत आले होते.

त्या गृहस्थांकडे पहात मी विचारलं,

‘काय साहेब? झालं का तुमच्या मनाचं समाधान? ”

“अहो समाधान कसलं घेवून बसलाय साहेब,? इथं माझा जीव टांगणीला लागला आहे.” ते म्हणाले.

“सर, या माणसाचं काहीही ऐकू नका, तुम्ही एक फोन यांच्या घरी करुन तर बघा.” सोनार हवालदार म्हणाले.

“म्हणजे इथून तिथून सगळे पोलीस सारखेच म्हणायचे तर, मघापासून साहेब, घरी फोन करा असे म्हणत होते. आता हे हवालदार …. तुम्हीपण मला वेडा समजताय का? ” ते पुन्हा चिडून म्हणाले.

“अहो मिस्टर चिडू नका, आम्ही काय चुकीचं सांगितलंय तुम्हाला? ” मी विचारलं.

“साहेब मी तुम्हाला जीवाच्या आकांतानं केव्हापासून सांगतोय, मी आणि माझी बायको स्कुटरवरुन निघालो होतो, ती माझ्याशी, मी तिच्याशी बोलत होतो. फक्त ती कोठे व कशी पडली हे मला समजले नाही. ” ते म्हणाले.

“हे पहा मिस्टर, मघापासून आम्ही तुमचं ऐकत आहोत, तेव्हा आता माझी तुम्हाला विनंती आहे, तुम्ही तुमच्या घरचा फोन नंबर द्या. मला एक वेळ खात्री करुन घेऊ द्या.. मग आपण पुढे काय कारवाई करायची ते ठरवू.” मी म्हणालो.

रागारागात, मोठे डोळे करुन एका कागदावर घराचा नंबर लिहून माझ्या पुढे कागद ठेवत तो म्हणाला,

” हे घ्या. होऊ द्या तुमच्या मनाचं समाधान.

“अहो, मला माझ्या मनाचं समाधान करायचं नाहीय. मला तुमच्या पत्नीचा शोध घेण्यासाठी करावयाच्या कायदेशीर बाबीचीही तपासणी करायची आहे.” मी म्हणालो.

“अशी तपासणी करण्याची तुमची ही कोणती पध्दत आहे, हे मला तर काही समजत नाही.” ते गृहस्थ काहीशा तिरसटपणाने म्हणाले.

‘पोलीस कसा तपास करतात, हे तुम्हाला माहिती नाही ना? , मग आता शांत बसून पहा, तुमच्या समोरच मी तुमच्या पत्नीचा शोध घेण्यासाठी कसा कसा तपास करतोय ते, मग कळेल तुम्हाला तपासाची पध्दत !” मी समोरील कागदावर लिहिलेला नंबर पाहून त्या गृहस्थाच्या घरचा नंबर डायल केला. काही सेकंदातच समोरुन,

“हॅलो, कोण बोलतय? ” म्हणून प्रश्न आला.

“नमस्कार, मी इन्स्पेक्टर पाटील बोलतोय, नौपाडा पोलीस ठाण्यातून, आपण कोण बोलता? ” मी प्रतिप्रश्न केला.

त्याच वेळी माझं लक्ष समोर बसलेल्या त्या गृहस्थांच्या हालचालींवर होतं, त्याचं मी बारकाईने निरीक्षण करीत होतो. मी फोनवर कोणाशीतरी बोलत आहे, हे पाहिल्यावर त्याच्या चेहऱ्यावरील भाव बदलत चालले होते.

समोरील महिलेने फोनवरुन स्वत:ची ओळख सांगितली.

“तुमचे पती माझ्यासमोर बसले आहेत.” मी म्हणालो.

मी फोनवर बोलत असतांना, त्या गृहस्थाने मध्येच अडवून फोन त्याचेकडे देण्याची मला विनंती केली. मी त्या गृहस्थाच्या पत्नीला, “तुमचे मिस्टर बोलणार आहेत.” असे म्हणालो.

त्या ओरडतच म्हणाल्या “नका देऊ त्यांना फोन, मी स्वत:च येते पोलीस स्टेशनात आणि मग समक्षच बोलते त्यांच्याशी !”

ते गृहस्थ माझ्याकडे केविलवाण्या नजरेने पाहत होते.

“मिस्टर, थांबा थोडा वेळ, तुमच्या पत्नी स्वत:च येत आहेत पोलीस स्टेशनला.” मी रिसीव्हर खाली ठेवत म्हणालो.

माझ्या या वाक्यावर ते गृहस्थ पटकन खाली बसले. त्यांचा चेहरा आता केविलवाणा झाला होता. थोडा वेळ पोलीस ठाण्यातलं वातावरण गंभीर झालं होतं.

‘चला साहेब, संध्याकाळचे साडेचार वाजले आहेत, दुपारचं जेवण मिळालंच नाही, रात्रीचं जेवण तरी जरा लवकर करुन घेऊया. ” सोनार हवालदाराच्या या बोलण्यानं, शांत व गंभीर झालेलं वातावरण काहीसं निवळलं.

मी त्या गृहस्थाला, “जेवण करणार का? ” असं विचारलं.

त्याने नकारार्थी मान हलवून इशारा केला.

आम्ही तिघेजण जेवायला बसलो. अजून अर्धे जेवण झालंही नव्हतं, तोपर्यंत ठाणे अंमलदाराच्या कक्षातून कोणाचा तरी मोठ्यानं बोलण्याचा आवाज आला. म्हणून मी जेवणावरुन तसाच उठलो.

तेवढ्यात एक शिपाई माझ्यासमोर आला व म्हणाला, “साहेब, यांची पत्नी आली आहे.”

मी त्या शिपायाकडे ” त्या बाईंना बसायला सांगा.” असा निरोप पाठवला. तसा तो गेला.

माझ्या विचारांची तंद्री लागली, हातातला घास हातात तसाच राहिला.

कसे तऱ्हेवाईक लोक पोलिसांना भेटतात, काय करावं पोलिसांनी? कोणतीही घटना घडलेली नसतांना, त्या तऱ्हेवाईक माणसाने विनाकारण दोन तास मनस्ताप दिला होता. वेळेवर जेवणखाणं पण नाही.

सोनार हवालदारानं माझ्या हाताला हात लावून, “अहो साहेब, ती बाई सापडली की, आता कसला विचार करताय? ” असे म्हणताच माझी तंद्री भंग पावली.

मी विचारातून बाहेर आलो. हात धुतला, दोन घोट पाणी पिऊन पुन्हा ठाणे अंमलदाराच्या खुर्चीवर स्थानापन्न झालो. समोर ते गृहस्थ पावसात भिजलेल्या बकरीसारखे त्यांच्या पत्नीसमोर अंग चोरुन बसले होते आणि त्यांची पत्नी वादळी पाऊस पडण्यापूर्वी कडाडणाऱ्या विजेसारखी त्यांच्यावर कोसळत होती.

” हे आमचं ध्यान, कसल्या विचारांत असतं हे त्याचं त्यालाच कळत नाही.” मी खुर्चीत बसताच त्या बाई म्हणाल्या,

“अहो बाई, थोडं शांत व्हा, तुमच्या मिस्टरांची चूक झाली, ती त्यांच्या लक्षात आली आहे आता.

मी काहीतरी बोलायचं म्हणून, त्या बाईंना शांत करण्यासाठी म्हणालो. मला त्या गंभीर झालेल्या वातावरणाला आता नॉर्मल करायचं होतं.

“तुम्ही कितीही सांगा साहेब, या पालथ्या घड्यावर पाणी आहे.” त्या बाई आपल्या नवऱ्याकडे बोट दाखवित म्हणाल्या.

बाईंचा रुद्रावतार थोडा शांत झाल्यावर मी दोघांना चहा प्यायला दिला आणि त्यांचा निरोप घेतला.

निरोप देतांना त्या गृहस्थाला एक सल्ला दिला,

‘आज तुमच्या स्कुटरवर पत्नीला बसवायला विसरलात. भविष्यात कधी तुमची पत्नी समजून दुसऱ्याच्या पत्नीला बसवून घेवून जाऊ नका, नाहीतर मोठी आफत येईल.’

माझ्या या बोलण्यानं स्टेशन हाऊस मध्ये हशा पिकला. त्या बाईदेखिल खळखळून हसत म्हणाल्या,

“साहेब, आज आले मी पोलीस स्टेशनला, पण त्यावेळी नाही येणार.”

त्या गृहस्थाने दोन्ही हाताने स्वत:चे कान पकडले व काहीही न बोलता, केवळ मान हलवित पोलीस स्टेशन बाहेर पडला.

ते दोघे पती-पत्नी स्कुटरवरुन गेले. मग आम्ही चर्चा करु लागलो. पोलिसांना कसल्या-कसल्या भानगडी निस्तराव्या लागतात आणि ही दुनियादारी करता करता पोलिसांच्या हे लक्षातच येत नाही की, ‘तो स्वत:च्या घरालाच विसरलाय !’

— व्यंकट पाटील 

(व्यंकट पाटील यांच्या ‘घर हरवलेला पोलीस’ या लेखसंग्रहातील हा लेख)

हे इ-पुस्तक खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. 
https://marathibooks.com/books/ghar-haravalela-police-by-vyankat-patil/

लेखक : व्यंकट पाटील (सेवानिवृत्त सहाय्यक पोलिस आयुक्त, मुंबई पोलिस)
प्रकाशक : मराठीसृष्टी / Marathisrushti
किंमत : रु. १००/-
सवलत किंमत : रु. ५०/-

Avatar
About व्यंकट भानुदास पाटील 15 Articles
सहायक पडोलिस आयुक्त या पदावरुन निवृत्त झालेले श्री व्यंकटराव पाटील ह पोलीस कथा लेखक आहेत तसेच त्यांच्या कादंबऱ्याही प्रकाशित झाल्या आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..