इनामदार “श्री देवी भगवती संस्थान कोटकामते”

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यात कोटकामते गावात प्राचीन भगवती देवी मंदिर आहे. देवगड-आचरा-मालवण मार्गावरील देवगड पासून १९ कि.मी. आणि मालवणपासून २९ कि.मी. अंतरावर असणा-या नारिंग्रे गावापासून ६ कि.मी. अंतरावर कोटकामते हे गाव आहे.

व्यक्तिगत ईनामे व संस्थाने रदद्‌ झाली तरी देवगडातील अदयाप अस्तित्वात असलेल्या देवस्थान ईनामापैकी एक गाव. या गावाच्या सर्व जमिनीवर प्रमुख कब्जेदार म्हणुन इनामदार “श्री देवी भगवती संस्थान कोटकामते” असा शिक्का प्रत्येक जमिनीच्या ७/१२ च्या उतारावर असतो.

येथे सुमारे ३६० वर्षांपूर्वी (शके १६४७ )” सेना सरखेल कान्होजी आंग्रे” यांनी बांधलेले इतिहासकालीन श्री देवी भगवतीचे मंदिर आहे. तशा आशयाच्या शिलालेख या देवालयाच्या भिंतीवर आहे. ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या या गावात पूर्वी एक किल्ला होता.
त्यावरूनच या गावाला कोटकामते हे नाव पडले आहे. हा संपूर्ण परिसर आमराईने नटलेला आहे. आता किल्ला नामशेष झाला असून त्याचे काही अवशेष शिल्लक आहेत. गावात प्रवेश करताना दिसणारा बुरूज आणि थोडीफार तटबंदी एवढेच अवशेष शिल्लक आहेत.

इतिहास काळात कोटकामते गावात सिद्धीचे राज्य होते. त्यावेळी कान्होजी आंग्रे यांनी मोठ्या शौर्याने वचक ठेवला होता. म्हणूनच सिद्धीचे राज्य असतानाही कोटकामते गावावर आंग्रेंची सत्ता होती. एका आख्यायिके नुसार कामते गावातील भगवती देवीस कान्होजी आंग्रे यांनी नवस केला होता, ‘‘जर मी लढाईत विजयी झालो तर, तुझे भव्य देऊळ बांधीन व देवस्थानाला गाव इनाम म्हणून देईन’’ त्याप्रमाणे युध्द जिंकल्यावर कांन्होजींनी भगवती देवीचे भव्य मंदिर बांधले. या घटनेची साक्ष देणारा शिलालेख आजही मंदिरात पाहता येतो.

शिलालेखातील मजकूर पुढील प्रमाणे:-
‘‘श्री भगवती ॥श्री॥मछक षोडश शत: सत्पचत्वारिंशत माधिक संबंछर विश्वात सुनामा ॥ सुभे तं स्थिच छरे आंगरे कान्होजी सरखेल श्रीमत्कामश देवा देवालय मकरोदिती जाना तु जनो भविष्य माण: ॥१॥

याशिवाय कान्होजींनी साळशी, आचरा, कामते, किंजवडे ही गावे मंदिराला इनाम म्हणून दिली होती.देवगड – मालवण रस्त्यावरील नारिंग्रे गावाकडून कोटकामते गावात जाताना रस्त्याशेजारी डाव्या बाजूस कोटकामते किल्ल्याच्या बुरुजाचे अवशेष दिसतात. बुरुजाजवळील तटबंदी व खंदकाचे अवशेष आज नष्ट झालेले आहेत. भगवती मंदिराबाहेर ३ तोफा उलट्या पुरुन ठेवलेल्या आढळतात.

मंदिरातील सभामंडपात कान्होजी आंग्रे यांचे नाव असलेला शिलालेख पाहता येतो. भगवती देवीची पुरातन मुर्ती काळ्या पाषाणात बनवलेली आहे. देवीच्या मूर्तीच्या वरच्या बाजूस २ हत्ती देवीवर पुष्पवृष्टी करताना कोरलेले आहेत. देवीच्या उजव्या हातात खडग आहे.
देवीच्या सभा मंडपाचे खांब लाकडी असून त्यावर कोरीव काम केलेले आहे. त्यापैकी एक खांब तुळशीचा असल्याची वदंता आहे. मंदिराच्या परिसरात दोन पुरातन मुर्ती ठेवलेल्या आहेत. त्यास स्थानिक लोक रामेश्वर व पावणाई म्हणतात. भगवती मंदिरामागे रामेश्वर मंदिर आहे. त्यात एक पुरातन मूर्ती आहे. याशिवाय पुरातन दुमजली वाड्याचे अवशेषही पाहायला मिळतात.

मंदिरापर्यंत जाण्यास उत्तम रस्ता आहे. मंदिरात देवीची पाषाणी रेखीव मूर्ती आहे. दक्षिण-उत्तर मंदिर असून समोरील दिशा दक्षिणेस आहे. मंदिरासमोर वड व पिंपळाचे दोन जुनाट वृक्ष आहेत. या वृक्षाखाली देवळाच्या प्रवेशद्वारापाशी देवीचे वाहन असलेली सिंह प्रतिमा आहे. मंदिराच्या सभा मंडपाला लाकडी खांब असून त्यावरील कोरीव नक्षीकाम अप्रतिम आहे. मंदिराशेजारी दोन शिवकालीन तोफा आहेत. देवालयाचा परिसर अत्यंत निसर्ग सौंदर्याने नटलेला असून आवारास चिरेबंदी तटबंदी आहे. बाजूलाच कलात्मक बांधणीची पिण्याच्या पाण्याची विहीर व धर्मशाळा आहे.

देवळाच्या आवारात श्री पावणादेवीचे एक मंदिर असून हि मूर्ती संगमरवरी आहे. श्री पावणा देवीच्या मंदिराचे बांधकाम नव्यानेच करण्यात आले आहे. मंदिरा बाहेरील आवारात श्री देव रवळनाथ, श्री मारुती अशी मंदिरे आहेत. श्रीदेवी वडची, श्रीदेव गांगेश्वर, रामेश्वर, ब्राह्मणदेव, जठेश्वर, श्री विठलादेवी इ. मंदिरे कोटकामते गावाच्या परिसरात आहेत.

नवरात्रोत्सव हा कोटकामते गावाचा प्रमुख उत्सव. दस-यात या मंदिरात हा उत्सव अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून दशमी पर्यंत दहा दिवस फार मोठ्या आणि पारंपारिक पध्दतीने शाही थाटात संस्थानिकांना शोभेल असा साजरा केला जातो. नवरात्रात देवीचे तेजही काही आगळेच असते. देवीच्या संपुर्ण अंगावर चांदीचे कवच चढवण्यात येते. पालखीदेखील खास चांदीच्या आभरणांनी सजवली जाते. सभामंडप जुन्या काळाच्या हंडया व झुंबरानी सजवले जातात.

अत्यंत शिस्तबद्धता हे इथल्या नवरात्र उत्सवाचे प्रमुख वैशिष्ठय. देवसेवकांची वाटुन दिलेली कामे नियमितपणे पार पडतात. चैत्र व कार्तिक महिन्यात १ महिना पालखी सोहळा असतो. गोकुळाष्टमीच्या आधी सात दिवस हरीनाम सप्ताहास सुरुवात होते. तर गोकुळाष्टमीला या सप्ताहाची सांगता होते. येथील उत्सवाचा आनंद लुटणे म्हणजे एक पर्वणीच आहे.

श्री देवी भगवती मंदिरा विषयी आख्यायिका सांगितले जाते , ती म्हणजे पूर्वीच्या काळी तानवडे नावाचे सद्गृहस्थ तंबाखूचा व्यापार करीत होते. या व्यापाराची वाहतूक बैलाच्या पाठीवरून केली जात होती. गावात आल्यावर ते सदगृहस्थ तंबाखूचू पोते पाठीवर मारून गावागावात तंबाखू विकत असत. मात्र एक दिवस काय झाले कि त्यांनी तंबाखूचे पोते पाठीवर मारल्यानंतर त्यांना ते पोते नेहमीपेक्षा जड झाले आणि म्हणून ते त्यांनी खाली टाकले. पोते नेहमीपेक्षा जड कसे झाले हे पाहण्यासाठी त्यांनी पोते उघडले तर त्यांना त्या पोत्यात एक वाटोळा दगड दिसला. त्यांनी तो दगड बाहेर काढून टाकला तर तो पुन्हा त्याच पोत्यात सापडू लागल्याने ते सदगृहस्थ कंटाळले. नंतर त्यांनी असाच एक दगड एका ठिकाणी टाकला.

त्यानंतर तो दगड पुन्हा पोत्यात न दिसल्याने त्याला निश्चिंत वाटले.ज्या ठिकाणी दगड टाकला त्यानंतर त्या जागेमध्ये आज भगवती मंदिर आहे. व्यापाराने ज्या ठिकाणी दगड टाकला तेथे पावणाई देवीची मूर्ती बसलेली होती. देवीला स्वताची जागा पाहिजे असल्याने तिने लहान कुमारिकेचे रूप घेतले व ती त्या मूर्तीजवळ गेली आणि तहान लागली असल्याचे सांगत पिण्यासाठी पाणी मागितले. त्याबरोबर तिने पाणी आणून देते असे सांगून ती विहिरीवर पाणी आणण्यासाठी गेली.

पाणी घेवून आल्यानंतर पाहते तो देवी तिच्या जागेवर बसली होती. तिने पाण्याचे भांडे पुढे केले, ते पाणी प्याल्या नंतर विचारणा केली. त्यावेळी तू माझ्या जागेवर बसलीस आता मी कोठे जावू..? तेव्हा देवीने तिला माझ्या शेजारी उजव्या बाजूला जावून बस असे सांगितले. त्याप्रमाणे ती उजव्या बाजूला बसली आहे. नंतर त्याठिकाणी लहान लहान मंदिरे बांधण्यात आली. काही कालांतराने त्या मंदिरांचा जीर्नोधार करून विस्तार करण्यात आला.

देवी चा चमत्कार.-:
१९७४ साली लिंगडाळ गावातील आडिवरे वाडी येथील श्री वडची देवी हिची यात्रा होती. या यात्रेस येथील देवस्वारी घेवून मानकरी,गावकरी गेले होते. यात्रेचा दिवस संपल्यानंतर माघारी येण्याच्या वेळी दुपारचे स्नेहभोजन आटोपल्यानंतर संध्याकाळी पाचच्या सुमारास पुन्हा धूप जाळून श्रींचे तरंग काढण्यात आले. मात्र सर्व धार्मिक विधी होईपर्यंत रात्रीचे आठ वाजले. याठिकाणी निघताना सोबत नेलेल्या सर्व सामानाची भांडी रिकामी झालेली होती.

मशालजीकडील तेल संपले असल्याचे लक्षात आल्यानंतर मानकर्यांनी हि गोष्ट देवीच्या कानावर घातली. देवीने मानकर्यासोबत मशालजीना व रयतेलाही मी जाईन त्याठिकाणी माझ्यासोबत चला अशी आज्ञा केली. सर्व मंडळी शिवकळेच्या मागून वडची देवी पाषाणाजवळ गेली. ती पाषाणाजवळ गेल्यानंतर तिने ती पेटती मशाल रिकाम्या पासरीत म्हणजेच तेलाच्या भांड्यात बुडवून वर उचलले. आपल्या हातात मशाल घेवून आता माझ्यामागून या अशी आज्ञा केली.

देवीच्या आज्ञेप्रमाणे हि मंडळी देवीच्या शेजारी असलेल्या ओहोळाजवळ गेली. तरंग पाण्यात बुडविला व पेटती मशाल पाण्यात बुडवून वर काढली.पाण्यात बुडवूनही मशाल मात्र विझली नाही. ओहोळावरील पाणी पसरीत भरून ती पुन्हा पाषाणाजवळ आली आणि म्हणाली, मी माझ्या दरबारात जाईपर्यंत या तेलाचा-पाण्याचा वापर करा. दरबारात गेल्यावर पासरीतील शिल्लक पाणी देवीच्या तळीत नेवून ओतण्यात आले. हि सत्यकथा येथील ग्रामस्थांनी प्रत्यक्ष अनुभवल्याचे सांगतात.

— गणेश कदम,
कुडाळ सिंधूदुर्गAbout गणेश कदम 47 Articles
पुणे येथे वास्तव्य असलेले गणेश कदम हे विविध विषयांवर समाजमाध्यमांतून लिहित असतात. ते टेक महिंद्र या कंपनीत वरिष्ठ सल्लागार आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

सोलापूर घोंगड्या

सोलापूर जिल्ह्याचे क्षेत्रफळ १४ हजार ८४५ चौरस किलोमीटर आहे.

सोलापूर जिल्ह्यातल्या ...

महाराष्ट्राची आयटी अनुकूल शहरे

भारतीय माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील व्यावसायिक संघटना नेस्कॉमच्या (नॅशनल असोसिएशन ऑफ ...

श्रध्दास्थान मुक्तागिरी

विदर्भातील अमरावती जिल्हयात मुक्तागिरी हे निसर्गरम्य तसेच जैनधर्मीयांचे महत्त्वाचे धार्मिक ...

करवीरनगरी अर्थात कोल्हापूर

करवीरनगरी अर्थात कोल्हापूर जिल्ह्यास ऐतिहासिक, सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक वारसा लाभलेला ...

Loading…