नमः शिवाभ्यामतिसुन्दराभ्यां
अत्यन्तमासक्तहृदम्बुजाभ्यां |
अशेषलोकैकहितङ्कराभ्यां
नमो नमः शङ्करपार्वतीभ्यां ‖ ६ ‖
भगवती आई पार्वती आणि भगवान शंकरांच्या चरण कमलांवर एकत्रित वंदन करताना भगवान जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराज शब्दरचना करतात,
नमः शिवाभ्यामतिसुन्दराभ्यां –
भगवती आई पार्वती आणि भगवान शंकर या दोघांनाही नमस्कार असो. हे दोघेही अत्यंत सुंदर आहेत.
हे वर्णन समजून घ्यावे लागते. आई जगदंबेचे सौंदर्य तर सहज समजते. पण भगवान शंकरांचे बाह्य स्वरूप, आपल्या डोक्यात बसलेल्या सौंदर्याच्या रूढ कल्पनेत बसत नाही.
वाढलेल्या जटा, फासलेले भस्म, हातातील कपाल, गळ्यातील मुंडमाला, नंदी हे वाहन, अंगावर रुळणारे सर्प, यापैकी कोणतीच गोष्ट सौंदर्याच्या सामान्य परिभाषेत बसत नाही.
पण लक्षात घ्या भगवंताचे सौंदर्य सामान्य परिभाषेत बसत नाही कारण ते सामान्य नाहीच. ते असामान्य सौंदर्याचे धनी आहेत.
सौंदर्याचा परिणाम काय? तर सगळ्यांनी पाहणे. शेवटी प्रत्येक जीवाला भगवान शंकरांनाच पहावे लागते. शेवटी सगळे त्यांनाच म्हणतात या अर्थाने ते अलौकिक सौंदर्यसंपन्न आहेत.
अत्यन्तमासक्तहृदम्बुजाभ्यां –
सगळ्या भक्तांची हृदय कमले या उभयतांच्या चरणकमलाशी आसक्त झालेली असतात. भक्तांना त्याशिवाय दुसरे काही दिसतच नाही.
अशेषलोकैकहितङ्कराभ्यां – अशेष म्हणजे परिपूर्ण. एक तर सगळ्या विश्वाचे कल्याण साधणारे. किंवा दुसऱ्या अर्थाने विश्वाचे सर्व प्रकारचे कल्याण साधणारे, असे हे दोघे आहेत.
नमो नमः शङ्करपार्वतीभ्यां – अशा या देवी पार्वती आणि भगवान शंकरांना वंदन असो.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply