नवीन लेखन...

श्री वेंकटेश सुप्रभातम् – मराठी अर्थासह – भाग २

ज्याकाळी भारतात दूरचित्रवाणी नव्हती व आकाशवाणी हेच लोकशिक्षणाचे मुख्य साधन होते, अशा काळातील एम.एस.सुब्बलक्ष्मींचे ‘वेंकटेशसुप्रभातम्’ ऐकले नाही असा मराठी माणूस शोधावाच लागेल. आकाशवाणीवर प्रातःस्मरणात बहुधा शुक्रवारी वेंकटेशसुप्रभातम् हमखास लागे व त्यामुळे ते घराघरात पोहोचले होते.हा लेख मराठीसृष्टी (www.marathisrushti.com) या वेबसाईटवर प्रकाशित झाला आहे. लेख शेअर करायचा असल्यास लेखकाच्या नावासह शेवटपर्यंत संपूर्णपणे शेअर करावा...

या काव्यात मुख्यत्वे प्रबोधिता(समरा जनास समरा जनास गा) व उद्धर्षिणी(ताराप भास्कर जनास जनास गा गा) वृत्ते वापरली आहेत.

सेवापराः शिवसुरेशकृशानुधर्म
रक्षोऽम्बुनाथ पवमान धनादिनाथाः 
बद्धाञ्जलि प्रविलसन्निजशीर्ष देशाः
श्रीवेङ्कटाचलपते तव सुप्रभातम् ॥१६॥

मराठीतुझ्या सेवेस तत्पर असे अष्ट दिक्पाल – ईशान, इंद्र, अग्नी, यम, निऋती राक्षस, वरुण, वायू, कुबेर, आपल्या मस्तकावर हात जोडून (उभे आहेत). वेंकट पर्वताच्या राजा, तुझी सकाळ मंगल झाली आहे.

इंद्रासवे वरुण वन्हि कुबेर हाता
ईशान वायु यम जोडुन येत आता ।
त्या संगती निऋति तत्पर दास येई
श्री वेंकटाचलपती, सु-सकाळ होई ॥ १६ ॥

धाटीषु ते विहगराज मृगाधिराज   
नागाधिराज गजराज हयाधिराजाः 
स्वस्वाधिकार महिमाधिकमर्थयन्ते
श्रीवेङ्कटाचलपते तव सुप्रभातम् ॥१७॥

मराठीशत्रूवर हल्ला करतेवेळीची तुझी (वाहने) पक्षीराज गरूड, पशूंचा राजा सिंह,सर्पाधिराज आदिशेष, गजराज ऐरावत, अश्वश्रेष्ठ उच्चैश्रवा आपआपल्या अधिकाराच्या माहात्म्यात वृद्धी करण्यासाठी आर्जवे करीत आहेत. वेंकट पर्वताच्या राजा, तुझी सकाळ मंगल झाली आहे.

युद्धी गरूड तव वाहन अश्वराजा
ऐरावतासह नखायुध नागराजा ।          (नखायुध- सिंह)
वाढो महत्त्व, अधिकार हवे तयाला
हा मोदपूर्ण दिन शेषगिरी नृपाला ॥ १७॥

सूर्येन्दु भौम बुध वाक्पति काव्यसौरि
स्वर्भानु केतु दिविषत्परिषत्प्रधानाः 
त्वद्दास दास चरमावधि दासदासाः
श्रीवेङ्कटाचलपते तव सुप्रभातम् ॥१८॥

मराठीदेवांच्या सभेत प्रमुख असणारे रवी, चंद्र, मंगळ, बुध,गुरू,शुक्र,शनी,राहू,केतू हे तुझे दासानुदास आहेत (व) शेवटच्या वेळेपर्यंत दासांचे दास (रहायला इच्छुक) आहेत.वेंकट पर्वताच्या राजा, तुझी सकाळ मंगल झाली आहे.

भानू शशी प्रमुख देवसभेत राहू
केतू शनी बुध म्हणे गुरुसंग राहू ।
दासानुदास नित मंगळसंग होता
श्रीवेंकटप्रियतमे सु-सकाळ आता ॥ १८

त्वत्पादधूलि भरितस्फुरितोत्तमाङ्गाः
स्वर्गापवर्ग निरपेक्ष निजान्तरङ्गाः 
कल्पागमाकलनयाकुलतां लभन्ते
श्रीवेङ्कटाचलपते तव सुप्रभातम् ॥१९॥

मराठीतुझ्या पायाच्या धुळीने माखलेली मस्तके झळाळत असलेल्या, आपल्या मनी स्वर्गाचे दान किंवा मोक्ष, परमानंद यांची अपेक्षा नसलेल्या (भक्तांच्या) मनाला युग बदलाच्या कल्पनेने व्याकुळता येते (की, पुढील युगी व्यंकटेशाची पावले दिसणार नाहीत). वेंकट पर्वताच्या राजा, तुझी सकाळ मंगल झाली आहे.

दे मस्तका मलिनता पद धूळ खाशी
मुक्ती न मोद परमोच्च मना नकोशी ।
व्याकूळता बदलता स्थिति येत चित्ता
हे श्रीनिवास, उगवे सु-सकाळ आता ॥ १९॥

त्वद्गोपुराग्रशिखराणि निरीक्षमाणाः
स्वर्गापवर्गपदवीं परमां श्रयन्तः 
मर्त्या मनुष्यभुवने मतिमाश्रयन्ते
श्रीवेङ्कटाचलपते तव सुप्रभातम् ॥२०॥

मराठीतुझ्या गोपुरांचे कळस पाहणारे, स्वर्ग व मोक्षाचा रस्ता चोखाळणारे जन (पुनः एकदा) मानवी सदनांकडे (जीवनाकडे) लक्ष वळवतात. वेंकट पर्वताच्या राजा, तुझी सकाळ मंगल झाली आहे.

चोखाळती पथ जरी जन मुक्ततेचे
उत्तुंग ते कळस पाहुन गोपुराचे ।
हे मर्त्य उत्सुक पुनः जगण्यास होती
हे वेंकटाचलपते तव सुप्रभाती ॥ २०॥

श्रीभूमिनायक दयादिगुणामृताब्धे
देवाधिदेव जगदेकशरण्यमूर्ते 
श्रीमन्ननन्तगरुडादिभिरर्चिताङ्घ्रे
श्रीवेङ्कटाचलपते तव सुप्रभातम् ॥२१॥

मराठीहे श्री देवी आणि भूदेवींच्या स्वामी, (भक्तांसाठी) करुणा आणि इतर गुणरूपी अमृताचा सागर, देवांमध्ये प्रथम देवा, जगात (भक्तांना) आसरा देण्यात मूर्तस्वरूप, ज्याची पाद्यपूजा गरुड आणि इतर जण करतात अशा पद्मावतीसह असणा-या अनंता, वेंकट पर्वताच्या राजा, तुझी सकाळ मंगल झाली आहे.

श्री-भूमि पालक, कृपा गुण सागरा रे
देवात मुख्य, जगरक्षक एकला रे ।
श्रीसंग विष्णु, पद पूजित पक्षिराज
हे श्रीनिवास, उगवे सु-सकाळ आज ॥ २१॥

श्रीपद्मनाभ पुरुषोत्तम वासुदेव
वैकुण्ठ माधव जनार्दन चक्रपाणे 
श्रीवत्सचिह्न शरणागतपारिजात
श्रीवेङ्कटाचलपते तव सुप्रभातम् ॥२२॥

मराठीहे पद्मनाभा, सर्वश्रेष्ठ पुरुषा, वसुदेवाच्या पुत्रा, विकुण्ठेच्या पुत्रा, माधवा, सुदर्शन चक्रधारका, वक्षस्थानी लक्ष्मीचे प्रिय (श्रीवत्स) चिह्न धारण करणा-या, तुला शरण येणा-यांना प्राजक्ताप्रमाणे सुवास (आल्हाद) देणा-या वेंकट पर्वताच्या राजा, तुझी सकाळ मंगल झाली आहे.

हे पद्मनाभ पुरुषोत्तम हे मुरारी
वैकुण्ठ माधव जनार्दन चक्रधारी ।
भक्तां सुवास, कमला-प्रिय-चिह्नधारी
हे श्रीनिवास, उगवे सु-सकाळ न्यारी ॥ २२॥

कन्दर्पदर्पहर सुन्दर दिव्यमूर्ते
कान्ताकुचाम्बुरुह कुटमल लोलदृष्टे 
कल्याणनिर्मलगुणाकर दिव्यकीर्ते
श्रीवेङ्कटाचलपते तव सुप्रभातम् ॥२३॥

मराठीहे मदनाचा गर्व हरण करणा-या दैवी सौंदर्याचा पुतळाच जणू, आपल्या  भार्येच्या वक्षरूपी कमळांच्या कळ्यांवर ज्याची चंचल नजर फिरते आहे, जो कल्य़ाणकारी अकलंक गुणांचा साठाच आहे अशा दैवी कीर्ती असलेल्या वेंकट पर्वताच्या राजा, तुझी सकाळ मंगल झाली आहे.

लावण्य दिव्य करिते मदनास कष्टी
भार्या सरोज कलिकां वर लोल दृष्टी ।
सारे हितार्थ गुण संचय, दिव्य कीर्ती
हे वेंकटाचलपते तव सुप्रभाती ॥ २३॥

मीनाकृते कमठ कोल नृसिंह वर्णिन्
स्वामिन् परश्वथतपोधन रामचन्द्र
शेषांशराम यदुनन्दन कल्किरूप
श्रीवेङ्कटाचलपते तव सुप्रभातम् ॥२४॥

मराठीहे मत्स्यरूप, कूर्म,वराह, नरसिंह, वामन, परशुधारी व तप हेच ज्याचे धन आहे असा परशुराम, रघुनंदन राम, शेषाचा अंश असणारा बलराम, कृष्ण आणि कल्की असे दहा अवतार झालेल्या वेंकट पर्वताच्या राजा, तुझी सकाळ मंगल झाली आहे.

मासा नि कासव, वराह, नृसिंह तैसा
क्रौंचारि, रामरघुनंदन, राम खासा ।           (क्रौंचारि-परशुराम)
शेषावतार, व्रजभूषण, कल्कि तूची            (शेषावतार राम-बलराम)
हे श्रीनिवास सु-सकाळ तुझी सुखाची ॥ २४॥

एला लवङ्ग घनसारसुगन्धितीर्थं
दिव्यं वियत्सरिति हेमघटेषु पूर्णम् 
धृत्वाऽद्य वैदिकशिखामणयः प्रहृष्टाः
तिष्ठन्ति वेङ्कटपते तव सुप्रभातम् ॥२५॥

मराठीवेलदोडे,लवंगा आणि कापूर यांनी सुवासिक झालेले स्वर्गंगेचे दिव्य पाणी सोन्याच्या कलशांमध्ये भरून आज वैदिक पंडिताचे चूडामणी आनंदाने (येथे) उभे आहेत. हे वेंकट पर्वताच्या राजा, तुझी सकाळ मंगल झाली आहे.

कापूरगंधित लवंग नि वेलचीचे
हे जान्हवी जल घटातुन कांचनाचे  ।
घेऊन आज श्रुतिपाठक श्रेष्ठ येती
हे वेंकटाचलपते तव सुप्रभाती ॥ २५॥

भास्वानुदेति विकचानि सरोरुहाणि
सम्पूरयन्ति निनदैः ककुभो विहङ्गाः 
श्रीवैष्णवास्सततमर्थितमङ्गलास्ते
धामाश्रयन्ति तव वेङ्कट सुप्रभातम् ॥२६॥

मराठी सूर्य उगवला आहे,(तळ्यातील) कमळे फुलली आहेत,आपल्या किलबिलाटाने पक्ष्यांनी (पर्वतांची) शिखरे गजबजून टाकली आहेत.सदैव मंगल गोष्टींची कामना करणारे वैष्णव तुझ्या निवासी आश्रयाला आले आहेत. हे वेंकट पर्वताच्या राजा, तुझी सकाळ मंगल झाली आहे.

होता पहाट फुलली कमळे तडागी
कानावरी खगांची किलबील येत जंगी ।
जे नित्य वैष्णव कृपा तव इच्छिताती
घेतात आश्रय घरी तव सुप्रभाती ॥ २६॥

ब्रह्मादयः सुरवराः समहर्षयस्ते
सन्तः सनन्दनमुखास्तवथ योगिवर्याः ।
धामान्तिके
 तव हि मङ्गलवस्तुहस्ताः
श्रीवेङ्कटाचलपते तव सुप्रभातम् ॥२७॥

मराठीब्रह्मा आणि इतर श्रेष्ठ देव इतर योगिश्रेष्ठ व महर्षींसह, ज्यांचे प्रमुख सनंदन आहेत, हाती पवित्र गोष्टी घेऊन तुझ्या सदनी आले आहेत. हे वेंकट पर्वताच्या राजा, तुझी सकाळ मंगल झाली आहे.

ब्रह्म्यासवे इतर श्रेष्ठहि देव येती
योगी महाऋषि सनन्दन मुख्य, हाती ।
त्यांच्या, तुझ्या सदनि मंगल भेट गोष्टी
हे वेंकटाचलपते तव सुप्रभाती ॥ २७॥

लक्ष्मीनिवास निरवद्यगुणैकसिन्धो
संसार सागर समुत्तरणैकसेतो 
वेदान्तवेद्यनिजवैभव भक्तभोग्य
श्रीवेङ्कटाचलपते तव सुप्रभातम् ॥२८॥

मराठीलक्ष्मीचे निवासस्थान असणा-या,निष्कलंक दैवी गुणांचा एकमेव सागर असलेल्या, संसाररूपी समुद्र ओलांडण्यासाठी असलेला एकमेव पूल, वेदांताचा अभ्यास केल्यानंतरच ज्याच्या वैभवाचे ज्ञान त्याच्या भक्तांना होते अशा वेंकट पर्वताच्या राजा, तुझी सकाळ मंगल झाली आहे.

पद्मागृहा, अमल सागर तू गुणांचा
ओलांडण्या भवसमुद्रहि पूल साचा ।
भक्तास वैभव कळे श्रुतिबोध होता
हे श्रीनिधी शुभ उषा तव होत आता ॥ २८॥

इत्थं वृषाचलपतेरिह सुप्रभातं
ये मानवाः प्रतिदिनं पठितुं प्रवृत्ताः 
तेषां प्रभातसमये स्मृतिरङ्गभाजां
प्रज्ञां परार्थसुलभां परमां प्रसूते ॥२९॥

मराठीजे लोक असे हे वृषपर्वताच्या स्वामीचे सुप्रभात स्तोत्र (काया वाचा मने) पठण करण्यास तयार होतात, सकाळी सकाळी त्यांच्या मतीमध्ये उच्च प्रतीच्या आध्यात्मिक ज्ञानाची निर्मिती होते. 

ऐसे पहाट पद जे जन श्रीनिवासा
गाण्या तयार दररोज तयास खासा ।
त्यांचा सकाळ समयो श्रुतिवेद ज्ञानें
बुद्धीत वृद्धि करतो परलोक भानें ॥ २९॥

********************

      

भाषांतरकार – धनंजय मुकुंद बोरकर
(९८३३०७७०९१)

धनंजय मुकुंद बोरकर
About धनंजय मुकुंद बोरकर 18 Articles
व्यवसाय इलेक्ट्रॉनिक (एव्हियॉनिक्स) इंजिनियर. संस्कृत भाषेची आवड. मी केलेले संस्कृत काव्यांचे मराठी गद्य व स्वैर पद्य रूपांतर - १. कविकुलगुरू कालिदासाचे `ऋतुसंहार' (वरदा प्रकाशन, पुणे) २. जयदेवाचे `गीतगोविंद' (प्रसाद प्रकाशन, पुणे). ३. मूकशंकराचार्याचे `मूक पंचशती' ४. जगन्नाथ पंडितांचे `गंगा लहरी' इत्यादी. मी ऋतुसंहार मधील श्लोकांवर आधारित एक दृकश्राव्य कार्यक्रम तयार केला असून त्याचे अनेक कार्यक्रम पुण्यात व इतर ठिकाणीही सादर केले आहेत.

1 Comment on श्री वेंकटेश सुप्रभातम् – मराठी अर्थासह – भाग २

  1. बहुदिनेभ्यः सुप्रभातस्य अध्ययनं कर्तुमिच्छन्त्यासम्!
    भवतः लेखां पठित्वा तत् अभवत्! नमांसि भूयांसि!

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..