साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झालेले शिंपी देविदास सौदागर
वेदनेला पुरस्कार दिल्याने वेदना संपत नसते. आयुष्यातील वास्तव नेहमीच आपल्याला खुणावत असते.कोणत्याही क्षेत्रातला सर्वोच्च पुरस्कार मिळवण्यासाठी जात, धर्म ,आर्थिक परिस्थिती, अपंगत्व कधीच आड येत नाही. व्यवसाय करणाऱ्यांमध्ये मनात एक कोपरा छंदाचा असतो. आपले छंद ओळखता येणं व ते जोपासणं प्रत्येकाला जमेल असं नाही. अभ्यासक्रम पूर्ण करण्याच्या नादात जीवनामधील छंद सुप्त अवस्थेतच असतात. छंदाला वाव मिळाला नाही तर तो जोपासला जात नाही. आयुष्याच्या उत्तरार्धातच अनेकांचे छंद ओळखले गेले आहेत व बहरले आहेत. शाळेत न जाता किंवा शाळा अर्धवट सोडून अनेकांनी छंदाला वेळ दिला आणि त्यात त्यांनी यशोशिखर गाठले. अनेकांनी व्यवसाय करत करत छंदही जोपासले आणि त्याचं फळ त्यांना मिळालं. असेच एक व्यक्तिमत्व म्हणजे साहित्य अकादमी प्राप्त देविदास सौदागर. वाचन व्यक्तिमत्व व आयुष्य समृद्ध करतं. वाचन तुम्हाला भरभरून देतं, ओळख देतं म्हणून वाचायलाच हवं.
शिवणकाम करीत लेखन करणारा धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूरचा युवा लेखक देविदास सौदागर यांना ‘उसवण’ कादंबरीबद्दल साहित्य अकादमीचा युवा पुरस्कार जाहीर झाला. शिंप्याच्या संघर्षाच्या वास्तवाची जाणीव करून देणारी ही कादंबरी आहे. अत्यंत मानाचा साहित्य अकादमीचा युवा पुरस्कार त्यांना जाहीर झाला आहे.घरात पिढ्यान् पिढ्या हलाखीची परिस्थिती होती. अजूनही ती फारशी सुधारलेली नाही. अशा वातावरणात राहून वाचन, लेखनाचा छंद जपत जगण्याची गोष्ट ‘उसवण’मधून त्यांनी मांडली. पूर्वी घरात मनोरंजनाची कुठलीही साधने नव्हती. साधा रेडिओसुद्धा नव्हता. शाळेत वर्तमानपत्र यायची. रविवारच्या पुरवण्या असायच्या. त्या ते नियमित वाचत असत. अण्णा भाऊ साठे, वि. स. खांडेकर यांच्यापासून ते विश्वास पाटील, आसाराम लोमटे अशा मोठ्या लेखकांची पुस्तके वाचण्याचा छंद त्यांना लागला. शाळा-महाविद्यालयात शिकत असताना अण्णा भाऊ साठे यांच्या पुस्तकांच्या प्रेमातच ते पडले. त्यांनी अनेक पुस्तके वाचली. आपल्यालाही असे वास्तव जगणे, सर्वसामान्यांचा संघर्ष लिहिता येतो का? असे सारखे वाटू लागले आणि त्यातूनच ते पुढे लेखनाकडे वळले. त्यांचे ‘कर्णाच्या मनातलं’, ‘काळजात लेण्या कोरताना…’ ही दोन कवितासंग्रह प्रकाशित झाली आहेत. कवितांवरही त्यांचा तितकाच जीव आहे. कवितेतून सुख, दुःख अशा भावना आपण मांडू शकतो. पण, कवितेतून व्यक्त होण्याला काही मर्यादा येतात. एखादी दीर्घ गोष्ट सांगायची असेल तर कथा किंवा कादंबरी हा साहित्यप्रकार आपल्याला स्वीकारावा लागतो. पण, दोन्ही साहित्यप्रकार त्यांना तितकेच महत्त्वाचे वाटतात.
त्यांचेआजोबा आणि वडीलही शेतमजूर. पण, वडील नंतर शिवणकाम शिकले. पुढे मलाही शिकवले. ते शिक्षण पूर्ण करत शिवणकाम करू लागलें. एम. ए. पूर्ण केले; पण नोकरी मिळेल असे वाटले नाही म्हणून पुन्हा शिवणकाम करू लागलें. हा उद्योग सांभाळताना यासमोरील आव्हाने त्यांना दिसत गेली. रेडीमेड (तयार) कपड्यांचा व्यापार वाढल्याने गावोगावी शिवणकाम करणारे कामगार किती अडचणीत आले आहेत, त्यांच्या घरात रोज चूल पेटत आहे की नाही, त्यांचा उदरनिर्वाह कसा सुरू आहे, हे त्यांना जवळून दिसू व जाणवू लागले. त्यांचा जगण्याचा संघर्ष त्यांनी ‘उसवण’मध्ये शब्दबद्ध केला आहे. हे त्यांचे आत्मकथन नाही. मात्र, यात आलेले अनुभव नक्कीच आहेत. शिंप्याच्या जगण्याचे वास्तव सांगणारी ही कादंबरी आहे. ग्रामीण जीवन हे जितक्या प्रकर्षाने मराठी साहित्यात उमटायला हवे, तितक्या प्रकर्षाने उमटताना दिसत नाही. जे तरुण खेड्यात राहत आहेत त्यांना शेती करावी लागत आहे आणि शेती परवडत नाही, अशी सध्याची स्थिती आहे. म्हणून पोटापाण्यासाठी काही तरुणांना पुण्या-मुंबईकडे जावे लागत आहे. स्थलांतर दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे गावांतील तरुणांची संख्या कमी होत असल्याचे अनेक बदल ग्रामीण भागात होत आहेत. ते साहित्यात उमटत आहेत, असे नाही. पुस्तक वाचनाची चळवळ वाढावी, यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. ही चळवळ नेमकी काय आहे? नवी पिढी मोबाइलच्या आहारी गेली आहे. त्यामुळे वाचन कमी झाले आहे. या तरुणांना पुन्हा वाचनाकडे वळवणे हे एक आव्हान आहे आणि त्यासाठी सामूहिक प्रयत्नांची आवश्यकता आहे. यात काय योगदान देता येईल, असा त्यांनी विचार केला आणि एक पुस्तक विक्री केंद्र सुरू केले. सध्याच्या काळात वाचकाला पुस्तक सहज मिळावे, चांगले पुस्तक अधिकाधिक वाचकांपर्यंत पोचावे हा त्यांचा प्रयत्न आहे. या प्रयत्नांना चांगला प्रतिसाद मिळत आहे.
कपड्यांची जुळवा जुळव करणं यांत्रिक असलं तरीही मानवी भावभावनांची शब्दात जुळवा जुळव करतांना साहित्य निर्मिती नैसर्गिक रित्या होते. जबरदस्त निरीक्षण शक्ती असले की सकस साहित्याची निर्मिती होतेच.
डॉ. अनिल कुलकर्णी
Leave a Reply