नवीन लेखन...

शतकाचा साक्षीदार !

कॅनडाच्या दोन्ही बाजूला पसरलेले विस्तीर्ण महासागर, किनारपट्टीवरील वैविध्यतेने नटलेली पर्यटन स्थळं, देशाच्या अंतर्भागातील शांत सरोवरं, गावाबाहेर नजरेपार पसरलेले हिरवेगार व उंच वृक्ष, शहरातील टोलेजंग व मनोवेधक इमारती, स्वच्छ, सुंदर रस्ते, त्यावरनं तेवढ्याच संथ गतीने एकामागून एक धावणारी वाहानं, तितकेच सौजन्यशील नि कृतीशील लोक! …. सगळच कसं विलोभनिय! मनाला भुरळ घालणारं ! नवख पण आपलसं वाटणारं !

कॅनडात मी जे पाहिलं, अनुभवलं ते कधीच विस्मृतीत जाणारं नव्हतं! मी जेंव्हा एकांतात बसतो तेंव्हा एकएक गोष्ट माझ्या नजरेसमोरून तरळू लागते. माझ्याशी बोलू लागते. तिथल्या निसर्गाची किमया व निसर्गाशी अनुरूप मानवनिर्मित कलाकृती मनाला भुरळ घालतात, एक अनोखा आनंद देऊन जातात. त्यापैकीच एक अविस्मरणीय पर्यटन क्षेत्र म्हणजे अटलांटीक महासगराच्या किनारपट्टीवरील पेगीची खाडी (पेगीज कोव्ह) व शतकाचा शाक्षिदार ठरलेले तिथले लाईट हाऊस!

महासागराचं आक्राळविक्राळ रूप पहायला मिळालं ते नोव्हास्कोशियातील पेगीज कोव्ह ईथे. हॅलिफॅक्सच्या नैऋतेला अटलांटिक महासागराच्या किनारपट्टीवरील हे छोटेसं गाव. 43 किलोमीटर अंतर कापून तासाभरात आम्ही इथे येऊन पोहोचलो नि महासागराचं महाकाय रूप पाहून थक्कच झालो. किनाऱ्यापासून नजरेच्या पट्यात सारे पाणीच पाणी! महासागराला किनाऱ्याची मर्यादा नसती तर……? वास्तवात असे घडत नाही, हेच बरे, नाहीतर……? कल्पना न केलेलीच बरी! पर्वताच्या उंची एवढ्या उसळणाऱ्या लाटा, त्यांना तेवढ्याच समर्थपणे थोपविणारी पाषाणाची किनारपट्टी, किनारपट्टीवरील लहानमोठ्या बोडक्या खडकाळ टेकड्या, उंच टेकडीवर उभा राहून सागराच्या हालचाली पहाणारा शतकाचा साक्षिदार…..लाईट हाऊस! निसर्गाचा हा चमत्कार पाहून मन थरारलं नि त्याच्या किमयेचं कौतूकही वाटलं.

आम्ही महासगराच्या किनाऱ्यावर पोहोचलो. निसर्गाचं ते अदभूत दृश्य पाहून थक्कच झालो. समोर अथांग पसरलेला सागर नि त्याला तितक्याच ताकदीने थोपवून धरलेली पाषाणाच्या टेकड्यांची किनारपट्टी! टेकडीवर झाडा-झुडपांचा कुठे मागमुसही नव्हता. अशी किनारपट्टी मी प्रथमच पहात होतो. जितकी सुंदर तितकीच धोकादायक…. टेकडीवर बसून महासागराचा खेळ पहाण्यात मन रमून जाईल; परंतु थोडीशी बेपर्वाई सुद्धा माणसाचा कर्दनकाळ ठरेल!

आम्ही पोहोचलो तेंव्हा महासागर कांहीसा शांत होता. निळसर संथ लाटा किनारपट्टीला येऊन हळूवारपणे बिलगत होत्या. प्रियकराच्या मिलनासाठी आसुसलेल्या प्रियसीने प्रेमभराने मिठी मारावी, अगदी तशाच. पण पाषाण हृदयी, भावनाहीन किनारा……पाषाणच तो! त्याला कशा समजणार तिच्या अंतरीच्या भावना! तेवढ्याच निष्ठूरपणे तो त्यांना दूर लोटीत होता. त्यामुळे प्रेमभंगाने अश्रुढाळीत त्या पुन्हा सागरमातेच्या पोटात विलीन व्हायच्या.

उथळ खडकावरून पाय सावरीत आम्ही हळुवारपणे पाण्याच्या जवळ गेलो. किनारपट्टीलगतही समुद्राचा तळ उथळ नव्हता. त्याचा अंतही लागणार नाही इतका खोल; त्यामुळे पाण्यात पाऊल टाकणे तितकेच धोक्याचे होते. मग सागराच्या पाण्यात जाण्याचे साहस करणार कोण ? मंद लाटांचा पाठशिवणीचा खेळ पहात आम्ही तिथेच बसलो. बऱ्याच दिवसानंतर आकाश निरभ्र होते. डोकीवर सूर्य तळपत होता; परंतु सागरावरून येणाऱ्या शीतल वाऱ्यांमुळे ऊन चांदण्यासारखे शीतल भासत होते.

पर्यटकांची बरीच गर्दी होती. सागरातील आणि किनाऱ्यावरील गमती-जमती पहाण्यात वेळ केंहा निघून गेला समजलेच नाही.

दुपार टळून गेली. अचानक सूर्य ढगाआड लपला. घोंघावणारा वारा जमीनीच्या दिशेने सुसाट वाहू लागला. त्याबरोबर महासागरातही खळबळ माजली. आतापर्यंत शांत असलेला रत्नाकर उसळ्या घेऊ लागला. लाटांनी उचल घेतली. त्या तांडव करीत पुढे येऊ लागल्या, बघता-बघता त्या डोंगरा एवढ्या झाल्या.

त्या जेवढ्या गतीने येत; पाषाणहृदयी किनारा तेवढ्याच निष्ठूरपणे त्यांचा कडेलोट करी. तो दधीचि झाला होता, प्रेम भंगामुळे बेभान झालेला महासागर लाटांना उचलून किनाऱ्यावर जोराने आपटीत होता. एव्हना एक भली मोठी जोराची लाट आली व खडकावर आदळली. त्याबरोबर तिची झालेली ठिकरे आमच्या अंगावर येऊन पडली. आम्ही सारे भितीने मागे हटलो.

कारवारला असतांना लाटांचे पाणी मी कित्तेकवेळा आंगावर झेलले होते, लाटेबरोबर पाण्यात पडून गटांगळ्याही खाल्या होत्या. किंबहूना त्यात मोठी मौज वाटायची! पण तिथे समुद्र किनारा उथळ असल्याने धोका कमी. इथे नेमकी उलट परिस्थिती. काठावर उंच खडक आणि खाली खोल समुद्र! त्यामुळे पाण्यात जायचा प्रयत्न करणे म्हणजे जीवाशी खेळ करण्याचाच प्रकार! मन कांहीसे उदास झाले. महासागराचं ते आक्राळविक्राळ रूप मी प्रथमच पहात होतो. ते पाहून भितीयुक्त आनंदही वाटला!

माजलेल्या हत्तीप्रमाणे महासागर अजूनही किनाऱ्यावर धडक्या देत होता. क्रोधाने फेसाळत होता. टेकड्यांच्या माथ्यावर उभे राहून लोक समुद्राचं हे वेगळं रूप कौतुकाने पहात होते, कॅमेऱ्यात टिपीत करीत होते. उंच टेकडीवरील लाईट हाऊस मात्र या साऱ्या गोष्टी तटस्थपणे पहात होते. “रोज मरे, त्याला कोण रडे’  अशीच त्याची गत झाली असावी. गेल्या शतकभरात अशा अनेक घटना त्यांने पाहिल्या होत्या, नि त्या पाहून त्याचे मन आता खट्टू बनले होते. सुखरूपपणे किनाऱ्यावर पोहोचल्याचा आनंद व्यक्त करणारे खलाशी, वादळाच्या चक्रव्यूहात सापडून दिशाहीन झालेले प्रवाशी, बुडणाऱ्या जहाजांबरोबर आक्रोष करीत जीवन संपविणारे खलाशी, खवळलेल्या वादळाला तोंड देत पोटासाठी मत्सेमारी करणारे कोळी …..! या साऱ्या गोष्टींचा साक्षिदार म्हणजेच किनाऱ्यावर स्तब्धपणे उभे असलेले लाईट हाऊस!

***

” पप्पा, उद्या पेगीज कोव्हच्या लाईट हाऊसला जायचय.’

कन्या म्हणाली. लाईट हाऊस म्हणजे एखादे वीजगृह अशीच माझी कल्पना; परंतु इथे आल्यानंतर त्याचा अर्थ नि कार्य स्पष्ट झाले. पूर्वीच्या काळी संपर्क व्यवस्था किंवा दिशादर्शक यंत्रनाही नव्हती. त्यामुळे समुद्र किनाऱ्यावरील उंच भागावर मनोऱ्याच्या आकाराचे उंच गृह बांधले जायचे; त्यावर लाल दिवा तेवत ठेवायची व्यवस्था असायची. रात्रीच्या वेळी हे दिवे जहाजाना दिशादर्शक ठरायचे. धोकादायक किनारपट्टीवर सावधगिरीचा इशारा देण्याचे कार्यही लाईट हाऊसच्या माध्यमातून होत असे.

पेगीज कोव्हचे लाईट हाऊस पाहिल्यानंतर मला इजिप्तमधील “फेरोज ऑफ अलेक्झांड्रीया लाईट हाऊस’ची आठवण झाली. जगातील एक आश्चर्य म्हणून फेरोज लाईट हाऊसाचा उल्लेख कुठेसा मी वाचला होता. सातपैकी एक आश्चर्य म्हणून ओळखल्या गेलेल्या या लाईट हाऊसविषयी मनात औत्सुक्यही होते. ते लाईट हाऊस पहायला मिळाले नाही; परंतु त्याच्या जागी किमान पेगीज कोव्हचे लाईट हाऊस पहायला मिळाले याचे समाधान वाटले.

पेगीज कोव्हची किनारपट्टी ही तेवढीच धोकादायक आहे. यासाठीच 1915 मध्ये इथे लाईट हाऊस बांधण्यात आले. लाईट हाऊसने शतक पार केले तरी, ते आजही तेवढ्याच सुस्थितीत आहे.

पेगीज कोव्हच्या धोकादायक धक्यावर अनेक दुर्घटना घडल्या, अनेक जहाजे बुडाली, महासागराच्या रुद्रावतारापुढे कित्तेकांना आपले प्राण गमवावे लागले. त्यांच्या दीनवाण्या आरोळ्या लाईट हाऊसने ऐकल्या असतील, पाण्यात बुडणाऱ्यांची वाचण्यासाठीची धडपड त्यांने पाहिली असेल. त्यांच्या किंकाळ्या ऐकून त्याचं मनही द्रवल असेल; परंतु जमिनीत पाय घट्ट रोवून उभा असलेले लाईटहाऊस त्यांच्या मदतीला धाऊन जाऊ शकत नव्हते. लाल दिवा दाखवून धोक्याचा इशारा देण्यापलिकडे ते काहीच करू शकत नव्हते. मात्र या साऱ्या घटनांचा तो शतकाचा साक्षीदार आहे.

***
एव्हाना वादळ शांत झाले. पाऊस येता-येता हवेत विरून गेला. आकाश निरभ्र झाले. सागर किनाऱ्यावरून फिरण्यात आता पुन्हा मौज वाटू लागली. आम्ही एका टेकडीवरून दुसऱ्या टेकडीवर जाऊ लागलो. एक-एक टेकडी म्हणजे अखंड पाषाण! तिथे ना माती, ना तृण वा ना झाडे-झुडपे! अखंड बोडका खडकच तो! किनारपट्टीला सागराची शीतलता लाभली नसती तर….. सारा प्रदेश ओसाड वाळवंट बनला असता.

टेकडीच्या माथ्यावर जाताना तेवढीच कसरत करावी लागत होती. झाडे-झुडपे नव्हती; परंतु जागोजागी शेवाळले होते. त्यामुळे चालताना पावले तेवढीच जपून टाकावी लागत होती. चढतांना पाय घसरलाच तर…. ? कल्पनाच न केलेली बरी! त्यामुळे टेकडीवर जाण्याचा धोका कशासाठी पत्करावयाचा? असा एक विचार मनात येऊन गेला. परंतु निसर्गाची किमया पहाण्याची ओढ त्याहून अधिक होती. आम्ही सावधगिरीने पावले टाकीत टेकडीच्या माथ्यावर पोहोचलो. समोर लाटांचा पाठशिवणीचा खेळ सुरू होता. तो पहाण्यात मन रमून गेले. आधून-मधून थंड वाऱ्याची झुळूक सर्वांगाला चाटून जात होती. महासागरात दूरवर एक जहाज संथगतीने येताना दिसत होते. एखाद-दुसरा समुद्र पक्षी (सीगल) समुद्रावरून घिरटया घालतांना दिसायचा. मघाचा तो महासागराचा रुद्रावतार नि आताचे ते रमणीयदृश्य….. निसर्गाच्या किमयेचे हे गुढ न उकलणारेच होते. “माणसाने विज्ञानात कितीही प्रगती केली तरी, निसर्गापुढे तो हतबल आहे हेच खरे !’ असा मनात विचार येऊन गेला.

क्षणोक्षणी निसर्गाचं हे बदलतं रूप पहाण्यात मन रमून गेलं होतं. सागराच्या लाटांच्या छटावरून नजर हाटत नव्हती. हे अपूर्व, अद्भुत दृश्य पाहून मी मुग्ध झालो. एवढ्यात-

‘किती वेळ इथेच बसणार….? चला ऽ!’

महासागराची बदलती रूपं कॅमेऱ्यात टिपण्यात मग्न झालेली कन्या म्हणाली नि आम्ही भानावर आलो. सायंकाळचे पाच वाजले होते. आता थांबता येणार नव्हते. बळेबळेच टेकडीवरून खाली उतरू लागलो. टेकडीच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या छोट्याछोट्या परंतु विस्कळीत घरांकडे लक्ष गेले. छोटी असली तरी तितकीच निटनेटकी नि सुंदर घरं! मासेमारी करणाऱ्या स्थानिक लोकांची ही वसाहत! गावच नांव होतं “पेगीज कोव्ह!’ कांहीस वेगळ वाटलं. योगायोगानं एका ग्रामस्थाची भेट झाली. त्याच्याशी झालेल्या गप्पातून बरीच माहिती समजली. गावच्या नावामागे असलेली एक लोककथा त्यांने कथन केली. तो म्हणाला,

‘देअर इस अ लीजेंड बिहाईंड दी नेम ऑफ धीस व्हीलेज’ (गावच्या नावामागे एक दंतकथा आहे.)

तो इंग्रजीतच सांगू लागला,

‘ऑक्टोबर महिना होता. वातावरणात सर्वत्र धुके पसरले होते. समुद्रात आणि किनाऱ्यावरही समोरचे कांहीच दिसत नव्हते. त्यातच सर्वांग गारठून टाकणारी थंडी. पहाटे-पहाटेच महासागर खवळला, वादळ घोंघाऊ लागले. कापसाप्रमाणे धरतीवर बर्फ पडू लागला. तशा महासागरातही हालचाली वाढल्या.’

तो मध्येच थांबला. त्याचा चेहरा गंभीर बनला. आठवणींचं वादळ त्याच्या अंतर्मनात घोंघाऊ लागलं. त्याने एक दीर्घ श्वास घेतला नि पुढे म्हणाला,
“याच वेळी एक होडी किनाऱ्यापासून कांही अंतरावर आली. उसळलेल्या लाटांबरोबर ती हेलकावे घेत होती. होडीतील प्रवासी आकांताने आक्रोश करीत होते. किनाऱ्यावरील धक्यापर्यंत होडी पोहोचविण्याची त्यांची धडपड! बर्फाळ पावसामुळे समोरचे स्पष्ट दिसत नव्हते. लाईट हाऊसचा लाल दिवाही कोसळणाऱ्या बर्फाच्या पडद्याआड लपला. घोंघावणाऱ्या वादळाच्या झोताबरोबर दुर्दैवाने त्यांची होडी शेजारच्या हॅलिबट खडकावर आदळली नि तिचे तुकडे-तुकडे झाले. ते पाण्यात बुडाले. त्यातूनही कांहीजणांनी पोहत येण्याचा प्रयत्न केला; परंतु उसळलेल्या लाटांबरोबर तेही पाण्यात बेपत्ता झाले. मात्र त्यातील एक साहसी युवती खवळलेल्या सागराला आव्हान देत किनाऱ्याला येऊन पोहोचली.’

ती मदतीसाठी आक्रोश करीत होती. किनाऱ्यावरच्या लोकांनी तिचा आक्रोश ऐकला नि ते धावत गेले. तिला पाण्यातून बाहेर काढले. वादळ-वारा नि उसळणाऱ्या लाटांना तोंड देत मोठ्या धैर्याने ती किनाऱ्यापर्यंत पोहोचली.

त्या युवतीचे नाव होते, मार्गारेट! तिच्या धाडसाचं लोक कौतुक करू लागले. ती जितकी साहशी तितकीच सुंदर नि प्रेमळ. लोक आवडीने तिला पेगी म्हणून बोलाऊ लागले. आपल्या प्रेमळ स्वभावाने लोकांना तिने आपलसं केलं. ती कुठून आली, कुठे जाणार होती….. माहित नाही. परंतु लोकांना ती आपली वाटू लागली. याच पेगीचे पुढे एका स्थानिक युवकाशी लग्न झाले नि ती इथेचे राहू लागली. तिच्या अनेक साहसी कथा सांगण्यात येतात. याच पेगीच्या नावाने लोक पुढे या गावाला पेगीज कोव्ह म्हणू लागले.’
त्याने कथा संपविली नि तो कांही वेळ शांत झाला.

सुमारे 35 कुटूंबे पीढ्यानपीढ्या इथे रहात असल्याचे सांगून तो म्हणाला,

“आज हे एक महत्वाचे पर्यटन स्थळ बनले आहे, मासेमारी हाच इथल्या रहिवाशांचा मुख्य व्यवसाय! इथल्या लॉबस्टरची (खेकड्या सारखा जलचर प्राणी) चव तुम्ही जरूर चाखा.’

हा महासागर आमचा जीवन साथी आहे, साहेब! तो कधी आमच्यावर रागावतो, कधी खवळतो….. तेवढ्याच विशाल अंतकरणाने आमच्या चुकाही पोटात घालतो. त्याचे मन जितके निर्मळ, तितकाच तो हृदयानेही विशाल आहे. तोच आमचा खरा अन्नदाता !’
त्यांने लाईट हाऊसकडे एक नजर टाकली नि म्हणाला,

‘हा आमच्या जीवनाचा साक्षीदार !’

त्यांने सांगितलेली कथा ऐकून आम्हीही भाराऊन गेलो. त्याचे आभार मानले नि शेजारच्या उपहारगृहात गेलो. तिथल्या लॉबस्टरच्या पिझाची चव अजूनही आमच्या जीभेवर आहे. गाडीत बसण्यापूर्वी माझी नजर पुन्हा एकदा विस्तीर्ण महासागरावर आणि त्याच्या क्रीडा तटस्थपणे पहात असलेल्या लाईट हाऊसकडे गेली नि मुखातून शब्द बाहेर आले –

शतकाचा साक्षीदार!

….. मनोहर (बी. बी. देसाई)

 

बी. बी. देसाई
About बी. बी. देसाई 7 Articles
लेखन : पुनर्वसन कादंबरी, ‘मला भावलेला कॅनडा’ प्रवास वर्णन प्रकाशनाच्या वाटेवर, दैनिक "सकाळ' व "बेळगाव वार्ता'मधून विविध विषयांवर 20 वर्षे लेखन, ज्वाला, जिव्हाळा, अमरदीप दिवाळी अंकातून कथा, लेख व कविता प्रसिद्ध, अमरदीप दिवाळी अंकाचे सात वर्षे संपादक म्हणून कार्य हव्यास : लेखन, वाचन, विविध विषयांवर व्याख्याने, सामाजिक कार्यात सहभाग
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..