नवीन लेखन...

कौटुंबिक मूल्यशिक्षण काळाची गरज

आपण जर शाळेत सभोवताली पाहिले तर काय दिसते? वर्गात कित्येकजण केरकचरा टाकतात;काही मुले तर गोंधळ करतात;काही जण छोट्या छोट्या कारणावरून मारामाऱ्या करतात, लहान मुलेच असे वागतात असे नव्हे ;तर मोठी माणसेही असे वागताना दिसतात. रस्त्यात कोठेही थुंकणे, घाण टाकणे हे प्रकार तुम्हाला सर्रास दिसतात.गाडीवाले इतरांना अडथळा होईल याची पर्वा न करता कुठेही गाड्या उभ्या करतात, काहीजण भरधाव गाड्या चालवतात; त्यामुळे अनेकांना अपघातात आपले प्राण गमवावे लागतात .येथे असे दिसेल की प्रत्येक जण फक्त स्वतःचा विचार करतो .आपल्यामुळे इतरांना काही त्रास होतो का? इतरांचे काही नुकसान होते का? असा विचारच कोणी करत नाही असे का घडते? लोक वाईट आहेत म्हणून असे घडते का? याचे कारण असे की, चांगले काय आणि वाईट काय, याचे स्पष्ट चित्र लोकांच्या मनात नसते .आणि स्पष्टपणे कळत असले तरी, ते अंगवळणी पडत नाही म्हणून आपल्याला चांगले आयुष्य जगता यावे आणि आपल्याबरोबर सर्वांना सुख समाधान मिळावे यासाठी आपण स्वतःला जे वळण लावायचा प्रयत्न करतो तेच मूल्यशिक्षण होय.

आजच्या आधुनिक युगात मानवाच्या गरजा प्रचंड वाढत आहेत. त्या गरजा पुरविण्यासाठी त्याची चालू असलेली धडपड आणि या धडपडीच्या प्रवाहात तो सापडत असल्यामुळे आवश्यक तेवढा वेळ आपल्या कुटुंबाला व मुलांना देता येत नाही. मुलांच्या जीवनाकडे, जडणघडणीकडे ,शैक्षणिक प्रगतीकडे पाहणे त्यांना अशक्य होत आहे. आजच्या काळात मानवाला अशक्य असे काहीही नाही एवढी कामगिरी आधुनिक तंत्रज्ञानाने करून दाखवली आहे; परंतु तरीही मानव असुरक्षित आहे कारण कमावलेल्या सामर्थ्याबरोबर त्याच्याशी सुसंगत अशी मानवता, संस्कार जपणारी योग्य मूल्ये जोपासली गेलेली नाहीत. त्याची आज गरज आहे. नुसती प्रगती महत्त्वाची नाही, तर तिला मूल्यांची जोड असणेदेखील अत्यावश्यक आहे कारण ढासळलेली मूल्ये त्या प्रगतीला गालबोट लावतात. म्हणूनच आज घराघरांतून मूल्य शिक्षण देण्याची गरज आहे.

आपण अश्या अनेक बातम्या वाचतो की अमुक एका विद्यालयात रॅगिंग चा प्रकार झाला,परीक्षेत विद्यार्थी कॉपी काढताना पकडला गेला,नापास झाला म्हणून आत्महत्या केली,रस्त्यात मुलींची छेडछाड काढली गेली,अल्पवयीन मुले गाडी चालवताना अपघात,अनैतिकता, अराजकता, आतंकवाद, अवैध धंदे, भ्रष्टाचार, खून, चोरी, वाईट व्यसन, बलात्कार…यांसंदर्भातील बातम्या रोजच आढळतात. आजूबाजूला घडणार्‍या या घटना अल्पवयीन मुलांवर परिणाम घडवून आणतात. त्यांच्या वर्तणुकीतून ते दिसून येते. गुंडागर्दी करणे, बळाचा वापर करणे, अपशब्द वापरणे, यांत मुलांना काही चुकीचे वाटत नाही, कारण सभोवताली तेच त्यांना दिसून येते.अश्या कितीतरी बाबी समोर येतात ;असले कृत्य हा नैतिक मूल्यांच्या आणि संस्कारांच्या अभावाचाच परिणाम म्हटला पाहिजे.यावर मूल्य शिक्षण हाच एक चांगला आणि प्रभावी उपाय ठरू शकतो.

मूल्यशिक्षणामुळेच विवेक जागा होतो. वर्तन सुधारते. समाजात वावरण्याचा आत्मविश्वास येतो. व्यक्तिमत्त्वाला आकार येतो. आपल्या रोजच्या वर्तनातून ही मूल्ये, संस्कार व्यक्त होत असतात. यासाठी शाळेत, कुटुंबात, समाजात जागरूकता आणणे गरजेचे आहे.

आपल्या देशात रॅगिंगविरोधी कायदा लागू आहे. या कायद्यान्वये शिक्षाही केली जाते. तरीही विद्यार्थ्यांना धाक राहिलेला दिसत नाही. अलीकडे शासनाने मूल्यशिक्षणाची पहिली तीस मिनिटांची तासिका कमी केली;शाळेत दरदिवशी मूल्यशिक्षण तासिका असते ही मुलांच्या मनावर आपोआपच जविव सतत होत असे;पण आता तासिकाच नाही; त्यामुळे मूल्य शिक्षणावर शाळेत पाहिजे तसा भर देता येत नाही; आणि घरी आईवडिलांकडून अवास्तव अपेक्षा केल्या जात असल्याने; विद्यार्थ्यांच्या मनावर त्याचा परिणाम होतो. हा परिणाम नकारात्मक असतो. आपल्या आईवडिलांच्या अपेक्षा आपण पूर्ण करू शकत नाही, मग आपल्या मित्रमैत्रिणींना तरी त्या का पूर्ण करू द्यायच्या, असा नकारात्मक विचार विद्यार्थ्यांकडून केला जातो.विद्यार्थी-विद्यार्थिनीं पेक्षा त्यांच्या पालकांनाच मुलांच्या गुणांबद्दल जास्त आकर्षण असते. माझ्याच मुलाला किंवा मुलीला जास्त गुण मिळाले पाहिजेत, अशी ईर्ष्या असते. एखाद्याला सर्वाधिक गुण मिळवून पुढे जाण्याची महत्त्वाकांक्षा असण्यात गैर काही नसते. पण, इतरांबद्दल जेव्हा मनात मत्सराची भावना निर्माण होते आणि त्या भावनेतून जेव्हा त्रास दिला जातो, तेव्हा तो प्रकार अनैतिक अन अनावश्यक मानला पाहिजे. आपल्याला पुढे जायचे आहे ;म्हणून आपल्या वर्गातील हुशार अन संवेदनशील मनाच्या मुलींना त्रास द्यायचा, त्यांना हैराण करायचे, वेगवेगळ्या माध्यमातून भावनात्मक छळ करायचा, अतिशय गलिच्छ आरोप करून त्यांची प्रतिमा मलीन करायची अन सरतेशेवटी त्यांना शाळा-कॉलेज सोडण्यास वा आत्महत्या करण्यास भाग पडायचे अशी कितीतरी उदाहरणे महाराष्ट्रात घडली आहेत .हे कुठेतरी थांबले पाहिजे.त्यासाठी शिक्षक,पालक,समाज यांनी प्रयत्न केले पाहिजेत.

मूल्य म्हणजे मानवाच्या सदाचारपूर्ण वर्तणुकीची तत्त्वे होत व मूल्य शिक्षण म्हणजे संस्कार संक्रमणाचे कार्य होय. आजची मुले उद्याचे भावी नागरिक आहेत. भावी नागरिक सुजाण व संस्कारक्षम असला पाहिजे यासाठी शाळेतून मूल्यशिक्षण रूजवायला हवे. छत्रपती शिवाजी महाराज,शाहू महाराज,म.ज्योतिराव फुले, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्वामी विवेकानंद, साने गुरुजी अशा अनेक थोर व्यक्ती मूल्यशिक्षणातूनच घडलेल्या आहेत. त्यांच्या विचारांची कास धरूनच आपल्याला भावी नागरिक घडवायचे आहेत.

शिक्षक मूल्यशिक्षणाची गरज ओळखून आपल्या विद्यार्थ्यांचे मित्र, मार्गदर्शक, प्रेरक बनत आहेत. यामध्ये शिक्षकांबरोबरच पालकांचीही भूमिका महत्त्वाची आहे. आज कुटुंबातले सूर हरवत चालले आहेत. मोबाईल, इंटरनेटमुळे जग जवळ येत आहे; पण कुटुंबात संवाद नसल्यामुळे नात्यांमध्ये दरी निर्माण होत आहे. त्यामुळे मूल्यशिक्षण देणे ही काळाची गरज बनली आहे.

मूल्यशिक्षण हे औपचारिक, अनौपचारिक दोन्ही पद्धतीने देऊ शकतो. केवळ मूल्यशिक्षण देऊन भागत नाही, तर ते आचरणात येईल, असे आपण पाहिले पाहिजे. तशी संधी आणि परिस्थिती निर्माण केली पाहिजे. विद्यार्थ्यांमध्ये विविध उपक्रमांद्वारे मूल्यशिक्षण रूजवू शकतो. परिपाठात तसेच इतर उपक्रमांत नैतिक मूल्यांद्वारे श्रमप्रतिष्ठा, राष्ट्रभक्ती, स्री-पुरुष समानता, सर्वधर्मसहिष्णुता, राष्ट्रीय एकात्मता, वैज्ञानिक दृष्टिकोन, संवेदनशीलता, शिस्त, निटनेटकेपणा, वक्तशीरपणा या मूल्यांचे विविध उपक्रम घेऊन विद्यार्थ्यांमध्ये मूल्यांची रूजवण करतो ,पण नवीन शैक्षणिक धोरण 2020 मध्ये त्याची नवीन समितीने सुधारणा करून घेतली पाहिजे.

दिल्लीच्या निर्भया प्रकरणानंतर महिलांबाबतच्या कायद्यात आमूलाग्र बदला झाला. विनयभंग छेडछाडीसारख्या कायद्याद्वारे गुन्हेगारांमध्ये जरब बसवण्याच्या दृष्टीने बदल करण्यात आले. निर्भया प्रकरणातील अल्पवयीन मुलाच्या सुटकेवरून झालेला वाद पाहता केंद्र सरकारने लागलीच कायद्यात बदल केला. गंभीर गुन्ह्यात सहभागी असलेल्या अल्पवयीन मुलाचे कृत्य लक्षात घेत त्याच्यावर मोठ्या व्यक्तींप्रमाणे गुन्हा दाखल करून खटला चालवयचा की नाही, हे ठरवण्याचा अधिकार जिल्हा स्तरावरील दोन कमिट्यांना देण्यात आला. म्हणजेच १६ वर्षांच्या मुलाने गंभीर गुन्हा केल्याचे सिध्द झाल्यास त्याला जन्मठेपेसारखी कठोर शिक्षा होऊ शकते.

अल्पवयीन गुन्हेगारांचे शहरी आणि ग्रामीण असे वर्गीकरण केले असता शहरी भागात कोवळ्या गुन्हेगारांचे प्रमाण जास्त आढळून येते. मुलांमध्ये वाढत असलेली हिंसा, उद्धटपणा आणि गुन्हेगारी प्रवृत्ती रोखण्यात सर्वांत महत्त्वाचे काम पालकांचे असते. आपल्या पातळीवर प्रयत्न करूनही मुला-मुलींच्या वागण्यात बदल होत नसल्यास समुपदेशन हाच त्यावर उपाय असू शकतो. मुलांशी होणारा संवाद हे यावर सर्वांत मोठे औषध आहे. मात्र, एकत्र कुटुंब पध्दतीचा ऱ्हास होत असून, मुलांचे संगोपन कसे करायचे याचेच आव्हान पालकांसमोर निर्माण होते आहे.

काहीच दिवसांपूर्वी कोल्हापूर येथील एका बापाने आपल्या 10 वर्षांच्या मुलास तृतीय पंथियास पाच लाख रूपयास विकले. केवढा मोठा हा मूल्यांचा ऱ्हास, त्या मुलावर संस्कार करणे सोडा; पण आपण त्याला जन्म दिला तेही विसरला. ही ढासळत चाललेली समाजातील मनोवृत्ती आहे,असेच म्हणावे लागेल.
समाजात ही बदलत चाललेली मनोवृत्ती बदलणे ही जबाबदारी देखील समाजाचीच आहे.मुलांच्या प्रवृत्तींमध्ये बदल होत आहेत याची जबाबदारी सर्वप्रथम पालक, शिक्षक, नातेवाईक आणि नंतर सर्वच समाजावर येते. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा होणाऱ्या गैरवापरावर अंकुश लावण्याची जबाबदारी पालकांना पार पाडावी लागेल.

अल्पवयीन गुन्हेगारांची वाढती संख्या भविष्यात सुप्त ज्वालामुखीप्रमाणे ठरू शकते. अल्पवयीन मुले अगदी तरबेज वा मुरलेल्या गुन्हेगाराप्रमाणे समाजविघातक गुन्हे वा अपराध का करू लागली? त्यांना कायद्याचा धाक वाटेनासा झाला का? याचे उत्तर शोधण्याची जबाबदारी पोलिसांसह समाजाने देखील घ्यायला हवी.

या सर्व घटनांचा विचार शासनाने केला व कडक कायदा करून याला पायबंद घालण्यासाठी कायदा केला.

क्रमशः

— चंद्रकांत धोंडी चव्हाण
chandrakantchavan205@gmail.com

चंद्रकांत धोंडी चव्हाण
About चंद्रकांत धोंडी चव्हाण 5 Articles
शिक्षण एम.ए.बी.एड.; नोकरी - श्री वा.स.विद्यालय, माणगाव, ता.कुडाळ, जि.सिधुदुर्ग, पद-पर्यवेक्षक, सेवा - २०वर्षे, विविध सामाजिक संस्था, संघटना मध्ये कार्यरत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..