नवीन लेखन...

शंख व त्याचे हिंदू धर्मातील महत्व

शंख व त्याचे हिंदू धर्मातील महत्व:

शंखाचे अनेक प्रकार आहेत. पण शास्त्रानुसार वामावर्ती आणि दक्षिणावर्ती शंख हे सर्वात महत्त्वाचे मानले जातात. शंख निर्मिती ही शंखचूर्णांच्या हाडांपासून होते असं मानलं जातं. तर त्यांची उत्पत्ती समुद्र मंथनादरम्यान झाली होती असंही मानलं जातं. हेच कारण आहे की, देवी लक्ष्मी आणि दक्षिणावर्ती शंख हे दोघे भाऊ-बहिण मानले जातात. शंख हा लक्ष्मीचा छोटा भाऊ समजला जातो. शंख हे समुद्र मंथनातून प्राप्त झालेले पाचवे रत्न आहे.

महाभारतातील शंखांची नावे-

कोणाचा शंख कोठला :
श्रीकृष्ण  – पांचजन्य
अर्जुन  – देवदत्त
भीम – पौंड्र
युधिष्ठिर – अनंतविजय
नकुल – सुघोष
सहदेव – मणिपुष्पक

यापैकी एका शंखाचा आवाज करून युद्धाची सुरुवात केली जायची.

हिंदुस्थानी संस्कृतीमध्ये व हिंदू धर्मामध्ये शंखाची पूजा महत्त्वाची मानले जाते. भगवान विष्णूंनी धारण केलेल्या चार आयुधांमध्ये एक शंख आहे. इतकेच नव्हे तर शंखाची पूजा केल्याखेरीज विष्णूची पूजा केल्यास ती त्यास पोहोचत नाही, अशी मान्यता आहे. शंख ठेवण्याकरिता जे (बहुधा कासवाच्या आकाराचे) आसन असते त्याला अडणी म्हणतात.

शंखाची शास्त्रीय माहिती:

शंख : मॉलस्का हा मृदुकाय म्हणजे शरीर मऊ असलेल्या प्राण्यांचा संघ आहे. गॅस्ट्रोपोडा हा या संघाचा एक वर्ग असून या वर्गात गोगलगायी, कवड्या, लिंपेट, हेटेरोपॉड इ. प्राणी येतात. या बहुतेक प्राण्यांना एकपुटी, कप्पे नसलेले, कठीण कवच असते. या कवचाला शंख व त्यात राहणार्‍या गॅस्ट्रोपॉड (उदरपाद) प्राण्यांना शंखधारी वा शंखवासी म्हणतात. शंख सामान्यपणे मळसूत्राप्रमाणे सर्पिल व असमित (विभाजनाने दोन समान न होणारा) असतो. कँकिओलीन व कॅल्शियम कार्बोनेट (कॅल्साइट वा अँरॅगोनाइट) यांच्या विशिष्ट थरांनी शंख बनलेला असतो. या कवचाच्या लगेच खाली असणार्‍या त्वचेच्या घडीला म्हणजे प्रावाराच्या स्रावापासून हे थर तयार होतात. शंखाचा आतला पृष्ठभाग चिनी मातीसारखा दिसतो तर काहींचा मोत्यासारखा दिसतो. शंखाची वेटोळी एकमेकांस चिकटलेली असून लगतच्या दोन वेटोळ्यांमधील संधिरेषेला सेवनी म्हणतात. शेवटचे वेटोळे सामान्यपणे आधीच्या वेटोळ्यांपेक्षा मोठे असते. शेवटचे वेटोळे वगळून उरणार्‍या शंखाच्या भागाला त्याचा कळस वा शिखर म्हणतात आणि कळसाच्या टोकाला शिखराग्र म्हणतात. शिखराग्रापासून सर्वांत दूर असलेला शंखाचा भाग म्हणजे त्याचा पाया होय. काही प्राण्यांच्या शंखाच्या पायाच्या पश्च टोकाजवळील वरील भागात कॅल्शियममय किंवा केराटीन या प्रथिनाचे शृंगमय पदार्थाचे पत्र्यासारखे झाकण असते, त्याला प्रच्छद म्हणतात. बहुतेक गॅस्ट्रोपॉड प्राणी आपले शरीर आखडून शंखात घेऊ शकतात. प्राणी शंखात शिरल्यावर हे प्रच्छद घट्ट लावून घेतो. त्यामुळे शंखाचे द्वारक (मुख) बंद होते आणि मासे, खेकडे यांसारख्या शत्रूंपासून त्याचे रक्षण होते. थंड प्रदेशातील काही गॅस्ट्रोपॉड प्राणी हिवाळ्यात शंखामध्ये झोपून राहतात म्हणजे शीतनिद्रा घेतात. या काळात ते शंखाचे द्वारक एका झाकणाने बंद करून घेतात. शीतनिद्रेचा काळ संपताना हे झाकण प्राणी विरघळवून टाकतो. अशा रीतीने शंखाचा संरक्षणासाठी उपयोग होतो. तसेच काही अवयवांना त्याचा आधारही मिळतो.

शंखाच्या वेटोळ्यांच्या आतील बाजू एकमेकींना घट्ट चिकटलेल्या असतात. त्यामुळे कवचाच्या मध्यभागी शिखराग्रापासून पायापर्यंत जाणारा एक कण तयार होतो, त्याला मध्याक्षक म्हणतात. अशा प्रकारे शंखातील पोकळी मुखापासून शिखराग्रापर्यंत सलग असते.

शंखांचे आकार, आकारमान, रंग, त्यावरील नक्षी, चकाकी, मुखाचे स्वरूप इ. बाबतींत पुष्कळ विविधता आढळते. या वैशिष्ट्यांचा उपयोग गॅस्ट्रोपॉड प्राण्यांचे वर्गीकरण करतानाही होतो. पेला, नलिका, पट्टी, घुमट, गोल, बिंब, शंकू, द्विशंकू, चाती, टोपी, बुटका मनोरा, ज्वालामुखी (उदा., लिंपेट) इ. अनेक आकारांचे शंख असतात. शंखांचे आकारमानही अगदी भिन्न असते. कॅरिबियन समुद्र व ऑस्ट्रेलियाचा समुद्रकिनारा येथील काही शंखांचे (उदा., हॉर्सकाँच) आकारमान ६० सेंमी. पेक्षा जास्त असते. जमिनीवरील महाकाय आफ्रिकी गोगलगायींचे २० शंख एका ओळीत जवळजवळ ठेवल्यास त्यांची एकूण लांबी २•५ सेंमी. पेक्षाही कमी असते. काही शंखांचे पृष्ठभाग गुळगुळीत, चकचकती, रंगहीन अथवा रेषा, पट्टे, ठिपके यांची रंगीबेरंगी नक्षी असलेले असतात तर काही शंखांवर उंचवटे, पुटकुळ्या, वरंबे इ. असल्याने त्यांचे पृष्ठभाग खडबडीत असतात. काही शंखांवर काट्यांसारख्या रचनाही असतात. गॅस्ट्रोपॉड प्राण्यांमध्ये जीवनप्रणाली व पर्यावरण यांना अनुरूप असा शंख निर्माण करण्याची प्रवृत्ती आढळते. उदा., समुद्रतटीय प्रदेशांत लाटांमध्ये टिकून राहतील असे जड व बळकट शंख तयार होतात तर खंड-फळीच्या वरील पट्ट्यात वजनाला हलके शंख तयार होतात आणि २,००० ते ३,००० मी. खोलीच्या वितलीय भागांतील शंख आधिक पातळ व रंगहीन असतात. जमिनीवरील प्राण्यांचे शंखही भार कमी व्हावा म्हणून वजनाला हलके व पातळ असतात. अशा प्रकारे शंखांचा पर्यावरणाशी परस्परसंबंध असतो. त्यामुळे जीवाश्मरूपातील शंखांचा त्या काळातील पर्यावरणाविषयी अंदाज बांधण्यासाठी उपयोग होऊ शकतो.

शंखाची उत्पत्ती:

त्वं पुरा सागरोत्पन्न: विष्णूना विधृते करे।
असत: सर्वदेवानां पांचजन्य नमोस्तुते॥

अशी प्रार्थना करून शंखास पूजेमध्ये मानाचे स्थान दिले जाते.

ब्रह्मवैवर्त पुराणात शंखाच्या उत्पत्तीविषयी कथा आहे- शंखासुर नावाचा सागरापासून उत्पन्न झालेला आणि सदैव सागरातच वास्तव्य करणारा बलाढ्य राक्षस होता. या राक्षसाने जबरदस्तीने वेदहरण केले व तो सागराच्या तळाशी दडी मारून बसला. मग देवदेवता, ऋषीमुनींनी क्षीरसागरामध्ये योगनिद्रेत असलेल्या भगवान विष्णूंना जागृत केले आणि शंखासुरास धडा शिकवण्याकरिता सांगितले. भगवान विष्णूंनी मत्स्यरूप धारण करून शंखासुराचा ठावठिकाणा शोधून काढला व त्याचा शिरच्छेद करणार इतक्यात शंखासुर म्हणाला की, भगवान आपल्या हातून मज मरण यावे याकरिताच मी वेद पळविले. आपण माझा वध अवश्य करावा; परंतु माझी एक इच्छा अशी की माझे कलेवर तुम्ही नेहमी आपल्या डाव्या हातात धारण करावे तसेच माझ्या कलेवराच्या स्पर्शाच्या जलाने आपणांस स्नान केल्याखेरीज आपली पूजा पूर्ण होणार नाही असा मला वर द्यावा.’’ भगवान विष्णूंनी ‘तथास्तु’ म्हणले आणि शंखासुराचा वध केला. त्या दिवसापासून विष्णूने हातात शंख धारण करावयास सुरुवात केली.
देवपूजेमध्ये शंखपूजेचे महत्त्व अनन्यसाधारण आहेच. त्याचप्रमाणे पुरातन काळी अनेक प्रकारच्या पुण्यकर्मांच्या वेळी, विवाहप्रसंगी, युद्धाच्या वेळी शंखध्वनी खूप महत्त्वाचा मानला जातो. मंदिरामध्ये शंखध्वनीचे विशेष महत्त्व आहे. तंत्रोक्त विधीमध्ये शंखाद्वारे अभिषेकाचे अलगच महत्त्व आहे. शंखध्वनींमुळे उत्पन्न होणाऱ्या कंपनांमुळे सभोवतालचे वातावरण शुद्ध व पवित्र होते. तसेच तो फुंकणाऱ्या व्यक्तीची फुप्फुसाची क्षमता वाढून तेज व ओजवृद्धी होते. पुरातन काळापासून शंख हे विजयाचे, सुखसमृद्धीचे प्रतीक मानले जाते.

शंख चंद्रसूर्यासमान देवस्वरूप आहे. त्याच्या मध्यभागी वरुण, पृष्ठभागात ब्रह्मदेव आणि अग्रभागी गंगा व सरस्वतीचे वसतिस्थान आहे. त्रैलोक्यात जेवढी तीर्थे विराजमान आहेत, ती सर्व विष्णूच्या आज्ञेने शंखामध्ये निवास करतात, अशी धार्मिक कल्पना आहे. सूर्याच्या उष्णतेने ज्याप्रमाणे बर्फ वितळून जातो, त्याचप्रमाणे ‘शंखाच्या केवळ दर्शनाने पापे नष्ट होतात, तर त्याच्या स्पर्शाने काय न साध्य होईल?’ असे एक सुभाषित आहे.
जिथे शंखनाद होतो तिथे कायमच सकारात्मक उर्जा असते. अध्यात्मिक शक्तीने परिपूर्ण असल्याने घरात शंखनाद करणं हे शुभ मानलं जातं. शंख हे भगवान विष्णूचं प्रमुख अस्त्र आणि शस्त्र देखील मानलं जातं.

शंखाचे प्रकार व जाती:

शंखाचे एकूण तीन भाग पडतात. (१) शंखाची पन्हळ, (२) ज्या ठिकाणाहून शंखात घातलेले पाणी पडते ते अग्र, (३) ज्यावर वलये असतात ती मागची बाजू.

शंखाचे मुख्यत: दोन प्रकार असतात. पहिला दक्षिणावर्ती (उजवा) शंख व वामावर्ती (डावा) शंख.
ज्या शंखाचा पृष्ठभाग स्वतःकडे करून देवाकडे त्याचे अग्र केले म्हणजे त्याच्या पन्हाळीची पोकळी उजव्या बाजूला येते असा शंख म्हणजे दक्षिणावर्ती (उजवा) शंख.

याविरुद्ध ज्या शंखाच्या पन्हाळीची पोकळी डाव्या बाजूला येते असा शंख म्हणजे वामावर्ती (डावा) शंख.

दक्षिणावर्ती शंखाचे पुन्हा वजन व आकारावरून नर व मादी असे भेद होतात. शंखाच्यादेखील ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र अशा चार जाती आहेत.

द्विजाती भेदेनस पुनस्तु चतुर्विध:। श्‍वेतो रक्त: पीतकृष्णौ ब्राह्मक्षत्रादिवर्णज:।
शंखांच्या जातिभेदाप्रमाणेच त्यांचे गणेश शंख, विष्णू शंख, देवी शंख व मोती शंख असेही भेद पडतात.

अथर्ववेदामध्ये सात मंत्रांनी युक्त अशा ‘शंखमणिसूक्ता’मध्ये दक्षिणावर्ती शंखाची महती वर्णन केली आहे. दक्षिणावर्ती शंख आंतरिक्ष वायू, ज्योतिमंडल आणि सुवर्णाने युक्त आहे. समुद्रमंथनातून निर्माण झालेला हा शंख राक्षसी, वाईट शक्तींचा नाश करणारा आहे. रोगनिवारण करून आरोग्यसंपन्न आयुर्मान देणारा, जीवनाचे रक्षण करणारा तसेच अज्ञान व अलक्ष्मीस दूर करून ज्ञान व अखंड स्थिर लक्ष्मी देणारा आहे.

शंख पूजा कशी करावी (धार्मिक समजुती):

कासवाकृती अडणीवरील शंख कसा ठेवायचा असतो? कासवाचे मुख आपल्या दिशेने असते पण वरचा शंख कसा ठेवायचा ?
शंखाचा निमुळता चोचीसारखा / पन्हळीसारखा भाग उत्तर दिशेला करावा. शंख अर्थातच पोकळ बाजू वर करून ठेवावा म्हणजे त्यात पाणी राहील. वाजवण्याकरता तोंड फोडलेला शंख पाणी भरून ठेवावा. तो देवपूजेकरता घेऊ नये. तो निव्वळ “शंखध्वनी” करण्याकरताच वापरावा. त्याची पूजा करणे झाल्यास स्वतंत्र करावी. शंखाला हळदकुंकू वहात नाहीत, तसेच गंधाक्षतफूल न वाहता, निव्वळ गंधफूल वहावे, शक्यतो पांढरे फूल वहावे.

पूर्वी गंध म्हणल्यावर, चंदनाचे उगाळून केलेले गंधच असायचे, हल्ली नसते. तर हल्ली निरनिराळ्या रंगांची /मातीची गंधे मिळतात. त्यातिल शक्यतो पांढरे/वा पिवळट गंध वापरावे. कुंकू कालवून केलेले गंध शंखासाठी वापरू नये.

शिवपूजेत शंखाचे महत्त्व नसणे :

‘शिवपूजेत शंखाची पूजा केली जात नाही, तसेच शिवाला शंखाचे पाणी घालून स्नान घालत नाहीत. देवांच्या मूर्तीमध्ये पंचायतनाची स्थापना असेल, तर त्यातील बाणलिंगावर शंखोदक घालण्यास हरकत नाही; पण महादेवाची पिंड असलेल्या बाणलिंगाला शंखोदकाने स्नान घालू नये.’
शास्त्र : शिवपिंडीत शाळुंकेच्या रूपात स्त्रीकारकत्व असल्याने स्त्रीकारकत्व असलेल्या शंखातील पाणी पुन्हा घालण्याची आवश्यकता नसते. बाणलिंगाबरोबर शाळुंका नसल्याने त्याला शंखाच्या पाण्याने स्नान घालतात.

आरतीच्या वेळी शंखनाद विहित असणे :

‘देवळात महादेवाची पूजा करतांना शंखपूजा उक्त नाही. मात्र आरतीपूर्वी शंखनाद विहित आहे आणि अवश्य केला जातो.’
शास्त्र : शंखनादाने प्राणायामाचा अभ्यास तर होतोच; शिवाय शंखनाद जेथपर्यंत ऐकू जातो, त्या परिसरात भूत, पिशाच वगैरे वाईट शक्तींचा त्रास होत नाही.

शंख पूजाचे फळ:

साक्षात लक्ष्मीचा सहोदर असणाऱ्या दक्षिणावर्ती शंखाची पूजा ज्या घरात होते, तेथे कायम मंगलमय वातावरण राहते.
देवपूजेपूर्वी शंखाची पूजा करण्याचा प्रघात आहे. देवपूजेकरिता लागणारे सर्व साहित्य शुद्ध करण्यासाठीदेखील शंखातील पाणी सिंचन केले जाते. दीर्घकाळ शंखात राहिलेले पाणी पूजेच्या समाप्तीनंतर विष्णूवर शिंपडल्यास त्या पाण्याच्या स्पर्शाने पूजकाच्या अंगाला चिकटलेली ब्रह्महत्येसारखी घोर पातकेसुद्धा नाहीशी होतात.

पांढाराशुभ्र, कांतिमान, गुळगुळीत असा दक्षिणावर्ती शंख ‘अष्टमी’ किंवा ‘चतुर्दशीस’ विधिवत पूजनाने आपल्या देव्हाऱ्यात किंवा तिजोरीत स्थापन करावा. राज्य, धन, कीर्ती, आयुष्य, शत्रूवर जय, कोर्टकचेऱ्यांमध्ये यश, पती-पत्नी नातेसंबंध यापैकी अपेक्षित फलप्राप्तीकरिता दिवसाच्या विशिष्ट नियोजित प्रहरामध्ये शंखपूजन करण्यास सांगितले आहे.

‘ॐ सर्वतोभद्राय सर्वाभीष्टफलप्रदाय सर्वारिष्ट-दुष्ट-कष्ट-विषारथ कामितार्थप्रदाय शंखाय स्वाधिष्ठायकाय भास्करा क्ली श्रीं ?? क्रौं नम: स्वाहा।’

या प्रतिष्ठा मंत्राने शंखाची स्थापना करून पुढीलपैकी एका मंत्राचा १०८ वेळा स्फटिकाच्या माळेवर जप करावा ॐ श्री लक्ष्मीसहोदराय नम:।,

ॐ श्रीं पयोनिधी जाताय नम:।, ॐ श्रीं दक्षिणावर्तशंखाय नम:।

गंगा-यमुना-सरस्वती यांच्यासह अनेक देवता करतात शंखामध्ये वास
शंख यामुळे पूजनीय मानलं जातं की, यामध्ये अनेक देवतांचा वास असतो. त्यामुळेच शंखाला पूजा स्थळावर विशेष स्थान देण्यात येतं. दक्षिणावर्ती शंखाच्या वरच्या बाजूला चंद्राचा वास असतो असं मानलं जातं. तर मध्य भागात वरुणाचा वास असतो. तर शंखाच्या पृष्ठ भागात ब्रम्हा आणि अग्र भागात गंगा, यमुना आणि सरस्वतीचा वास असतो असं म्हटलं जातं.
शंख कसे तयार होतात?

शंख कसे बनतात?

हे कवच टर्बिनेलिडे कुटुंबातील टर्बिनेला पायरम या समुद्री गोगलगाय प्रजातीचे आहे . ही प्रजाती
कँकिओलीन व कॅल्शियम कार्बोनेट (कॅल्साइट वा अँरॅगोनाइट) यांच्या विशिष्ट थरांनी शंख बनलेला असतो. या कवचाच्या लगेच खाली असणार्‍या त्वचेच्या घडीला म्हणजे प्रावाराच्या स्रावापासून हे थर तयार होतात.शंख कसे बनतात?
हे कवच टर्बिनेलीडे कुटुंबातील टर्बिनेल्ला पायरम जातीचे आहे या समुद्री गोगलगाय प्रजातीचे आहे.
ही प्रजाती हिंद महासागर आणि आसपासच्या समुद्रात राहताना आढळते. कवच पोर्सिलेनियस असते (म्हणजे कवचाचा पृष्ठभाग मजबूत, कडक, चमकदार आणि काहीसा अर्धपारदर्शक, पोर्सिलेनसारखा असतो).

फेंगशुईनुसार शंखांचे फायदे

घरातील शंख किंवा सीशेल घरात ठेवल्यास शुभेच्छा आकर्षित करतात. शंख हे संवाद, निरोगी नातेसंबंध आणि समृद्धीचे प्रतीक आहे. शंख आहे. भगवान बुद्धाच्या चरणी असलेल्या आठ शुभ चिन्हांपैकी एक. वाईट शक्तीपासून घराचे रक्षण करण्यासाठी, खिडकीवर शंख ठेवा. फेंगशुईनुसार, त्यांना बेडरूममध्ये (नैऋत्य) ठेवल्याने जोडप्यांना त्यांचे नाते दृढ होण्यास मदत होते. समृद्ध करिअरसाठी लिव्हिंग रूमच्या ईशान्येला सीशेल ठेवा. फेंग शुईमध्ये, शेलसह डिझाइन केलेले वाहते पाण्याचे कारंजे घरात वाहत असलेल्या पैशाचे प्रतीक आहे आणि संपत्तीचे संरक्षण देखील

शंखा साठी वास्तू नियम:

• प्रार्थनेदरम्यान फुंकलेला शंख देवतांना जल अर्पण करण्यासाठी वापरू नये.
• पवित्र पाण्याने दररोज शंख स्वच्छ करा आणि पांढऱ्या किंवा लाल रंगाने झाकून टाका कापड
• पूजेच्या ठिकाणी शंख नेहमी पाण्याने भरलेला ठेवावा.
• नियमितपणे शंखांची पूजा करा आणि ते दिवसातून किमान दोनदा फुंकले जातील याची खात्री करा.
• भगवान शंकराला जल अर्पण करण्यासाठी शंख वापरू नका.
• घरातील मंदिरात कधीही पूजेसाठी दोन शंख एकत्र ठेवू नयेत.
• जमिनीवर कधीही शंख ठेवू नका कारण तो देवतेसारखा आहे.
• तुटलेला किंवा चिरलेला शंख कधीही मंदिरात ठेवू नये.
• काटेरी शंख आणि कोरल सजावटीचे तुकडे म्हणून ठेवणे टाळा कारण ते घराच्या निरोगी वातावरणात असंतुलन निर्माण करतात.

शंखिनी म्हणजे काय?

शंखिनी ही मादी शंख आणि खडबडीत पृष्ठभाग असलेल्या शेल स्टोनचा एक प्रकार आहे. शंखिनी नकारात्मक ऊर्जा निर्माण करते, म्हणून ती शुभ विधी किंवा फुंकण्यासाठी वापरली जात नाही.

कासवाच्या मूर्तीवर धातूच्या शंखाचे काय फायदे आहेत?

कासवाच्या मूर्ती वास्तू दोष कमी करण्यास मदत करतात कारण त्यात पर्यावरण संतुलन आणि सुसंवाद साधण्याची प्रचंड शक्ती असते. कासव करिअरचे नशीब, दीर्घायुष्य आणि आरोग्य, संपत्ती आणि कौटुंबिक नशीब वाढविण्यात देखील मदत करते. शंख पवित्र आहे आणि कीर्ती, दीर्घायुष्य आणि समृद्धी आकर्षित करतो. हे पाप साफ करणारे आणि धनाची देवी आणि भगवान विष्णूची पत्नी लक्ष्मीचे निवासस्थान आहे.

शास्त्र :

शंखनादाने प्राणायमाचा अभ्यास तर होतोच; शिवाय शंखनाद जेथपर्यंत ऐकू जातो, त्या परिसरात भूत, पिशाच्च वगैरे वाईट शक्तींचा त्रास होत नाही.

शंखाचे महत्त्व आणि उपयुक्तता-

शंखध्वनींमुळे उत्पन्न होणार्‍या कंपनांमुळे सभोवतालचे वातावरण शुद्ध व पवित्र होते. तसेच तो फुंकणार्‍या व्यक्तीच्या हृदयाची व फुप्फुसाची क्षमता वाढून तेज व ओजवृद्धी होते.

दक्षिणावर्ती शंख दुर्मिळ असल्याने त्याच्या किंमती अधिक असतात. शंखाची योग्य ती परीक्षा करूनच तो खरेदी करावा कारण बाजारात हल्ली खूप बनावटी शंख विक्रीसाठी आहेत. कृपया खोट्या व बनावटी वस्तूंना बळी पडू नये.
शंख वाजवण्यासाठी स्त्री – पुरुष असे कोणतेही बंधन नाही. स्त्रियापण शंख वाजवतात.

शंखाचे अर्थशास्त्र:

शंखाची किंमत बऱ्याच गोष्टीवर अवलूंबून असते.

१. जसे की शंख दक्षिणावर्ती आहे की उत्तरावर्ती.
२. शंखाची चकाकी, एकसंधपणा, नैसर्गिक रंगसंगती.
३. शंख कोणत्या समुद्रतळी मिळाला, जसे की बंगालचा महासागर, अरबी समुद्र, हिंद महासागर इ.
४. शंखाची लांबी, वजन यावर सुद्धा किंमत अवलंबून असते.

शंख नेहमी वजनावर विकला जातो. साधारणपणे, उत्तरावर्ती शंख स्वस्त असतात कारण ते विपुल प्रमाणात मिळतात व त्याचे धार्मिक व पौराणिक महत्व एवढे नसते.

तो साधारणपणे दहा रुपये ग्राम पासून उपलब्ध होतात. परंतु दक्षिणावर्ती शंख हा कमीतकमी २५०० रुपये ग्राम प्रमाणे विकले जातात व ते दुर्मिळ आहेत.

लेखकाने स्वतः ३-४ फुटी दक्षिणावर्ती शंख पाहिले आहेत, जे साधारणपणे २-३ किलो वजनाचे होते व किंमत कोटीच्या घरात होती. जाणकार व्यक्तीकडून खात्री करूनच शंख विकत घ्यावा.

संदर्भ :
१. विकिपीडिया मराठी
२. सर्व फोटो गुगलच्या सौजन्याने
३. शंखावरील बरेच लेख व साहित्य

डॉ. दिलीप केशव कुलकर्णी
मोबा: ९८८१२०४९०४
१८/०८/२०२४

 

डॉ. दिलीप केशव कुलकर्णी
About डॉ. दिलीप केशव कुलकर्णी 73 Articles
वनस्पती शास्त्रात शिवाजी विद्यापीठातून १९८० साली पीएच. डी. आंतर राष्ट्रीय कीर्तीच्या राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा,(NCL) पुणे येथे १९८१ साली रुजू. सुमारे ३२ वर्षे झाडांचे उती संवर्धन या विषयामध्ये सखोल संशोधन. यामध्ये १२ राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जर्नल मध्ये पेपर प्रसिद्ध अति वरिष्ठ वैज्ञानिक म्हणून २०१३ साली निवृत्त. सोशल मीडिया मध्ये वावर. जवळ जवळ पन्नास पॉप्युलर लेख लेख प्रसिद्ध. तसेच इतर विषयावरील वीस लेख प्रसिद्ध. वेंकटेश सुप्रभातम चे दोन खंडात मराठी भाषांतराची पुस्तके प्रकाशित. mob. 9881204904

2 Comments on शंख व त्याचे हिंदू धर्मातील महत्व

  1. डॉ.कुलकर्णी ह्याचा लेख ‘शंख’, ह्या विषयावर समर्पित केला आहे. आपल्या पौराणिक साहित्यामध्ये शंख ह्याचा अनेक ठिकाणी संदर्भ येतो, व बर्याचदा आपल्याला त्या विषयाची माहिती नसल्याने गैरसमज पसरतात. जसे कोणाला शंख म्हटले की समज कमी आहे असा अर्थ होतो. तरी लेख वाचल्यावर विषयाची शास्त्रोक्त माहिती मिळते.

  2. लेख नेहीप्रमाणेच विस्तृत आणि माहितीपूर्ण आहे. धन्यवाद..

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..