नवीन लेखन...

शब्दाची व्युत्पत्ती

“आपण दिवसभरात आपल्या भाषेतले इतके शब्द वापरतो पण मला नेहमीच कुतूहल वाटत आलंय ते या सगळ्या शब्दांच्या “व्युत्पत्ती” चं … म्हणजेच त्यांचा उगम कसा झाला याचं . उदा: गवत हा शब्द असेल तर आपण “ गवत” असाच का म्हणतो तवग , वतग किंवा अजून काहीही का नाही म्हणत ?? … कारण आपण पिढ्या न पिढ्या हेच म्हणत , ऐकत आलो आहोत……. पण हा शब्द कधीतरी पहिल्यांदा उच्चारला किंवा लिहिला गेला असेलच ना तेव्हा तो असाच का उच्चारला असेल , त्याला काहीतरी कहाणी किंवा संदर्भ तर असेलच पण हे असे असंख्य “मुलभूत शब्द” आहेत ज्यांचा उगम/ व्युत्पत्ती शोधणे फार अवघड आहे . हे सगळे शब्द आपण वारसाहक्काने वापरतो आणि पुढे पाठवतो ..

सुरवातीला आदिमानव खुणा , हातवारे किंवा वेगवेगळे आवाज काढून एकमेकांशी संभाषण करत असतील आणि जशी जशी प्रगतीच्या दिशेनी वाटचाल चालू झाली आणि भाषा जन्माला येऊ लागली तेव्हाचे हे “मुलभूत शब्द”असणार. मग वाक्य पूर्ण करण्यासाठी आणि काळ विषद करण्यासाठी क्रियापद आलं , मग भाषा अधिक विकसित होऊ लागली तशी “विशेषणे , म्हणी, कविता, वाक्प्रचार इत्यादी इत्यादी … आणि मग प्रांतवार वेगवेगळ्या भाषा जन्माला आल्या … मराठी देखील त्यातलीच एक समृद्ध भाषा ….

गरज ही शोधाची जननी आहे म्हणतात ना … ते भाषेच्या बाबतीत देखील लागू होतं . भाषेचा शब्दकोश तेव्हाच वाढतो जेव्हा त्यात नवीन शब्द वाढत जातात आणि शब्द तेव्हाच वाढतात जेव्हा त्याची गरज निर्माण होते . म्हणजे अगदी आजच्या काळातलं उदाहरण द्यायचं झालं तर Selfie हा शब्द . मुळात हा प्रकारच पूर्वी नसल्याने यासाठी मराठीत शब्दच नव्हता त्यामुळे आता इथे गरज निर्माण झाली आणि नवीन शब्द रुजू झाला “स्वयंप्रतिमा“. अशा अनेक इंग्रजी शब्दांना मराठी प्रतिशब्द म्हणून बऱ्याच नवीन शब्दांची मराठी मध्ये भर पडली . जशी जशी नाट्य आणि चित्रपट सृष्टी आपला जम बसवू लागली त्यावेळेस Director , Producer अशा अनेक शब्दांसाठी दिग्दर्शक, निर्माता , नेपथ्य , पार्श्वसंगीत असे अनेक नवीन शब्द मराठीच्या सेवेत रुजू झाले.

पण या मुलभूत शब्दांनंतर आलेले शब्द बहुतांशी मुलभूत शब्दांवरून किंवा इतर भाषांतील शब्दांवरून उगम पावले आहेत . संस्कृत भाषेतून देखील मराठीमध्ये बरेच शब्द तसेच्या तसे तर काही थोडेफार साधर्म्य असणारे आले आहेत . या प्रकारात शहरांची / गावांची नावे किंवा वाक्प्रचार येतात . त्याचा उगम कसा झाला याबद्दल अंदाज लावता येऊ शकतात. मुंबादेवी वरून मुंबई , नाग नदी वरून नागपूर ही काही नावांची उदाहरणं देता येतील तर वाक्प्रचारांसाठीची उदाहरणे खालीलप्रमाणे….

आजही लग्नसमारंभात असे अनुभव येतात की गुरुजींनी मंगलाष्टकं सुरु केली की दोन्ही बाजूंचे नातेवाईक , काही आज्ज्या वगैरे अनेकांना स्वरचित मंगलाष्टकं म्हणायची असतात , तिथेही Waiting List असते . त्या नादात गुरुजींची मुहूर्ताची वेळ गाठण्यासाठी लगबग होते आणि त्यामुळे मंगलाष्टकातील शेवटचा भाग “ तदेव लग्नं सुदिनं तदेव I ताराबलं चंद्रबलं तदेव II “ हे म्हणताना गुरुंजींची जी बिकट अवस्था होते त्या लगबग किंवा धावपळीच्या अवस्थेला त्यातल्या “तारा बलं” या शब्दावरून “ तारांबळ उडणे “ हा वाक्प्रचार रूढ झाला . … ही झाली या शब्दाची व्युत्पत्ती . अर्थात याचा कुठे लिखित पुरावा नाही .

हरताळ ही एक प्रकारची पिवळी पूड , ज्याचा उपयोग पूर्वीच्या काळी सध्याच्या काळातल्या whitener सारखा करत . पूर्वी पोथ्या लिहिताना काही चूक झाली तर त्यावर हरताळ फासत असंत . थोडक्यात ती गोष्ट रद्द करत , मिटवून टाकत म्हणजेच संपवून टाकत . यावरूनच “संप करणे” म्हणजे “हरताळ करणे” हा शब्द आला असावा. हिंदीत देखील हडताल हाच शब्द वापरतात .

विनोद निर्मिती साठी काही गमतीदार उदाहरणं देखील देता येतील… आईस्क्रिम ला “दुग्ध शर्करा युक्त शीत घन गोल गट्टू” , सिग्नल ला “अग्निरथ आगमन निर्गमन ताम्र कास्य पट्टिका” तर टेबल टेनिस ला “हरित काष्ठक मंचकावर घे टकाटक दे टकाटक”.
या उलट काही ठिकाणी मात्र इतर भाषिकांना प्रतिशब्द शोधायला लागल्याची उदाहरणं देखील आहेत . शाळेत असताना इंग्लिश च्या बाईंनी सांगितलेलं या प्रकारातल एक उदाहरण आजही आठवतंय …. तो शब्द म्हणजे “ व्हरांडा” . बहुधा ब्रिटीशांच्या भारतावरच्या राजवटी दरम्यान घरासमोरची मोकळी जागा म्हणजेच हा व्हरांडा त्यांच्या नजरेस पडला आणि त्याला इंग्लिश मध्ये प्रतिशब्द नसल्याने त्यांनी तो तसाच्या तसा त्यांच्या भाषेत उचलला . आजही Oxford Dictionary मध्ये किंवा अगदी आत्ताच्या Google translate वर सुद्धा Veranda हा शब्द सापडतो. पुन्हा एकदा इथेही असा कुठला लिखित दस्तावेज असल्याचं ऐकीवात नाही .

मूळ “चिकट” या शब्दावरून त्या पुढची कृती सांगणारा “चिकटवणे” हाच शब्द योग्य आहे जो आजकाल “चिटकवणे , चिपकवणे” असा काहीही म्हणतात . बरेचदा खाणावळी वर “ उपहार गृह “ अशी पाटी आपण बघितली असेल पण तो शब्द (उप + आहार) याचा संधी असल्याने “उपाहार गृह” असाच असला पाहिजे . उपहार म्हणजे भेटवस्तू , त्यामुळे Gift articles च्या दुकानांवर उपहार गृह ही पाटी जास्त रास्त ठरेल . इंग्लिश मधल्या Double आणि triple याला आजकालच्या मराठीत डबल आणि “टिबल” म्हणतात आणि त्याही पुढच्या परिस्थितीला “चौबल” सुद्धा म्हणतात …या अशा टिबल , चौबल शब्दांपुढे मात्र आपल्याला “हतबल” व्हायला होतं ……… असो …….
त्यामुळे कुठलाही शब्द उच्चारताना त्याची व्युत्पत्ती काय असेल याचा जर आपण विचार केला , अंदाज बांधले तर आपली भाषा आत्मसात करण्याची प्रक्रिया अधिक रंजक तर होईलच पण आपण आपल्या भाषेच्या अधिकाधिक जवळ जाऊ… समरस होऊ ….

तळटिप : सदर लेख हा माझ्या तुटपुंज्या ज्ञानावर , आजवरचे काही अनुभव आणि वाचनात आलेल्या काही संदर्भांच्या आधारे लिहिला आहे . काही चुका असल्यास “भाषातज्ञ” मंडळींनी जरूर मार्गदर्शन करावे .

© क्षितिज दाते.

ठाणे.

Avatar
About क्षितिज दाते , ठाणे 77 Articles
केवळ एक हौस म्हणून लिखाण सुरू केलं . वेगवेगळ्या विषयांवर पण साध्या सोप्या भाषेत लेखन . आकाशवाणीवरील कार्यक्रमात काही लेखांचं प्रसारण झालं आहे .काही लेख/कथा पॉडकास्ट स्वरूपात देखील प्रसारित झाल्या आहेत . Snovel या वेबसाईट / App वर "सहज सुचलं म्हणून" या शीर्षकाखाली तुम्ही ते पॉडकास्ट ऐकू शकता.

1 Comment on शब्दाची व्युत्पत्ती

  1. अतिशय सुटसुटीत आणि खुमासदार पद्धतीने लिहिला आहे लेख. आवडला. परंतु आणखी सखोल माहिती अपेक्षित होती. व्युत्पत्ती बद्दल

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..