नवीन लेखन...

जेष्ठ चित्रकार रघुवीर मुळगावकर

रघुवीर मुळगावकर यांचा जन्म १४ नोव्हेंबर १९१८ रोजी गोव्यातील अस्नोडा येथे झाला.

मुळगावकर यांचे वडील शंकर मुळगावकर हेही चित्रकार होते. त्यांचे मूळ आडनाव राजाध्यक्ष होते. गावाच्या नावावरून त्यांनी ते मुळगावकर असे केले. शंकररावांनी गोव्यात चित्रकलेचा एक वर्ग चालवला होता. रघुवीर मुळगावकर यांचा थोरला भाऊदेखील चित्रकलेत पारंगत होता. पण दुर्दैवाने, तो अल्पायुषी ठरला. पुढे रघुवीर मुळगावकर वडिलांचा चित्रकलेचा वारसा सांभाळला.

मुळगावकरांच्या शेजारी प्रसिद्ध चित्रकार ए.एक्स.त्रिंदाद राहत. लहानपणी रघुवीर त्यांची चित्रे न्याहाळत बसत असत. त्रिंदादांनीही या मुलातील कलागुण हेरले व शंकररावांना रघुवीरास चित्रकलाशिक्षणासाठी मुंबईला धाडण्यास सांगितले. रघुवीर मुळगावकर मुंबईला आले. त्या काळात चित्रकार एस.एम. पंडित यांचे नाव कलाक्षेत्रात प्रसिद्ध होते. चित्रपट, पोस्टरे, कॅलेंडरे या माध्यमांतून पंडितांची कला लोकांना परिचित होती. मुळगावकरांनी मुंबईला आल्यानंतर काही काळ एस.एम. पंडितांकडे काढला.

मुळगावकरांनी एकलव्याप्रमाणे पंडितांचे काम न्याहाळत त्यांची शैली जवळून अभ्यासली. पुढे मुळगावकर गिरगावात स्थायिक झाले. तेथे कुलकर्णी ग्रंथागार, केशव भिकाजी ढवळे, ग.पां. परचुरे, रायकर यांच्या प्रकाशनांच्या पुस्तकांच्या वेष्टनांची कामे मिळू लागली. तो काळ मराठी साहित्यातला सुवर्णकाळ म्हणून ओळखला जातो. पुस्तके, नियतकालिके यांच्यासोबत कॅलेंडरेही मोठया प्रमाणात प्रकाशित होत असत. बहुश: देवदेवतांची असणारी त्यांवरील चित्रे मुळगावकरांच्या कुंचल्याने नटू लागली. पूर्वीच्या पिढीत राजा रविवर्म्याने देवदेवतांची चित्रे काढून घरोघरी चित्रकलासंस्कार पोचवण्याचे जे काम केले, तेच मुळगावकरांनी पुढे नेले.

प्रल्हाद केशव अत्रे, विनायक दामोदर सावरकर, पु.ल. देशपांडे, चिं.वि. जोशी, अ.वा. वर्टी यांच्यासह अनेक साहित्यिकांच्या पुस्तकांची मुखपृष्ठे मुळगावकरांच्या कुंचल्याने सजली. त्याचप्रमाणे दीपलक्ष्मी, धनुर्धारी, वसंत, अनुप्रिता, नंदा, माधुरी, माणिक, अलका, पैंजण अशा अनेक नियतकालिकांची व त्यांच्या दिवाळी अंकांची मुखपृष्ठे मुळगावकरांच्या कुंचल्याने साकारली. मुळगावकरांनी दीपलक्ष्मी नियतकालिकासाठी १९५८ ते १९७६ सालांदरम्यान, म्हणजे अठरा वर्षे, मुखपृष्ठे चितारली. या कामांमधून दीपलक्ष्मीचे ग.का. रायकर व शब्दरंजन नियतकालिकाचे जयंत साळगावकर मुळगावकरांचे स्नेही बनले. मुळगावकरांनी देवदेवतांप्रमाणे काही व्यक्तिरेखाही अमर केल्या.

बाबूराव अर्नाळकरांचे धनंजय, छोटू, झुंझार-विजया, काळापहाड, धर्मसिंग, चारुहास आदी गुप्तहेर मुळगावकरांनी साकारले होते. दरमहा सहा कथा प्रसिद्ध होणाऱ्या या मालिकांना मुळगावकरांनी अश्या रितीने सादर केले, की धनंजय वगैरे पात्रे काल्पनिक असूनही वाचकांना ती खरीखुरी वाटत. मुळगावकरांनी कथाचित्रेही अमाप काढली. विशेषत: हाफटोनमधील वॉश चित्रे असोत, वा सरळ रेषांमध्ये काढलेली रेखाचित्रे, कृष्णधवल रंगांतील त्यांची कथाचित्रे देखणी असत. या कृष्णधवल रंगांमध्ये अनेक पौराणिक व ऐतिहासिक चित्रमालिका त्यांनी प्रसिद्ध केल्या. त्यामध्ये गणेश पुराण, रामायण, महाराष्ट्रातील संत आदी मालिका लोकप्रिय झाल्या.

संख्येने सुमारे पाच हजारांच्यावर चित्रसंपदा निर्माण करणाऱ्या मुळगावकरांची ‘स्प्रे’ या माध्यमावर जबरदस्त पकड होती. त्यांनी या माध्यमाचा वापर मोठया कुशलतेने केला. त्यांच्या कामाचा झपाटादेखील मोठा होता. प्रसिद्ध गायिका नलिनी मुळगावकर या त्यांया भावजय नलिनी मुळगावकर यांनी संपादलेल्या रत्नदीप दिवाळी अंकामध्ये त्यांनी कथाचित्रे व चित्रमालिका चितारणे आरंभले. पुढे त्यांनी स्वतःचा रत्नप्रभा हा अंक सुरू केला. या वार्षिकामधून त्यांनी आपल्या खास चित्रे रसिकांसमोर आणली.

रघुवीर शंकर मुळगावकर यांचे ३० मार्च १९७६ रोजी निधन झाले.

— संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4228 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..