नवीन लेखन...

बचत आणि गुंतवणूक

गुंतवणूक करणे म्हणजे जमिनीत आंब्याचे बी पेरण्यासारखे असते. बी पेरून त्याची योग्य निगराणी करावी लागते, अनेक वर्षे वाट पाहावी लागते, तेव्हा त्याचे मोठ्या वृक्षात रूपांतर होते. हा वृक्ष नेमका किती मोठा होईल व किती वर्षांनी आंबे येतील हे आधीच अचूक सांगता येत नाही.

बचत आणि गुंतवणूक हे शब्द आपण प्रसारमाध्यमांमधून आणि आजूबाजूच्या लोकांकडून नेहमीच ऐकत असतो. पैशांची बचत करणे आणि कुठेतरी पैसे गुंतवणे महत्त्वाचे आहे हे आपल्याला माहीत असते. पण योग्यप्रकारे आर्थिक नियोजन करण्यासाठी या शब्दांचा नेमका अर्थ समजावून घेणे व ते अंमलात आणणे महत्त्वाचे असते.

बचत म्हणजे काय, गुंतवणूक म्हणजे काय, वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवणूक करताना कुठली काळजी घ्यावी, या मार्गात कोणकोणते खाचखळगे असू शकतात व कोणती पथ्ये पाळावीत हे आपण आज पाहूया. बचत व गुंतवणूक यातील फरक काय असतो हे आपण प्रथम समजावून घेऊ.

प बचत

समजा एखादी व्यक्ती महिन्याला 50,000 रुपये कमावते व त्यातले 35,000 रुपये कुटुंबाचा घरखर्च व इतर दैनंदिन गरजांसाठी प्रत्येक महिन्यात खर्च होतात. याचा अर्थ त्या व्यक्तीने महिन्याला 15,000 रुपयांची बचत केली असा होतो. सोप्या भाषेत सांगायचे तर कमावलेले पैसे खर्च न करता बाजूला काढून ठेवणे म्हणजे बचत.

दर महिन्याला बचत केलेले हे 15,000 रुपये सहसा आपण घरी न ठेवता बचत खात्यात, बँकेच्या मुदत ठेवीत (In term deposit) अथवा अल्पकालीन गुंतवणुकीसाठी असणाऱ्या म्युच्युअल फंड योजनांमध्ये (mutual fund scheme) ठेवतो. हे करण्यामागे प्रमुख उद्देश हा असतो की, ते पैसे सुरक्षित रहावेत व हवे तेव्हा वापरायला मिळावेत. पैशांची सुरक्षितता व हवे तेव्हा पैसे काढता येणे हे बचतीत महत्त्वाचे असते. त्यावर किती व्याज मिळते हे महत्त्वाचे असतेच, पण सर्वाधिक महत्त्व सुरक्षितता व हवे तेव्हा उपलब्ध असण्याला असते.

गुंतवणूक

जर दर महिन्याला वरीलप्रमाणे 15,000 रुपयांची बचत केली तर आपली बचत साहजिकच हळूहळू वाढत जाते. या रकमेतील काही भाग आपल्याला अचानक उद्भवणाऱ्या खर्चासाठी लागू शकतो. त्यामुळे काही रक्कम कायमच वर उल्लेख केलेल्या आल्पकालीन बचत योजनांमध्ये ठेवावी लागते. पण आपल्या सर्वच आर्थिक गरजा पुढील काही महिन्यांमध्ये किंवा 1-2 वर्षांमध्ये उद्भवणाऱ्या नसतात. उदाहरणार्थ निवृत्तीची तरतूद, मुलांचे उच्च शिक्षण, लग्नखर्च या सर्व खर्चांची तरतूद करण्यासाठी वय कमी असताना अनेक वर्षांचा अवधी असतो. याचबरोबर महागाईमुळे वरील सर्व खर्चांसाठी मोठी रक्कम लागते. विशेषतः मुलांचे उच्च शिक्षण व स्वतःच्या निवृत्तीची तरतूद यासाठी सतत वाढणाऱ्या महागाईमुळे खूप मोठी रक्कम जमवावी लागते. जिथे मोठी रक्कम उभारावी लागणार आहे अशा भविष्यकालीन गरजांसाठी कमी व्याज देणारी बचत पुरेशी नसते. त्यासाठी जिथे पैशाची चांगली वृद्धी होईल अशा ठिकाणी गुंतवणूक करावी लागते. नेमके सांगायचे झाले तर महागाई ज्या वेगाने वाढते त्यापेक्षा अधिक वेगाने आपल्या गुंतवणुकीचे मूल्य वाढणे आवश्यक असते. यासाठी आपल्या बचतीतला काही भाग दीर्घकालीन गुंतवणुकीकडे वळवणे आवश्यक असते.

गुंतवणूक करणे म्हणजे जमिनीत आंब्याचे बी पेरण्यासारखे असते. बी पेरून त्याची योग्य निगराणी करावी लागते, अनेक वर्षे वाट पाहावी लागते, तेव्हा त्याचे मोठ्या वृक्षात रूपांतर होते. हा वृक्ष नेमका किती मोठा होईल व किती वर्षांनी आंबे येतील हे आधीच अचूक सांगता येत नाही. पण वाट पाहण्याची क्षमता व चिकाटी असेल तर भरपूर फळे मिळण्याची खूप शक्यता असते.

जमीन/घर (रिअल इस्टेट), शेअर बाजारात ज्यांची खरेदी/विक्री केली जाते अशा कंपन्यांचे शेयर्स व या शेअर्समध्ये पैसे गुंतवणारे म्युच्युअल फंड या गोष्टींमध्ये तज्ज्ञाच्या सल्ल्याने केलेली गुंतवणूक भविष्यात चांगला परतावा देणारी ठरू शकते.

सोने हा देखील एक चांगला गुंतवणूक पर्याय आहे. आपल्या गुंतवणुकीच्या 5 ते 10 टक्के गुंतवणूक सोन्यात करायला हरकत नाही. जेव्हा जागतिक मंदीमुळे, युद्धजन्य परिस्थितीमुळे किंवा अन्य जागतिक संकटांमुळे शेअर बाजार आणि रिअल इस्टेट यांचे भाव पडत असतात, अशा वेळी सोन्यातील गुंतवणूक तारून नेते असा मागील अनेक दशकांचा अनुभव आहे.

 

दीर्घकालीन गुंतवणूक करताना पुढील तीन मुद्दे लक्षात ठेवावेत :

1 जमीन, घर अथवा चांगल्या कंपन्यांच्या शेयर्समध्ये केलेल्या गुंतवणुकीत दीर्घकाळात खूप चांगल्या वृद्धीची (म्हणजे महागाईच्या दरापेक्षा अधिक वेगाने भाव वाढण्याची) अपेक्षा ठेवता येते.

2 शेअर्स, म्युच्युअल फंड अथवा रिअल इस्टेटमधील गुंतवणुकीत, किती वर्षात पैशांची किती वृद्धी होईल ह्याचा निश्चित आकडा सांगता येणे कुणालाही शक्य नसते. जितका गुंतवणुकीचा अवधी अधिक, तेवढी चांगल्या परताव्याची शक्यता जास्त.

3 गुंतवणूक ही तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच करावी. चांगल्या कंपन्यांचे शेअर्स अनेक पटींनी नफा देऊन जाऊ शकतात, तसेच खराब कंपन्यांमध्ये गुंतवलेले आपले सर्व पैसे बुडूदेखील शकतात. तज्ज्ञांचा सल्ला, वाट बघण्याची तयारी व बाजाराच्या सतत होणाऱ्या चढ-उताराने विचलित न होणे महत्त्वाचे असते. इक्विटी म्युच्युअल फंडाच्या अनेक योजनांनी मागच्या 20-25 वर्षांमध्ये गुंतवणूकदारांना उत्तम नफा मिळवून दिला आहे. अशा योजनांमध्ये आपण तज्ज्ञांच्या मदतीने पैसे गुंतवू शकतो.

गुंतवणूकदारांची दिशाभूल होण्याची कारणे

कुठल्याही प्रकारची गुंतवणूक करताना काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात. अन्यथा दिशाभूल होण्याची शक्यता असते. गुंतवणूकदारांची फसवणूक झालेली अनेक उदाहरणे आपण वृत्तपत्रात सतत वाचतो. दिशाभूल होण्याची काही प्रमुख कारणे व ते कसे टाळावे हे आपण बघूया :

  1. अधिक व्याजाच्या योजनांमागे धावणे : कुठलीही गुंतवणूक करताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी. जेव्हा एखाद्या योजनेत अधिक व्याजदर मिळेल असे सांगितले जाते, तेव्हा तिथे त्या प्रमाणात जोखीमही अधिक असण्याची दाट शक्यता असते. उदाहरण द्यायचे तर सहकारी पतसंस्थांमध्ये मुदत ठेवींवर राष्ट्रीयकृत बँकांपेक्षा अधिक मिळत असलेला व्याजदर. याचा अर्थ असा नव्हे की, अशा ठिकाणी पैसे ठेवूच नयेत. पण आपण घेत असलेल्या जोखमीची जाणीव नक्की असावी व इथली गुंतवणूक मर्यादित ठेवावी.
  2. पैसे दुप्पट करण्याचे आमिष दाखवणाऱ्या योजना : झटपट श्रीमंत होण्याच्या नादात भले भले लोक अशा योजनांच्या आहारी जातात. अशा योजनांना इंग्रजीत ‘पॉन्झी स्कीम’ असे म्हणतात. सध्या बाजारात जो व्याजदर प्रचलित आहे, त्यापेक्षा खूप अधिक व्याजदराचे आमिष या योजनांमध्ये दाखवले जाते. त्यात अधिक पैशाच्या हव्यासापायी लोक मोठ्या प्रमाणात पैसे गुंतवतात. सुरुवातीला काही महिने लोकांकडून आलेल्या पैशांतूनच नियमितपणे व्याज दिले जाते. त्यामुळे लोकांचा विश्वास बसतो व अधिक लोक या योजनेकडे आकर्षित होतात. अशा प्रकारे पैसे गोळा करून, एक दिवस हे भामटे गुंतवणूकदारांचे पैसे हडप करतात व पसार होतात. दुर्दैव असे आहे की, हे फसवणुकीचे प्रकार अनेक वर्षे चालू आहेत. पण काम न करता अधिक पैसे कमावण्याच्या हव्यासापोटी लाखो लोक दरवर्षी ह्याला बळी पडतात.
  3. एजंटांकडून होणारी फसवणूक : विमा कंपनी, णङखझ कंपनी अथवा इतर कुठल्या कंपनीच्या एजंटनी चुकीची माहिती सांगून पॉलिसी विकण्यातून आपली फसवणूक होऊ शकते. स्वतःच्या तात्कालिक फायद्यासाठी कधी कधी लोकांची दिशाभूल केली जाते व त्या योजने/पॉलिसीबद्दल मोठी स्वप्ने दाखवली जातात. कुठल्याही योजनेत पैसे गुंतवताना त्याबद्दल संपूर्ण माहिती पैसे देण्याआधीच करून घ्यावी. त्या योजनेत आधी पैसे गुंतवलेल्या लोकांचा अनुभव माहिती करून घ्यावा. केवळ चुकीची माहिती देणेच नव्हे, तर अर्धवट माहिती देणे व गुंतवणुकीत असलेली जोखीम पूर्णपणे न सांगणे ही देखील फसवणूकच असते.
  4. कागदपत्रांची पडताळणी : जमीन अथवा घर खरेदी करताना मालकी व मालमत्तेचा कर भरणा केल्याची सर्व कागदपत्रे व्यवस्थित तपासून घ्यावीत. व्यवहार होऊन गेल्यावर फसवणूक झाल्याचे लक्षात आले तर पश्चात्ताप करण्याची वेळ येते. नंतर कोर्टात गेलात तरी किती वर्षे खटला चालेल हे सांगता येत नाही.
  5. ऑनलाईन व्यवहार : फक्त खात्रीच्या वेबसाईटवर व स्वतःच्या मोबाइल अथवा संगणकावरूनच ऑनलाईन व्यवहार करावेत. आपला पासवर्ड व मोबाइल फोनचा पिन देखील कुणाला सांगू नये. आपले सर्व पासवर्ड नियमितपणे बदलत रहावे व ते ओळखायला सोपे नसावेत. अशा प्रकारे सावध राहून जर आपण गुंतवणुकीचे व इतर आर्थिक व्यवहार केले व दीर्घकाळासाठी गुंतवणूक केली तर आपण नक्कीच लवकर आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होऊन आयुष्याचा आनंद उपभोगू शकतो.

–केदार रायकर

(व्यास क्रिएशन्स च्या पासबुक आनंदाचे दिवाळी २०२२ ह्या अंकामधून प्रकाशित)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..