नवीन लेखन...

सत्यनारायण पूजा – एक विश्लेषण

लोकसत्ताच्या ‘चतु:सूत्र’ या सदरातील ‘संस्कृतीच्या वाटाघाटी’ हा प्रा. श्रद्धा  कुंभोलकर यांचा १२नोव्हें. २०२० ला ( पुणे आवृत्तीत ) प्रसिद्ध झालेला लेख आणि त्यानिमित्तानें प्रा, विजय काथरे यांची १३ नोव्हे. ची लोकसत्तामधील ‘लोकमानस’ या सदरातील प्रतिक्रियाही वाचली. सत्यनारायण व्रतावर आणखी माहिती मिळावी अशी इच्छा काथरे यांनी प्रगट केलेली आहे. त्यानुसार माझा हा लेख.

या विषयाला स्पर्श करतांना, सुरुवातीलाच मी स्पष्ट करतो हें केवळ एक विश्लेषण आहे ; कोणाच्याही भावना दुखवायची माझी इच्छा नाहीं.

  • तूर्तास कुंभोजकर याच्या लेखावर मी अधिक लिहीत नाहींये. मात्र, एका मुद्याचा उल्लेख करावासा वाटतो. त्या म्हणतात, ‘आपली संस्कृति एकजिनसी असल्याचा दावा कां केला जातो ?’.

(एका अन्य संदर्भात, श्री. श्री. म. भावे यांनी या समाजाला ‘एकजिनसी’ म्हटलें आहे. मात्र, संदर्भ वेगळा असल्यानें, त्यावर चर्चा योग्य नाहीं. पण, त्यामुळे कुंभोजकरांच्या विधानाला बळकटी मिळते). १२ नोव्हेंबरच्य ‘लोकमानस’ मध्यें मंगेश निमकर यांनी दोन संस्कृतींची सरमिसळ, देवाणगेवाण, आदानप्रदानाबद्दल लिहिलें आहे. ‘दोन संस्कृती’ असा उल्लेख असल्यानें, निमकर यांनाही ही संस्कृती ‘एकजिनसी’ असल्याचें प्रतीत होत नाहीं. त्यामुळे, कुंभोलकराच्या विधानाला बळकटीच मिळते.

आपल्या संस्कृतीमधील वैविध्य तर सर्वसाधारण माणसालाही माहीत असते. भारताच्या वेगवेगळ्या भागांमधील हिंदूंच्या अनेक चालीरीती भिन्नभिन्न आहेत, उदा. लग्नातील विधी, मृत्यूपश्चात केले जाणारे विधी, व्रतवैकल्यें , इत्यादी.  महाराष्ट्रात (दक्षिणी संस्कृतीत ) विवाहित स्त्रिया मंगळसूत्र घालतात, तर उत्तर व उत्तर-पूर्व भारतात भांगात सिंदूर घालतात. महाराष्ट्रात वटसावित्रीपूजन करतात, तर उत्तरेत करवा (कड़वा) चौथ. देवदेवतांचे व अन्य परंपराचें वैविध्य चर्चायला तर एक वेगळा लेख लिहावा लागेल. अशी विविध उदाहरणें देतां येतील. तेव्हां, केवळ हिंदुत्वामुळे भारतीय समाजाला एकजिनसी संबोधायचें असेल तर वेगळी गोष्ट आहे ;  अन्यथा, ‘गुणवैविध्य’ हेंच खरें तर भारतीय समाजाचें गुणवैशिष्ट्य आहे.

असो. तूर्तास चर्चेचा विषय तो नाहीं. पण त्या विषयाला इथें थोडक्यात स्पर्श केलेला  आहे, कारण सत्यनारायण व्रताच्या बाबतीत आपण अशा प्रकारचा संगम पाहणार आहोत.

  • आतां आपण सत्यनारायणाकडे वळूं.

( प्रस्तुत लेखात याचा ‘व्रत’ व ‘पूजा’ असा दोन्हीं पद्धतीनें उल्लेख केला आहे).

  • ही पूजा महाराष्ट्रात आली कुठून

ही पूजा मध्ययुगात महाराष्ट्रात नव्हती. आजही ही महाराष्ट व बंगाल येथें लोकप्रिय आहे, ( अन्य कांहीं प्रांतांमध्येही असूं शकेल). यावरूनच, ही कुठून आली याचा अंदाज येईल. अर्थात बंगालमधून. ( याबद्दल अधिक चर्चा आपण पुढे करणार आहोत) . पण, ती महाराष्ट्रात कधी आली असावी ?

  • महाराष्ट्रात कधी आली असावी –
  • मध्ययुगात महाराष्ट्र व बंगाल यांचा संबंध पेशवे नानासाहेब यांच्या काळात आला होता. (१७४० ते १७६१) . त्यासमयीं नागपुरकर भोसले यांची सेना बंगाल व ओडीशा या भागात संचरत असे. परंतु, पेशवेकालात या व्रताचा उल्लेख नाहीं. ( संदर्भ – ‘विकीपीडिया’. काचरेही याबद्दल साशंक आहेत). त्यामुळे, भोसल्यांच्या बंगाल-संपर्कामुळे ही पूजा महाराष्ट्रात आली असावी, असें म्हणतां येत नाहीं. त्यांतून, भोसले यांचें सैन्य केवळ लढण्यांसाठीच बंगालवर स्वार्‍या काढत असल्यामुळे, त्यांना वर्तवैकल्यांची देवाणघेवाण करायला वेळही नव्हता व संधीही नव्हती.
  • त्यानंतर, उत्तर-भारतात-स्थित महाराष्ट्रीय मंडळी आणि बंगाली व बंगालात-स्थित उत्तर-भारतीय मंडळी यांचा संपर्क १८५७ च्या काळीं आला. पण त्या धामधुमीत व्रताचें ज्ञान-प्रसारण शक्यच नव्हते.
  • मात्र, नंतर १९व्या शतकाच्या शेवटीशेवटी व खास करून २०व्या शतकाच्या आरंभीआरंभी या दोन्हीं प्रांतांचा संबंध बराच आला ( अगदी ‘बंगाल-नागपुर रेल्वे’ पासून ते सुधारकांपर्यंत, तसेंच राजकारणी व क्रांतिकारकांपर्यंत). ब्राह्मो समाजाच्या (ब्राह्मो = ब्रह्म) धर्तीवर मुंबईला ‘प्रार्थना समाज’ सुरूं झाला. राजकारणी ‘लाल-बाल-पाल’ तर प्रसिद्धच आहेत.
  • तेव्हां, या काळात, हें व्रत महाराष्ट्रात आलें असावें. म्हणजे, हा केवळ शंभरएक वर्षांचा इतिहास आहे.
  • सत्य-विनायक :

काचरे यांनी प्रश्न उपस्थित केला आहे की, पेशवेकाळात ‘सत्य विनायक’ पूजेवरून ही सत्यनारायण पूजा आली असावी काय ? माझ्या पत्नीचे एक आप्त ‘सत्य-विनायक’ पंथीय होते. त्यामुळे मला त्याबद्दल थोडीफार माहिती प्राप्त झालेली आहे. विनायक हें गणेशाचें एक नांव आहे हें खरें, पण विनायक-पंथी सगळ्याच गणेशमूर्तींना ‘विनायक’ म्हणत नाहींत. ते केवळ उजव्या सोंडेच्या गणपतीलाच ‘विनायक’ म्हणून संबोधतात. (आणखीही कांहीं निकष असूं शकताता). पेशवे गणेशपूजक होते हें खरें आहे, पण ते विनायकपपंथी होते कां ? बहुधा, नसावेत.( पेशवे दप्तराचे अभ्यासक याबद्दल खुलासा करूं शकतील). त्यामुळे, पेशवेकाळात ‘सत्य विनायक’ व्रत होतें, असें म्हणतां येणें कठीण.

म्हणून मला असें वाटतें की, विसाव्या शतकाच्या सुरुवातीला महाराष्ट्रात सत्यनारायण व्रत सुरूं झाल्यानंतर, मग विनायकपंथीयांनी स्वत:चें ‘सत्य विनायक’ व्रत सुरूं केलें असावें. ( ते सत्यनारायण पूजा करत नाहींत).

  • बंगालात हें सत्यनारायण व्रत कसें व कधी सुरूं आलें असावें –
  • याबद्दलचा जो मुद्दा मी मांडत आहे, त्याविषयींचे वेगवेगळे संदर्भ देत आहे, ज्यांमुळे मुद्दा स्पष्ट होईल व शाबित होईल.
  • (१) विकीपीडिया सांगतो की, हिमालयाच्यापरिसरात सत्यनारायण देवतेची काही मंदिरे आहेत, तिथून हे व्रतबंगालमध्ये आलें.  या प्रवासाबद्ल मी स्वत: साशंक आहे. (विकीपीडियाबद्दलची हीच तर अडचण आहे की त्यावर १००% विसंबून रहातां येत नाहीं). सत्यनारायणाची हिमालय-परिसरातली मंदिरें किती शतकें जुनी आहेत ? दुसरी गोष्ट म्हणजे, एखाद्या दैवताचें मंदिर असलें म्हणजे त्या दैवतासंबंधीचें व्रत असेलच, असें नाहीं. अशी अनेक दैवतें आहेत, ज्यांची मंदिरें आहेत, पण ज्यांच्या नांवें कांहीं खास (स्पेशल) व्रत पाळलें जात नाहीं. त्यामुळें, हिमालयाच्या परिसरात हें व्रत कधी पाळलें जात होतें कां, असल्यास तें कधीपासून,  बंगालात तिथून तें आलें कां, आलें असल्यास कसें व कधी आलें ? ( जसा की आपण पुढे बंगाल व महाराष्ट्र यांचा संस्कतिक संबंध उकलून दाखवणार आहोत, त्याच पद्धतीनें या संबंधातही झालें होतें कां ?) अशा विविध प्रश्नांची उत्तरें शोधावी लागतील.
  • परंतु, ही पूजा बंगालातच सुरूं झाली, हें अधिक तर्कशुद्ध (लॉजिकल) वाटतें.
  • (२) विकीपीडिया असेंही सांगतो की, म.म. हरप्रासाद शास्त्री यांच्या मते सत्यनारायण पूजेचा उगम मुसलमानी आहे , व या पूजेचे प्रारंभीचे नाव ‘सत्यपीरेर पूजा’ ( म्हणजे, सत्यपीराची पूजा) असें आहे.

(याबद्दलची चर्चा आपण करणारच आहोत).

  • (३) सर्वात महत्वाचा संदर्भ मी श्री. श्री. बा. जोशी यांचा देऊं इच्छितो.
  • जोशी हे बहुभाषाकोविद दीर्घव्यासंगी विद्वान असून ते कलकत्ता येथील नॅशनल लायब्ररीत होते, व त्यामुळे अनेक दशकें त्याचें वास्तव्य बंगालात होते.
  • १९७०च्या दशकात जोशी यांचा लेख ( बहुधा ‘सोबत’ साप्ताहिकात) आला होता, ज्यात त्यांनी हेंच सांगितलेलें आहे की सत्यनारायणाचें व्रत बंगालमधील मुसलमानांच्या पीराच्या पूजेवरून घेतलेलें आहे. ही पीर-पूजा मध्ययुगीन आहे.
  • रिटायर झाल्यानंतर जोशी बडोदा येथें स्थायिक झाले. १९९०च्या दशकात मीही कांहीं वर्षें बडोद्याला होतो. जोशींचा लेख मी वाचलेला असल्यानें, मी त्यांच्याशी याविषयी चर्चा केली. तेंव्हां त्यांनी या बाबतीस दुजोरा दिला व अन्य माहितीही पुरवली.
  • त्यामुळे, हें तर नक्की आहे की, मुसलमानी पीर-पूजेवरून हें व्रत हिंदूंनी घेतलें (अॅडॉप्ट् केलें), व  ‘बेतलें’ (अॅडाप्ट् केलें) , आणि ‘सत्यनारायणाचें व्रत’ म्हणून सुरूं केलें .
  • पिराला शिर्‍याचा नैवेद्य देतात, तसाच सत्यनारायणपूजेतही सुरूं झाला. पूजेतील अनेक बाबी सूफी पंथाकडून आल्याचें काचरे सांगतातच.
  • सत्यनारायण कथेत, ही कथा स्कंद पुराणाच्या रेवा खंडात असल्याचा उल्लेख आहे, व नारद, शौनक, नैमिषारण्य असेही उल्लेख आहेत. पण खरें तर हे उल्लेख ‘बनावट’ (स्पूरीयस) आहेत, व ते हेतुत: घालण्यांत आलेले आहेत, हें उघड आहे, (की ज्यायोगें भाविकांचा / पूजकांचा या कथेवर विश्वास बसावा).
  • या कथेतील बर्‍याच गोष्टींची ‘कां व कसें’ ची कारणमीमांसा तर पूर्णपणें मध्ययुगीनच वाटते. ( जसें की, साधु वाण्याच्या कथेतील घटना, नांव बुडणें व पुन्हां वरती येणें). त्यामुळे, ही पूजा मध्ययुगीन आहे, या बाबीला दुजोरा मिळतो.
  • हिंदूंनी मुसलमानी पीराचें व्रत कां घेतलें असावें ?
  • या मुद्याची उकल होणें गरजेचें आहे.
  • दक्षिणेतील बहामनी सुल्तान हिंदूंना ‘मानत’ असत ( मान, जवळीक, आपुलकी) . बहामनी हा शब्दच ‘ब्राह्मण’ (बिरहमन / बहमन/ ब्रह्मण / बम्मन) या शब्दावरून आलेला आहे. (शाह मुंतोजी ब्रह्मणी या नांवाचा एक संत होऊन गेला, असें रा. चिं. ढेरे यांनी आपल्या एक पुस्तकात सांगितलेलें आहे. – संदर्भ – नंतर दिलेला आहे).
  • या दक्षिणी शाह्यांमध्ये कांहीं अंशीं ‘मिलीजुली’ (मिक्स्ड्) म्हणतां येतील अशा, सांस्कृतिक समन्वय साधणार्‍या पद्धती दिसतात. मध्ययुगात हिंदु-भक्तीमार्गाचा बराच प्रचार झाला. भारतातील मुस्लिम सूफी पंथाचाही प्रचार याच काळातला. सूफी पंथाच्या अनेक प्रथा हिंदूंना परिचित वाटण्यांसारख्या आहेत. तीही एक भक्तिपरंपराच आहे. तिच्यात भजन, गायन वगैरे वापरलें जातें, जें हिंदू भक्तीपंथासारखें आहे. उत्तरेत व दक्षिणेतील सूफी संतांनी हिंदू देवदेवतांवर काव्यही लिहिलेलें आहे. जसें की रहीम, रसखान, कबीर ; आणि महाराष्ट्रातील हुसेन अंबरखान , शेख महंमद वगैरे. ( संदर्भ – रा. चिं. ढेरे यांचें ‘एकात्मतेचे शिल्पकार’ , ज्याचा उल्लेख आनंद हर्डीकर यांनी त्यांच्या एका लेखात केलेला आहे. हर्डीकरांच्या लेखाचा संदर्भ पुढे आहे).
  • त्यामुळे हिंदूंना सूफींबद्दल आपुलकी वाटल्यास नवल नव्हे. मध्ययुगात आपल्याला हिंदू लोक मुसलमानी सूफी पीराची पूजा करतांना दिसतात. ‘शाह शरीफ’ या पीराच्या अशाच एक नवसपूर्तीमुळे शिवाजी महाराजांचे पिता व काका यांना ‘शहाजी (शाहजी)’ व ‘शरीफजी’ अशी नांवें ठेवण्यांत आली होती. हा विचार, ही वृत्ती हिंदुस्थानात इतर भूभागांमध्येही होती. त्यामुळे, अशी पीरपूजा हिंदू धर्मात रूप बदलून आलेली असल्यास नवल नव्हे.
  • बंगालमधील इस्लामिक चालीरीतींबद्दल, असीम रॉय यांच्या ‘दि इस्लामिक सिंक्रेटिस्टिक ट्रेडिशन इन बेंगॉल’ या संशोधनाधारित पुस्तकाचा संदर्भ  देऊन आनंद हर्डीकर लिहितात, ‘बंगालमधील इस्लामवर नाथपंथीयांचा व वैष्णवांचा खूप मोठा प्रभाव पडलेला होता. हिंदूंच्या महाकाव्याप्रमाणेंच त्यांच्या ( हिंदूंच्या) असंख्य देवदेवतांचें गुणवर्णन मुसलमान कवींनी आपल्या साहित्यामधून केलें होतें. पीर ही संकल्पना समन्वयातूनच पुढें आली होती ’.   (संदर्भ – “शेषराव मोरे यांच्या  ‘काँग्रसनें आणि गांधीजींनी अखंड भारत कां नाकारला’ या ग्रंथाचा प्रतिवाद” , असें नांव असलेल्या पुस्तकातील आनंद हर्डीकर यांचा लेख).
  • सारांश :

थोडक्यात काय, तर ,

  • धार्मिक समन्वयामुळे हिंदू परंपरेपासून प्रेरणा घेऊन सूफी पंथीय मुस्लिमांनी बंगालात सत्य पीराची पूजा सुरूं केली ;
  • अशाच समन्वयामुळे बंगाली हिंदूंनी त्याचें रूपांतर ‘सत्य नारायणात’ केलें; आणि,
  • बंगाल-महाराष्ट्रातील संबंधांमुळें शंभरएक वर्षांपूर्वी ही पूजा महाराष्ट्रात अवतीर्ण झाली.

— सुभाष स. नाईक

सुभाष नाईक
About सुभाष नाईक 297 Articles
४४ वर्षांहून अधिक अनुभव असलेले सीनियर-कॉर्पोरेट-मॅनेजर (आतां रिटायर्ड). गेली बरीच वर्षें हिंदी/हिंदुस्थानी, मराठी व इंग्रजी या भाषांमध्ये गद्य-पद्य लिखाण करत आहेत. त्यांची ९ पुस्तकें प्रसिद्ध झाली आहेत. पैकी ६ ‘पर्यावरण व प्रदूषण’ या विषयावरील इंग्रजी न हिंदी कवितांची पुस्तकें आहेत. दोन पुस्तकें , ‘रामरक्षा’ व ‘गणपति-अथर्वशीर्ष’ या संस्कृत स्तोत्रांची मराठी पद्यभाषांतरें आहेत. अन्य एक पुस्तक ‘मृत्यू आणि गत-सुहृद ’ हा विषयाशी संल्लग्न बहुभाषिक काव्याचें आहे. गदिमा यांच्या ‘गीत रामायणा’चें हिंदीत भाषांतर. बच्चन यांच्या ‘मधुशालचें मराठीत भाषांतर केलेलें आहे व तें नियतकालिकात सीरियलाइझ झालेलं आहे. टीव्ही वर एका हिंदी सिट-कॉम चें स्क्रिप्ट व अन्य एका हिंदी सीरियलमधील गीतें व काव्य लिहिलेलें आहे. कत्थक च्या एका कार्यक्रमासाठी निवेदनाचें हिंदी स्किप्ट लिहिलें आहे. अनेक मराठी व हिंदी पब्लिकेशब्समध्ये गद्य-पद्य लेखन प्रसिद्ध झालें आहे, जसें की, महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, सत्यकथा, स्वराज्य, केसरी, नवल, धर्मभास्कर, धर्मयुग, धर्मभास्कर, साहित्य अकादेमी चें हिंदी जर्नल ‘समकालीन भारतीत साहित्य’ , मराठी अकादेमी बडोदा चॅप्टर चें मराठी जर्नल ‘संवाद’, तसेंच प्रोफेशनल सोसायटीचें इंग्रजी जर्नल यांत लेखन प्रसिद्ध झालेलें आहे.मराठी , हिंदी व इंग्लिश वेबसाईटस् वर नियमित गद्य-पद्य लेखन. कांहीं ई-बुक सुद्धा प्रसिद्ध.
Contact: Website

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..