नवीन लेखन...

संत तुकाराम महाराज

अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१६ मध्ये सौ. नयना अशोक मेंगळे  यांनी लिहिलेला हा लेख


संत तुकाराम महाराजांचे अभंग नावाप्रमाणेच अभंग आहेत! अंतर्गत शक्तीची जबरदस्त ताकत त्यांच्या ठायी होती. भक्ती हेच त्यांचे सर्वश्रेष्ठ मूल्य होते. त्यांना नीतीमूल्याची जाण होती. जनजागृतीचे कार्य त्यांनी आयुष्यभर केले. विट्ठल नाम हे अमृतापेक्षाही त्यांना गोड वाटे. नामचिंतन जसेजसे खोलवर रूजले तसेतसे त्यांचे चित्त शुद्ध होऊ लागले. ही प्रक्रिया अत्यंत पारदर्शी आहे. कधी त्यांचे अंतःकरण पश्चात्तापाने दग्ध होई तर कधी ते आपल्याच मनाशी सुसंवाद साधू लागले. अहंकाराची जागा नम्रतेने घेतली. सर्व चराचरात परमेश्वर भरलेला आहे ही परमेश्वराच्या सर्वात्मकतेची जाणीव त्यांना होती. त्यामुळे त्यांच्या आचरणात आमुलाग्र बदल झाला. निस्पृह भावना, निरासक्त वृत्ती निर्माण झाली. ‘वज्रादपि कठोरानि, मृदुनि कुसुमादपि’ असा त्यांचा स्वभाव बनला.

परम वैराग्य, निढळ भक्ती, अंतर्मुख वृत्ती, डोळस श्रद्धा, वाणीतील परखडपणा, कठोर आत्मपरीक्षण आणि रसाळ प्रासादिकता अशा संतश्रेष्ठ तुकोबांच्या अभंगवाणीने कवित्वाचा जणू कळसच गाठला. ‘भले त्यांसि देऊ गांठीची लंगोटी । नाठाळाचे माथी हाणूं काठी’ अशी भावना त्यांच्या अभंगांतून व्यक्त होऊ लागली. प्रपंचात राहून परमार्थ साधता येतो. लोकांचे कल्याण व्हावे म्हणून त्यांनी रोखठोकपणे उपदेश केला आहे.

तुकाराम बोल्होबा मोरे (आंबिले) असे त्यांचे पूर्ण नाव. जन्म देहू गावी. त्यांचे आईवडील धार्मिक प्रवृत्तीचे आणि विठ्ठलभक्त होते. ते नित्यनेमाने पंढरपूरला जात. लहानपणीच आई-वडील वारले. थोरला भाऊ सावजी विरक्त होऊन संसार तुकारामांच्या अंगावर टाकून परागंदा झाले. दुष्काळी परिस्थितीमुळे होते ते सारे द्रव्य संपले. धंदाव्यवसायात नुकसान झाले. पहिली पत्नी रखमाई व मुलगा शिवाजी अन्नान्न करून मेले. दुसरी पत्नी अवलाई (जिजाबाई) म्हणजे पुण्यातील आप्पाजी गुळवे यांची कन्या. कजाग आणि आक्रस्ताळी होती. धंद्याचे दिवाळे निघाले. इतक्या आपत्ती वयाच्या एकविशीच्या आतच त्यांच्यावर कोसळल्या. त्यामुळे त्यांचे मन संसाराविषयी उदास, उद्विग्न झाले. परंतु या आपत्तींनी खचून न जाता त्याचा उपयोग स्थितप्रज्ञाप्रमाणे झेलून आत्मकार्याकडे त्यांनी करून घेतला. ‘बरे झालें देवा, निघाले दिवाळे’ असे ते अभंगात म्हणतात. नंतरच्या उत्तरायुष्यात त्यांची साधकावरच्या, नंतर साक्षात्कार आणि सिद्धावस्था, धर्मरक्षणाचे कार्य, भक्तियोग, संतसंगती, व्यावहारिक नीती, विठ्ठलभक्ती, रामभक्ती, वैदिक धर्माचे स्वरुप, शिवरायांच्या शिवधर्मांतील लोकोत्तर कार्य. समाजातील दुष्ट प्रवृत्तींवर कडाडून हल्ला, समाजकंटकांचा विरोध आदी प्रत्येक बाबतीत तुकोबांनी कळस गाठला. इतकी प्रसिद्धी कोणत्याही संताच्या वाट्याला आलेली नाही.

श्रीपांडुरंगासह नामदेव स्वप्नांमध्ये येऊन त्यांनी तुकोबांना स्वप्नात जागे केले आणि कवित्व कर, व्यर्थ काही बोलू नकोस हे काम सांगितले. माप करते वेळी हिशोब विठ्ठलांनी ठेवून त्यांनी थापटून सावध केले. नामदेवांनी स्वप्नात सांगितले की, मी शंभर कोटी अभंग करण्याचा संकल्प केला होता. त्यापैकी शहाण्णव कोटी अभंग झाले असून उरलेले चार कोटी तू करून संकल्प पूर्ण कर. असे तुकाराम महाराज म्हणत. नामदेवांची स्वप्नात भेट झाल्यामुळे तुकोबांना कवित्व स्फूर्तीचा प्रसाद प्राप्त झाला. स्वप्नातच तुकोबांवर सद्गुरुकृपा होऊन ‘रामकृष्ण हरी’ हा मंत्र मिळाला. बाबाजी हे त्यांचे गुरु !

स्वतःला पोहता येत नसता ते दुसऱ्याला शिकवू इच्छितात याला काय म्हणावे? असा सवाल तुकोबाराय करतात. मानवी गुरुची आवश्यकता नाही असे ते म्हणतात. मात्र सद्गुरूने मेघवृष्टीप्रमाणे सर्वांना समानरीतीने उपदेश करावा. त्यांच्यापैकी एकालाच निवडून आपला शिष्य मात्र करू नये. नाहीतर त्या गुरुला शिष्याच्या पापाचा अर्धा वाटा लागेल. असे विचार त्यांनी मांडले. शेवटी मन हेच आपले गुरु असते व मन हेच आपले शिष्य असते. माझा मीच व्यालो नि स्वतःच आपल्या पोटी जन्माला आलो असा एक उच्च विचार त्यांनी दिला आहे.

प.पू. तुकाराम महाराज हे एक श्रेष्ठ विचारवंत होते. त्यांच्या विनोदी अभंगांकडे पाहिले असता त्यांचे सर्वच अभंग लोकप्रिय व लोकप्रसिद्ध आहेत. ‘वाघे उपदेशिला कोल्हा | सुखें खाऊं द्यावें मला ।।’ या अभंगांत भुकेला वाघ आणि धूर्त कोल्हा अशी जोडी आहे. वाघ कोल्ह्याला सांगतो की, मी भुकेला आहे. तेव्हा तू माझी भूक शमवून उपकाराचे पुण्य पदरात पाडून घे. नाहीतरी तू मरणार आहेसच. चतुर कोल्हा साळसूदपणे वाघाला सांगतो, वाघोबादादा, वाघोबादादा, तुझ्या तोंडून हे पुण्यदायक सत्य ऐकून मी आनंदित झालो आहे आणि एवढे बोलून कोल्हा मोठ्या शिताफीने पळून जातो. तुकाराम महाराज म्हणतात, वाघ आणि कोल्ह्याच्या परस्परविरोधी गोष्टीवरून दोन ठक आणि महाठकांची गाठ पडल्यावर काय होते हे जाणून घेऊन दोन धूर्तांच्या स्वभावांचे धर्म व वर्म सुजाणांनी लक्षात घ्यावे. त्यांनी आपल्या आयुष्यात आलेल्या सर्व दुःखांचा, संकटांचा सन्मान ‘बरे झाले देवा’ या शब्दांत केला आहे. पण जेव्हा हेच तुकाराम महाराज आपल्या घराच्या स्थितीचे वर्णन उपहासात्मक विनोदी बुद्धीने करतात तेव्हा वाचक अचंबित होतो, स्तिमित होतो.

आम्ही भाग्याचे भाग्याचे ।
आम्हां तांबे भोपळ्याचे ।।१।।
लोकां घरीं गाई म्हैसी ।
आम्हां घरी उंदीरघुसी ||२||
लोकां घरी हत्ती घोडे ।
आम्हां आघोडीचे जोडे ||३||
तुका म्हणे आम्ही सुडके |
आम्हां देखोन काळ धाके ।।४।।

तुकोबांची कीर्तने ऐकून आदराने शिवाजीमहाराजांनी त्यांच्याकडे दिवट्या, छत्री, घोडे व धन, अलंकार पाठविले पण तुकोबांनी या ऐश्वर्याचा, धनाचा स्वीकार केला नाही. ते परत करताना शिवबाला सोबत नऊ अभंग पाठविले. त्यांत काही विठूमाऊलीला व काही अभंग शिवबांना उद्देशून आहेत. आयुष्याच्या अखेरीस वैभवात राहण्याची संधी आपण होऊन चालून आली होती. ती त्यांनी नाकारली. ‘आता येथे पंढरीराया । मज गोविशी कासया || तुका म्हणे देवा । माझे सोडवणे धावा ।। अशी त्यांनी प्रार्थना केली.

सर्व संतमहात्मे एकच सत्य पुनश्च सांगत आहेत, ‘हा संसार कितीही सुंदर लाडाकोडाचा वाटत असला तरी तो मोहमय आहे, मायावी आहे. तरी या मृगजळात गुंतून राहू नका. परब्रह्माकडे जाणाऱ्या मार्गाने सातत्याने दृढ निश्चयाने वाटचाल करा. ‘हाचि नेम आतां न फिरे माघारी’ हा निश्चय येथे महत्त्वाचा आहे.

तुकोबांना झालेला स्वप्नदृष्टांत व सद्गुरुकृपा यामुळे त्यांच्या जीवनात झालेले आमुलाग्र परिवर्तन यामुळे ते एका उच्च पातळीवर गेले. दैवी योग्यता आली. ते मराठी भाषेचे मुकुटमणी झाले. त्यांनी नामस्मरणाने व भक्तियोगाने साधना करून संत ज्ञानेश्वरांच्या बरोबरीचा मान मिळविला. त्यांनी कंठरवाने आत्मतिडीकेने घणाघाती शब्दांत वज्रप्रहार करून समाजाला जागविण्याचा प्रयत्न केला. ‘तुका झालासे कळस’ ही उक्ती सार्थ झाली म्हणूनच संत बहिणाबाई म्हणतात,

ज्ञानदेवे रचिला पाया ।
तुका झालासे कळस ।।

सौ. नयना अशोक मेंगळे, बोरीवली (पूर्व)

(अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१६ मधून)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..