नवीन लेखन...

संस्कृती – संस्कृती बालगुडे

वेदांग ज्योतिष ग्रंथात सांगितलेल्या साडेतीन मुहूर्तांपैकी एक म्हणजे गुढीपाडवा. हिंदू संस्कृतीचं प्रतीक. मोठय़ा उत्साहानं आणि जोशानं साजरा केला जाणारा सण. सणाचं हेच औचित्य साधून मला फोटोशूट करण्यासाठी विचारण्यात आलं होतं. शूटसाठीच्या मॉडेलचा माझा शोध सुरू झाला. त्यात मराठी संस्कृतीचं प्रतिनिधित्व करू शकेल, अशा कलावतीच्या मी शोधात होतो. ही शोधमोहीम संपली आणि मी थेट फिल्मसिटीत पोहचलो ते पाडव्याच्या फोटोशूटसाठी. मराठी संस्कृतीचं प्रतिनिधित्व करणाऱया संस्कृती बालगुडे हिचं फोटोशूट यानिमित्तानं मी केलं. हिरव्या बॅकग्राऊंडवर बेतलेलं, संस्कृती बालगुडेचा मराठमोळा सात्त्विक चेहरा आणि उभारलेल्या गुढीचं पूजन हे सारं एकीकडे कॅमेराबद्ध करत असतानाच दुसरीकडे शूटच्या वेळच्या अनेक आठवणी तेव्हा माझ्या शिदोरीत जमा होत होत्या.

संस्कृती बालगुडेची नि माझी ही पहिलीच भेट होती. चंद्रकांत गायकवाड या नामांकित तरुण दिग्दर्शकानं ही भेट खरंतर घडवून आणली होती. अवघ्या एक दिवस आधी हे शूट आम्ही ठरवलं होत. वेळेअभावी फारसं शूटचं नियोजन आम्हाला करता आलं नव्हतं. एरव्ही एखाद्या सणासाठीच शूट करायचं झालं तर त्याची फार जय्यत तयारी करावी लागते. कलावतीचा शृंगार, पेहराव, दागिने, शूटसाठीचा लूक आणि मग हे शूट तडीस नेण्यासाठी रंगभूषा, वेशभूषा साकारण्यासाठी लागणारे आर्टिस्ट, प्रॉपर्टी अशा नानाविध बाबींच पूर्वनियोजन करून मगच शूट आयोजित केलं जातं. मात्र वेळेअभावी भेटून, ठरवून हे शूट काही आम्हाला करता आलं नाही. सारं काही ठरलं ते फोनवर. नेमकं शूट कसं असेल, त्यासाठी काय अपेक्षित आहे, लूक कसा असेल, काय प्रॉपर्टी असेल हे सारं मी आणि संस्कृतीनं फोनवरच ठरवलं होतं. तेव्हा ‘पिंजरा’ या मालिकेत संस्कृतीची मध्यवर्ती भूमिका होती. याच मालिकेच्या सेटवर मी आणि संस्कृती भेटलो. संस्कृतीसोबत तिची आईदेखील होती.

सेटवर शूट असल्याने मेकअप, हेअर आणि कॉश्च्युम यासाठीची तयारीत आम्हाला फारसं लक्ष घालावं लागलं नाही. या मालिकेत संस्कृतीचा जो पेहराव होता त्याच पेहरावात आम्ही फोटोशूट केलं. सेटच्या आवारात असलेल्या झाडांच्या हिरव्या बॅकग्राऊंडवर आम्ही हे शूट केलं. एकीकडे मालिकेचं शूट सुरू असल्याने आम्हाला या वेळी फार कमी वेळ मिळाला होता. आतून संस्कृतीला सारखा आवाज दिला जात होता. मात्र संस्कृतीचं सगळं लक्ष फोटोशूटकडे होतं. तिचा चेहरा फार बोलका होता. संस्कृती गुढीची पूजा करत असतानाचे हावभाव, तिचा हसरा-मोहक चेहरा मी कॅमेराबद्ध करत होतो. मोजक्या वीस-पंचवीस मिनिटांत हे शूट आम्ही केलं. या वेळी संस्कृतीच्या भावमुद्रा फार महत्त्वाच्या होत्या. अन्यथा हे शूट पूर्ण करणं शक्य झालं नसतं. इतक्या कमी वेळात, एका मालिकेतल्या आपल्या मध्यवर्ती भूमिकेतून बाहेर पडून मराठी संस्कृतीचं प्रतिनिधित्व करणाऱया मराठमोळ्या स्त्रीच्या भूमिकेत जाऊन त्या भूमिकेला न्याय देणं हे संस्कृतीला या वेळी उत्तम जमलं होतं. इथेच एका कसदार कलाकाराचं लक्षण या वेळी संस्कृतीत मला पाहायला मिळालं.

या शूटनंतर आमची दुसरी भेट झाली ती स्टुडिओ शूटच्या निमित्ताने. मराठमोळा चेहरा अशीच या शूटचीदेखील थीम होती. मात्र या वेळी शूटचं नियोजन उत्तम करता आलं होतं. मला हवा तेवढा वेळ या शूटसाठी मिळणार होता. कोणतेही निर्बंध नव्हते. कसलीही घाई नव्हती. संस्कृतीनेही शूटसाठीचा वेळ राखून ठेवल्याने त्याचा शूटसाठी फायदाच झाला होता. स्टुडिओतलं शूट असल्याने लायटिंगवर ताबा मिळावणं शक्य होत. शूटसाठीची थीम संस्कृतीशी बोलून मग त्यानंतर कॉश्यूम, मेकअप, हेअर आणि दागिने हे सर काही संस्कृतीला शूटच्या आधी माझ्या टीमनं सांगितलं होतं. संस्कृतीलाही ही थीम आवडली होती. त्यामुळे शूट चांगलं होईल अशी आकांक्षा मला होती.

शूटसंबंधित संस्कृतीशी बोलून आम्ही ठरल्याप्रमाणे शूटला सुरुवात केली. संस्कृतीचा लोभस चेहरा, तिने केलेली पारंपरिक वेशभूषा, त्यावर मराठमोळा साजशृंगार, कलाकुसरीने सजलेले दागिने हे सारं काही कॅमेराबद्ध करण्याचा प्रयत्न मी करत होतो. हे शूट चांगलं तीन-साडे तीन तास चाललं. या वेळी ब्लॅक ऍण्ड व्हाइट फोटो टिपण्याचा मोह मला आवरता आला नाही. या ब्लॅक ऍण्ड व्हाइट पोर्ट्रेट्समध्ये संस्कृती अधिक खुललेली दिसत होती.

तीन-साडे तीन तासांअंती हे शूट धम्माल मस्तीत संपलं खरं. मात्र या वेळच्या अनेक आठवणी आजही कायम आहेत. वेळेच्या गणितात बांधली गेलेली आणि वेळेच्या साच्यात न अडकलेली अशा दोन्ही भिन्न वेळेची संस्कृती मी कॅमेराबद्ध केली आहे. दोन्ही वेळी मला शूटला न्याय देणारी कलावती हवी होती. आणि ती कलावती साकारण्यात संस्कृती यशस्वी ठरली.

धनेश पाटील

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..