नवीन लेखन...

संगीत सौभद्र नाटक रंगभूमीवर सादर झाले.

१८ नोव्हेंबर १८८२ साली अण्णासाहेब किर्लोस्करांचे ‘संगीत सौभद्र’ हे नाटक रंगभूमीवर सादर करण्यात आले.

नाटककार अण्णासाहेब किर्लोस्करांचे १८ नोव्हेंबर १८८२ साली रंगभूमीवर आलेलं ‘संगीत सौभद्र’ हे नाटक आज इतक्या वर्षांचा प्रदीर्घ काळ लोटूनही तितक्याच आवडीनं रसिक उचलून धरतात यातच या नाटकाची अभिजातता दडलेली आहे. कलावंतांच्या अनेक पिढय़ांनी आपल्या गान-अभिनयानं हे नाटक तोलून धरलं, त्यात आपले रंग मिसळले आणि तरीही ‘संगीत सौभद्र’ची जादू कधीच ओसरली नाही.

‘संगीत सौभद्र’मध्ये सुरुवातीला साकी, दिंडय़ांसह १४५ हून अधिक पदं होती. हाही एक विक्रमच होय. त्याकाळी पहाटेपर्यंत नाटकं चालत. त्यामुळेच बहुधा नाटकाची रंगत वाढविण्यासाठी तेव्हा पदांची संख्या इतकी असावी. यावर मल्लिनाथी करताना आद्य नाटककर्ते विष्णुदास भावे यांनी ‘संगीत सौभद्र’चा प्रयोग पाहून ‘यात फक्त डोअरकीपरला तेवढं गाणं द्यायचं राहिलंय,’ असे उद्गार काढल्याचं सांगतात. असो.

संगीत रंगभूमीच्या उतरत्या काळात संगीत नाटकांमधलं ‘नाटय़’ कमी होऊन त्यातलं ‘गाणं’ भारी झाल्याने रसिकांनी त्याकडे पाठ फिरवली, असं त्याच्या ऱ्हासाचं एक कारण सांगितलं जातं. मात्र, ‘संगीत नाटका’चा उत्तम वानवळा म्हणून ज्याकडे निर्देश करता येईल असं नव-रंगावृत्तीत ‘संगीत सौभद्र’ नाटक ओम् नाटय़गंधा या संस्थेनं नुकतंच रंगमंचावर सादर केलं आहे. या प्रयोगात केवळ गाण्यांसाठी गाणी गायली जात नाहीत, तर त्या- त्या वेळच्या पात्रांची भावस्थिती विशद करण्याकरता, प्रसंगांची मागणी म्हणून, तसंच नाटक पुढं नेण्यासाठी पोषक म्हणून ओघात ही पदं येतात. पण हे भान संगीत रंगभूमीवर केवळ आपल्या गायकीच्या जोरावर राज्य करणाऱ्या गायक कलावंत मंडळींनी त्याकाळी न ठेवल्यानं संगीत रंगभूमीला हलाखीचे दिवस आले आणि आधुनिक मराठी रंगभूमीची ध्वजपताका मानानं मिरवणारं,महाराष्ट्राचं भूषण असलेलं संगीत नाटक कालौघात लयाला गेलं. ‘संगीत नाटक’ या समासात ‘संगीत’ आणि ‘नाटक’ या दोन्हीला समान महत्त्व आहे, ही गोष्ट नंतरच्या काळात साफ विसरली गेली. त्याचे अनिष्ट परिणाम संगीत रंगभूमीला भोगावे लागले. असो.

तर आता ज्ञानेश महाराव यांनी नव्याने रंगावृत्ती केलेल्या या ‘सौभद्र’बद्दल.. ‘संगीत सौभद्र’ हे प्रेक्षकांचं रंजन करणारं, अवीट संगीतानं नटलेलं नाटक आहे, ही बाब ज्ञानेश महाराव यांनी त्याची रंगावृत्ती करताना कटाक्षानं लक्षात ठेवली आहे. नुसत्या गाण्यांच्या भडिमारानं प्रेक्षकांचा अंत न पाहता त्यांना नाटय़ आणि संगीत या दोहोची मेजवानी मिळावी, या हेतूनं ही निर्मिती झालेली आहे. त्यामुळे नाटक कुठंही न रेंगाळता आणि यातली पदं रसिकांना हवीहवीशी वाटत असतानाच संपतात. त्यात नाटकाची गरज प्रधान मानलेली आहे. कुणीएक कलाकार चांगला गातो/ गाते म्हणून त्यांना हवं तेवढं गाऊ दिलंय असं इथं घडलेलं नाही.

बालगंधर्वाच्या स्त्री-भूमिकांशी साधम्र्य असलेली देहयष्टी आणि त्यांच्या गायनशैलीशी नातं सांगणाऱ्या विक्रान्त आजगांवकर यांनी यात सुभद्रेची भूमिका साकारली आहे. आजच्या काळाशी हे तसं विसंगतच. त्याकाळी बालगंधर्वानी गाजवलेली भूमिका आजही एखाद्या पुरुष-पात्रानं करण्यामागचं प्रयोजन उमजत नाही. कदाचित त्याकाळची बालगंधर्वाची गाण्याची पद्धत आजच्या रसिकांना कळावी यासाठी असं हेतुत: केलं गेलं असावं. (अर्थात हा आपला एक तर्क!) बालगंधर्व स्त्रीभूमिका करत होते, परंतु ते मुद्दामहून बायकी आवाज काढीत नसत. त्याचप्रमाणे विक्रान्त आजगांवकरही जाणूनबुजून बायकी ढंगात बोलत वा गात नाहीत. पण स्त्रियांची बोलण्याची ढब मात्र त्यांनी स्वीकारली आहे. त्यांचं गाणं उत्तमच आहे. त्यामुळे एक आव्हान म्हणून त्यांनी ही भूमिका साकारली असावी.

सुभद्रा-अर्जुनाच्या प्रेमाची आणि त्यांना एकत्र आणण्यासाठी कृष्णानं रचलेल्या चालींची कहाणी ‘संगीत सौभद्र’मध्ये उलगडते. ‘नमुनि ईशचरणा’, ‘नभ मेघांनी आक्रमिले’, ‘राधाधर मधुमिलिंद जय जय’, ‘लग्नाला जातो मी’, ‘प्रिये पहा..’, ‘जरतारी लाल शालजोडी’, ‘नच सुंदरी करू कोपा..’, ‘वद जाऊ कुणाला शरण’, ‘कोण तुजसम मज सांग गुरुराया कैवारी माझा’, ‘पावना वामना या मना..’, ‘बलसागर वीरशिरोमणी’, ‘अरसिक किती हा शेला’, ‘किती किती सांगू तुला..’ अशा एकाहून एक सरस पदांनी या नाटकातले नाटय़पूर्ण क्षण चढत्या रंगतीनं उत्कर्षबिंदूप्रत जातात. मात्र, ही नाटय़संगीताची मैफल नसून हे ‘नाटक’ आहे याची जाणीव या प्रयोगात उन्मेखून ठेवलेली आढळते. म्हणूनच त्या- त्या प्रसंगांतलं नाटय़ खुलविण्यापुरतीच यात पदांची पखरण केलेली आहे.

पूर्वी संगीत नाटकांत नेपथ्यात रंगवलेले पडदे वापरीत. या प्रयोगाचं नेपथ्य ‘बालगंधर्व’ चित्रपटफेम नेपथ्यकार नितीन देसाई यांनी केलं आहे. परंतु त्यांच्या लौकिकाला ते साजेसं मुळीच नाही. पूर्वीच्या रंगीत पडद्यांऐवजी फ्लॅट्सचा वापर या ‘संगीत सौभद्र’मध्ये केलेला आहे. त्यात सौंदर्यपूर्ण वा नावीन्यपूर्ण असं काहीच नाही.

दिग्दर्शक यशवंत इंगवले यांनी नाटकाचा प्रयोग सुविहित बसवला आहे. पूर्वी संगीत नाटकांमध्ये एका पात्राचं गाणं चाललेलं असताना इतर पात्रं मख्खपणे त्याचा चेहरा न्याहाळत, किंवा प्रेक्षकांकडे वा विंगेत पाहत बसत. इथं मात्र गाण्यांच्या वेळी समोरची पात्रंही क्रिया, प्रतिकिया वा प्रतिक्षिप्त क्रिया देत असल्यानं प्रयोगात रंगत आली आहे. आणखीन एक गोष्ट या प्रयोगात जाणवली. ती म्हणजे- पाश्र्वसंगीताच्या तुकडय़ांमध्ये प्रसंगातील रसपरिपोषाकरिता ‘म्हातारा न इतुका..’ किंवा ‘युवती मना..’सारख्या रागांच्या बंदिशींचा केलेला वापर. आणखीही एक नमूद करण्याजोगी गोष्ट म्हणजे आरती गोसावी या तरुणीने या नाटकात संवादिनीची साथ केली आहे. तबलासाथ आदित्य पाणवलकर यांची आहे. सुनील देवळेकर यांनी प्रकाशयोजनेतून घटना-प्रसंगांतील भावप्रक्षोभ अधिक गहिरे केले आहेत.

कलाकारांची जेवढय़ास तेवढी, चोख कामं हीही या प्रयोगाची खासियत. विक्रान्त आजगांवकर यांची सुभद्रा दिसायला सुंदर नसली तरी गाण्यात त्यांनी बाजी मारली आहे. पूजा कदम यांनी रुक्मिणीचा तोरा मुद्राभिनयातून नेमकेपणानं व्यक्त केला आहे. सुभद्रा-अर्जुनाच्या प्रेमात महत्त्वाची ‘भूमिका’ बजावणारा कृष्ण, त्यांना एकत्र आणण्यासाठी त्यानं रचलेल्या चाली, त्यामुळे उद्भवलेले पेचप्रसंग आणि त्यातून त्यानं काढलेले हिकमती मार्ग.. हे सारं कृष्ण झालेल्या लोभस व्यक्तिमत्त्वाच्या संदीप राऊत यांनी उत्तम पेललं आहे. त्यांच्या रसाळ गाण्यांनी तर या भूमिकेला जणू चार चॉंद लावले आहेत. कुशल कोळी यांनी सरळमार्गी, पण काहीसा रेम्याडोक्याचा बलराम समजून वठवला आहे. अनंत राणे यांचा वक्रतुंड छोटय़ा भूमिकेतही छाप पाडून जातो. गिरीश परदेशी यांनी अर्जुनाचं शीघ्रकोपीत्व, उतावळेपणा अचूक टिपला आहे. नारद झालेल्या ज्ञानेश महाराव यांनी पोटापुरतं गाणं छान निभावलं आहे. मयुरेश कोटकर यांनी यात सात्यकी आणि घटोत्कच साकारला आहे. प्राप्ती बने यांची कुसुमावतीही नीटस. एकुणात, हे रंगीतसंगीत ‘संगीत सौभद्र’ गद्य नाटकांचं वळण असलेल्या प्रेक्षकांनाही आवडेल असं आहे.

— संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4228 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..