नवीन लेखन...

समर्थ रामदास स्वामी ……९

समाजात रज , तम , आणि सत्व या तिन्ही गुणांची माणसे असतात.या पैकी रजोगुणी माणसांची संख्या प्रचंड आहे.

आपण तमोगुण कसा असतो हे दासबोधातून जाणून घेतले.तमोगुण हा अत्यंत हीन दर्जाचा गुण आहे.त्या पेक्षा बरा आहे तो रजो गुण .या गुणाची माणसे दुस-याला ठार मारण्या पर्यंत जात नाहीत परंतु अशा लोकांना समर्थ अप्पलपोटे असे म्हणतात. माझे घर , माझा संसार , माझे कुटुंब ,माता पिता आणि मुला बाळांची जो फक्त जो सदैव काळजी करतो तो रजो गुणी .चांगले जेवावे,चांगले नेसावे ,चांगले राहावे याच बरोबर जो दुस-याच्या चांगल्या गोष्टींची सतत अभिलाषा बाळगतो तो रजो गुणी.जो तीर्थ , व्रत , आणि पाहुणे यांचे करता काहीही खर्च करीत नाही,ज्याचे मन सदैव पैसा अडका, धान्य,संपत्ती यातच अडकलेले असते आणि जो अत्यंत कंजूस असतो तो रजो गुणी.

मीच सुंदर, मीच बलाढ्य ,मीच चतुर, मीच थोर अशी ज्याची समजूत असते तो रजोगुणी.कपटी,अंतर्यामी मत्सरी, सतत कामवासना ज्याच्या मनात असते आणि दुस-याला जो हीन लेखतो तो रजोगुणी. .जो सतत संसाराच्या चिंतेत असतो आणि माझे कसे होईल याची सतत काळजी करतो तो रजो गुणी.जो पूर्वी जे सुख भोगले त्याची आठवण करतो आणि ते सुख आता भोगता येत नाहीत म्हणून दुखः करतो तो रजो गुणी.

ज्याला विनोद, शृंगार,नाच गाणे ,गायन,याची आवड असते आणि गाणे आणि त्यासाठी हावभाव करणे इत्यादी मध्ये जो रंगून जातो त्याच्या अंगी रजो गुण पुरेपूर भरला आहे असे समर्थ म्हणतात.जो विनाकारण दुस-याची टिंगल टवाळी करतो,विनाकारण सतत हास्य विनोद करतो तो रजो गुणी.जो कलावंत असतो , नाटक पाहण्याचा शौकीन असतो.निरनिराळ्या खेळात पैसे खर्च करतो तो रजो गुणी असे समर्थ म्हणतात.

समर्थ म्हणतात रजो गुणांमुळे वासना प्रपंचात गुंतून राहते.समर्थ रजोगुणाला पूर्ण त्याज्य ठरवत नाहीत पण रजो गुणात पण “शुद्ध रजोगुण” आणि “शबल रजोगुण” हे दोन प्रकार आहेत.

समर्थ म्हणतात हा शबल रजोगुण माणसाला संसारात अडकवतो तर शुद्ध रजो गुण माणसाला भक्ती मार्गात घेवून जातात. संगीत , नाट्य , ,कीर्तन हे जर लोकांसाठी त्यांच्या मनोरंजना साठी जो उपयोगात आणतो आणि ज्यामुळे समाजात आनंद निर्माण होतो तो अतिशय चांगला “शुद्ध रजो गुण” आहे असे समर्थ म्हणतात —

रज तम आणी सत्व | येणेंचि चाले जीवित्व |
रजोगुणाचें कर्तुत्व | दाखऊं आता ||६||
रजोगुण येतां शरीरीं | वर्तणुक कैसी करी |
सावध होउनी चतुरीं | परिसावें ||७||
माझें घर माझा संसार | देव कैंचा आणिला
थोर | ऐसा करी जो निर्धार | तो रजोगुण ||८||
माता पिता आणि कांता | पुत्र सुना आणी दुहिता |
इतुकियांची वाहे चिंता | तो रजोगुण ||९||
बरें खावें बरें जेवावें | बरें ल्यावें बरें नेसावें |
दुसर्‍याचें अभिळाषावें | तो रजोगुण ||१०||
कैचा धर्म कैचें दान | कैचा जप कैचें ध्यान |
विचारीना पापपुण्य | तो रजोगुण ||११||
नेणे तीर्थ नेणे व्रत | नेणे अतीत अभ्यागत |
अनाचारीं मनोगत | तो रजोगुण ||१२||
धनधान्यांचे संचित | मन होये द्रव्यासक्त |
अत्यंत कृपण जीवित्व | तो रजोगुण ||१३||
मी तरुण मी सुंदर | मी बलाढ्य मी चतुर |
मी सकळांमध्ये थोर | म्हणे तो रजोगुण ||१४||
माझा देश माझा गांव | माझा वाडा माझा ठाव |
ऐसी मनीं धरी हांव | तो रजोगुण ||१५||
दुसऱ्याचें सर्व जावें | माझेचि बरें असावें |
ऐसें आठवे स्वभावें | तो रजोगुण ||१६||
कपट आणी मत्सर | उठे देहीं तिरस्कार |
अथवा कामाचा विकार | तो रजोगुण ||१७||
बाळकावरी ममता | प्रीतीनें आवडे कांता |
लोभ वाटे समस्तां | तो रजोगुण ||१८||
जिवलगांची खंती | जेणें काळें वाटे चित्तीं |
तेणें काळें सीघ्रगती | रजोगुण आला ||१९||
संसाराचे बहुत कष्ट | कैसा होईल सेवट |
मनास आठवे संकट | तो रजोगुण ||२०||
कां मागें जें जें भोगिलें | तें तें मनीं आठवलें |
दुःख अत्यंत वाटलें | तो रजोगुण ||२१||
वैभव देखोन दृष्टी | आवडी उपजली पोटीं |
आशागुणें हिंपुटी | करी तो रजोगुण ||२२||
जें जें दृष्टी पडिलें | तें तें मनें मागितलें |
लभ्य नस्तां दुःख जालें | तो रजोगुण ||२३||
विनोदार्थीं भरे मन | शृंघारिक करी गायेन |
राग रंग तान मान | तो रजोगुण ||२४||
टवाळी ढवाळी निंदा | सांगणें घडे वेवादा |
हास्य विनोद करी सर्वदा | तो रजोगुण ||२५||
आळस उठे प्रबळ | कर्मणुकेचा नाना खेळ |
कां उपभोगाचे गोंधळ | तो रजोगुण ||२६||
कळावंत बहुरूपी | नटावलोकी साक्षेपी |
नाना खेळीं दान अर्पी | तो रजोगुण ||२७||
उन्मत्त द्रव्यापरी अति प्रीती | ग्रामज्य आठवे
चित्तीं | आवडे नीचाची संगती | तो रजोगुण ||२८||
तश्करविद्या जीवीं उठे | परन्यून बोलावें वाटे |
नित्यनेमास मन विटे | तो रजोगुण ||२९||
देवकारणीं लाजाळु | उदरालागीं कष्टाळु |
प्रपंची जो स्नेहाळु | तो रजोगुण ||३०||
गोडग्रासीं आळकेपण | अत्यादरें पिंडपोषण |
रजोगुणें उपोषण | केलें नवचे ||३१||
शृंगारिक तें आवडे | भक्ती वैराग्य नावडे |
कळालाघवीं पवाडे | तो रजोगुण ||३२||
नेणोनियां परमात्मा | सकळ पदार्थी प्रेमा |
बळात्कारें घाली जन्मा | तो रजोगुण ||३३||
असो ऐसा रजोगुण | लोभें दावी जन्ममरण |
प्रपंची तो सबळ जाण | दारुण दुःख भोगवी ||३४||
आतां रजोगुण हा सुटेना | संसारिक हें तुटेना |
प्रपंचीं गुंतली वासना | यास उपाय कोण ||३५||
उपाये येक भगवद्भक्ती | जरी ठाकेना विरक्ती |
तरी येथानुशक्ती | भजन करावें ||३६||
काया वाचा आणि मनें | पत्रें पुष्पें फळें जीवनें |
ईश्वरीं अर्पूनियां मनें | सार्थक करावें ||३७||
येथानुशक्ती दानपुण्य | परी भगवंतीं अनन्य |
सुखदुःखें परी चिंतन | देवाचेंचि करावें ||३८||
आदिअंती येक देव | मध्येंचि लाविली माव |
म्हणौनियां पूर्ण भाव | भगवंतीं असावा ||३९||
ऐसा सबळ रजोगुण | संक्षेपें केलें कथन |
आतां शुद्ध तो तूं जाण | परमार्थिक ||४०||
त्याचे वोळखीचें चिन्ह | सत्वगुणीं असे जाण |
तो रजोगुण परिपूर्ण | भजनमूळ ||४१||
ऐसा रजोगुण बोलिला | श्रोतीं मनें अनुमानिला |
आतां पुढें परिसिला | पाहिजे तमोगुण ||४२||
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
रजोगुणलक्षणनाम समास पांचवा || २.५ ||

— चिंतामणी कारखानीस

चिंतामणी कारखानीस
About चिंतामणी कारखानीस 75 Articles
चिंतामणी कारखानीस हे ग्राहक संरक्षण सेवा समिती या संस्थेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष होते. त्यांना या क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल २०१० चा Consumer Awareness Award हा पुरस्कार प्राप्त झाला आहे. ठाणे महानगरपालिका शिक्षण मंडळाचे ते माजी अध्यक्ष आहेत. विविध वृत्तपत्रांत व मासिकांत त्यांचे लेख प्रकाशित झाले असून आकाशवाणीवर भाषणेही प्रसारित झाली आहेत. ते शिवसेनेचे ठाणे जिल्हा प्रवक्ते आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..