नवीन लेखन...

सफारी इन माबुला भाग – १

मी जात्याच भित्री असल्याने दक्षिण आफ्रिकेला जायचे टाळत होते. पण पूर्वी एका स्नेह्याकडून ऐकलेले आफ्रिकन सफारीचे वर्णन मोहही पाडत होते. भलं मोठं शिवार, उंच उंच गवत, मुक्त जंगली प्राणी आणि आपण मात्र उघड्या मोकळ्या जीपमध्ये ही कल्पना जरी रम्य असली तरी मला फारशी आकर्षक वाटत नव्हती. ह्यांना मात्र मनापासून तेथे जायचे होते, म्हणून आम्ही जोहान्सबर्ग व केपटाऊन हा भाग “बिग फाईव” बघण्यासाठी निवडला.

जोहान्सबर्ग जरी आमच्या सहलीतले पहिले ठिकाण होते तरी तेथे न रहाता जवळच्याच ‘सनसिटी’मध्ये रहाणे सगळे पसंत करतात. त्याप्रमाणे शहरात फिरून आम्हीही तेथेच गेलो. सनसिटीचे वर्णन मिस वर्ल्ड, मिस युनिव्हर्स स्पर्धेमुळे ऐकले होते. क्वचित टीव्हीवर पाहिलेही होते. पण प्रत्यक्षात ‘हॉटेल निसर्ग सान्निध्यात होते’ एवढे सोडल्यास विशेष वेगळे काही वाटलेनाही. हॉटेल्स छान होती. ‘बिग ५’ चं आस्तित्व तिथल्या सजावटीत ठायीठायी दिसत होतं. छोटे छोटे खरे व कृत्रिम धबधबे, जंगलातली पायवाट, (कृत्रिम) लाटा उसळणारी तळी, कारंजी यांची शोभा हत्ती, सिंहाच्या पुतळ्यांनी अधिकच वाढवली होती.

ठराविक वेळी हत्तींच्या पाठीमागून धूर सोडला जायचा, हत्तींचे चीत्कार, सिंहाच्या डरकाळ्या व माकडांचे ओरडणे ऐकू यायचे. मजा वाटली. सनसिटी मध्ये कॅसिनो असणे आवश्यकच. किंबहुना कुणी कॅसिनोमध्ये खेळायला व बिग फाईव पहायला तर कुणी वीकएंड साजरा करायला तिथे येतात. त्यामुळे आम्हालाही खेळण्याची नाही तरी तिथली गंमत पहाण्याची उत्सुकता होतीच. जुगाराच्या अड्यामध्ये जायला मन धजावत नव्हतं. त्याचवेळी आतला एकंदर कोलाहल हसण्याचे आवाज बाहेर थांबूही देत नव्हते. कॅसिनोच्या जवळ गेलो तर बाहेरच दरवाजापाशी (खोट्या) नाण्यांची रास एका सोनेरी घड्यातून खाली जमिनीवर ओतली जाते आहे असे दृश्य होते आणि त्यावर प्रकाशाचा झोत असा काही कोन साधून पडत होता की ती रास खरीच वाटावी. आपली लक्ष्मीची मूर्तीच काय ती कमी होती. दिव्यांची रोषणाई, आजुबाजूची बाग, आत बाहेर करणाऱ्या लोकांची लगबग, आणि एकंदर वातावरणातील उत्साह आम्हालाही खेचून आत घेऊन गेला. इथे आमचे पासपोर्ट आम्ही उतरलेल्या हॉटेलच्या ताब्यात असल्याने मलेशियासारखी तपासणी होत नव्हती. फक्त दारावर आमचा खोली क्रमांक विचारला. आत पाऊल टाकताच सिगारेट, सेंट व दारूचा एकच संमिश्र वास नाकात घुसला. विविध रंगसंगतीचे कपडे ल्यालेली विविध देशातली माणसे भान हरपून खेळण्यात मग्न होती.

प्रशस्त जागेत भरपूर खेळण्याची यंत्रे असलेले वातानुकूलित कॅसिनो, रंगीबेरंगी दिव्यांच्या प्रकाशझोतांनी नुसते झगमगत होते. प्रत्येक यंत्रात माणसे आपापली खोटी नाणी-खोटे शिक्के सारून, खटके ओढून आपापले नशीब आजमावून बघत होती. त्या यंत्रातून कधी नाणी पडलीच तर वेड्यासारखी ओरडत होती, नाचत होती, एकमेकांना मिठ्या मारत होती… अगदी जल्लोषाचे वातावरण होते सगळीकडे. कुठे खटके दाबायची यंत्रे होती तर कुठे भली मोठी चक्रे एका छोट्या गोळ्याला गरागरा फिरवत होती, कुठे पत्त्यांचे सराईत हातातून वाटप चाललेले होते. पत्ते वाटणाऱ्या हातांची सफाई अवर्णनीय होती. आकर्षक गणवेशातील कर्मचारी, त्यांचे पत्ते हाताळताना होणारी हातांची सराईत हालचाल, रंगवलेली नखे आणि सुबक हात अगदी नजर खिळवून ठेवत होते. सगळीकडे लक्ष्मीचा खळखळाट ऐकू येत होता. आपल्याला जरी हे सगळे बघायचा कंटाळा आला तरी खेळणारे मात्र अगदी तल्लीनतेने खेळत होते. खाणेपिणे, सिगरेट, वारुणीचे घुटके-सगळे तिथेच, त्या यंत्र देवासमोर बसूनच. आमच्यासारख्या बघ्यालाही आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी काही शिक्के फुकट देण्याचे प्रलोभन कॅसिनोचे कर्मचारी सतत दाखवत होते. आपण ते घेऊन जर एखाद्या खेळाकडे म्हणजे आपल्याला खेळायला सोप्या अशा खटक्याच्या खेळाकडे गेलो आणि थोड्या वेळातच कंटाळून निघालो तर त्या यंत्राकडे इतर मंडळी अगदी धावत सुटायची. प्रथम असे का ते कळलेच नाही. मग समजले की, आपल्यासारख्या बिगिनरचे नशीब त्या लोकांना लाभते म्हणे! सगळे वातावरण जरी खूप आकर्षक असले तरी सिगारेटचा व दारूचा वास आम्हाला फारवेळ तिथे थांबू देईना. मोकळ्या हवेत आल्यावर बरे वाटले.

कॅसिनोची सजावट आतून होती तशीच बाहेरूनही खूप कलात्मक होती. प्रत्येक कॅसिनोबाहेर छान बाग होती. शोभेची झाडे, फुलझाडे यांची रंगसंगती अगदी नजर खिळवून ठेवत होती. दिव्यांच्या खांबावर वेलींचे झोपाळे करून त्यावर विविध पक्षी बसवले होते. छान संगीत होते. झाडांवर माकडे उड्या मारत होती. कोणी खाऊ दिला तर पटकन उतरून परत जात होती.निसर्गाच्या प्रसन्न सान्निध्यात प्रवासी खाद्य-पेयांचा आस्वाद घेत होते. सगळेपहाता पहाता दोन दिवस कसे गेले कळले सुद्धा नाही. आपल्या जगतसुंदऱ्या जिथे उतरल्या होत्या त्या ठिकाणी आम्ही जाऊन आलो, राहिलो याचा आनंद होताच पण आता पुढचे वेध लागले होते ते सोन्याच्या खाणीचे आणि माबुला लॉजचे. त्यासाठी परत मुक्काम जोहान्सबर्ग!

आलो त्या दिवशी जो’बर्गचा काही भाग पाहिला होता. उरलेला सन सिटीहून माबुलाकडे जाताना. वाटेमध्ये सोन्याची खाण! अपेक्षेप्रमाणे ती गावापासून दूर होती, पण निर्जन भागात नव्हती. एक दोन मस्त रेस्टॉरंट्स, शेजारीच मुलांसाठी करमणूक केंद्र, रोलर कोस्टर, रिझॉर्टस यांनी ही ‘गोल्ड रीफ सिटी’ गजबजली होती. अर्थातच सर्वांचा केंद्रबिंदू म्हणजे गोल्ड माईन. सोन्याचे आकर्षण आम्हा भारतीयांइतकेच परदेशीयांनाही वाटते, त्यामुळे लहान मुलांच्या खेळण्यामध्ये न रमता मंडळी सोन्याच्या खाणीकडे वळली.

खाणीत प्रवेश करण्याचा रस्ता सुव्हेनीयर शॉपमधून होता. गोल्डरीफ चा ट्रेडमार्क असणाऱ्या तबकड्या, टी शर्टस, की चेन्स अशा अगणित वस्तू विक्रीसाठी मांडून ठेवलेल्या होत्या. त्यातील १-२ गोष्टी खरेदी करून वळलो. एका भल्यामोठ्या लोखंडी कमानीने आमचे स्वागत केले. सोन्याच्या खाणीचे प्रवेशद्वार लोखंडाचे आहे याची गंमत वाटली. मी तर अशाप्रकारची खाण प्रथमच पहात होते. त्यामुळे सगळ्याच गोष्टींचे मला कुतूहल वाटत होते. माईन बघायची असेल तर फक्त गाईडेड टूरच घेता येते. स्थानिक गाईडने आत कोणती काळजी घेणे आवश्यक आहे ते सांगितल्यावर गंमत-जंमत करणारी मंडळी जरा गंभीर झाली. अन् जेव्हा आम्ही हेलमेट घालून व हातात टॉर्च घेऊन पिंजरावजा लिफ्टमध्ये शिरलो तेव्हा लिफ्टची एकंदर अवस्था बघून हे गांभीर्य अधिकच वाढले. आपण जमिनीखाली २२० ते २५० मीटर जाणार आहोत हे कळल्यावर तर बोलतीच बंद झाली. थोडेसे खाली जातोय तोच लिफ्टच्या बाहेरच्या बाजूने प्रथम पाणी ठिबकण्याचा व नंतर भिंतीवरून पाणी ओघळण्याचा आवाज यायला लागला. क्वचित तुषारही अंगावर उडले, कानात दडे बसले, अंधार वाढायला लागला. मिणमिणत्या उजेडात लिफ्ट जास्तच जुनाट वाटत होती. तिचा वाढत जाणारा आवाज अंगावर काटा आणत होता. कधी बाहेर पडतोय असे झाले होते. तोच मोठा आवाज करून लहानसा गचका देत लिपट थांबली. ‘चला, सुटलो!’ म्हणत लिफ्ट मधून बाहेर पडलो ते काळोखी भुयारात! भुयार पाहिल्यावर तर अगोदरची लिफ्टच बरी वाटायला लागली. भुयार मिणमिणत्या उजेडाचे, जेमतेम ७-८फूट उंची असलेले व एकावेळी २-३ माणसे जाऊ शकतील असे होते.

पायाखालची जमीन टणक व खूपच खडबडीत असल्याचे बुटांच्या तळव्यातूनही पायाला जाणवत होते. त्या खडबडीत भुयारातून आम्ही जमिनीखाली २५० मीटरवर चालत होतो ही कल्पनाही फारशी आकर्षक नव्हती. तसेही उष्णता आणि ताज्या हवेच्या अभावामुळे आपल्याला इथे २० मिनिटांपेक्षा जास्त वेळ थांबू देत नाहीतच. जरी हवेचा दाब व प्रवाह नियंत्रित केले असले तरी आर्द्रतेमुळे फार वेळ थांबणे त्रासदायकच होते. या परिस्थितीत राहून सोने काय किंवा कोळसा काय खणून काढणाऱ्यांना माझे शतश: प्रणाम!

या भुयारात ठिकठिकाणी वेगवेगळी हत्यारे, डायनामाईट्स, विजेचे जनरेटर सेट्स, खाणीतून निघणारे दगड वाहून नेण्यासाठी जिने, रस्ते, गाड्या ठेवलेले होते. काही ठिकाणी पुतळे तर काही प्रात्यक्षिके दाखविण्यासाठी कामगारही होते. कधी मिणमिणत्या उजेडात तर कधी टॉर्चच्या प्रकाशात आम्ही हे सारे पहात होतो. डोळे सरावले अन् आपण जमिनीखाली आहोत हेच विसरायला झाले. सगळेजण बघण्यात एवढे रमलो की गाईडने “आता परत फिरूया” म्हटल्यावर “एवढ्यातच?” अशीच सगळ्यांची प्रतिक्रिया झाली. पण शेवटी लिफ्टपाशी जेव्हा “ही खाण मुळात १०००मीटर खोल होती, पण आता ३०० मीटरच्या खाली पाणी भरलेले असल्याने बंद आहे” असे कळले तेव्हा उगीचच पायाखालची जमीन हलते आहे असा भास होऊन कधी वर उघड्यावर जातो असे झाले. परत त्या लिफ्टचा प्रवास सुरू झाला. लिफ्ट वर येताना जास्तच आवाज करते व तिच्या वेगाने भिंतीवरून ओघळणारे पाणी जास्त जोरात आम्हाला भिजवते आहे हेही अनुभवायला मिळाले.

वर येऊन मोकळा श्वास घेतल्यावर खूप बरे वाटले. शुद्ध हवेची महती अशा वेळी प्रकर्षाने जाणवते. खाणीतून मिळणारं सोनं, दगड, वाळू, व इतर धातूंपासून वेगळं करून शुद्ध करतात. वितळवून त्यापासून ठोकळे तसेच चिपा बनवण्यापर्यंत काय काय प्रक्रिया केल्या जातात याचे प्रात्यक्षिक शेजारच्याच खोलीत चालू होते. १० किलो सोन्याची ढेप खास हात लावण्यासाठी ठेवली होती. सर्वजण त्याला कुरवाळत होते हे पाहून माझाही धीर चेपला व मग मीही हात पावन करून घेतले. १-२ ग्रॅम पासून फारतर १० ग्रॅम पर्यंत सोने हातात घेणारे माझे हातच त्यादिवशी सोन्याचे झाले.

सोने पाहून झाल्यावर आमच्या गाड्या मुख्य मुक्कामाकडे निघाल्या. गेम सफारीबद्दलची माझी कल्पना म्हणजे जंगल, त्यातले प्राणी आणि त्यांना बघण्यासाठी तुफान वेगाने धावणारी जीप. म्हणून या मुक्कामासाठी मी नाखूष होते. जो’बर्गपासून सुमारे अडीच तासाचा प्रवास. वाटेत कुठे वस्ती तर कुठे डोंगर, मोकळी जागा. वाटेत दूरवर काही खाणीही दिसू लागल्या. त्या खाणीतून बाहेर टाकलेल्या मातीचे, दगडांचे ढीग उन्हात चमकत होते. पण जंगलाचे अन वन्य प्राण्यांचे नाव नव्हते. शेवटच्या अर्ध्या तासात चित्र एकदम बदलले. रस्त्याच्या कडेने झाडे दिसायला लागली, लांब दिसणारे डोंगर जवळ आले, वळणे घेत आम्ही माबुला ‘लॉज मुक्कामी’ पोहोचलो.

आमची गाडी तिथे पोहोचताच आदिवासी वेषातल्या एका माणसाने जोरजोरात ढोल वाजवायला सुरुवात केली. प्रवेशालाच कमान व मागे मोकळे अंगण होते. आम्हाला ‘सुस्वागतम्’ म्हणायला आदिवासी वेषातील कर्मचारी हजर होते. ओले टॉवेल व सरबताचे ग्लास हातात देऊन कमरेत वाकून त्यांनी सर्वांचे स्वागत केले. त्या गरम व चिकचिक्या हवेत ओले टॉवेल व कोमट पण टेस्टी सरबत खूपच छान वाटले. आत्तापर्यंतच्या प्रवासाचा थकवा कुठेच्या कुठे पळून गेला. रिसेप्शन हॉलमध्ये सर्व आधुनिक सोयी असल्या तरी सजावट मात्र जंगलातल्या वातावरणाला साजेशी होती. समोरच छोटसं तळं त्यावर सुबक पूल, मागे सर्वत्र झाडे व निवासी खोल्यांचे पुंजके.

वॉटरबर्ग डोंगराच्या परिसरात लिम्पोपो प्रॉविन्समध्ये १२००० हेक्टर आवारात हे लॉज आहे. अनेक छोट्याछोट्या झोपड्या व ३-४ कॉन्फरन्स हॉल असणारे हे लॉज निसर्गाशी पूर्ण एकरूप झालेले आहे. बऱ्याचशा खोल्या एकमजली, क्वचित एखादी इमारत दुमजली. खोल्या गटागटांत विभागलेल्या पण एकमेकांपासून दूरदूर आहेत. मधेमधे पायवाट, मोठी मोठी झाडे व गुडघ्याइतके गवत होते. झाडांवर दिवसा वेगवेगळे पक्षी तर रात्री वटवाघळे दिसली. दिवसभर वेगवेगळ्या आवाजात वेगवेगळे राग आळवत असलेल्या पक्ष्यांना रात्री रातकिड्यांनी छान ‘किर्रर्र’ संगीताची साथ दिली होती.

आमची खोली रिसेप्शन हॉलपासून दूर, सगळ्यात शेवटच्या एका दुमजली इमारतीच्या तळमजल्यावर एका टोकाला होती. आम्ही दोघे सोडल्यास इतर कोणीच त्या इमारतीत वस्तीला नव्हते. हे लक्षात आल्यावर व आजुबाजूचे उंच उंच गवत पाहून मला तर पळून जावेसे वाटत होते. पण जाणार कुठे? शेवटी जीव मुठीत धरून २ दिवस काढणे भाग होते. खोलीत आधुनिक सोयी तशा मर्यादितच होत्या. दारासमोरच्या भिंतीवरला भला मोठा पडदा ‘मागे काहीतरी आहे’ हे दर्शवत होता. भला मोठा प्रशस्त व्हरांडा पडद्याआड लपून आमची वाट पहात होता. व्हरांड्याला कठडा वगैरे नव्हताच, फक्त गवतात शिरणाऱ्या ३-४ पायऱ्या होत्या. अंधार पडेपर्यंत मजा वाटली, पण नंतर मात्र बिग५ पैकी कोण येईल सोबतीला याची भीती वाटू लागली. जेवणाची वेळ झाल्याची बातमी हवेत दरवळणाऱ्या मसाल्यांच्या वासाने व रिकाम्या पोटाने करून दिली तसा आम्ही आमचा मोर्चा जेवणघराकडे वळवला.

-– अनामिका बोरकर

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..