नवीन लेखन...

सावज (कथा)

ट्रींssग… ट्रींssग… सकाळी चारचा गजर वाजला.. महेंद्र मराठेंची झोपमोड झाली.. डोळे चोळता चोळता मनाला भुरळ घालणा-या एका गोड स्वप्नाचा नकळत चुराडा झाला होता..अंगावरची उबदार दुलई बाजूला सारून मराठे उठले.. मुखमार्जन करुन रोजच्या सवयीप्रमाणे एक ग्लास कोमट पाणी पिऊन मॉर्निंग वॉक साठी घराबाहेर पडले..

सोसायटीच्या वॉचमननं झोपेनं तारवटलेले डोळे अर्धवट उघडून एक कडक सॅल्युट ठोकला.. सिक्युरिटी कॅबिनच्या दाराजवळ अंगाचं मुटकुळं करून पडलेलं कुत्रं उठलं .. शेपूट हालवित त्यांच्याकडे आशाळभूतपणे पाहू लागलं.. मराठेंनी खिशातून एक बिस्कीटचा पुडा काढला.. त्यातील काही बिस्कीटं.. त्याच्यासमोर धरली.. त्यानं पुढील पाय किंचीत उंचावून ती तोंडात धरली.. एका बाजूला ठेवून खाऊ लागलं.. उरलेल्या बिस्कीटांचा पुडा त्याच्या जवळ ठेवून म्हणाले..

“अरे.. बहादूर.. तुझं काय.. चहा वगैरे घेतला की नाही..?”
“नही..शाहाबजी.. एवढ्या सकाळी सकाळी चहा कुठून मिळणार.. चहावाला आण्णा पाच वाजता येतो.. “
मराठेंनी खिशातून पन्नासची नोट काढली.. बहादूरला देत म्हणाले..
“हे घे.. चहावाला येईल तेव्हा चहा घे आणि काही नाश्ता मिळाला तर खाऊन घे..”
“मेहेरबानी.. शाहाबजी..” म्हणून त्यानं मेन गेट उघडलं..

मराठे बाहेर पडले.. रस्त्यावर तशी सर्वत्र शांतता पसरली होती… पण लष्करी खाक्या अंगात मुरल्यामुळे त्यांना त्याची पर्वा नव्हती.. त्यांच्या पायाची लयबद्ध चाल पाहून कुणीही ते लष्करी अधिकारी असावेत असं अगदी सहज ओळखलं असतं.. रस्त्याने जाताना मधेच एखादी दुसरी गाडी त्यांना मागे सारून पुढे जात होती..पण त्याचा त्यांच्या त्या लयबद्ध चालीवर कोणताही परिणाम होत नव्हता..

सकाळचा मंद गार वारा अंगावर रोमांच उभे करीत होता.. साधारण पंधरा मिनिटे चालल्यावर ते एका सार्वजनिक बागेजवळ पोहचले.. पावणेपाच वाजले होते.. बाग उघडण्याची वेळ सकाळी पाचची असल्यामुळे त्यांना अजून पंधरा मिनिटे थांबावं लागणार होतं.. इथे एका ठिकाणी उभं राहण्यापेक्षा बागेलाच एक चक्कर मारण्याचं ठरवून ते चालू लागले.. अर्धेअधिक अंतर चालून गेल्यावर त्यांना हळूवारपणे एक आकृती त्यांच्या पुढे काही अंतरावर चालत असल्याचे दिसून आले…

सकाळच्या त्या अनाहूत स्वप्नाची धुंदी मनावर रेंगाळत होती.. तशातच त्या आकृतीची मोहक चाल बघून त्यांच्या मनाची चलबिचल झाली.. पावलांनी ताल सोडला आणि एका विलक्षण ओढीने वेगात पडू लागली..पण मराठे त्या आकृतीला गाठण्यापूर्वीच ती शेजारच्या गल्लीत दिसेनाशी झाली… क्षणभर पावलं रेंगाळली.. थांबून त्यांनी त्या गल्लीकडे पाहिले.. कोणीही दिसत नव्हतं…

मानेला एक हळुवार झटका देऊन मनात आलेला विचार अंगावर अवचित पडलेल्या झुरळालाला झटकून टाकावं तसा झटकला आणि पुढे चालू लागले.. बागेचं मेन गेट उघडलं होतं.. त्यांनी आत प्रवेश केला.. शेजारच्या झाडाखाली बूट काढून ठेवले.. वॉकींग ट्रॅकवर चालतांना गवतावर साचलेल्या दवबिंदूचा थंडगार स्पर्श पायांना आनंददायी अनुभूती देऊ लागला होता..

चार महिन्यापूर्वी याच गवतावरून सुधाबरोबर चालतांना, चालता चालता गप्पा मारताना मन तिशीतल्या हिंदोळ्यावर झोके घेऊ लागायचं.. चालताना तिचा नकळत होणारा रेशमी स्पर्श अजूनही पारिजातकाच्या फुलांसारखा वाटायचा.. केसरी देठांच्या पांढ-या शुभ्र फुलांची भरलेली ओंजळ नाकाजवळ धरून, डोळे मिटून तो सुवास हृदयात साठवण्यासाठी मन अधीर व्हायचं.. पहाटेचा थंड वारा अंगात मधुर मिलनाचे स्फुल्लिंग चेतवायचा.. तेव्हा ते म्हणायचे..

“सुधा.. चल जरा टपरीवर जाऊन मस्त गरमागरम चहा घेऊ..”
“अहो.. पण अजून सहा सुद्धा वाजले नाहीत.. तो चहावाला तरी आला असेल की नाही कुणास ठाऊक “
“अगं.. तो साडेपाचलाच येतो.. चल..”
“मला तर बाई तुमचं आजकाल काही समजतच नाही.. ड्युटीवर असताना किती वेळा चहा पित होते तुम्ही..”
“अगं ते दिवस कडक शिस्तीचे असतात.. ड्युटीवर असताना चहा वगैरे मिळत नाही.. थंडी लागली तर गरम पाणी प्यायचं किंवा फार तर मस्त एक दोन पेग ड्रिंक घ्यायचं..पण चहाचं नाव घ्यायचं नाही..”
“मग आता का चहासाठी एवढे व्याकूळ झालेले असतात..?”
“सुधा.. अगं सोड ते.. तू येणार आहेस की मी जाऊ..?”
“येते… उगाच सकाळी सकाळी नाराज होऊ नका..”

बागेतून बाहेर पडून त्यांनी चहाची टपरी गाठली..पण ती बंद असलेली पाहून सुधा म्हणाली..
“घ्या.. मी सांगितले होते टपरी उघडली नसेल. पण तुम्ही ऐकाल तर शप्पथ..”
“अगं.. आज बहुतेक त्याला उशीर झालेला दिसतोय..मी ब-याचदा त्याला साडेपाचला टपरी उघडताना पाहिलंय..”
“मग आता काय करायचं… चला परत..”
“परत नको..आता घरीच जाऊ या.. चहा घेतल्याशिवाय बरं नाही वाटायचं..”
“म्हणजे.. तुम्हाला बरं वाटतं नाही की काय ?”
“सुधा.. शब्दशः अर्थ नको घेऊ.. म्हणजे मनाची चलबिचल थांबणार नाही असं म्हणायचं होतं मला..”
“म्हणजे.. आता तुमच्या मनाची चलबिचल पण व्हायला लागली आहे का ?
“ए..तू समजून घे ना गं.. थट्टा नको करू.”

बोलता बोलता ते सोसायटीच्या जवळ कधी पोहचले समजलं सुद्धा नाही.. फ्लॅटचा दरवाजा उघडला.. दोघेही आत आले.. मराठेंनी दरवाजा बंद केला.. सुधा स्वयंपाकघरात चहा बनविण्यासाठी गेली आणि मराठे बेडरूममध्ये तिची वाट पाहत बसले..

दहा मिनीटानी सुधा चहा बिस्कीट घेऊन आली.. टीपॉयवर चहाचा ट्रे ठेवला.. चहाचा कप मराठेंना दिला..

“हे काय.. तू नाही घेणार..?”
“अहो असं काय करता.. मला तुमच्यासारखा गरम चहा प्यायला जमत नाही माहित आहे ना..?”
“हो..गं.. विसरलोच बघ.. पण तुला सांगतो.. चहाची खरी मजा गरम गरम पिण्यातंच आहे.. तुला थंड कसा आवडतो कुणास ठाऊक..? बरं मग फुंकर मारून देऊ का?”
“अहो.. होईल की थंड.. चहा मला प्यायचा आहे..तुम्हाला का एवढी घाई झालीय..?”
“अगं.. म्हणजे कसं आहे की.. मला तोपर्यंत वाट पहावी लागेल ना..?
“म्हणजे..?”
“काही.. नाही..होऊ दे थंड..”

सुधाने चहाचा कप तोंडाला लावला.. पण घोट न घेता कप पुन्हा खाली ठेवला..
“अजून गरमच आहे.. तुम्हाला बरं जमतं गरम गरम प्यायला..”
“अजूनही गरम आहे..?.. इतक्या वेळात माझे तीन कप पिऊन झाले असते..”
“बरोबर आहे.. तुम्हाला बाई प्रत्येक गोष्टीची घाई का असते कुणास ठाऊक ?”
“अगं लष्करी पेशातला माणूस आहे मी.. त्यामुळे आम्हाला सगळं कसं पटापट आवरायचं असतं.. आणि आता तू हेच समजून घेतलं तर बरं होईल..”
“अहो..आता तुम्ही निवृत्त झाले आहेत.. आता कशाची घाई.. आणि त्यात समजून घेण्यासारख काय आहे..?
“सांगतो.. तो चहा बघ एकदा ..चहाच आहे की लस्सी झालीय.. “

सुधाने चहाच्या कपाला हात लावून पाहिलं..कप अजूनही गरमच असल्याचं जाणवलं.. तिने तो पुन्हा खाली ठेवला..
“काय झालं..?”
“अहो कप अजून गरमच लागतोय..”
“आता मात्र कमाल झाली तुझी.. अगं कप गरम आहे म्हणजे चहा गरम असेलच असं नाही..”
“तुम्ही थांबा हो.. चहा मला प्यायचा आहे.. मला जसा हवा तसा पिऊ द्या.. उगाच तोंड भाजलं मग..?”

दोन मिनिटांनी सुधाचा एकदाचा चहा पिऊन झाला.. चहाचे कप उचलून ती उठणार तेवढ्यात मराठेंनी तिला मिठीत घेतले.. तेव्हा या अनपेक्षित घडलेल्या घटनेमुळे ती बावरली..
“अहो ..काय हे..?”
“काय म्हणजे..? सुधा तुला कधी कळणार माझं मन..? चहा बनविण्यासाठी जेवढा वेळ लागला नाही त्यापेक्षा जास्त वेळ तू तो पिण्यासाठी घालवला.. सकाळच्या अशा धुंद वातावरणात नुसतं चहाने मन कसं भरायचं?”
“अहो.. पण.. नवीन लग्न झालंय का..? सागर आणि सूनबाई अमेरिकेला गेले त्याला दोन वर्षे झाली आहेत.. तुम्ही मात्र अजूनही कुलू मनाली आणि शिमल्यालाच मुक्काम ठोकलाय.. कधी समाधान व्हायचं तुमचं..?
“सुधा ..अगं .. तुला जे काही बोलायचं असेल ते नंतर…”

असं म्हणून मराठेंनी सुधाला ब्लॅंकेट मध्ये ओढलं.. इतका वेळ घोंघावणारं वादळ दाराशी थांबलं होतं.. पण ते असं किती वेळ थांबणार होतं.. सुधाच्या केसांचा अंबाडा सुटला.. आणि श्वासात श्वास गुंफले.. अनावृत्त अंगावर मोग-याची फूलं..टप..टप..पडली.. आपल्या मंद धुंद सुगंधाने सुधाला न्हावू घातलं..मराठेंची मिठी घट्ट होऊ लागली… बेडरूममधल्या पंख्याला आपसूकच गती मिळाली होती.. पूर्वेच्या कोवळ्या किरणांचा झोत हळुवार पावलांनी घरात दाखल झाला.. आणि.. अंधारलेले कोपरे उजळून निघाले..महेंद्रच्या मिठीत सुधा डोळे मिटून विसावली होती.. सुधाच्या हातच्या चहाची अमृतगोडी महेंद्रच्या ओठांवर अलगद विसावली होती.. एक घोंघावणारे वादळ तृप्त होऊन शांत झाले होते…

आठवड्यातून अशी एक दोन वेळा मराठेंना सकाळच्या चहाची आठवण व्हायची.. मॉर्निंग वॉक अर्धवट सोडून ते सुधाला घेऊन घरी यायचे.. सुधा आलं आणि वेलची पूड घालून फक्कड चहा बनवायची… आणि तो अमृततुल्य चहा पिऊन मराठे तृप्त व्हायचे..

सूनबाईच्या डोहाळजेवणाच्या साधारण महिनाभर अगोदर सुधा अमेरिकेला गेली होती.. मागच्याच आठवड्यात सूनबाईचं बाळंतपण झालं होतं.. घरात एका गोजिरवाण्या पाहुण्याचं आगमन झालं होतं.. त्याचं आणि सूनबाईचं करता करता तिला मराठेंची विचारपूस करायला वेळही मिळत नव्हता.. त्यांना बिछान्यावरचं एकाकीपण छळू लागलं होतं.. पण नाईलाज होता.. अजून दोन एक महिने तरी सुधा येणार नव्हती..

मॉर्निंग वॉक पूर्ण करून त्यांनी घर गाठलं..दाराच्या कडीत अडकवलेला रोजचा पेपर घेऊन घरात आले. दुध गरम करून कॉफी बनवली..चहाची तहान कॉफीवर भागवावी लागली होती… बिछान्यावर पडून पेपर वाचता वाचता डोळा केव्हा लागला समजलंच नव्हतं…

दहा वाजता..दारावरची बेल वाजली.. तेव्हा पुन्हा एकदा त्यांची झोपमोड झाली होती.. त्यांनी उठून दार उघडले.. दारात कामवाली पारु उभी होती..ती दार लोटून आत आली .. सरळ स्वयंपाकघरात गेली.. चहाला आधण ठेवलं.. तेव्हा मराठे म्हणाले..

“पारू.. तुझ्या बाईसाहेब आल्या की त्यांच्याकडून चहा कसा करायचा एकदा नीट शिकून घे.. चहा प्यायल्यानंतर मन कसं तृप्त झालं पाहिजे..”
“का हो सायेब.. आसं का म्हणतायसा..? म्या चांगला च्या करीत न्हाई का ?”
“मी असं कुठं म्हटलंय..का कुणास ठाऊक पण चहा प्यायल्यासारखं वाटतंच नाही..”.
“मग काय कमी पडतंय ते सांगा…मग म्या तसा करते.. च्या पावडर , येलची का साकर कमी पडतीय ? काय कमी पडतंय का ज्यास्ती व्हतंय तेवढं सांगा..म्हणजी म्या सुधरुन घेते..”
“तसं.. काही सांगता येणार नाही.. पण चहा प्यायल्यासारखं वाटत नाही एवढं नक्की..”
पारूनं मराठेंना चहा दिला.. एक कप स्वतः घेतला..
“साहेब .. नाश्ट्याला काय करू? “
“अगं..कर काही तरी.. तू पण खाशील.. सकाळी उठून उपाशीपोटीच येत असशील तू..”
“तसं.. काय बी न्हाई साहेब.. काही ना काही तरी शिळंपाकं पोटात घालायाच लागतंय.. न्हाई तर काम कसं करायचं..?

पारूनं थालीपीठ बनवलं.. मराठेंना देऊन स्वतः ही घेतलं..
“साहेब..तुम्ही आंघूळीला जाताय का येळ हाय ?”
“नाही.. तुला काय करायचं असेल ते कर .मी नंतर आंघोळ करील..”
“बरं.मग म्या आदुगर कचरा काढून फरशी पुसून घेते.. मग सैपाकाला लागते..तुमची आंघूळ झाल्यावर जाता जाता कापडं धुवून टाकते..”

पारूनं साडीच्या नी-या वर घेऊन कमरेला खोचल्या.. पदर खांद्यावरून आडवा घेऊन तो ही कमरेला खोचला.. गॅलरीमध्ये ठेवलेला झाडू घेऊन आली.. स्वंयपाकघरातून कचरा काढीत काढीत ती हॉलमध्ये आली.. मराठे सोफ्यावर निवांत बसले होते.. आज पारूची प्रत्येक हालचाल त्यांना पहात रहावेसे वाटत होते.. निमगोरी आणि ठुसक्या बांध्याची पारू नकळत मराठेंच्या मनावर मोहिनी घालत होती..

तिने कचरा काढून झाल्यावर फरशी पुसायला एका बादलीत पाणी घेतलं..फरशी पुसायचं कापड घेऊन ती फरशी पुसत पुसत बेडरूममध्ये गेली.. नुसतंच बसून राहण्याऐवजी पेपर वाचावा म्हणून पेपर घ्यायला ते बेडरुममध्ये गेले.. पारू खाली वाकून फरशी पुसत होती.. तेव्हा तिच्या पदरामागून हळुवार डोकावणारं तिचं देखणं रुप त्यांच्या नजरेस पडलं.. अंगातून एक गोड शिरशिरी आरपार गेली.. अंगावर रोमांच उभे राहिले..
सुधाचं असं चोरटं रुप त्यांनी कधी पाहिलंच नव्हतं.. लग्नं झाल्यावर दर दोन वर्षांनी त्यांना लष्करी नियमाप्रमाणे एक महिन्याची सुट्टी मिळायची.. दोन दोन वर्षे मनात दाबून ठेवलेली गोड स्वप्न उफाळणा-या समुद्रातील लाटांप्रमाणे किना-याला कवेत घ्यायला आसुसलेली असायची.. त्यावेळी फक्त एकामागून एक उसळलेल्या लाटा अनावृत्त किना-याला मनसोक्त न्हावू घालायच्या.. प्रशस्त ऐसपैस पसरलेल्या किना-यापासून काहीच लपवता येत नव्हतं..घोंघावणारा वारा, उंचच ऊंच उठणा-या लाटा , किना-याची चंद्रप्रकाशात जीवाला लागलेली ओढ असा खेळ रंगायचा की सर्व एकमेकात विरून जायचे.. आणि पुन्हा दुसऱ्या दिवशीच्या भरतीची वाट बघत शांत व्हायचे..

“साहेब.. काही पायजे व्हतं का ?” खाली वाकलेल्या अवस्थेत पारूनं विचारलं..
“हां.. पेपर पाहिजे होता..”

पारू उभी राहिली.. मराठेंना आत येण्यास जागा दिली.. पुढे होऊन त्यांनी पेपर घेतला.. पारूकडं एक चोरटा कटाक्ष टाकला आणि हॉलमध्ये येऊन पेपर वाचत बसले.. पेपर वाचत होते पण पुढचं पाठ मागचं सपाट अशी त्यांची अवस्था झाली होती.. ते राहून राहून बेडरूमकडे पहात होते.. त्यांनी पुन्हा पेपराची पानं चाळायला सुरूवात केली..रोज पेपरातील प्रत्येक बातमी मन लावून वाचणा-या मराठेंचं आज मात्र मन लागतच नव्हतं..
अचानक त्यांची नजर एका जाहिरातीवर पडली.. तिथे एका आकर्षक महिलेचा फोनवर बोलत असल्याचा फोटो छापला होता.. लिहीलं होतं.. “तुम्ही एकटे आहात का..? तुम्हाला टाईमपास करण्यासाठी एखादा डेटींग पार्टनर हवाय का ?.. काळजी करू नका.. आम्ही आहोत ना.. ताबडतोब फोन लावा.. किंवा आमच्या वेबसाईटवर लॉग-इन करा..पुढे नंबर सुद्धा दिला होता.. मराठे विचार करु लागले.. काय प्रकार असेल..? फोन करून पहावं का..? पण डायरेक्ट फोन करण्याऐवजी अगोदर त्यांच्या वेबसाइटवर काय दिलंय ते पहावं हे उत्तम..

पारू बेडरुमची फरशी पुसून हॉलमध्ये आली.. इतका वेळ मान वळवून पाहणा-या मराठेंच्या समोर पारू उभी होती.. साडीच्या नी-यांचा घोळ गुडघ्यापर्यंत वर घेऊन खाली बसून फरशी पुसू लागली.. त्यांनी डोळ्यासमोर पेपर धरला होता.. पण तो नुसताच धरला होता.. त्यांचं सर्व लक्ष पारूकडं लागलं होतं.. खाली बसून फरशी पुसताना ती मागे पुढे व्हायची तेव्हा तिच्या देहाच्या कमनीय वळणाची हालचाल अधिकच उठावदार आणि लोभसवाणी दिसत होती.. मराठेंच्या मनाची चलबिचल वाढली होती..

लष्करात दाखल झाल्यानंतर ते पहिल्यांदा सुट्टीवर आले होते तेव्हा त्यांच्या आई-वडिलांनी सुधाचं स्थळ सांगून आल्याचं सांगितलं.. मुलगी नाकी डोळी तरतरीत होती..शिकलेली होती.. जास्त आढेवेढे न घेता त्यांनी होकार दिला होता.. आठ दहा दिवसांत लग्नसोहळा आटोपला… घरातल्या रितीरिवाजाप्रमाणे सत्यनारायण घातला..जागरण गोंधळ घातला..हे सर्व करेपर्यंत अजून आठ दिवस गेले.. आणि मग तो दिवस उजाडला.. सुधाला घेऊन त्यांनी मधुचंद्रासाठी कुलु मनाली गाठलं .. मोकळ्या वातावरणात डोंगराळ प्रदेशातली थंडगार बोचरी हवा सुधाला मानवत नव्हती.. तास दोन तास इकडे तिकडे फिरल्यावर ती लगेच हॉटेलवर परतण्याचा हट्ट धरायची.. दोन दोन स्वेटर घालून वरुन जाडजूड दुलई घेऊन मराठेंच्या मिठीत पडून रहायची..

आठ दिवस झरझरत्या पावलांनी गेले… आणि त्यांना तातडीने दाखल होण्यासाठी त्यांच्या डिव्हीजनचा टेलीग्राम आला..घरी जाऊन पुन्हा परतण्याची वाट न बघता सुधाने घरी जायचं आणि मराठेनी ड्युटीवर जायचं असा दोघांनी मिळून निर्णय घेतला..नववधुला एकटीला परत पाठविणे योग्य नव्हते पण त्यांचा नाईलाज झाला होता.. शिमला एयरपोर्टवरून त्यांनी शिमला मुंबई फ्लाईट मध्ये सुधाला बसवलं आणि तिचा निरोप घेतला.. तेव्हापासून जेव्हा कधी मराठे सुधाकडे तो गोड आग्रह धरायला लागले की तिचं वाक्य ठरलेलं असतं…” तुम्ही अजूनही कुलू मनाली लाच आहेत का…?

“साहेब…! आंघूळीला जाताय नव्हं..?

पारूच्या अचानक प्रश्नानं त्यांची विचारमालिका तुटली.. ते म्हणाले..
“हो..हो.. जातो..! अं..पारू..?”
“बोला की सायेब..”
“काही.. नाही.. तूझा स्वयंपाक करून झाला का ?
“आं.. आता गं बया.. सायेब.. भूक लागलीय का काय ..? आताच तुमच्या पुढं फरशी पुसत व्हते.. आन् सायेब.. एक माणसाच्या सैपाकाला किती येळ लागतोय..? तुम्ही जावा पटदिशी आंघूळ करून या..”

मराठे आंघोळीला गेले आणि पारू सैपाकाला लागली.. आंघोळ करून ते बाहेर आले.. देवपूजा करून पुन्हा हॉलमध्ये पेपर वाचत बसले.. मनात मघाशी पाहिलेली जाहिरात फेर धरून नाचू लागली होती..पण..सुधा नाही म्हणून हे असं करणं योग्य नाही..असाही दुसरा विचार मनाला बजावत होता.. पण देहधर्म स्वस्थ बसू देत नव्हता.. ते उठून उभे राहिले.. हॉल ते बेडरूम अशा दोन फे-या मारल्या.. सकाळचा गारठा कधीच पळाला होता.. वातावरणातील वाढत्या उष्णतेबरोबर शरीर आणि मनही तप्त झाले होते.. नकळत त्यांची पावलं स्वैपाकघराकडं वळली.. ते दारापर्यंत पोहचले आणि पारुनं मागं वळून पाहिलं…

“काय वं..सायेब.. काय पायजेल व्हतं का…”
“अं… नाही.. म्हणजे हो… “
“आवं सायेब .. न्हाई बी म्हणताय आन् व्हयं बी म्हणताय.. तब्ब्येत बरी न्हाई का तुमची..?”
“नाही.. तसं काही नाही.. मला पाणी पाहिजे होतं..”
“आवं..मग मला हाक मारायची ना.. बरं..थांबा देते..”

आसं म्हणून ती पुन्हा पाठमोरी झाली.. फिल्टरमधून पाण्याचा ग्लास भरू लागली.. मराठे तिच्या त्या पाठमोऱ्या लयबद्ध कोमल देहाकडे आशाळभूतपणे पाहू लागले.. पाण्याचा ग्लास घेऊन ती फिरली.. दारात उभ्या असलेल्या मराठेंना पाण्याचा ग्लास देण्यासाठी हात पुढे केला… त्यांचाही हात पुढे झाला.. पण नजर तिच्या तोंडावर स्थिरावली होती.. ग्लास घेतांना तिच्या हाताचा स्पर्श झाला.. एखाद्या उघड्या वीजेच्या तारेला हात लागल्यासारखा झटका लागला.. हातातल्या ग्लासातलं थोडं पाणी खाली सांडलं..पारू त्यांच्याकडे पाहून गोड हसली… सांडलेलं पाणी पायाखाली कपडा धरून पुसू लागली.. मागे पुढे होणा-या पायाबरोबर साडीचा घोळ थरारला.. मराठेंच्या घशाला कोरड पडली… त्यांनी हातातील ग्लास तोंडाला लावला.. क्षणार्धात रिकामा करून पारूला देत म्हणाले..

“आज जरा जास्तच गरम होतंय नाही..?

“गरम..? मला नाही बाई तसं काही वाटत.. मग तुम्हाला काही सरबत बिरबत देऊ का..?
“नको.. आता नको.. पाहिजे असेल तर सांगतो नंतर..”
मराठे पुन्हा मागे फिरले.. येऊन सोफ्यावर बसले..पारूनं दिलेल्या ग्लासभर पाण्यानं आग लागली होती..ती सरबत देऊ का म्हणाली.. पण आता ही आग पाण्यानं किंवा सरबतानं विझणार नव्हती.. त्यांनी पुन्हा पेपर घेतला.. ती जाहिरात बघून.. पारूला हाक मारली..

“पारु.. अगं..जरा इकडे ये..”
“दोनंच मिन्टं साहेब.. तव्यावर चपाती टाकलीय.. तेवढी भाजली का आलेच..”

तव्यावरली चपाती भाजून पारू आली..
“बोला सायेब..!”
“काही नाही गं.. माझा मोबाईल पाहिजे होता..”
“बरं..देते..”
पारू गेली.. बेडरूममधून मोबाईल घेऊन आली.. मराठेंच्या शेजारी सोफ्यावर ठेवला आणि ती जाऊ लागली..

“काय गं..पारू..रागावलीस की काय ?
पारू थांबली.. म्हणाली..
“न्हाई..वं..सायेब.. तुम्हाला आसं का वाटलं..?”

“मोबाईल..गुपचूप ठेवलास आणि काही न बोलता पुढे गेलीस.. म्हणून मला तसं वाटलं.. “
“सायेब.. आसं काय बी मनाला लावून घेऊ नका… सैपाक झालायं.. तिकाडलं आवरून घेते.. पटकन कापडं धुवून निघाया पायजेल.. जाऊ का आता..?”
“हो..जा..”

मराठेंनी.. मोबाईल घेतला.. जाहिरात पुन्हा एकदा पाहून वेबसाईट शोधली.. हृदयाची धडधड वाढली होती.. जाहिरातीतील स्त्रीच्या फोटोने स्वागत केले.. पुढे जाण्यासाठी मोबाईल नंबर टाकण्यासाठी सांगण्यात आले.. काय करावं.. मोबाईल नंबर टाकावा की नाही अशी द्विधा मनस्थिती झाली.. मनाचा हिय्या करून त्यांनी नंबर टाकला…एक रंगीबेरंगी दिव्यांचा झगमगाट दाखविणारे पेज ओपन झाले.. वेगवेगळ्या वयातील स्त्रियांचे आकर्षक फोटो दिसू लागले.. त्यातून आपल्याला आवडलेला फोटो निवडण्यास सांगितलं होतं..

थोडा वेळ विचार करून त्यांनी एका पंचविशीतल्या वयाच्या दिसणा-या स्त्रीच्या फोटोवर क्लिक केले.. पुढील पेज ओपन झाले..त्याच स्रीचे वेगवेगळे फोटो दिसू लागले.. पारंपरिक भारतीय वेष परिधान केलेले, आधुनिक फॅशनला अनुसरून घातलेल्या कपड्यातून आपल्या सौंदर्याची उधळण करणारे… फोटो पाहून अंगातील वणवा आधिकच भडकला.. तिथेच एका कोपऱ्यात आपल्याला फोनवर बोलायचं आहे की प्रत्यक्ष भेटून डेटवर जायचं आहे असे पर्याय सुचविण्यात आले होते.. तेवढ्यात पारू आली..म्हणाली..

“सायेब..!”
“क्..काय..काय..?

पारुनं अचानक विचारलेल्या प्रश्नामुळे त्यांची तारांबळ उडाली होती.. त्यांनी पटकन फोन उलटा करून खाली ठेवला..

“सगळं काम झालंय.. जाऊ का मी आता?”
“हो..जा.. “

पारु गेली.. मराठेनी मोबाईल घेतला.. काय करावं.. फोन करून बोलावं की डायरेक्ट डेटवर जायचं..? काय करावं मनाचा निर्धार होत नव्हता.. सीमेवर दुश्मन दिसताच मागचा पुढचा विचार न करता बिनदिक्कत गोळी झाडतांना त्यांच्या मनाची चलबिचल झाली नव्हती..पण इथे मात्र त्यांना खूपच टेन्शन आलं होतं.. बघू नंतर म्हणून त्यांनी वेबसाइट बंद केली.. पुन्हा पेपर वाचू लागले..पण शारिरीक भूकेनं त्यांच्या मनाचा ताबा घेतला होता.. काय करावं असा विचार करु लागले..

फोन करून बोलावं की डायरेक्ट डेटवर जावं.. पण नुसतं फोनवर बोलून काय होणार होतं..पण एखाद्या अनोळखी स्त्री बरोबर डायरेक्ट डेटवर जाण्यात काही धोका तर नसेल ना..? की त्यापेक्षा पारूच्या मनाची चाचपणी करावी.. पारूचा प्रतिसाद मिळाला तर बरं होईल..पण तिचा प्रतिसाद मिळाला नाही आणि सुधा परत आल्यावर तिला समजलं तर ?.. डोकं भणभण करायला लागलं तेव्हा ते उठले.. एका ग्लासात अर्धा ग्लास वाईन घेतली.. एका झटक्यात ग्लास रिकामा केला.. एरव्ही अर्धा ग्लास रिकामा करायला त्यांना पंधरा वीस मिनिटे लागली असती.. त्यांनी पुन्हा ग्लास भरला..

मनात दाटलेल्या विचारांच्या चढ उतारात दिवस गेला.. रात्रीचं जेवण केलं.. थोडावेळ टी.व्ही. बघितला..एक फेरफटका मारून यावं म्हणून ते खाली उतरले.. तास भर इकडे तिकडे फिरुन साधारण साडे दहाच्या सुमारास परत आले..

बहादूर गेटजवळ बसला होता.. त्यांना पाहून तो उठला.. हात जोडून म्हणाला.

“राम राम शाहाबजी..”
“रामराम.. अरे बहादूर तू नेपाळचा ना”
“जी शाहाबजी..”
“अरे मग.. तुला तुझ्या घरच्यांची आठवण येते की नाही..?”
“येते ना..शाहाबजी.. गावाला भाऊ आहे..एक वर्ष तो घर सांभाळतो , मी नोकरी करतो.. आता चार महिन्यांनंतर तो येईल.. मग तो नोकरी करील.. आणि मी गावाला जाईल..”
“बरं.. ठीक आहे..” म्हणून त्यांनी बहादूरचा निरोप घेतला..

घरी येऊन.. सरळ बेडरूममध्ये जाऊन अंग टाकलं.. विचार करता करता केव्हा तरी झोप लागली.. पुन्हा एकदा सकाळी चारचा गजर वाजला आणि झोपमोड झाली.. सकाळचा फेरफटका मारून सात वाजता परत आले..

पेपर घेऊन बेडरूममध्ये गेले.. फोन बघितला.. व्हाट्सअप मेसेज चेक केले.. नेहमीप्रमाणे काही काल रात्री गुडनाईटचे तर काही आज सकाळच्या गुड मॉर्निंग चे होते..कुणी रात्री दोन तीन वाजता गुडनाईट म्हटलं होतं तर काहींनी चार पाच वाजताच गुड मॉर्निंग म्हटलं होतं.. ते बघून त्यांना हसू फुटलं..

एका अनोळखी नंबरवरून एक मेसेज आला होता.. काल ज्या फोटोला त्यांनी क्लिक केले होते त्याच स्रीचे वेगवेगळे फोटो पाठवण्यात आले होते.. सोबत मेसेज होता.. “आपण आलात पण न बोलता न भेटताच परत गेले…माझे काही फोटो पाठवले आहेत.. तुम्हाला नक्कीच आवडतील ‌… लवकरच भेटू..”

मराठेनी फोटो पाहिले.. काही स्विमींग पुलमधील होते तर काही कुठल्यातरी बीचवर बिकीनीत काढलेले होते.. फोटोतील तरुणीने त्यांना सरळ सरळ आमंत्रणच दिलं होतं..आता निर्णय त्यांना घ्यायचा होता.. विचार करता करता.. दहा वाजले.. रोजच्या सवयीप्रमाणे पारूनं बेल वाजवली.. त्यांनी दार उघडून तिला आत घेतले..ती स्वयंपाकघरात गेली आणि मराठे बेडरूममध्ये..

दहा मिनिटांनंतर पारु चहा घेऊन आली..आज पारू कालच्या पेक्षा जास्तच आकर्षक दिसत होती.. तिनं टीपॉयवर चहाचा ट्रे ठेवला आणि जाऊ लागली..
“पारु…!”
“जी सायेब..!”
“आज तू खूप छान दिसत आहेस..”
“व्हयं..का ? आमचं हे बी सकाळी तेच म्हणंत व्हते..”
पारू असं म्हणाली आणि मराठेंचा उत्साह मावळला..
“पारू.. तुला मुलं किती आहेत गं..?”
“एक पोरगं हाये सायेब..दीड वरसाचा हाये..”

“अगं.पण तुझ्याकडं पाहून तू दीड वर्षाच्या मुलाची आई आहेस असं वाटत नाही..”

“आवं सायेब .. बाईच्या आंगावर मास आसल्यावर तरणी दिसतीय..पर आंगावर चरबी आसंन तर तरणी आसून बी म्हतारीवाणी दिसतीय..”

पारूनं हसून एक गोड मुरका मारला आणि ती गेली.. मराठे विचार करु लागले.. पारू एवढी मनमोकळेपणाने हसून बोलतेय.. थोडी हिंमत करून तिच्या मनाची चाचपणी करावी का?.. पण तिला नाही आवडलं तर..? नको.. त्यापेक्षा त्या व्हाट्सअप मेसेजवालीचा विचार केलेला बरं..

घरातलं सर्व काम आवरून पारु गेली..मराठेंनी पुन्हा एकदा ते फोटो पाहिले.. आणि रिप्लाय केला..
“तुमचे फोटो सुंदर आहेत.. मला खूप आवडले..”
“मग.. एकदा सेवा करू द्या.. कुठे भेटायचं सांगा” उत्तर आले..

“पण .. तुम्हाला भेटायचं म्हणजे ..देण्याघेण्याविषयी काही समजलं तर बरं होईल..” मराठेनी मेसेज पाठवला…

आता मात्र रिप्लाय न येता व्हाट्सअप व्हिडिओ कॉल आला.. फोन त्या फोटोतल्या तरुणीचाच होता.. मराठेंच्या छातीची धडधड वाढली.. त्यांनी कॉल घेतला..

“ह्.. हॅलो..”
“हाय्…गुड मॉर्निंग महेंद्र साहेब..मी मधुरा..”
“हॅलो.. म्.. मधुरा..”

“हां..तर .. महेंद्र ..मी तुम्हाला माही म्हटलं तर चालेल का.. म्हणजे..माही.. बोलायला आणि ऐकायला कसं छान वाटतं.. पण “महेंद्र मराठे” म्हटलं की आपल्या समोर कुणीतरी पोलिस किंवा मिलीटरीतला माणूस उभा असल्यासारखं वाटतं.. तुम्ही मला मधुरा ऐवजी फक्त मधु म्हणालात तरीही चालेल..”
“हो..हो.. चालेल की..”
“हां..तर माही.. माझी सेवा म्हणजे सर्व्हिस तुम्हाला कोणत्या प्रकारची पाहिजे त्यानुसार सर्व्हिस चार्जेस असतात..”
“म्हणजे..?”

“म्हणजे असं आहे माही..नुसतंच डेटवर जायचं असेल .. म्हणजे खायचं, प्यायचं, फिरायचं.. आणि फार तर एखादी मुव्ही बघायची.. यासाठी तुम्हाला एका दिवसाचे दहा हजार रुपये द्यावे लागतील..पण .‌त्याहीपलिकडे जाऊन.. काही करायचा विचार असेल तर.. पंचवीस हजार रुपये पडतील.. आणि पूर्ण दिवसाचा सहवास..”

“मधु.. पण ..ते पुढचं काही करायचा विचार असेल तर ते.. कुठे..”

“कुठेही.. तुम्ही म्हणाल तिथे.. एखाद्या हॉटेलात, तुमच्या घरी किंवा माझ्या घरी.. तुम्हाला आवडेल तिथे ‌..”
“बरं..मधु..मग ..मी पंचवीस हजार रुपये द्यायला तयार आहे..”

“व्वा.. माही.. अजून एक गोष्ट….आता मी तुम्हाला अहो जाहो म्हणणार नाही.. आणि तुम्ही मला सुद्धा म्हणायचं नाही.. दोस्ती.. म्हणजे नो फॉर्म्यालिटीज… काय माही…पटतंय ना तुला..?”
“हो‌..हो.. चालेल..तू मला तसं बोलू शकते..”
“गुड..माही.. तर तु मला डेटवर कधी घेऊन जाणार आहेस..?”
“तुला वेळ असेल तर आज, उद्या केव्हाही..”
“मग..मी उद्या सकाळी दहा वाजल्यापासून तुझ्या बरोबर असेल.. कुठे भेटायचं सांग..”
“आपण असं..करु.. डायरेक्ट दादरला भेटू ‌.. दिवसभर फिरू.. सिनेमा पाहू.. आणि..”
“आणि काय..माही ? बिनधास्त बोल..”
“रात्री शक्य असल्यास तुझ्या घरी..”
“ओ..ह.. काही हरकत नाही.. तू रात्री माझ्या घरी राहू शकतो.. ओके..बाय्.. भेटू उद्या..”

मराठेंच्या व्हाट्सअपवर मधुने तिचे अजून काही फोटो पाठवले.. काही बेडरूममधले तर काही आंघोळ करताना बाथरूममधले.. तिचं ते अनावृत्त रुप पाहून ..मराठेंच्या अंगातील वणवा आधिकच भडकला.. कधी एकदा मधुला भेटतो असं वाटू लागलं.. उरलेला दिवस आणि रात्र एकदाची संपली..

सकाळी मॉर्निंग वॉकला न जाता मराठेनी घरातच रहाणं पसंत केलं.. लवकर आवरून त्यांनी साडेनऊच्या सुमारास दादर गाठलं.. मधुने दहाची वेळ दिली होती म्हणून अजून अर्धा तास तरी तिची वाट पहावी लागणार होती.. एका ठिकाणी थांबण्याऐवजी ते जवळच्या मारूती मंदिरात गेले.. दर्शन घेऊन पंधरा वीस मिनिटे इकडं तिकडं फिरून पुन्हा दहा वाजता ठरलेल्या जागेवर येऊन उभे राहिले..

दहा वाजून गेले होते..पण मधुचा पत्ता नव्हता.. साडे दहा वाजले तरीही ती आली नव्हती.. काय करावं.. तिला फोन करून विचारावं का असा विचार मनात आला.. पण ठीक आहे अजून दहा पंधरा मिनिटे वाट पहावी.. म्हणून त्यांनी शेजारच्या स्टॉल वरून पेपर घेतला.. पेपर वाचण्यात मन लागत नव्हतं.. जवळपास अकराच्या सुमारास त्यांच्या फोनची घंटी वाजली.. त्यांनी बघितलं.. फोन मधुचाच होता.. त्यांच्या काळजाची धडधड वाढली.. थरथरत्या हातांनी त्यांनी फोन रिसीव केला..

“हाय.. माही.. कुठं आहेस तू.. ?”

“हे..काय स्टेशनच्या बाहेर.. हॉटेल शेजारी … पेपर स्टॉलजवळ..”
“पण तुला ओळखू कसं.. कोणत्या कलरचा शर्ट घातला आहेस..?
“शर्ट नाही.. टी शर्ट घातला आहे.. पांढ-या रंगाचा..”
“बरं.. दोनच मिनिटात आले मी..”
आणि खरच दोन मिनिटांत ती आली..त्याला पाहून म्हणाली..

“माही.. ? मी मधुरा .. सॉरी मला एक तास उशीर झाला.. पण डोन्ट वरी.. मी तुला एक तासाची वेळ वाढवून देईल.. बरं पुढचा काय प्लॅन आहे..?”
“अगोदर काहीतरी खाऊन घेऊ आणि मग बाराच्या मुव्ही शो ला जाऊ..”.

“ओके..” म्हणून तिनं त्यांचा हात पकडला.. शेजारच्या हॉटेल मध्ये घेऊन गेली.. दोघांनीही आपापल्या पसंतीच्या नाश्त्याची ऑर्डर दिली.. पाच मिनिटांत नाश्ता आला.. नाश्ता करून चहा घेतला आणि ते बाहेर पडले..

चालता चालता मराठे म्हणाले..
“मधु.. आपल्याला शो साठी उशीर होईल बहुतेक.. “
“उशीर…? अरे लवकर जाऊन करायचं काय..? आणि शो बघायचाय कुणाला.. दोन अडीच तासात .. थिएटरच्या काळोखात.. तुला एंटरटेन करायचं आहे… बस्.. तुला समजतंय ना..?”
“अं..हो..हो..”

तिकीटं काढून ते आत गेले तेव्हा थिएटरमध्ये पूर्ण काळोख झाला होता.. तिथल्या कामगाराने तिकीटावरचा नंबर बघून बॅटरीच्या प्रकाशात सीट दाखवली.. चाचपडत ते सीटवर बसले.. सिनेमा चालू होऊन दहा एक मिनिटं झाली होती.. मराठे पडद्याकडे पहात होते.. मधुने त्यांचा हात हातात घेतला.. बोटात बोटं गुंफली.. आणि त्यांच्या खांद्यावर मान टेकवली…

सिनेमाचं कथानक हळूहळू पुढे सरकत होतं.. आणि मधुने आपल्या शर्टाची मधली दोन बटणं काढली.. मराठेंचा हात धरून शर्टात घातला.. तिथल्या त्या हव्याहव्याशा वाटणा-या स्पर्शाने मराठेंच्या अंगात कामदेवाने ठिणगी टाकली.. अंधारात त्यांचं मन एका हाताने मदनाचा खेळ खेळू पहात होते.. मधुने आपला चेहरा त्यांच्याकडं उंचावला.. मराठेनी आपले तप्त ओठ.. तिच्या ओठावर ठेवले… दोन शरीरं एकमेकांत गुंतण्यासाठी धडपड करत होते.. पण क्षणाक्षणाला अंगात भडकणा-या अग्नीशिवाय काहीही होऊ शकत नव्हतं.. त्यासाठी रात्रीच्या ख-याखु-या अंधाराची वाट पहावी लागणार होती..

सिनेमा संपला आणि एकमेकांचा हात धरून ते बाहेर आले.. दुपारचे सव्वातीन वाजले होते.. ते पुन्हा हॉटेलात गेले.. दुपारचं जेवण उरकून बाहेर आले..

“आता… पुढे काय..?” मधुने विचारलं..

“मधु.. थिएटरमध्ये तू माझ्या हाताला धरून जिथं घेऊन गेली आहेस.. तिथुन पुढे लवकर जायचं आहे.. मला आता धीर धरवत नाही..”

एक मधाळ कटाक्ष टाकून ती म्हणाली..

“धीरज रखीए जनाब.. सब्र का फल मिठा होता है.. पण तू थांबणार नसशील तर.. मग चल तुझ्या घरी..”
“नको मधु.. आपण तुझ्या घरीच जाऊ..”

“मग त्यासाठी तुला संध्याकाळ पर्यंत थांबावं लागेल मेरी जान.. आता आपण चौपाटीवर जाऊ…”

दोघेही चौपाटीवर गेले.. इकडे तिकडे फिरुन ..एका ठिकाणी एका नारळाच्या झाडाला टेकून बसले.. सुर्यास्त झाला.. पाणी पुरी, भेळपुरी खाऊन आणि आइस्क्रीमचा आस्वाद घेतला.. हातात हात घालून समुद्राच्या वाळूत फेरफटका मारला..माणसांची गर्दी वाढली होती.. कुणी अंधारात , कुणी मऊसर वाळूत तर कुणी पाणी पुरीच्या गाडीवर आनंदाचे क्षण शोधत होता.. प्रत्येक जण आपापल्या जगात तल्लीन झाला होता.. कुणाची कुणाला पर्वा नव्हती…

साडे आठ वाजता त्यांनी चौपाटीचा निरोप घेतला.. मुख्य रस्त्यावर येऊन टॅक्सी पकडून साडे नऊ दहा वाजता मधुच्या फ्लॅट वर पोहचले.. दोन बेडरूमचा सुंदर फ्लॅट होता.. पण घरात कुणीच नव्हतं… दोघांनीही शॉवर घेतला.. चहा घेतला.. मधु म्हणाली..

“सो..माही… कसं वाटतंय.. माझी कंपनी कशी वाटली..?”.

“खूप छान.. खरं सांगायचं झालं तर.. आनंद शब्दात नाही सांगता येत . तो फक्त अनुभवायचा असतो..”
“अगदी बरोबर..पण त्या आनंदासाठी तुला थोडं थांबावं लागेल.. मी बाहेरून जेवण मागवते.. तोपर्यंत आपण ड्रिंक घ्यायचं.. मग उद्या सकाळी अकरा वाजेपर्यंत हा फ्लॅट आणि माझ्यावर तुझं राज्य.. तुला जे हवं ते सर्व कर.. आणि हो.. पैशाचं काय..ते आताच देऊन टाक.

मधु एक दारूची बाटली आणि दोन ग्लास घेऊन आली.. मराठेंनी तिला पंचवीस हजार रुपये दिले.. दारुची बाटली त्यांच्या पुढे ठेऊन म्हणाली..

“माही..मी फक्त तुला तुझा मूड सेट होण्यासाठी थोडी कंपनी देईल.. तु मात्र बिनधास्त हवी तेवढी घे.. भरपूर स्टॉक आहे.. “

“हे बरोबर नाही…थोडी कंपनी नाही चालणार.. अगदी बरोबरीने व्हायला पाहिजे..”

“अरे..पण अशाने आपण दोघेही झोपून जाऊ.. मग काय फायदा.. तुझ्या सेवेसाठी मला जागं रहावं लागेल.. तुला तुझं सुख मिळायला पाहिजे ना..”
“हो.. ते ही बरोबरच आहे.. ठीक आहे..तू म्हणशील तसं.. पण आजची रात्र अविस्मरणीय व्हायला पाहिजे.. पुन्हा कदाचित आपली भेट होईल की नाही कुणास ठाऊक..”
ड्रिंक करता करता.. जेवणं उरकली..मराठेंनी दोन बाटल्या संपवल्या होत्या.. मधु त्यांना घेऊन बेडरूममध्ये गेली..

मराठेंना जाग आली तेव्हा सकाळचे नऊ वाजले होते.. मधु आवरून हॉलमध्ये टी. व्ही. पहात बसली होती.. मराठेंनी तिला हाक मारली.. तेव्हा ती लगबगीने आली आणि म्हणाली…

“गुड मॉर्निंग माही.. कसं काय वाटतंय.. काय काय करत होतास रात्री .. बाप रे.. यार तू तो छुपा रुस्तम है.”
“का.. काय केलं मी..”

“माही.. मी नाही सांगणार.. मला लाज वाटतेय.. “
असं म्हणून तिने आपल्या हाताने तोंड झाकले आणि हॉलमध्ये पळाली..

मराठेनी आवरून चहा नाश्ता घेतला..मधुला मिठीत घेऊन तिचं एक दिर्घ चुंबन घेतलं.. आणि तिचा निरोप घेतला… एका व्यवहारापोटी तयार झालेलं नातं एक दिवसात संपलं होतं..

मधुला भेटून आल्यापासून मराठे आनंदात होते.. पारू येत होती. काम करून जात होती.. मराठे हॉलमध्ये बसून निवांतपणे मन लावून पेपर वाचत होते.. पारू कडे पहावं असं काही वाटत नव्हतं.. .

आठ दिवस गेले.. दुपारी एकच्या सुमारास बेल वाजली.. मराठे उठून बाहेर आले.. दार उघडलं.. हातात एक पाकिट धरून कुरिअरवाला उभा होता.. पाकिटावर त्यांचंच नांव आणि पत्ता होता.. त्यांनी सही करुन पाकिट घेतलं.. कुणी पाठवलं असेल ? नाव पण लिहिलं नव्हतं..

हॉलमधल्या सोफ्यावर बसून त्यांनी उत्सुकतेने पाकिट उघडलं.. पाकिटात काही फोटो होते.. फोटो पाहून त्यांना घाम फुटला.. घशाला कोरड पडली.. सर्व घर गरागरा फिरू लागलं..फोटो मधु आणि त्यांचे त्या रात्रीच्या प्रसंगाचे होते.. असं काही होईल याची त्यांनी कल्पना सुद्धा केली नव्हती..

संध्याकाळी सहाच्या सुमारास फोन आला.. फोन मधुचा होता.. मनात राग भरला होता.. समोर असती तर तिचा गळा दाबून जाब विचारला असता.. त्यांनी फोन घेतला…

“हाय..माही.. कसा आहेस.. कुरिअर मिळाले असेलच.. फोटो आवडले की नाही .. ते विचारण्यासाठी फोन केलाय..”

“यु…ss चिटर..मी जीव घेईन तुझा.” मराठेंना राग अनावर झाला होता..

“रिलॅक्स् माही.. ओरडून, रागवून काहीही होणार नाही.. आणि माझा गळा तू दाबूच शकणार नाही… कारण तुझा गळा माझ्या हातात आहे..”

“का केलंस असं.. ?”

“पैसा.. मिस्टर मराठे पैसा.. फोटो बरोबर एक अकाउंट नंबर दिला आहे.. गुपचूप ताबडतोब त्या अकाउंटला पाच लाख रुपये जमा कर.. नाही तर यातले निवडक सुंदर सुंदर फोटो तुझ्या सोसायटीच्या प्रत्येक मेंबरला पाठवीन..बघ विचार कर आणि काय करायचं लवकर ठरंव..सात वाजेपर्यंत पैसे मिळाले नाही तर.. कुरिअर रवाना झाले समज.. बाय..”

मधुचा फोन कट झाला.. पैसे देण्याशिवाय पर्याय नव्हता.. पोलिसात तक्रार करायची म्हटलं तर ते ही शक्य नव्हतं.. बदनामी होणार होती.. नाईलाज झाला आणि त्यांनी पाच लाख रुपये ट्रान्स्फर केले..

मधुला फोन करून सांगितलं.. सर्व फोटो परत करण्यास सांगितलं तेव्हा ती म्हणाली..

“मिस्टर मराठे.. हा पहिला हप्ता झाला आहे.. दोन दिवसांनी पुन्हा पाच लाख रुपये ट्रान्स्फर कर.. नाही तर कुरिअर तयार आहे…”
“नको.. करतो मी.. पण माझे फोटो मला परत दे.. मी तुला हात जोडून सांगतो..”

दोन दिवसांनी पुन्हा पाच लाख रुपये ट्रान्स्फर केले.. पण मधुचा व्यवहार पूर्ण होत नव्हता… तिने आता दहा लाख रुपयांची मागणी केली… मराठेनी फिक्स्ड डिपॉझीट सरंडर करून दहा लाख रुपये ट्रान्स्फर केले.. मग मात्र आठ दिवस मधुचा फोन आला नव्हता.. बरं झालं.. सुटका झाली म्हणून त्यांनी देवाचे आभार मानले..

पण तसं होणार नव्हतं.. मधुने पुन्हा एकदा फोन करून दहा लाख रुपयांची मागणी केली… मराठेंचं अकाउंट खाली झालं होतं.. त्यांनी मधुला पैसे नाहीत म्हणून सांगितलं..पण ती ऐकायला तयार नव्हती.. दोन दिवसांची मुदत देऊन तिनं फोन कट केला…

एका क्षणिक सुखाची त्यांनी फार मोठी किंमत मोजली होती.. आणि अजूनही चुकवावी लागणार होती.. सुधा आली तर बॅंकेत पैसे नसल्याचं तिला कळेल तेव्हा काय करायचं..? मधुला पैसे मिळाले नाही तर ती सोसायटीत सगळ्यांना फोटो पाठवील..

डोक्यात घणाचे घाव बसत होते.. त्यांनी दारूची बाटली काढली .. एक बाटली संपली… दुसरी संपली.. तिसरी संपली.. रात्र संपली… सकाळी पारु आली.. दारावरची बेल पुन्हा पुन्हा वाजवली… पण दार उघडले नव्हते.. तिनं बहादूरला सांगितलं… त्यानं सोसायटीच्या इतर मेंबर्सला सांगितलं.. सेक्रेटरीनं पोलिसांना फोन केला… अर्धा तासाने पोलिस आले… त्यांनी दरवाजा तोडला.. आणि पारूनं किंकाळी फोडली…
हॉलमधल्या फॅनला मराठेंचं प्रेत लटकत होतं..

–- राजेश जगताप

राजेश जगताप
About राजेश जगताप 9 Articles
मी एक नवोदित लेखक आहे. माझ्या कथा नियमितपणे "बोलती पुस्तके by Patil sir" या युट्यूब चॅनल वर ऑडिओ स्वरूपात सादर केल्या जातात.. माझे " विळखा The Trap " आणि " आनंदी " हे दोन कथासंग्रह प्रस्तावित आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..