नवीन लेखन...

रशियन कादंबरीकार लिओ टॉलस्टॉय

 

रशियन कादंबरीकार आणि विचारवंत लिओ टॉलस्टॉय यांचा जन्म ९ सप्टेंबर १८२८ रोजी झाला.

रशियन इतिहासातील टॉलस्टॉय उमराव घराण्यातील व्यक्तींमध्ये ते सर्वात प्रभावशाली असावेत.

दर्जेदार कादंबरीलेखनामुळे, विशेषकरून वॉर अँड पीस आणि आना कारेनिना या दोन अप्रतिम साहित्यकृतींमुळे टॉलस्टॉय महान साहित्यिक मानला जातात. या दोन्ही कादंबऱ्या आजतागायत सर्वोत्तम व वास्तववादी ललित साहित्याचा उच्च बिंदू मानल्या जातात. टॉलस्टॉय हे त्याच्या गुंतागुंतीच्या व विरोधाभासी सभावासाठीही तितकाच परिचित होते. १९७० नंतर त्यांची मते आदर्शवादी व निराकारी बनली आणि ते समाज प्रवर्तक गणला जाऊ लागला. त्यांची किंगडम ऑफ गॉड इज विदिन यू या लिखाणातून मांडलेल्या अहिंसक लढ्याबद्दलच्या संकल्पनेचा २० व्या शतकातील मोहनदास गांधी व मार्टीन लुथर किंग या थोर व्यक्तींवर प्रचंड प्रभाव पडला.

लिओ टॉलस्टॉय यांना महात्मा गांधींनी गुरुस्थानी मानले होते. अहिंसेचे तत्त्वज्ञान हा या दोघांना जोडणारा समान दुवा. अहिंसेच्या तत्त्वज्ञानाचा प्रसार जागतिक स्तरावर होण्याची निकड गांधीजींना वाटत होती. त्यासंबंधी त्यांनी टॉलस्टॉय यांच्याशी केलेल्या पत्रव्यवहारातून त्यांच्यात घनिष्ट नाते निर्माण झाले. थोर रशियन साहित्यिक, विचारवंत आणि ‘वॉर अॅयण्ड पीस’ या जगभर गाजलेल्या कादंबरीचे लेखक लिओ टॉलस्टॉय यांनी त्यांच्या जीवनाच्या अखेरच्या काळात (१९१० साली मृत्यू!) आपल्या रोजनिशीत पूर्वेकडील देशांविषयी- विशेषत: भारताबद्दल त्यांना असलेल्या उत्सुकतेविषयीच्या अनेक नोंदी करून ठेवल्या आहेत. भारतातील विविध धर्म आणि भारतीय तत्त्वज्ञान या वैशिष्टय़ांमुळे पूर्वेकडील अन्य देशांमध्ये त्यांचा जेवढा मित्रपरिवार नव्हता, तेवढा एकटय़ा भारतात होता. धर्म आणि तत्त्वज्ञान हे त्यांच्या आस्थेचे प्रमुख विषय होते. १९ व्या शतकाचा उत्तरार्ध आणि २० व्या शतकाच्या प्रारंभास भारतातील अनेक विचारवंत टॉलस्टॉय यांचा वैचारिक पाठिंबा मिळवण्यासाठी प्रयत्नशील होते. त्यात महात्मा गांधींचाही समावेश होता.

आपली नाळ भारतीय परंपरेशी खोल कुठेतरी जुळते आहे, अशा नोंदी टॉलस्टॉयनी केल्या आहेत. त्यांच्या रोजनिशीतील नोंदींनुसार, त्यांना वेद उत्तम प्रकारे अवगत होते. मॉस्कोपासून दोनशे कि. मी. अंतरावरील टॉलस्टॉय यांच्या ‘यासनाया पाल्याना’ या घरी त्यांच्या व्यक्तिगत ग्रंथसंग्रहात भारताविषयीच्या पन्नासेक पुस्तकांचा समावेश होता. त्यामध्ये ‘वेदांत दर्शन’, ‘भारतीय शाकाहारी का आहेत?’, ‘राम’, ‘आनंदपथ’ आदी पुस्तके आढळतात.

टॉलस्टॉय यांनी लिहिलेल्या अनेक कथांमध्ये वाचकाला भारताचे दर्शन घडते. कर्म, कृष्णचरित्र, भागवत, वेद, उपनिषदातील अनेक संदर्भ त्यांच्या कथांमधून आढळतात. रशियन मुलांसाठी त्यांनी लिहिलेल्या अनेक गोष्टींत भारतीय गोष्टींचा अंतर्भाव आहे. त्यात त्यांनी पात्रांची नावं रशियन ठेवून त्या रशियात लोकप्रिय केल्या. ‘राजा आणि हत्ती’, ‘आंधळा आणि दूध’, ‘म्हातारा आणि मृत्यू’ या त्यातल्या गोष्टींचा उल्लेख करावा लागेल. त्या काळात रशियात साक्षरतेचे प्रमाण वाढावे म्हणून त्यांनी मुलांसाठी एक साधी-सोपी पाठमाला तयार केली होती. त्यात त्यांनी वेद, उपनिषदांतील सूक्तांचा मोठय़ा प्रमाणात वापर केलेला आहे. भारतीय संस्कृतीचा एवढा प्रभाव त्यांच्यावर होता, की ते स्वत: शाकाहारी झाले आणि तसे इतरांनीही व्हावे यासाठी ते लोकांना आवाहन करत. चांगला समाज घडवायचा असेल आणि समाजात परिवर्तन घडवून आणावयाचे असेल तर समाजातील प्रत्येक व्यक्तीने सकारात्मकरीत्या बदलले पाहिजे यावर त्यांचा ठाम विश्वास होता. त्यामुळेच लेनिनने त्यांना ‘रशियन क्रांतीचा आरसा’ म्हणून संबोधले होते.

आश्चर्याची बाब म्हणजे टॉलस्टॉय आणि गांधीजी यांची ओळख फार उशिरा झाली. टॉलस्टॉय यांच्या जीवनाचे ते अखेरचे दिवस होते, तर गांधीजी तेव्हा खूप तरुण होते. गांधीजींच्या कर्तृत्वाला नुकतीच कुठे सुरुवात झाली होती. मात्र दोघांच्या विचारांत कमालीचे साम्य होते. टॉलस्टॉय यांच्याप्रमाणेच गांधीजीही धार्मिक मूल्यांकडे व्यापक दृष्टिकोनातून बघत असत. याबाबतची मतं दोघांनी वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या वयांत व्यक्त केलेली आहेत. दोघांनी वेगळे शब्द मांडले, वेगळी पुस्तकं लिहिली; मात्र ते एकाच विचाराने प्रेरित झाल्याचे जाणवते असे मत तज्ज्ञ, अभ्यासक व्यक्त करतात. या तत्त्वज्ञांनी आपले विचार अिहसेच्या मार्गातून मांडले आणि आपल्या महान कार्याने जनमानसावर अनमोल छाप पाडली. टॉलस्टॉय यांनी आपले अिहसेचे मत ख्रिस्तियन गॉसपेलमधून विकसित केले, तर गांधीजींनी हिंदू धर्माचा आधार घेत आपल्या विचारांना चालना दिली.

२० व्या शतकाच्या सुरुवातीला तरुण असलेल्या गांधीजींनी ऑक्टोबर १९०९ मध्ये टॉलस्टॉय यांना लंडनहून प्रथम पत्र लिहिले. त्यावेळी ते दक्षिण आफ्रिकेत स्थानिक भारतीयांसाठी तत्कालीन वर्णभेद कायद्याच्या अत्याचाराविरुद्ध तीव्र संघर्ष करत होते. या मानहानीकारक व भेदभाव करणाऱ्या कायद्याबाबत ब्रिटिश सरकारशी बोलणी करण्यासाठी गांधीजी लंडनला आले होते आणि तिथून त्यांनी टॉलस्टॉय यांना पत्र लिहिले. त्यात त्यांनी ट्रान्सवालमध्ये भारतीयांविरुद्ध होणारी क्रूर दडपशाही व अत्याचाराचे वर्णन केले होते. या लंडनवारीने ब्रिटिशांकडून कोणताही प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा नसली, तरीही लंडनच्या त्यांच्या या मिशनमुळे भारतीयांमध्ये निर्माण झालेली निराशा कमी होण्यास मदत होईल असा विश्वास त्यांनी पत्रात व्यक्त केला होता. त्याचप्रमाणे जागतिक स्तरावर अिहसेच्या मुद्दय़ाचा प्रसार करण्यासाठीही ही लंडन भेट सार्थकी ठरेल असे त्यांना वाटत असल्याचा उल्लेखही या पत्रात आहे. जागतिक स्तरावर अिहसेच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी आणि ही चळवळ मजबूत करण्यासाठी ‘अहिंसा सद्गुण’ (virtue of non-violence) या विषयावर जागतिक लेखनस्पर्धा घ्यावी असे त्यांना वाटत होते. परंतु अशा स्पध्रेच्या साध्यतेवर स्वत:च शंका उपस्थित करून त्याबाबतचे टॉलस्टॉय यांचे मत ते पत्रात विचारतात. जर यात काही चूक वाटत नसेल, तर या विषयावर आपली मतं मांडतील अशा जागतिक नेत्यांची नावं सुचविण्याची विनंतीही गांधीजींनी टॉलस्टॉय यांना पत्राद्वारे केली होती.

एका भारतीयाने अतिशय दूर, दक्षिण आफ्रिकेतील ट्रान्सवाल येथे सुरू असलेल्या संघर्षांबाबत पाठवलेल्या या पत्राची टॉलस्टॉय यांनी गंभीर दखल घेतली. या पत्राच्या लेखकाच्या भाषेवरून त्यांचा आध्यात्मिक अभ्यास असल्याची जाणीव त्यांना झाली. टॉलस्टॉय यांनी त्वरित उत्साह वाढवणारे पत्र गांधीजींना पाठवले. ब्रिटिश अधिकाऱ्यांसोबतची गांधीजींची बोलणी तेव्हा अयशस्वी झाली होती.

टॉलस्टॉय यांच्या त्वरित मिळालेल्या पाठिंब्यामुळे गांधीजी अतिशय आनंदित झाले. त्यांनी लगेचच दुसरे पत्र टॉलस्टॉय यांना पाठवले. ‘अशा प्रकारच्या प्रश्नांबाबत जगातील सर्वात प्रभावशाली व्यक्तिमत्त्व’ असे टॉलस्टॉय यांचे वर्णन गांधीजींनी या पत्रात केले आहे. टॉलस्टॉय आणि गांधीजी यांच्यातील पत्रव्यवहार पुन्हा नंतर सहा महिन्यांनी सुरू झाला. ४ एप्रिल १९१० ला गांधीजींनी टॉलस्टॉय यांना तिसरे पत्र लिहिले. या पत्राबरोबर त्यांनी ‘इंडियन होमरूल’ ही पुस्तिकाही टॉलस्टॉय यांना पाठवली होती. या पत्रात गांधीजींनी लिहिले होते, ‘‘तुम्हाला त्रास देण्याची इच्छा नाही. पण तुमची तब्येत बरी असल्यास आपण ही पुस्तिका जरूर चाळावी आणि त्यावर आपली प्रतिक्रिया द्यावी.’’ तसेच टॉलस्टॉय जर भारतीय वकिलाने काढलेल्या या निष्कर्षांचे समर्थन करत असतील, तर रशियन लेखकाच्या असलेल्या प्रभावाचा त्यांच्या (गांधीजींच्या) आंदोलनाला पाठिंबा मिळू शकतो का, अशी विचारणा पुढे या पत्रात करण्यात आली होती.

त्याचप्रमाणे गांधीजी टॉलस्टॉय यांच्या ‘द हिंदू’ या वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेल्या पत्राचे पुनर्मुद्रण त्यांच्याच संमतीने केल्याचे सांगतात आणि त्याच्याही काही प्रती या पत्राबरोबर पाठवत असल्याचा उल्लेख करतात. ‘हिंदू’- म्हणजेच त्यावेळच्या ‘फ्री हिंदुस्थान’ या वर्तमानपत्रात टॉलस्टॉय यांचे ‘मी शांत बसू शकत नाही..’ (‘I can not be silent’) या मथळ्याखाली पत्र प्रसिद्ध झाले होते. या पत्रानंतर टॉलस्टॉय यांच्या ‘यासनाया पाल्याना’ या निवासस्थानी भारतातून येणाऱ्या पत्रांचा ओघ प्रचंड वाढला. आणि नंतर या पत्रांना उत्तर म्हणून टॉलस्टॉयना भारतावर राज्य करणाऱ्या ब्रिटिश सरकारवर टीका करण्याचं प्रमुख कारण मिळालं. या पत्राच्या माध्यमातून टॉलस्टॉय भारतीय जनतेला संदेशही देऊ शकत होते. त्यांना मिळालेल्या असंख्य पत्रांना उत्तर म्हणून ते भारतीय जनतेला उद्देशून लिहितात, ‘‘पाश्चात्त्यांनी जे राज्य भारतीयांवर लादले आहे, त्याविरुद्ध भारतीयांनी विरोध करणे गरजेचे आहे. पाश्चात्त्यांच्या मोहिनीला न जुमानता नागरिकांनी एकत्र लढा दिला पाहिजे. भारत हा आध्यात्मिक अधिष्ठान लाभलेला देश आहे. अशा या बलशाली देशाचा कारभार भारतीयांशी धार्मिक आणि नतिक काहीही संबंध नसलेल्या परकीयांकडून चालवला जावा याबाबत खेद वाटतो.’’ ते पुढे म्हणतात, ‘‘जर भारतीयांनी आपल्या प्राचीन बुद्धिवंतांची शिकवण आचरणात आणली आणि त्यांच्यावर होणाऱ्या दडपशाहीचा तीव्र विरोध केला, तर जगातली कोणतीही शक्ती त्यांच्यावर राज्य करू धजावणार नाही. वाईटाचा प्रतिकार करता येत नसेल तर करू नका, परंतु त्यांना साथही देऊ नका. त्यांच्या प्रशासनातील जबाबदारी स्वीकारा; मात्र महत्त्वाचे म्हणजे त्यांच्या लष्करात सहभागी होऊ नका, म्हणजे जगात तुम्हाला कोणीही गुलाम बनवू शकणार नाही.’’ असा सल्ला टॉलस्टॉय भारतीयांना या पत्रातून देतात.

८ मे १९१० रोजी टॉलस्टॉयनी गांधीजींना त्यांच्या पत्राचे उत्तर दिले. गांधीजींनी पाठवलेल्या ‘इंडियन होमरूल’ या पुस्तिकेची प्रशंसा ते या पत्रात करतात. पण वयोमानानुसार आपण हे पत्र आपल्या सचिवाकडून लिहून घेत आहोत याबाबत खेदही व्यक्त करतात. नंतर गांधीजी ट्रान्सवाल येथील लढय़ाविषयी आपल्या पत्रात लिहितात. सरकारने भारतीयांना बेघर केल्याने आपल्या मित्राच्या फार्मवर ‘टॉलस्टॉय आश्रम’ उभारल्याची खबर टॉलस्टॉयना ते पत्रातून देतात. या पत्राचे उत्तर टॉलस्टॉय आपल्या सचिवाकडून लिहून घेतात. त्यात ते लिहितात, ‘वय झाल्याने मला वाटते, माझा अंतिम क्षण जवळ येतो आहे.’ परंतु अहिंसाच सर्वात महत्त्वाची असल्याचा पुनरुच्चार ते करतात. हे टॉलस्टॉय यांचे शेवटचे पत्र ठरले. त्यांच्या मृत्यूनंतर गांधीजींना ते मिळाले. ते पत्र गांधीजींनी आपल्या ‘इंडियन ओपिनियन’ या पत्रिकेत प्रसिद्ध केले. या पत्रिकेत १९०६ पासूनच्या दक्षिण आफ्रिकेतील आपल्या लढय़ाच्या सफलतेविषयी मत व्यक्त करून आणि त्यात टॉलस्टॉय यांचे छायाचित्र प्रसिद्ध करून त्याखाली त्यांनी शीर्षक दिले- ‘आमच्या आंदोलनाचा महान प्रेरणास्रोत!’ टॉलस्टॉय यांचे आपण शिष्य आहोत असे गांधीजी म्हणत असत. लिओ टॉलस्टॉय यांचे निधन २० नोव्हेंबर १९१० रोजी झाले.

— संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

संदर्भ. इंटरनेट / विद्या स्वर्गे-मदाने

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4156 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


 

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..