नवीन लेखन...

ऋजू स्वभावाचा बिहाग

खरतर संगीतात अनेक भावना आढळतात पण त्या भावनांचा शास्त्राशी संबंध जोडला तर हाताशी तसे फारसे लागत नाही. काहीवेळा असेच वाटते, केवळ काही स्वरांच्या साद्धर्म्याने विचार केला तर, काही भावना मनाशी येऊ शकतात तरीही, अखेर शास्त्रकाट्यावर तपासणी करता, सूर आणि भावना, याचे नेमके नाते जोडता येत नाही, हेच खरे. मग प्रश्न पडतो, राग आणि समय, किंवा राग आणि भावना, याला काय आधार आहे? हे सगळे केवळ “संकेत” असेच मानायचे का? तसे मानले तर, हे “संकेत” निर्माण करण्यामागे काय उद्दिष्ट असावे? आज वर्षानुवर्षे, बहुतेक रागांचे समय, त्याला लगडलेल्या भावना, याचा आपल्या मनावर परिणाम झालेला असतो, त्या परिणामाचा कार्यकारण भाव आणि संगती कशी लावायची? की पुन्हा कोऱ्या पाटीवर नव्याने धुळाक्षरे शिकायची? या प्रश्नांची उत्तरे तशी सोपी नाहीत पण, विचार करायला नक्की लावणारी आहेत.
मी, जेंव्हा “बिहाग” रागाला, “ऋजू” भावनेची जोड देतो तेंव्हा , माझ्या मनात पारंपारिक संकेत आणि त्याला जोडून आलेले विचार, याचेच प्राबल्य असते.आपल्याला बरेचवेळा, मी, कवी सुधार मोघ्यांच्या एका कवितेत वाचलेल्या ओळी आठवतात.
“शब्दांना नसते सुख, शब्दांना दु:खही नसते;
जे वाहतात ओझे, ते तुमचे माझे असते”!!
स्वरांच्या बाबतीत असाच विचार करणे योग्य आहे का? खरेतर स्वर म्हणजे निसर्गातील ध्वनी. त्यांना आपण, शास्त्राची जोड दिली आणि त्याला अभिजात स्वरूप प्रदान केले. याचाच वेगळा अर्थ, त्या स्वरांचे नैसर्गिकत्व कायम राखणे, हाच उद्देश असू शकतो. त्यावर मानवी भावनांचे आरोपण करणे, अन्यायकारक असू शकते. असे झाले तरी देखील, स्वरांच्या सान्निध्यात वावरताना, आपल्या मनात भावनांचे तरंग उमटत असतात, अगदी अनाहूतपणे, ही देखील वस्तुस्थिती आहे.
आरोही स्वरांत, “रिषभ” आणि “धैवत” वर्जित  असल्याने, “औडव” जातीचा राग तर पुढे अवरोहात हे दोन्ही वर्जित स्वर अस्पष्टपणे लावले जातात. पूर्वीच्या संदर्भात बघायला गेलो तर, या रागात, “मध्यम” फक्त शुद्ध स्वरूपात लावला जायचा परंतु आधुनिक काळात, “तीव्र मध्यम” उपयोगात आणला जातो. अर्थात, जेंव्हा हा स्वर लावला जोतो, तेंव्हा हा राह लखलखून समोर येतो. आरोहात “ग म प नी सां” ही स्वरसंगती या रागाची ठेवण दर्शवते. बहुतेक स्वर “शुध्द” स्वरूपात लावत असल्याने, या रागाला “ऋजू” स्वरूप प्राप्त झाले. आक्रमकता, या रागाच्या स्वभावाशी फटकून वागते. वास्तविक, “गंधार” आणि “निषाद” हे “वादी – संवादी” असले तरी देखील, “मध्यम” स्वराचा प्रयोग हेच वैशिष्ट्य मानले जाते. आता आपण, शास्त्राच्या अधिक आहारी न जाता, त्याच्या “ललित” स्वरूपाकडे वळूया.
उस्ताद रशीद खान यांनी गायलेली “मरे मन अटकाओ रे अली” ही बिहाग रागातली चीज ऐकण्यासारखी आहे . मुळात, या गायकाचा अत्यंत मृदू आवाज, त्यामुळे उपरिनिर्दिष्ट भावना, इथे अतिशय सुंदररीत्या सादर झाली आहे. स्वर उच्चारताना, त्याचा “स्वभाव” ओळखून, गायला गेला तर होणारे गायन, अधिक प्रभावी ठरते. रशीद खान, इथेच नव्हे तर एकुणातच “मंद्र सप्तक” किंवा “शुद्ध स्वरी सप्तक” गायन करतात. याचा एक परिणाम असा होतो, रसिकाला स्वराची “ओळख” करून घेता येते. ताना घेताना देखील, अति दीर्घ स्वरूपाच्या ताना टाळून, गायची पद्धत आहे, प्रसंगी तान  खंडित करून, दोन भागात तान, पूर्ण करण्याचा विचार दिसतो.सुरवातीला लावलेला अति खर्ज आणि त्यातून पुढे आवाजात आलेला मोकळेपणा, यामुळे ही रचना अधिक वेधक होते. कधीकधी तर, बंदिश, भावगीताशी दुरान्वये का होईना, पण नाते सांगते की काय? असा भास निर्माण करण्याइतकी जवळीक साधली जाते. या मागे अर्थात, जे रसिक, शास्त्रापासून दूर असतात, त्यांना देखील रंजक वाटावे, हा स्पष्ट विचार दिसतो. असे करताना देखील, आपण “बंदिश” गात आहोत, याचे भान कुठेही सुटलेले दिसत नाही आणि खरेच ही तारेवरची कसरत आहे.
“बोलिये सुरिली बोलियां
खट्टी मिठी आंखो से रसिली बोलियां”.
“गृहप्रवेश” चित्रपटात या रागावर आधारित अतिशय सुंदर गाणे आहे. “बोलिये सुरिली बोलीया” हेच ते गाणे. संगीतकार जयदेव यांची निर्मिती आहे. या संगीतकाराच्या बहुतांशी रचना या “गायकी” ढंगाच्या असतात आणि त्यामुळे गाताना, फार जपून, विचार करून गाव्या लागतात. रचनेतच, अनेक गुंतागुंतीच्या रचना करून, गायक/गायिकेच्या गळ्याची परीक्षा बघणाऱ्या असतात. गाण्यात, सरळ, स्पष्ट असा केरवा ताल आहे पण, ताल अत्यंत “धीमा” ठेवलेला. त्यामुळे कविता आणि गायन, याचा आपल्याला सुरेख आस्वाद घेता येतो.
गाणे जरा बारकाईने ऐकले तर ध्यानात येईल, गाण्यात काही ठिकाणी “बिहाग” दिसत नाही!! विशेषत: गाण्याचा पहिला अंतरा झाल्यानंतर, गाण्याची सुरवात ऐकताना, असे आढळून येते. हा संगीतकार किती कुशाग्र बुद्धिमत्तेचा होता, याचे हे एक उत्तम उदाहरण. गाण्यात, राग सादर करणे किब=नवा त्या रागाच्या सावलीत गाणे तयार करणे, यात तशी “निर्मिती” आढळत नाही कारण, गाण्याच्या चालीचा “नकाशा” तुमच्या समोर असतो आणि त्यानुरूप गाणे तयार करायचे, इतकेच तुमच्या हाती असते परंतु, प्रत्येक रागात, अनेक छटांच्या शक्यता आढळत असतात आणि हाताशी असलेल्या कवितेनुरूप, रागातील एखादी छटा, कवितेच्या आशयाशी जुळते आणि त्या छटेनुसार, पुढे चालीचा वेगवेगळ्या लयीच्या अंगाने विस्तार करायचा, ही या संगीतकाराची खरी खासियत होती आणि तीच इथे दिसून येते.
“तेरे सूर और मेरे गीत,
दोनो मिलकर बनेगी प्रीत”.
“गुंज उठी शहनाई” या चित्रपटात, खऱ्या अर्थात, “बिहाग” राहाची “ओळख” देणारे गाणे आपल्याला ऐकायला मिळते. “तेरे सूर और मेरे गीत”, हेच ते गाणे. मघाशी, मी या रागाचा स्वभाव “ऋजूतेशी” जोडला होता आणि या गाण्याच्या चाल्लीतून, नेमका तोच भाव दृग्गोचर होतो. संगीतकार वसंत देसायांची ही अजरामर कृती. लताबाईंच्या पहिल्याच आलापात हा राग समोर येतो. किती अप्रतिम लडिवाळ हरकत गायिकेच्या गळ्यातून निघाली आहे. या गाण्याची आणखी एक गंमत इथे मांडायची आहे. गाण्याच्या प्रत्येक कडव्यानंतर जे संगीत असते, ती खास ऐकण्यासारखे आहे. बासरीचे सूर सुरवातीला खंडित स्वरूपात येतात परंतु एका विविक्षित क्षणी त्याच बासरीच्या सुराने, लयीचे संपूर्ण “वर्तुळ” पूर्ण केले जाते. हा प्रकार वाटतो तितका सोपा नाही. गाणे “दादरा” या प्रचलित तालात बांधले आहे, गाण्याचा स्वभाव उत्फुल्ल आहे परंतु गाणे कुठेही आपली संयतशील मर्यादा सोडून भिरकटत नाही,
सगळे गाणे, एका सुंदर बंधनात बांधले आहे पण तरीही बंधनातीत आहे. लताबाईंची सुंदर गायकी आणि मुळात, गाण्यच्या चालीत असलेला “अश्रुत” गोडवा, यामुळे हे गाणे कधीही ऐकायला सुंदर वाटते.
“कोई गाता मैं सो जाता,
संस्कृती के विस्तृत सागर में
सपनो की नौका के अंदर
दुख सुख की लहेरो में उठ गिर,
बहाता जाता”.
काही वर्षापूर्वी “आलाप” नावाचा चित्रपट आला होता. त्यात, बिहाग रागाशी नाते सांगणारे एक गाणे आढळले. “कोई गाता मै सो जाता”. याची चाल ऐकतानाच अवघड आणि गायकी ढंगाची आहे, हे जाणवते. संगीतकार जयदेवने या गाण्याची “तर्ज” बांधली आहे. राग संगीताच्या असंख्य छटा कशा असतात, हे इथे बघता येईल. वरती, याच संगीतकाराने अगदी वेगळ्या धाटणीची चाल निर्माण केली आहे आणि इथे संपूर्ण वेगळी चाल!!
या गाण्यात मात्र, “तीव्र मध्यम” लागलेला दिसतो, जो मी वरती उद्मेखून मांडला आहे तरीही, हे गाणे, बिहाग रागाचे लक्षणगीत म्हणून मानणे कठीण आहे, इतके “तीरोभाव” या गाण्यात दिसतात.
या गाण्याची मजा म्हणजे, गाण्यात हा राग दिसत आहे, असे वाटत असताना, चाल वेगळे वळण घेते आणि ऐकणाऱ्याला आश्चर्यचकित करते. पहिल्या ओळीत राग सापडतो पण, लगेच पहिला अंतरा वेगळ्या सुरावर सुरु होतो, तिथेच चाल थोडी रेंगाळते आणि अंतरा संपत असताना, आपल्याला बिहाग परत भेटतो!! या गाण्यात अगदी दोष(च) काढायचा झाल्यास, गायक येशुदास याचे शब्दोच्चार. कित्येकवेळा, त्याच्या आवाजातील “दाक्षिणात्य” हेल बरेचवेळा कानाला खटकतात. अन्यथा हे गाणे अतिशय सुंदर आहे.
हे गाणे म्हणजे एक सुंदर कविता आहे – हरिवंश राय बच्चन यांची. वास्तविक हा कवी कधीही चित्रपटासाठी गाणी लिहिणारा नव्हता पण तरीही संगीतकार जयदेव यांनी, या कवितेतून गाण्याची शक्यता ओळखली आणि त्याला सूर अर्पण केले.
“तुज साठी शंकरा
भिल्लीण मी झाले”.
आपल्या मराठीत देखील या रागावर आधारलेली काही गाणी ऐकायला मिळतात. “चिमुकला पाहुणा” या चित्रपटात, असेच “गायकी” ढंगाचे अप्रतिम गाणे ऐकायला मिळते. “तुज साठी शंकरा” हे, संगीतकार स्नेहल भाटकर यांनी बनवलेले गाणे ऐका. ईश्वराची आळवणी आहे पण तरीही गाण्यात जबरदस्त गायकी आहे. पहिलीच ओळ बघा, “तुज” शब्द तसा खर्जात लावलेला आहे पण क्षणात “शंकरा” शब्दावर वरच्या सुरांत केलेली आलापी ऐकताना, आपण दिपून जातो आणि ही करामत लताबाईंची. खरतर, या गायिकेच्या गळ्याला कुठे “अटकाव” आहे, हा संशोधनाचा(च) विषय आहे. लयीची कितीही अवघड वळणे असू देत, गळ्यावर अशा काही पद्धतीने तोलून घेतली जातात आणि आपल्या समोर सादर होतात, की ऐकताना अविश्वसनीय वाटावे!!
खरेतर, बिहाग रागापासून, काही ठिकाणी फटकून, चाल वळणे घेत पुढे सरकते, इतकी की, काही ठिकाणी “मारुबिहाग” रागाची सावली आढळते. अर्थात, “मारुबिहाग” राग हा, “बिहाग” रागाच्या कुटुंबातला असल्याने, तसा फार फरक पडत नाही.
“पास रहते हुवे भी तुझसे बहुत दूर है हम,
किसे दर्द सुनाते है की मजबूर है हम,
तेरे प्यार मे दिलदार जो है मेरा हाल-ए-दिलदार
कोई देखे या ना देखे अल्ला देख रहा है”.
“मेरे महेबूब” या चित्रपटातील हे गाणे आहे. संगीतकार नौशाद यांची चाल आहे तर शकील बदायुनी यांची शब्दकळा आहे. खरेतर केवळ “बिहाग” रागाची संपूर्ण ओळख म्हणून या गाण्याची निवड करणे अवघड आहे पण चालीत रागाच्या भरपूर छटा आढळतात. अतिशय जलद लयीतील गाणे आहे, अर्थात चित्रपटातील नृत्यगीत असल्याने द्रुत लय असणे साहजिक ठरते. गाण्यात तसे फार काही असामान्य नाही तसेच गाण्यात नेहमीचा केरवा ताल वापरला आहे. असे असून देखील लताबाईंच्या वेधक गायकीने आपले लक्ष या गाण्याकडे वेधले जाते.
“मन हो राम रंगी रंगले,
आत्म रंगी रंगले
मन विश्वरंगी रंगले”.
भीमसेन जोशी यांनी अजरामर केलेली ही रचना. गोविंदराव टेंबे यांची शब्दकळा आहे. हे गाणे मात्र निखालस बिहाग रागाची ओळख करून देते, अगदी पहिल्या सुरापासून. पंडितजींचा जोमदार पण तरीही प्रसंगी हळवा होणारा आवाज असल्याने, गाण्याचा परिणाम आपल्या मनावर लगेच आणि दीर्घकाळ होतो. भजन गायकीला मैफिलीत मानाचे स्थान मिळवून देण्यात ज्या शास्त्रीय संगीत गायकांचा महत्वाचा वाटा आहे त्यात पंडित भीमसेन जोशी यांचे स्थान फार वरच्या क्रमांकाने ठेवावे लागेल.
— अनिल गोविलकर

Avatar
About अनिल गोविलकर 92 Articles
मी अनिल गोविलकर. उभरता लेखक असे म्हणता येईल. माझा ब्लॉग आहे – www.govilkaranil.blogspot.com ही वेबसाईट आहे. या वर्षी, माझ्या ब्लॉगला ABP माझा स्पर्धेत २रे पारितोषिक मिळाले आहे. तसेच "रागरंग" नावाचे पुस्तक – रागदारी संगीतावरील ललित आणि तांत्रिक, लेखांवर आधारित- प्रसिद्ध झाले आहे. मी १९९४ ते २०११, दक्षिण आफ्रिकेत नोकरीनिमित्ताने वास्तव्याला होतो. त्याचा परिणाम म्हणून त्या देशावरील ललित लेख – जवळपास ३५ ते ४० लेख लिहिले आहेत तसेच संगीतावर आधारित ( जागतिक स्तरावरील संगीत) १०० पेक्षा जास्त लेख लिहून झाले आहेत. काही आवडलेल्या पुस्तकांची परीक्षणे लिहिली आहेत .

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..